অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फळबाग व्यवस्थापनामध्ये करा पाण्याचा कार्यक्षम वापर

उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाई भासणाऱ्या प्रदेशामध्ये रब्बीपासून पाण्याचे नियोजन करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आपल्याकडे उपलब्ध साधनांचा योग्य वापर करीत पाण्याचा कार्यक्षम वापर करावा. त्याविषयीच्या काही पद्धतीची माहिती घेऊ. 

कमी मुदतीकरिता करावयाच्या उपाययोजना आच्छादनाचा वापर

जमिनीतील पाणी बाष्पीभवनाद्वारे, तर झाडातील पाणी पानांमधून होणाऱ्या उत्सर्जन क्रियेमुळे झपाट्याने कमी होते. जमिनीतील ओलावा राखण्यासाठी आच्छादनाचा फायदा होतो. 
- आच्छादनासाठी पॉलिथीन फिल्मचा किंवा सेंद्रिय पदार्थांचा वापर केला जातो. 
उपलब्धतेप्रमाणे शेतकऱ्याने 80-100 मायक्रॉन जाडीची फिल्म आच्छादनासाठी वापरल्यास अतिशय फायद्याचे ठरते. 
- सेंद्रिय आच्छादनामध्ये वाळलेले गवत, लाकडी भुसा, उसाचे पाचट, पालापाचोळा, गव्हाचे काड, भाताची काड, गिरिपुष्प यांचा समावेश होतो. या अवशेषांचा फळझाडाच्या ड्रिपखाली 4 ते 6 इंच जाडीचा थर द्यावा. त्या ठिकाणी तंतुमय मुळ्या पसरलेल्या असतात. वाळवीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सेंद्रिय आच्छादन करण्यापूर्वी त्यावर/ त्याखाली फॉलिडॉल भुकटी धुरळावी. सेंद्रिय स्वरूपाचे आच्छादने वापरल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.

मडका सिंचन

फळझाडासाठी मडका सिंचन वापर करता येतो. ही पद्धत कमी खर्चिक आणि पाण्याचा कार्यक्षम करणारी आहे. कमी वयाच्या लहान फळझाडासाठी 5-6 लिटर क्षमतेचे, तर मोठ्या झाडाच्या झाडासाठी 15 लिटर क्षमतेचे मडके निवडावे. त्याच्या तळाशी लहानसे छिद्र पाडून त्यात कापडाची चिंधी बसवून मडक्‍याचे तोंड जमिनीच्या वर राहील, अशा बेताने मडके झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीत पुरावे. ते पाण्याने भरून मडक्‍याच्या तोंडावर झाकण ठेवावे. मडक्‍याच्या सच्छिद्र रचनेमुळे ते पाझरते व त्यातील पाणी हळूहळू पसरून जमिनीत ओलावा तयार होतो. त्यामुळे झाडांच्या मुळांना सातत्याने आवश्‍यकतेएवढा पाण्याचा पुरवठा संथ गतीने होऊ शकतो. मडके रिकामे झाल्यानंतर पुन्हा भरावे.

काळजी

1) आंतरमशागतीवेळी मडके फुटणार नाही व शेतामध्ये जनावरे मडके तुडवणार नाही, याची दक्षता घ्यावी. 
2) मडके सच्छिद्र असावे.

सलाइन बाटल्यांचा वापर

ठिंबक सिंचनाप्रमाणे कार्यक्षम आणि अगदी थेट झाडाच्या मुळ्यांजवळ पाणी देण्यासाठी सलाइनच्या बाटल्या वापरता येतील. यामध्ये पाणी पडण्याचा वेग सलाइनप्रमाणे कमी-जास्त करता येतो. सलाइनच्या प्लॅस्टिक बाटल्यांमध्ये पाणी भरून फांदीच्या आधाराने बाटली झाडाजवळ टांगावी. तिची नळी झाडाच्या मुळाजवळ जमिनीच्या वरच्या थरात ठेवावी. 
काळजी - 
1) पाणी वेळोवेळी मुळांजवळ पडते किंवा नाही याची तपासणी करावी. 
2) कचरायुक्त/ गढूळ पाणी सलाइन बाटलीमध्ये वापरू नये.

पानांतून होणारे उत्सर्जन कमी करण्यासाठी

झाडाचा पानोळा/ फळ संख्या कमी करणे 
झाडावरील पानांमधूनदेखील पाण्याचे उत्सर्जन होत असते. त्यामुळे झाडांची हलकीशी छाटणी करून पानांची/ फळांची संख्या कमी करावी. मोसंबीवरील पानसोट काढून टाकावे. कमी ओलीत असणाऱ्या शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजनाप्रमाणे फळसंख्या मर्यादित ठेवावी. मोसंबी झाडांवरील पानसोट (वाटरशुट) मोठ्या प्रमाणावर वाढविले असता त्याची वेळेवर छाटणी करून काढल्यास झाड सशक्त राहून पाण्याची बचत होईल. 
काळजी -

  • हलकी छाटणी करण्यासाठी अथवा पानोळा कमी करण्यासाठी तीक्ष्ण वा धारदार सिकेटरचा/ कात्रीचा वापर करावा.
  • छाटणी करताना फांदी पिचणार नाही याची काळजी घ्यावी.
  • मर्यादेपेक्षा जास्त पानोळा करू नये; अन्यथा झाडावर विपरीत परिणाम होईल.
  • छाटणी केलेल्या ठिकाणी बोर्डोपेस्ट लावावी.

बाष्परोधकाचा वापर

पानाच्या पर्णरंध्रातून होणारे पाण्याचे उत्सर्जन नियंत्रित करण्यासाठी 6 ते 8 टक्के केवोलीन बाष्परोधकाची (600 ते 800 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) फवारणी 15 दिवसांच्या अंतराने 1 ते 2 वेळा करावी. 
काळजी - दोन वा तीन फवारण्यांपेक्षा जादा फवारणी करू नये.

अतिउष्णतेपासून खोड वाचविण्यासाठी

खोडास बोर्डोपेस्ट लावणे 
उन्हाळ्याच्या व पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या काळात मोसंबी खोडास बोर्डोपेस्ट लावणे फायद्याचे ठरू शकते. यासाठी फळझाडांच्या खोडास (1 किलो मोरचूद, 1 किलो कळीचा चुना, 10 लिटर पाणी) बोर्डोपेस्टचा लेप द्यावा. त्यामुळे खोडाचे उष्णतेपासून संरक्षण होईल. 
व्यवस्थापन - 
1) खोडास बोर्डोपेस्ट लावताना स्वच्छ ब्रशचा वापर करावा. 
2) बोर्डोपेस्टची शक्ती मिश्रणाच्या तीव्रतेवर सामूवर अवलंबून असते. योग्य त्या प्रमाणातच वापर करावा. 
3) तयार मिश्रणात निळा लिटमस पेपर अथवा लोखंडी खिळा वा चाकू बुडविल्यास त्यावर तांबट थर दिसणार नाही, याची काळजी घ्यावी. तांबट थर दिसल्यास मिश्रणात मोरचुदाचे प्रमाण जादा असते. अशा वेळी त्या मिश्रणात चुन्याचे द्रावण ओतावे. 
4) बोर्डोपेस्ट प्लॅस्टिकच्या/ मातीच्या भांड्यातच स्वतंत्रपणे तयार करावी. (लोखंडी बादली वापरू नये.)

खोडास गवत/ बारदाना बांधणे

यूर्याचा प्रखर सूर्यप्रकाश खोडावर पडत असल्यामुळे खोडास इजा पोहोचू शकते. तसेच खोड तडकण्याची शक्‍यता असते. त्यासाठी सुतळीच्या साहाय्याने खोडाच्या संपूर्ण भागावर गवत अथवा बारदाना घट्टपणे बांधावा. 
काळजी - 
1) शेतात गवताच्या गंजीस/ पाचटास आग लावू नये. 
2) गवत बांधण्यापूर्वी खोडावर कार्बारिल भुकटी टाकावी.
कलमी/ रोपावर शेडनेटची सावली करणे 
रोपावर शेडनेटची सावली करावी. त्यामुळे उत्सर्जनाचा दर कमी होतो.
दीर्घ मुदतीकरिता करावयाच्या उपाययोजना 
ठिबक सिंचनाचा वापर 
उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. ठिबक सिंचनामुळे पाण्यात विरघळणारी खते व सूक्ष्म अन्नद्रव्येसुद्धा देता येतात. 
काळजी 
1) वेळोवेळी ड्रीपरची तपासणी करावी. 
2) दररोज ठिबक चालविण्याची गरज नाही. 
3) वाफसा स्थिती आल्यावरच ठिबकसंच सुरू करावा. 
4) क्षारयुक्त पाण्याचा वापर ठिबक संचसाठी करू नये.
1) डॉ. एम. बी. पाटील, 7588598242 
प्रभारी अधिकारी, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर. 
2) डॉ. एस. बी. पवार, 9422178982 
कृषी विस्तार अधिकारी, औरंगाबाद.

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate