অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फळातील आरोग्य घटक मापन

नव्या पद्धतीमुळे संत्र्यामध्ये दहापट अधिक ऍण्टीऑक्‍सिडेन्ट असल्याचे स्पष्ट

आजवर केवळ रसामध्ये असलेल्या पोषक घटकांचे मोजमाप केले जात असे. मात्र, रसासोबत रस व फळातील चोथ्यामध्ये असलेल्या ऍण्टीऑक्‍सिडेन्ट घटकांचे नेमके मोजमाप करण्यासाठी ग्रॅनाडा विद्यापीठामध्ये नवीन पद्धती विकसित करण्यात आली आहे. पारंपरिक विश्‍लेषण पद्धतीच्या तुलनेमध्ये या पद्धतीमुळे संत्रा किंवा मोसंबीमध्ये दहापट अधिक आरोग्यदायी गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे.
संत्रे किंवा मोसंबीच्या रसामध्ये आरोग्यदायी घटकांचे प्रमाण अधिक असून, त्यामुळे शरीरातील हानीकारक घटकांचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे अन्नद्रव्य विश्‍लेषक, आहारतज्ज्ञ या फळांचा रस आहारात घेण्यासंबंधी रुग्णांना मार्गदर्शन करत असतात. मात्र, या फळातील आरोग्यदायी घटकांचे योग्य विश्‍लेषण पूर्वीच्या पद्धतीने होत नसल्याचे दिसून आले. त्यावर संशोधन करून ग्रॅनाडा विद्यापीठातील संशोधकांनी नवी विश्‍लेषण पद्धती तयार केली आहे. त्यामुळे पदार्थांतील आरोग्यदायी घटकांचे प्रमाण अधिक अचूकतेने मोजणे शक्‍य होणार आहे.

अशी आहे ही मोजमाप पद्धती

पचनसंस्थेमध्ये पचनाची प्रक्रिया समजावताना ग्रॅनाडा विद्यापीठातील प्रा. जोसे ऍन्जेल रुफियन हेनारेस यांनी सांगितले, की घन पदार्थ (तंतुमय पदार्थ) अन्न आतड्यामध्ये सारक म्हणून कार्य करतात. हे घनपदार्थ मोठ्या आतड्यामध्ये आल्यानंतर त्यावर सूक्ष्मजीव कुजविण्याची प्रक्रिया करून त्यातील पोषक घटक मिळवितात. पचनसंस्थेमध्ये अन्नाचे पचन होताना आरोग्यदायी घटकांचे शोषण होते. या शोषण होणाऱ्या घटकांचे मोजमाप विश्‍लेषणामध्ये होत नव्हते. सध्या केवळ द्रवरूप पदार्थातील आरोग्यदायी घटकांचे मोजमाप केले जाते. नव्या पद्धतीमध्ये दोन्ही घटकातील पोषक घटकांचे प्रमाण मोजणे शक्‍य आहे. 
संशोधकांच्या गटाने विकसित केलेल्या नव्या तंत्राला ग्लोबल ऍण्टीऑक्‍सिडेन्ट रीस्पॉन्स (GAR) असे नाव देण्यात आले आहे. त्यामध्ये रंग, चमक, आणि विविध घटकातील संबंध अशा भौतिक आणि रासायनिक बाबींची दखल घेण्यात आली. या पद्धतीविषयी अधिक माहिती जर्नल फूट केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. 
व्यावसायिक आणि नैसर्गिक संत्रा, मोसंबी, लिंबू, द्राक्ष रसावर या तंत्राचा वापर केला असता, पोषक घटकांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. उदा. संत्रा रसामध्ये ऍण्टीऑक्‍सिडेन्टचे प्रमाण पारंपरिक पद्धतीने 2.3 मिलिमोल ट्रोलोक्‍स प्रतिलिटर (हे ऍण्टीऑक्‍सिडेन्ट क्षमतेचे परिमाण आहे.) असल्याचे मानले जाते. नव्या पद्धतीने ते 23 मिलिमोल ट्रोलोक्‍स प्रतिलिटर मिळाले आहे. थोडक्‍यात हे प्रमाण 10 पट अधिक आहे.

याचा फायदा कोठे होणार

  • अन्नातील ऍण्टीऑक्‍सिडेन्टचे नेमके प्रमाण कळणार असल्याने खाद्यातील नेमके प्रमाण ठरवणे आहारतज्ज्ञांना शक्‍य होईल.
  • या पद्धतीनुसार रस आणि खाद्यपदार्थ यातील नैसर्गिक आणि साठवणीतील पोषक घटकांचे प्रमाण मिळवणे शक्‍य होईल. गणिती पद्धतीने त्यावर आधारित प्रारूप तयार करणे शक्‍य आहे.
  • कच्चा माल, निर्जंतुकीकरण आणि पाश्‍चरायझेशन प्रक्रियेत कमी होणाऱ्या पोषक घटकांचे प्रमाणही समजू शकेल.
  • प्रयोगशाळेमध्ये आरोग्यदायी घटकांचा अभ्यास करण्यासाठी अधिक अचूकतेची आवश्‍यकता असते.

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate