অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

संत्र्याच्या मृगबहराचे नियोजन

संत्र्याच्या मृगबहराचे नियोजन

संत्र्याच्या मृग बहराचे नियोजन करताना जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडाला माफक ताण द्यावा. मृगबहर येण्याच्या कालावधीत अपुरा पाऊस झाल्यास त्वरित ओलीत करावे. बहर धरण्याच्या कालावधीत बागेत जमिनीच्या मशागतीची कामे करू नयेत. शिफारशीनुसार खत आणि ओलीत व्यवस्थापन करावे. सेंद्रिय खताचा नियमित वापर करावा.
- डॉ. शंशाक भराड, डॉ. प्रकाश नागरे, डॉ. उज्ज्वल राऊत

साधारणतः फळझाडांना ऋतू बदलताना नवीन पालवी फुटण्यास सुरवात होते. या नवीन पालवीस नवती असे संबोधण्यात येते. ही नवती वर्षातून तीन वेळा म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी, जून-जुलै आणि सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यांत येते. त्याचप्रमाणे संत्र्यालासुद्धा वर्षातून तीन वेळा नवती येते. या नवतीसोबत फुलेसुद्धा येतात; परंतु प्रामुख्याने ही फुले दोन वेळा येतात. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येणारी फुले आंबिया बहाराची, तर जून-जुलैमध्ये येणारी फुले मृगबहाराची असतात.

झाडे जमिनीतून मिळणारे अन्नद्रव्य आणि पाणी सतत शोषून घेत असतात. यामुळे झाडांची वाढ सारखी सुरू असते. संत्रा झाडाला बहार घेण्याकरिता या क्रियेत अडथळा निर्माण करून झाडाची वाढ थांबवून झाडास विश्रांती द्यावी लागते. त्यामुळे संत्रा झाडाच्या वाढीकरिता लागणारी अन्नद्रव्ये वाढीकरिता खर्ची न होता या अन्नद्रव्यांचा संचय झाडाच्या फांद्यामध्ये प्रमाणबद्ध झाल्यावर पोषक हवामान मिळताच बहाराची फुले नवीन नवतीसोबत दिसू लागतात.

मृगबहार न येण्याची कारणे

अयोग्य जमिनीमध्ये झालेली लागवड


  • विदर्भात मोठ्या प्रमाणात संत्राबागा या भारी जमिनीमध्ये आहेत. या भारी जमिनीमध्ये ६० ते ९० सें.मी. खोलीपर्यंत चिकणमातीचे प्रमाण ६० ते ७२ टक्के आहे. तसेच मुक्त चुनखडीचे प्रमाण १० पेक्षा जास्त आहे. भारी जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही. पाणी साचून राहते. त्यामुळे तंतुमय मुळे कमजोर होऊन सडतात आणि अन्नद्रव्याचा पुरवठाही नियमित होत नाही.
  • भारी जमिनीत ओलावा कमी झाल्यास मातीचे कण आकुंचन पावतात, जमीन कडक व घट्ट होते. ओलावा भरपूर असल्यास जमीन फुगते. याचा परिणाम मुळावर होतो. तंतुमय मुळे तुटतात. यामुळे झाडाचा ऱ्‍हास होतो.
  • मृगबहारासाठी झाडाला उन्हाळ्यात पाण्याचा ताण देणे जरुरी असते. भारी जमिनीत झाडाला योग्य ताण बसत नाही. कारण भारी जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे ताणाच्या कालावधीत भारी जमिनीमध्ये ६० ते ९० सें.मी. खाली उपलब्ध असलेल्या ओलाव्याचा पुरवठा झाडाला होतो. त्यामुळे योग्य ताण बसत नाही आणि त्याचा परिणाम मृगबहार न येण्यावर होतो.
  • जमिनीमध्ये मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे संत्रा झाडाला लागणारी अन्नद्रव्ये तयार होण्यास अडथळा निर्माण होतो. याचासुद्धा मृगबहार न येण्यावर परिणाम होतो.

प्रतिकूल हवामान

  • मृगबहार येण्याकरिता जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा दुसरा आठवडा या कालावधीत संत्राबागेतील जमिनीमध्ये भरपूर ओलावा असणे आवश्‍यक आहे. या कालावधीत किमान २०० ते २५० मि.मी. पाऊस पडलेला असावा. जर या कालावधीत पाऊस १५० मि.मी. कमी पडल्यास बहार येण्यामध्ये अडचणी निर्माण होतात.
  • मृग नक्षत्राचे पहिले एक-दोन पाऊस जोराचे असावेत. तसेच या कालावधीत ढगाळ वातावरण राहून ५ ते ६ दिवसांची पावसाची झड असावी. हवेतील आर्द्रता ८० ते ९० टक्के असणे जरुरी आहे. सरासरी तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस असावे, अशा अनुकूल हवामानात संत्र्याला मृगबहार येतो. परंतु ही अनुकूल परिस्थिती हवामानबदलामुळे गेल्या काही वर्षांपासून उपलब्ध होत नाही.

झाडाला देण्यात येणारा अयोग्य ताण


  • मृगबहाराची फुले येण्याकरिता संत्रा झाडाला उन्हाळ्यात पाण्याचा ताण द्यावा लागतो. पाण्याच्या ताणाचा कालावधी जमिनीचा मगदूर, झाडाचे वय आणि स्थानिक तापमान यावर अवलंबून आहे. झाडाला बसलेल्या योग्य ताणामुळे झाडाची वाढ थांबून झाडाच्या पानात, फांद्यात कर्ब व नत्र हे प्रमाणबद्ध होतात आणि अनुकूल परिस्थिती मिळताच मृगाच्या पहिल्या पावसानंतर मृगबहाराची फुले दिसतात. हा पाण्याचा ताण उन्हाळ्यात अकाली पाऊस आल्यामुळे बसत नाही. त्यामुळे मृगबहाराची फुले येत नाहीत.
  • योग्य ताण बसलेल्या झाडाची पाने कोमेजतात, सुकतात, खालच्या बाजूने वाकतात आणि काही प्रमाणात पानाची गळसुद्धा होते. हा माफक ताण भारी जमिनीत लागवड केलेल्या संत्रा झाडांना बसत नाही. त्यामुळेसुद्धा मृगबहार येत नाही. संत्रा झाडाला माफक ताण बसण्याचे लक्षण पानांमध्ये उपलब्ध असलेले पाण्याच्या प्रमाणावरूनसुद्धा ठरविता येते. पानामध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त पाण्याचे प्रमाण असल्यास झाडाला योग्य ताण बसत नाही. तर ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास तीव्र ताण बसलेला असतो.

झाडाचे खालावलेले प्रकृतिमान


  • संत्राबागेपासून अपेक्षित उत्पादन न मिळाल्यामुळे काही बागायतदार बागेची योग्य निगा राखत नाहीत. काही संत्राबागा दुर्लक्षित आहेत. त्यात मशागतीचा अभाव आढळतो. उदा. सल न काढणे, शिफारशीनुसार खतमात्रा न देणे, ओलिताचा अभाव, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, या कारणांमुळे संत्राझाडाचे प्रकृतिमान खालावते, अशा झाडावर मृगबहार येत नाही.

मृगबहार येण्याकरिता उपाययोजना

जमिनीचा पोत सुधारणे


  • संत्रालागवड ही मध्यम पोताची १ ते १.५ मीटर खोलीची उत्तम निचरा होणारी आणि चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जमिनीमध्ये केलेली असावी. परंतु भारी जमिनीमध्ये संत्रालागवड झालेली असेल, तर त्या जमिनीचा पोत सुधारण्याकरिता भरपूर सेंद्रिय खतांचा वापर दर वर्षी करावा.
  • दर वर्षी प्रत्येक संत्राझाडाला ४० ते ५० किलो शेणखत आणि ७.५ किलो निंबोळी ढेप आळ्यातील जमिनीत मिसळून द्यावी. संत्राबागेत हिरवळीची खते उदा. बोरू पेरून फुले येण्यापूर्वी गाडावा. झाडाच्या वाफ्यात वाळलेल्या गवताचे आच्छादन करावे. त्यामुळे जमिनीतील सूक्ष्म जीव सक्रिय होऊन अन्नद्रव्ये मुळांना सहज उपलब्ध होतात.
  • ८ ते १० किलो ट्रायकोडर्मा ५० ते ६० किलो शेणखतात मिसळून एक हेक्टर बागेतील मातीत मिसळून द्यावे.
  • बागेत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याकरिता उताराच्या दिशेने दोन झाडांमध्ये चर खोदून पाणी बागेच्या बाहेर काढावे.

झाडांना योग्य ताण देणे


संत्राबागेला मृगबहर येण्याकरिता पाण्याचा ताणाचा कालावधी जमिनीच्या मगदुरावर अवलंबून आहे. मध्यम पोताची १ ते १.५ मीटर खोलीच्या जमिनीमध्ये लागवड केलेल्या बागेला ५० दिवसांचा ताण मृगबहर घेण्याकरिता योग्य आहे. हलक्या जमिनीमध्ये १५ ते २० दिवसांच्या ताणानेसुद्धा संत्रा बागा मृगबहाराने बहरल्याचे दाखले आहेत. तसेच भारी जमिनीमध्ये लागवड केलेल्या संत्राबागेला ६० ते ७० दिवसांचा ताण देऊनसुद्धा मृगबहार न आल्याचे आढळले. मध्यम, उत्तम निचऱ्‍याच्या जमिनीमध्ये लागवड केलेल्या ३० दिवसांच्या पाण्याचा ताण देणे योग्य ठरेल.

खत व्यवस्थापन


मृगबहर येण्याकरिता प्रति झाडास ५० किलो शेणखत उन्हाळ्यात जमिनीत मिसळून वखरणी करावी, जून महिन्यात मृगाचा पहिला पाऊस पडल्यानंतर ताण तोडते वेळी प्रति झाडास ६०० ग्रॅम नत्र अधिक ४०० ग्रॅम स्फुरद अधिक ४०० ग्रॅम पालाश अधिक ७.५ किलो निंबोळी ढेप द्यावी. संत्रा बागेतील जमिनीत जस्ताची कमतरता असल्यास या खताच्या मात्रे सोबत झिंक सल्फेट २०० ग्रॅम प्रति झाड मातीत मिसळून द्यावे. उरलेली नत्राची अर्धी मात्रा फळे वाटाणा एवढ्या आकाराची (६०० ग्रॅम) झाल्यावर किंवा फळधारणा झाल्यावर १.५ ते २ महिन्यांनी ऑगस्टमध्ये द्यावी.

मृगबहाराकरिता ओलीत व्यवस्थापन


-मृगबहाराची फुले येण्याकरिता संत्राबागेत जून-जुलैमध्ये जमिनीत भरपूर ओलावा जरुरी आहे. मृगाच्या अपुऱ्या पावसामुळे ओलावा कमी पडतो. ही कमतरता भरून काढण्याकरिता ओलिताची गरज असते. अशा वेळेस त्वरित ओलीत सुरू करावे. या कालावधीत ठिबक सिंचनाद्वारा केलेले ओलीत अधिक फायदेशीर आहे.
- बहार धरण्याच्या कालावधीत तुषार पद्धतीने ओलीत करणेसुद्धा फायदेशीर आहे; कारण तुषार सिंचन पद्धतीने ओलीत केल्यामुळे संत्राबागेत हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ७० ते ८० टक्के टिकून राहील. त्यामुळे मृगबहाराची फुले येतील आणि फलन क्रियासुद्धा अधिक प्रमाणात आढळून येईल.

मृगबहार घेण्याकरिता काही आवश्‍यक बाबी

  • संत्र्याची लागवड योग्य जमिनीत करावी.
  • पावसाच्या पाण्याचा निचरा त्वरित करावा.
  • झाडाला जमिनीच्या मगदुराप्रमाणे माफक ताण द्यावा.
  • मृगबहार येण्याच्या कालावधीत पावसाचा खंड किंवा अपुरा पाऊस झाल्यास त्वरित ओलीत करावे.
  • बहार धरण्याच्या कालावधीत बागेत जमिनीच्या मशागतीची उदा. वखरणी, उकरी इत्यादी कामे करू नयेत.
  • सालटलेल्या संत्राझाडाची छाटणी करावी.
  • शिफारशीनुसार खत आणि ओलीत व्यवस्थापन करावे. सेंद्रिय खताचा नियमित वापर करावा.
  • मृगबहाराच्या फळांची काढणी ३१ मार्चच्या आत करावी.
  • मृगबहाराची प्रति झाड ८०० ते १००० फळे घ्यावीत.

अपेक्षित उत्पन्न न मिळण्याची कारण


१) लागवडीसाठी अयोग्य जमिनीची व कलमाची निवड, ओलितासाठी पाण्याची कमतरता, शास्त्रीय दृष्टिकोनातून खत, पाणी व्यवस्थापन व कीड, रोगांचे योग्य वेळी नियंत्रण करण्याचा अभाव.
२) मृगबहार येण्यासाठी वाजवीपेक्षा जास्त ताण देणे, झाडांवरील रोगट- वाळलेल्या फांद्या, सल न काढणे, पाणी व खते देण्याची चुकीची पद्धत.
३) संत्राबागेत सुरवातीच्या काळात ज्वारी, कपाशी इत्यादीसारखी आंतरपिके घेणे, रोग आणि किडी नियंत्रणाकडे दुर्लक्ष.

डॉ. भराड ः९६५७७२५७११ 
(लेखक ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, येथे कार्यरत आहेत

स्त्रोतअग्रोवन


अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate