অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डाळिंबात आंबे बहाराचे व्यवस्थापन करा काळजीपूर्वक

डाळिंबामध्ये बहाराचे नियोजन काळजीपूर्वक करावे. आंबे बहारात कीड आणि रोगांचे प्रमाण कमी असते. उत्पादन चांगले मिळते. संरक्षित पाणी असल्यास आंबे बहार धरणे फायद्याचे ठरते.

डाळिंब हे पूर्णतः सदाहरित अथवा पूर्णतः पानझडी गटामध्ये मोडत नाही. डाळिंबाच्या झाडाला निर्सगतः वर्षभर फुले आणि फळे येत असतात. उत्तम दर्जाचे फळे आणि अधिक उत्पादन घेण्यासाठी योग्य तो बहार धरणे महत्त्वाचे आहे. डाळिंबामध्ये बहाराचे नियोजन करताना डाळिंब बागाईतदारांनी पुढील बाबी विचारात घ्याव्या.

  • ज्या भागात तेलकट डाग रोगाचे प्रमाण जास्त आहे, अशा भागात शक्‍यतो मृगबहार/पावसाळी घेऊ नये.
  • डाळिंबाचा पहिला बहार दोन वर्षांनंतरच धरावा.
  • वर्षांतून फक्त एकच बहार घ्यावा.
  • बहार घेतल्यानंतर बागेला 3 ते 4 महिने विश्रांती द्यावी.
  • आंबे बहार व्यवस्थापन

    डाळिंबामध्ये प्रामुख्याने मृग बहार, हस्त बहार आणि आंबे बहार असे तीन बहार घेतले जातात. आंबे बहारात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये फुले येतात. फळांची काढणी जून-ऑगस्टमध्ये येते. या बहारात भरपूर फुले येतात, फळांचा रंग आणि प्रत अतिशय चांगली असते. आंबे बहारात कीड आणि रोगांचे प्रमाण कमी अतिशय कमी असते. उत्पादन चांगले मिळते. संरक्षित पाणी असल्यास आंबे बहार धरणे फायद्याचे ठरते.

    ताण आणि पानगळ

    डाळिंबाला एकाच वेळी फुले आणि फळे येण्यासाठी झाडांना विशिष्ट कालावधीसाठी विश्रांती, पाणी तोडणे, पानगळ करून छाटणी करणे या बाबी महत्त्वाच्या असतात.

    • जमिनीच्या मगदुराप्रमाणे डाळिंबाच्या झाडांना किती दिवस ताण द्यायचा ते ठरवावे.
    • बहार धरताना साधारणतः जमीन जर हलकी असेल तर बहार धरण्याअगोदर 30-35 दिवस पाणी तोडावे.
    • तसेच मध्यम ते भारी जमिनीत 40-45 दिवस पाणी बंद करावे. झाडांना ताण दिल्यानंतर छाटणीच्या तीन आठवडे आधी 20 मिली इथेफॉन प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करून पानगळ करावी.

    छाटणी

    • डाळिंबात छाटणी न केल्यास फळे टोकाला लागतात. त्यामुळे पानगळ केल्यानंतर डाळिंबाची हलकीशी छाटणी करावी. छाटणी करताना रोगट, तेलकट डाग रोगाच्या फांद्या काढून टाकाव्यात. भरपूर सूर्यप्रकाश, हवा खेळती राहील आणि फळे सावलीत राहतील अशा प्रकारे छाटणी करावी. छाटणी करताना झाडाचा वरचा समतोल बिघडणार नाही याची काळजी घेऊनच छाटणी करावी.
    • आंबे बहारात प्रखर सूर्यप्रकाशामुळे फळांवर काळे डाग पडण्याची शक्‍यता असते. त्यासाठी झाडाच्या आतील भागात रिफिल व पेन्सिल काड्या ठेवून त्यावर फळे धरावीत. छाटणी केल्यानंतर लगेच 1 टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.

    अन्नद्रव्य व्यवस्थापन

    • माती परीक्षण करून डाळिंब झाडाच्या वयानुसार रासायनिक खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा.
    • डाळिंबाचा बहार धरताना प्रति झाड 20 किलो शेणखत, 2 किलो निंबोळी पेंड, 1 किलो गांडूळ खत, 25 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्लस, 15 ग्रॅम पीएसबी आणि 15 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर द्यावे.

    -- ---- -- ---- -- ---- खताची मात्रा प्रति झाड ---- -- ---- -- 
    जाडाचे वय (वर्ष) ---- शेणखत (किलो) ---- नत्र (ग्रॅम) ---- युरिया (ग्रॅम) ---- स्फुरद (ग्रॅम) ---- एसएसपी (ग्रॅम) ---- पालाश (ग्रॅम) ---- एमओपी (ग्रॅम) 
    1 ---- 10 ---- 250 ---- 540 ---- 125 ---- 800 ---- 125 ---- 200 
    2 ---- 20 ---- 250 ---- 540 ---- 125 ---- 800 ---- 125 ---- 200 
    3 ---- 30 ---- 500 ---- 1100 ---- 125 ---- 800 ---- 125 ---- 200 
    4 ---- 40 ---- 500 ---- 1100 ---- 125 ---- 800 ---- 250 ----400 
    5 व पुढील ---- 50 ---- 625 ---- 1400 ---- 250 ----1600 ---- 250 ---- 400

    • डाळिंबाच्या पूर्ण वाढ झालेल्या झाडांना 325-250-250 ग्रॅम नत्र - स्फुरद - पालाश पहिले पाणी देतेवेळी द्यावे.
    • उर्वरित नत्राची अर्धी मात्रा गाठ सेट झाल्यावर दोन ते तीन हप्त्यांत विभागून द्यावी. तसेच बहार धरतेवेळी 200 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेटची मात्रा द्यावी.
    • फळे लिंबू आकाराची असताना 500 ग्रॅम 18-46 आणि 100 ग्रॅम एमओपी द्यावा.
    • फळे पेरू आकाराची असताना 200 ग्रॅम 19-19-19 आणि 100 ग्रॅम एमओपी द्यावा.
    • झाडांच्या वाढीच्या अवस्थेनुसार 12-61-0, 19-19-19, 13-40-13, 13-0-45, 0-52-34 आणि0-0-50 या विद्राव्य खतांच्या ग्रेडचा वापर करावा.

    पाणी व्यवस्थापन

    डाळिंब हे उष्ण कटीबंधातील फळपीक असून, फार कमी पाणी लागते.

    • डाळिंबाचे झाड ताणावर असताना दीड महिना पाणी पूर्ण बंद करावे.
    • त्यानंतर ताण सोडताना डाळिंबाला पहिले पाणी पाच ते सहा तास ठिबक सिंचनने द्यावे.
    • डाळिंबाची बाग फुलोऱ्यात असताना बेताचे पाणी द्यावे.
    • गाठ सेठ झाल्यानंतर खालील वेळापत्रकाप्रमाणे पाणी द्यावे.

    येथे चौकट नं. 2 - compose/29-11-2014/agr-cs6 (a)
    महिना ---- लि/दिवस/झाड ---- महिना ---- लि/दिवस/झाड 
    जानेवारी ---- 17 ---- मे ---- 44 
    फेब्रुवारी ---- 18 ---- जून ---- 30 
    मार्च ---- 31 ---- जुलै ---- 22 
    एप्रिल ---- 40 ---- ऑगस्ट ---- 20
    डाळिंबाच्या झाडाला अति पाणी दिल्यास सूत्रकृमी, मर आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते.

    फळ काढणी

    शाश्‍वत डाळिंब उत्पादन घेण्यासाठी डाळिंब झाडाच्या वयाप्रमाणे फळांचे उत्पादन घ्यावे.

    • पूर्ण वाढ झालेल्या झाडाला 60 ते 80 फळे घ्यावीत.
    • डाळिंबाचे फळ पक्‍व झाले की टोकाकडील पुष्प पाकळ्या मिटतात. फळांचा गोलाकारपणा किंचित कमी होऊन फळांना चपटा आकार येतो.
    • साधारणतः फुलोऱ्यानंतर 150 ते 210 दिवसांनी आणि फळधारणेनंतर 120 ते 130 दिवसांनी डाळिंब काढणीस येतात.

     

    संपर्क - डॉ. संतोष मरभळ, 9405851848 
    02555-235555 
    (डाळिंब संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसार केंद्र, 
    लखमापूर, ता. सटाणा, जि. नाशिक.)

    स्त्रोत: अग्रोवन

    अंतिम सुधारित : 10/7/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate