অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जागतिक द्राक्ष बेदाणा समिती

जागतिक द्राक्ष बेदाणा समिती

डार्विनच्या "सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट' या नियमाप्रमाणे बदलत्या काळात तग धरण्यासाठी आपल्याला "फिट' राहण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. यासाठी जगभरात नित्यनेमाने बदलणाऱ्या शास्त्र, तंत्रज्ञानाचा सातत्याने वेध घेत पुढे जावे लागणार आहे आणि जमेची बाजू अशी, की यासाठी ध्येयवादी भारतीय तरुण शेतकऱ्यांची मानसिकता अतिशय आश्‍वासक आहे...सांगताहेत जागतिक द्राक्ष बेदाणा समितीचे अध्यक्ष, तसेच भारतीय द्राक्ष प्रक्रिया मंडळाचे अध्यक्ष जगदीश होळकर..

जागतिक द्राक्ष बेदाणा समिती'च्या स्थापनेमागील संकल्पना काय आहे

इंडियन ग्रेप प्रोसेसिंग बोर्डाचे काम एका महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच पुन्हा जागतिक द्राक्ष बेदाणा समितीवर काम करण्याची संधी मिळते आहे याचा आनंद तर आहेच; त्याहीपेक्षा "इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन इन वाइन ऍण्ड वाइनच्या (ओआयव्ही) जागतिक स्तरावरील 21 द्राक्ष व बेदाणा उत्पादक देशांचे प्रतिनिधित्व भारताकडे आले आहे. ही सर्वांत महत्त्वाची घटना मानायला हवी. अजूनही बऱ्याच प्रतिकूलता आणि काही भागांत तंत्रज्ञानाचे मागासलेपण असतानाच उत्पादकता आणि गुणवत्ता या बाबतीत द्राक्षशेतीत भारताने आदर्श निर्माण केला आहे. जागतिक दर्जाचे व्यवस्थापन करण्यात जिद्दी भारतीय द्राक्ष उत्पादक जगात पुढे असल्याचे चित्र दिसते आहे. यामुळे भारताचं जागतिक पातळीवर स्थान उंचावलेलं आहे. भारतीय द्राक्षांकडे सन्मानानं पाहिलं जात आहे. दोन वर्षांपूर्वी "ओआयव्ही'चे माजी महासंचालक डॉ. कॅस्टुल्यूसी भारतात नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान श्री. कॅस्टुल्यूसी व श्री. जॉन यांनी याबाबत स्वतःहून बेदाणा समितीच्या प्रतिनिधित्वाबाबत सुचविले होते. "ओआयव्ही'ने भारताला सदस्य करून घेणं आणि पुन्हा जागतिक द्राक्ष-बेदाण्याच्या समन्वयाची जबाबदारी आपल्यावर सोपवली जाणं, हे त्याचंच द्योतक आहे, असं मला वाटतं.

"ओआयव्ही'शी जोडले गेल्यामुळे भारतीय द्राक्ष उत्पादकाला याचा काय फायदा होणार आहे?


"ओआयव्ही'च्या अंतर्गत चार प्रमुख आयोगांवर (कमिशनवर) काम चालते. त्यात प्रामुख्याने सर्व प्रकारची द्राक्षशेती (विटीकल्चर), खाण्याची द्राक्षे (टेबल ग्रेप्स), बेदाणे (रेझीन्स) आणि वाइन यांचा समावेश होतो. यातील बेदाणा उत्पादनात पश्‍चिम आशियायी, पूर्व युरोपीय खंडातील अनेक देश अग्रेसर आहेत. भारत त्यांपैकी एक आहे. नवीन देशाकडे या विषयाचे नेतृत्व देण्यात यावे, जागतिक पातळीवर बेदाण्याची उत्पादकता, गुणवत्ता वाढावी, त्या दृष्टीने सर्वच दृष्टींनी "अटॅचमेंट' वाढावी, हा या समितीच्या स्थापनेमागचा उद्देश आहे.
द्राक्षे, बेदाणा आणि वाइन उत्पादन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या "ओआयव्ही' संस्थेचे जगातील 45 देश सदस्य आहेत. या संस्थेच्या अंतर्गत द्राक्षे आणि बेदाणा उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अमेरिका, तुर्कस्तान, चिली, अर्जेंटिना, इराण, इराक, अफगाणिस्तान, जॉर्डन तसेच आफ्रिका खंडातील देश आदी 21 देशांची समिती स्थापन करण्यात आली आहे. बेदाण्याची गुणवत्ता, उत्पादकता आणि स्टॅंडर्डायजेशन यावर विशेषत्वाने ही समिती काम करणार असून, याबरोबरच वैश्‍विक प्रमाणीकरण, द्वीपक्षीय सूचना, सुधारणा, पॅकेजिंग व्यवस्था, बेदाण्याच्या नवीन जाती, त्यांची टिकवणक्षमता, ग्राहक सुरक्षा त्या दृष्टीने ग्लोबल गॅप, वाइन गॅप, रेझीन गॅप या संदर्भात पाठपुरावा करण्यावर या समितीचा भर असणार आहे.
भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात दर वर्षी 6 लाख टन द्राक्षांचा बेदाण्यासाठी वापर होतो. दीड लाख टन बेदाण्यांची निर्मिती होते. 30 टक्के बेदाणे निर्यात होतात. द्राक्षशेतीतील हा पूरक उद्योग जागतिक स्तरावर "ओआयव्ही'शी जोडला गेल्यामुळे हा उद्योगवाढीच्या दृष्टीने भविष्यात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.''
चीन आणि भारत हे मोठी लोकसंख्या असलेले देश असल्यामुळे येथे बेदाण्यासारख्या उत्पादनांना मागणी मोठी आहे. मोठं भांडवली मार्केट म्हणून जग या देशांकडे पाहते आहे. या दृष्टीनं परस्पर लाभासाठी या देशांची इतर विकसित देशांबरोबर कनेक्‍टिव्हिटी होण्यावर भर दिला जात आहे. द्राक्षे, बेदाणा आणि वाइन या बाबतीत मोलाची भूमिका बजावत आहे. यापुढे तर ही भूमिका अधिक विकसित होत जाणार आहे, असंच दिसतंय.

जागतिक बेदाणा समितीचा मुख्य "अजेंडा' काय असेल?


द्राक्षात युरोप गॅप, ग्लोबल गॅप या संकल्पना आल्यानंतर भारतीय द्राक्षांचं मार्केट मोठ्या वेगानं युरोपीय देशांशी जोडलं गेलं. यातून "गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन आणि उत्पादन' ही संकल्पना पुढे आली. यामुळे नाशिक, सांगली जिल्ह्यांतल्या छोट्याशा गावातला शेतकरीही खऱ्या अर्थानं "ग्लोबल' झाला. केवळ बेदाण्यात हे काम तितकंसं अद्याप झालेलं नाही. जागतिक बेदाणा समितीच्या माध्यमातून हे काम प्राधान्यानं करायचंय..या सगळ्याचा सविस्तर आराखडा आम्ही बनवतोय..एवढं खरं, की यातून होणारं काम हे येत्या काळात द्राक्षशेतीला अजून वेगळं वळण देणार आहे. बेसिकली यातून बेदाण्यांच्या "अपडेटेड प्रॅक्‍टिसेस' वर अधिक भर देण्यात येणार आहे.

बेदाणा उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञान कसं आणता येईल?


मजूरटंचाई हा जगभरातील मोठा प्रश्‍न बनलेला असताना विकसित देशांतील पद्धतीनुसार बेदाणे सुकविणं, ते तयार होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर यांत्रिकीकरणाचा कसा वापर करता येईल, त्यासाठीचं कोणतं तंत्रज्ञान, कोणत्या देशात उपलब्ध आहे, ते आपल्याकडे कसं उपलब्ध होईल किंवा त्याचा आपल्या भारतीय वातावरणात कसा वापर करून घेता येईल, या दृष्टीनं या क्षेत्रातील तज्ज्ञ, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांच्यात होणाऱ्या चर्चेवर अधिक भर द्यायचं येत्या काळात ठरवलं आहे. "ओआयव्ही'च्या निमित्तानं ही जगाची खिडकी आपल्यासाठी खुली झालीय. द्राक्षं आणि बेदाण्याचं उत्पादन घेताना आपण या क्षेत्रातील 21 प्रगतशील देशांबरोबर जोडले गेले आहोत. जगभरातील अद्ययावत अशा तंत्रज्ञानाची या निमित्तानं देवाण-घेवाण होणार आहे. बरं, हे तंत्रज्ञान काही केवळ उत्पादनाचंच असणार नाही. बेदाण्यात चांगले परिणाम देणारे नवीन वाण, नवीन दमदार रुटस्टॉक, बेदाण्याची टिकवणक्षमता, प्रतवारी, पॅकिंगमधील नवीन तंत्रज्ञान या बाबतीतही आपल्याला पुढचं पाऊल टाकावं लागणार आहे.

जागतिक बाजारात भारतीय बेदाण्याचं स्थान कसं उंचावता येईल?


सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकाची गरज आणि ग्राहकाची बदललेली मानसिकता याचा अभ्यास करून उत्पादनाकडे लक्ष द्यावं लागणार आहे. जगभरात बाजाराचं क्षितिज प्रचंड विस्तारलेलं आहे. ते अजून विस्तारत जाणार आहे. मात्र बाजाराची गरज काय, हे अगोदर लक्षात घ्यावं लागेल. तुर्कस्तान असो की अमेरिका, इथं लांबट आकाराच्या बेदाण्याला मागणी असते, तर इंग्लंड, इटली, जर्मनी येथे गोल आकाराच्या बेदाण्याला ग्राहकांची पसंती असते. शिवाय बियांसहित(सीडेड) आणि बियांविरहित (सीडलेस) द्राक्षं यांचेही ग्राहक वेगवेगळे आहेत. पुन्हा रंगाबाबत सांगायचं तर काळा, हिरवा, सोनेरी हेही मागणीचं वेगळेपण आहे, ते लक्षात घ्यावंच लागेल. यासाठी "मार्केट रिसर्च' खूप महत्त्वाचा ठरणार आहे. यावर या माध्यमातून काम करायचं आहे.

बेदाणा उत्पादनासमोरील आव्हानांवर कशी मात करता येईल?


बेदाण्याच्या गुणवत्तापूर्ण निर्मितीपासून ते बेदाणा प्रत्यक्ष खाणाऱ्या ग्राहकांपर्यंतची "व्हॅल्यू चेन' सशक्त आणि पारदर्शक ठेवणं, ही काळाची गरज बनली आहे. या साखळीतील जो अंतिम टोकाकडील ग्राहक- ज्याला "एंड यूजर' म्हटलं जातं, त्याचं समाधान (ऍप्रिसियएशन) हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. पारंपरिक द्राक्षशेती याचा आपण इतका विचार केला नाही. जगभरात तो केला जातोय. या स्पर्धेत टिकण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी आपल्याला बदलावं लागणार आहे.
डार्विनच्या "सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट' या नियमाप्रमाणे बदलत्या काळात तग धरण्यासाठी आपल्याला "फिट' राहण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. यासाठी जगभरात नित्यनेमानं बदलणाऱ्या शास्त्र, तंत्रज्ञानाचा आपल्याला सातत्यानं वेध घ्यावा लागणार आहे. जमेची बाजू अशी, की यासाठी भारतीय तरुण शेतकऱ्यांची मानसिकता अतिशय आश्‍वासक दिसते आहे.

बेदाणा एक पूर्ण अन्न!


जागतिक आरोग्य संघटनेनं बेदाण्याला "कम्पलीट फूड' म्हणजे "पूर्ण अन्न' म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळेच जगभरात ड्रायफ्रूटमध्ये अग्रक्रमानं "बेदाणा' घेतला जातो. संपूर्ण सकस असलेल्या बेदाण्यातून नैसर्गिक पद्धतीनं मानवाला आवश्‍यक कॅलरी मिळतात. शास्त्रीय, वैद्यकीय दृष्टिकोनातूनही कितीतरी जमेच्या बाजू बेदाण्याच्या आहेत. याचा नियमित आहारात वापर वाढविण्याच्या दृष्टीनं जागरुकता निर्माण केली तरी एक शेती उत्पादन म्हणूनही बेदाण्याचं मार्केट अजून भरपूर उंचावणार आहे. 

संपर्क : 8390151028

------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन


अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate