অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फळछाटणीपूर्व तयारी

फळछाटणी करणे

  • बऱ्याच क्षेत्रामध्ये काळ्या रंगाच्या द्राक्षजातीची लागवड झालेली आहे. ही द्राक्ष बाग पांढऱ्या रंगाच्या द्राक्षजातीच्या तुलनेत लवकर काढावयास तयार होते. लवकर फळछाटणी घेऊन द्राक्षे लवकर बाजारात आणल्यास दरही चांगला मिळतो. मात्र त्यासाठी या बागेत काही महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करणे आवश्‍यक आहे.
  • बागेतील मशागत करणे - द्राक्षबागेत फळछाटणीपूर्वी बोद मोकळा करून, त्यात शेणखत, काडी कचरा व आवश्‍यक स्फुरदयुक्त खते टाकून त्यावर माती झाकून घ्यावी. ही खते हळूहळू उपलब्ध होत असल्याने फळछाटणीच्या आधी 15 दिवस जमिनीमध्ये टाकली जातात.
  • बागेत रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्यास, बागेत वेलीची पानगळ झालेली नसेल. मात्र रोगांचा प्रादुर्भाव झालेला असल्यास जवळपास अर्धी पानगळ झालेली असेल. अशा परिस्थितीमध्ये वेलीची पानगळ करणे गरजेचे असेल. ही पानगळ हाताने किंवा इथेफॉनच्या वापराने करता येते. इथेफॉनची फवारणी करण्यापूर्वी वेलीला सुरवातीला पाण्याचा ताण बसणे आवश्‍यक आहे. फवारणी झाल्याच्या काही वेळात
  • पाऊस आला किंवा बागेला पाणी दिल्यास बागेमध्ये पानगळीसाठी कोणताही फायदा होणार नाही. अशी वेळ आल्यास पुन्हा तितक्‍या मात्रेने फवारणी करावी लागेल.

रोगनियंत्रण करणे

  • बागेमध्ये फळछाटणी करण्यापूर्वी पाऊस किंवा पावसाळी वातावरणामुळे रोगांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते. वेलीचे पान विविध रोगांना बळी पडते. फळ छाटणीच्या वेळी आपण जरी पानगळ केली तरी सर्व पाने खाली जमिनीवर पडतात. त्यामधील काही पाने ओलांडा व फांदीवर तशीच राहतात. हीच रोगग्रस्त पाने पुढे फळ छाटणीनंतर त्रासदायक ठरतात. या गोष्टींचा विचार करूनच फळ छाटणीपूर्वीच सर्व रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यावर जोर द्यावा. बागेमध्ये इथेफॉनची फवारणी झाल्यानंतर पानगळ व्हायला सुरवात होते. पानांच्या परिस्थितीनुसार 10-12 दिवसांत जवळपास 90 टक्के पानगळ झालेली असते. अशा परिस्थितीत बागेत फळ छाटणीच्या जवळपास दोन दिवस आधी बोर्डो मिश्रणाची फवारणी घ्यावी, त्यामुळे काडीवर व तसेच खाली गळून पडलेल्या पानांवर फवारणीचे तुषार पडून रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. दुसरी फवारणी फळ छाटणी होताच दुसऱ्या दिवशी व तिसरी फवारणी छाटणीच्या पाचव्या दिवशी किंवा पोंगा अवस्थेच्या एक दिवसापूर्वी घ्यावी. ही फवारणी बोद, ओलांडा, खोड व काड्या तसेच बांधावर सुद्धा व्यवस्थितरीत्या कव्हरेज होईल, अशा प्रकारे करावी. त्यामुळे रोगांचे नियंत्रण होऊन पुढील अडचणी कमी होतील.

डोळे तपासणी करून घेणे

  • फळ छाटणीच्या वेळी काडीवरील डोळे तपासणी करणे गरजेचे समजावे. यामुळे फळ छाटणीच्या वेळी होणाऱ्या त्रुटी निघून जातील. बागेत एकसारख्या जाडीच्या 8 -10 काड्या गोळा कराव्यात. या काड्यांची वरील डोळ्यांमध्ये सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी करावी. यामुळे काडीच्या कोणत्या डोळ्यामध्ये चांगला घड आहे याची कल्पना येईल. फळ छाटणी घेणेसुद्धा सोपे जाईल.
टीप- द्राक्ष पिकात लेबल क्‍लेम असलेल्या रसायनांचा वापर बंधनकारक आहे. मात्र इथेफॉन या संजीवकाला द्राक्ष पिकात लेबल क्‍लेम नाही.
त्याचा वापर करण्यापूर्वी संबंधित लेखातील शास्त्रज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
- 020 -26956060
(लेखक द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे येथे कार्यरत आहेत.)

---------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate