অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

द्राक्ष उत्पादनात पानांचे महत्त्व

पानांच्या वयानुसार प्रकाशसंश्‍लेषणाची क्षमता पाहिली असता असे दिसते, की पान उघडल्यापासून 30 दिवसांपर्यंत ही क्रिया वाढत जाते. 40 दिवसांपर्यंत स्थिर राहून नंतर 70 दिवसांपर्यंत ती पुन्हा कमी होत जाते. पानांची वाढ होत असताना हरितद्रव्याच्या वाढत जाणाऱ्या प्रमाणामुळे अन्ननिर्मिती वाढत जाते व साधारणतः दोन ते तीन आठवडे कायम राहते.

पानांमधील प्रकाशसंश्‍लेषणावर ते कोणत्या हंगामातील आहे, यावरही प्रकाश संश्‍लेषणाचा दर अवलंबून असतो. कारण प्रत्येक परिस्थितीत वातावरणाचा परिणाम वेगळा होत असतो, तसेच सोर्स-सिंकचे प्रमाण वेगळे असू शकते.

पानांची कार्यक्षमता

  1. पानांमधील पाण्याचे प्रमाण अन्ननिर्मितीचे कार्य नियंत्रित करते. मुख्यत्वे पर्णरंध्रांची उघडझाप पाण्याच्या उपलब्धतेनुसार अवलंबून असते. वेलीने शोषलेल्या एकूण पाण्यापैकी फक्त एक टक्का पाणी प्रत्यक्ष अन्ननिर्मितीसाठी वापरले जाते. उरलेले 99 टक्के पाणी उत्सर्जनावाटे बाहेर टाकले जाते. बाष्पोत्सर्जनाचे प्रमाण पाण्याच्या उपलब्धतेपेक्षा जास्त झाल्यास पानांमध्ये पानांचा ताण निर्माण होतो. यावर मात करण्यासाठी पर्णरंध्रे बंद होतात, उत्सर्जन कमी केले जाते व पुन्हा पाण्याचे प्रमाण वाढल्यानंतर हे कार्य पूर्ववत होते. या सर्व क्रियेमधून प्रत्यक्ष अन्ननिर्मितीवर देखील परिणाम होतो.
  2. बऱ्याच वेळा पाण्याचा ताण लवकर पूर्ववत न होता बराच काळापर्यंत कायम राहतो. या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी ऍबसिसिक आम्लाची निर्मिती होते, त्यामुळे पाण्याची उपलब्धता पूर्ववत झाल्यानंतर लगेचच प्रकाश संश्‍लेषण पूर्ववत होत नाही, तर ऍबसिसिक आम्लाची मात्रा कमी झाल्यानंतर काही काळाने ही प्रक्रिया पुन्हा कार्यक्षमतेने सुरू होते. हा कालावधी काही दिवसांचा असू शकतो, त्यामुळे अन्ननिर्मिती कार्यक्षमतेने होत राहण्यासाठी वेलीस पाण्याचा ताण पडू नये याची काळजी घ्यावी. यामध्ये खोलवर मुळांची वाढ होणाऱ्या खुंटांचा वापर फायदेशीर ठरतो.

प्राणवायू व कर्बवायू यांचा अन्ननिर्मितीवर परिणाम

वातावरणातील या घटकांचा प्रत्यक्ष अन्ननिर्मितीवर परिणाम होत असूनही, सामान्यतः आपण त्याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवू शकत नाही; परंतु काही ठिकाणी अलीकडे बागेवर तसेच शेताच्या बाजूने प्लास्टिक कागदांचा वापर केला जातो. अशा ठिकाणी रात्रीतील श्‍वसनामधून निर्माण झालेला कर्बवायू वेलीच्या भोवती कोंडून राहतो.

दिवसा सूर्यप्रकाशामध्ये कर्बवायूच्या अधिक प्रमाणामुळे अन्ननिर्मिती अधिक क्षमतेने होते. पॉलिहाऊसमध्ये लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या किंवा फुलांच्या बाबतीत अशाच प्रकारे तापमान सूर्यप्रकाश व कर्बवायूच्या वाढलेल्या प्रमाणाचा उपयोग प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया वेगाने होण्यासाठी केला जातो. त्यामुळे भविष्यामध्ये उपलब्ध सूर्यप्रकाश व कर्बवायूचा अधिक क्षमतेने वापर करून घेण्यामध्ये "प्लास्टिक कल्चर' तंत्रज्ञानाचा वापर विचारात येऊ शकतो.

फवारणीचा अन्ननिर्मितीवरील परिणाम

द्राक्षवेलीवर अनेक प्रकारची बुरशीनाशके, कीटकनाशके फवारली जातात. यापैकी काही द्रावणांमुळे पानांपर्यंत सूर्यप्रकाश पोचण्यास अडथळा निर्माण होतो व त्याचा अन्ननिर्मितीवर काही प्रमाणात दुष्परिणाम होतो. सामान्यतः "वेटेबल पावडर' स्वरूपातील रसायनांचा अशाप्रकारचा परिणाम आपल्याला प्रत्यक्षपणे द्राक्षवेलीवर दिसून येतो.

ऍन्टिस्ट्रेस या विद्राव्य पॉलिमर प्रकारच्या घटकाचा प्रकाश संश्‍लेषणावर काही परिणाम न होता रोगांना अटकाव होतो, तसेच उर्त्सजन काही प्रमाणात कमी होऊन ताण परिस्थितीत अन्ननिर्मिती कायम राखण्यास मदत होते.

संजीवकांच्या वापराचा अन्ननिर्मितीवर परिणाम

"सी विड एक्‍स्ट्रॅक्‍ट'च्या दोन मि.लि. प्रति लिटर या फवारणीचा चांगला परिणाम पाहावयास मिळतो. पांढऱ्या मुळीची वाढ होत राहिल्यास वेलीअंतर्गत सायटोकायनीनची पातळी चांगली राहते, त्यामुळे पानांचे कार्य सुरळीत होते. मुळांच्या कार्यक्षेत्रात ह्युमिक ऍसिड सी वीड एक्‍स्ट्रॅक्‍ट, तसेच स्लरी वापरल्यास मुळांची वाढ होण्यास मदत होते. यापूर्वीच्या लेखात आपण आच्छादनाचे फायदे पाहिले आहेत. मुळांच्या वाढीसाठी आच्छादनाचा वापर करावा. अनेक वेळा अति काळजीमुळे जास्त प्रमाणात टॉनिकवर्गीय संजीवकांच्या फवारण्या केल्या जातात. त्याचा दुष्परिणाम होऊन पाने कडक होतात व ती फाटण्याचा संभव असतो. अशी पाने पूर्ण क्षमतेने अन्ननिर्मिती करू शकत नाहीत.

तापमानाचा अन्ननिर्मितीवरील परिणाम

प्रकाश संश्‍लेषण क्रियेमध्ये प्रकाशाधारित रासायनिक क्रियांबरोबरच जैव रासायनिक प्रक्रिया सुरू असतात, त्यामुळे तापमानाचा परिणाम प्रकाश संश्‍लेषणावर होत असतो. यामध्ये तापमानानुसार परिस्थितीचा विस्तार तीन प्रकारांत करता येऊ शकतो. 
  1. आवश्‍यकतेपेक्षा कमी,
  2. आवश्‍यक व
  3. अति जास्त.

प्रकाशसंश्‍लेषणाची क्रिया 25 ते 30 अंश से. तापमानात चांगली होत असते; परंतु हेच तापमान द्राक्षाच्या इतर वाढीस योग्य असते असे नाही. प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया 30 अंश से.पेक्षा जास्त तापमानात मंदावते व 45 अंश से. तापमानास ती शून्य होते. सामान्य परिस्थितीमध्ये पूर्णपणे सूर्यप्रकाशात असलेल्या वेलींच्या पानांचे तापमान हवेच्या तापमानापेक्षा 0.5 अंश से. ते पाच अंश से. फरकाने असू शकते.

विस्तार व्यवस्थापनाचा अन्ननिर्मितीवरील परिणाम

वेलीवरील फुटी व पानांच्या संख्येमध्ये, तसेच रचनेमध्ये इच्छित बदल घडवून आणल्याने प्रकाश संश्‍लेषणाच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा होते, किंबहुना विस्तार व्यवस्थापनाचे प्रथम ध्येय हे वेलीची अन्ननिर्मितीची प्रक्रिया वृद्धिंगत करून एकंदर उत्पादन वाढविणे हेच असते. त्यामुळे पानांची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने उपलब्ध सूर्यप्रकाशाचा पुरेपूर वापर करून घेणे आवश्‍यक ठरते.

प्रकाश संश्‍लेषणाचा दर अभ्यासता सावलीतील पानांमधील दर 25 ते 50 टक्‍क्‍यांनी कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जास्तीच्या कॅनोपीमुळे पाने एकमेकांवर आडवी आल्यामुळे तळातील पानांपर्यंत सूर्यप्रकाश पोचू शकत नाही, त्यामुळे खालची पाने पिवळी होतात. अशी पाने अन्ननिर्मिती करू शकत नाहीत. वेलीवर ती परजीवी म्हणूनच वाढत असतात. अशी पाने काढून टाकावी.

अशी परिस्थिती सर्वसाधारणपणे बावर प्रकारच्या वेल विस्तार व्यवस्थापनात आढळून येते. म्हणूनच पानांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी वेलीचे विस्तार व्यवस्थापन हे सर्वाधिक उपयुक्त भौतिक माध्यम आहे. पानांच्या अन्ननिर्मितीवर परिणाम करणाऱ्या या सर्व घटकांचा विचार करून अधिकाधिक उत्पादनासाठी त्यांचा उपयोग करून घेणे शक्‍य होते. 

संपर्क : डॉ. रामटेके - 9422313166
(लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 8/7/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate