অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मोसंबीवरील रोग

मोसंबीवरील महत्त्वाचे रोग


फळ काढणीपूर्वी देठकूज : मोसंबीची फळे चार ते पाच महिन्याची किंवा पक्वतेच्या अवस्थेत असताना हा रोग आढळतो. फळांच्या देठाजवळील भागावर संसर्ग होऊन हा संसर्ग दूषित भाग करडा तपकिरी रंगाचा होतो; तसेच फळ नारंगी रंगाचे होऊन त्यांची गळ होते. काढलेली फळे व रोगग्रस्त फळे एकत्र साठविली गेल्यास या रोगाचे जंतू कोलेटोट्रायकम किंवा डिप्लोडिया काढणीपश्‍चात फळकूज म्हणून वेगाने फैलावतो. भरपूर आर्द्रता आणि उष्ण हवामानात रोगाचा फैलाव होतो. पावसाच्या थेंबाद्वारे फुलांवर किंवा फळांच्या देठाजवळ संसर्ग होतो. हवेमार्फत व कीटकांमार्फतसुद्धा रोगाचा प्रसार होतो. उन्हाळ्यात रोगजंतू हे मेलेल्या फांद्या आणि झाडाच्या सालीवर उपजीविका करून मुख्य हंगामात म्हणजेच आंबे बहरात प्रसार होतात. 

व्यवस्थापन ः झाडातील मेलेल्या फांद्या छाटून त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावी. फळधारणेनंतर चार ते पाच महिन्यांनी किंवा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक 20 ग्रॅम मॅन्कोझेब 10 लिटर पाण्यात मिसळून रोगाच्या तीव्रतेनुसार तीन ते चार फवारण्या 30 दिवसांच्या अंतराने कराव्यात. काढणीपश्‍चात फळकूज होऊ नये यासाठी 20 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड किंवा 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात फळे दोन मिनिटे बुडवून नंतर सुकवावीत. छाटणीकरिता वापरलेली कात्री 15 मि.लि. सोडिअम हायपोक्‍लोराइट प्रति लिटर पाण्यात वापरून निर्जंतुक करावी. जमिनीवर पडलेली व झाडांवर असलेली रोगग्रस्त फळे गोळा करून त्यांचा नाश करावा, बागेत स्वच्छता ठेवावी.

शेंडेमर


विविध प्रकारचे रोगजंतू, सूत्रकृमी, अन्नद्रव्यांची कमतरता, जमिनीत जास्त काळ पाणी साचणे या घटकांच्या परिणामामुळे शेंडेमर रोगाचा प्रादुर्भाव होतो. जुनी व दुर्लक्षित बागेत या व्याधीचे प्रमाण अधिक आढळते. नवीन व पक्व फांद्यांवरून खालपर्यंत वाळण्यास सुरवात होते. त्यावर पांढरट वाढ होऊन बुरशीचे काळसर ठिपके दिसतात. कोलेटोट्रीकम बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पानावर प्रथम हिरवट काळसर ठिपके पडून नंतर पानगळ होते. फांद्यांची मर बुंध्यापर्यंत जाऊन डायबॅकची लक्षणे दिसतात. झाडाच्या पेशीमध्ये बुरशी निश्‍चल अवस्थेत वास्तव्य करतात. अशा पेशी जेव्हा अशक्त होतात किंवा मरतात, तेव्हा ही बुरशी सक्रिय होते. 

व्यवस्थापन - जुनी/ दुर्लक्षित बागेचे व्यवस्थापन सुधारावे. व्यवस्थापनात पुरेसे सिंचन, योग्य खतांची मात्रा, इतर किडी-रोगांचे नियंत्रण या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पावसाळ्यापूर्वी व नंतर रोगग्रस्त फांद्या छाटून त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावी. तसेच आंबिया बहर घेताना प्रत्येक वेळेस झाडातील शेंडेमरग्रस्त फांद्यांची छाटणी करावी. छाटणीकरिता वापरण्यात आलेली कात्री व अवजारे सोडिअम हायपोक्‍लोराईट (15 मि.लि. प्रति लिटर पाणी) वापरून निर्जंतुक करावे. झाडांवर 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा 20 ग्रॅम मॅन्कोझेब किंवा 30 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून तीन ते चार फवारण्या कराव्यात.

मोझॅक


हा रोग सतगुडी मोसंबी, पमेलो आणि संत्र्यामध्ये सर्वसाधारणपणे आढळून येतो. रोगग्रस्त झाडातील पानात अनियमितपणे पिवळे किंवा हलक्‍या हिरव्या रंगाचे चट्टे आळीपाळीने, परंतु हिरवट भागामध्ये दिसतात. पानांचा आकार कमी होऊन पानगळ होते. फळांमध्ये काही प्रमाणात पिवळे चट्टे आणि हिरवट भाग दिसून येतात, अशी फळे आकाराने लहान असतात. रंगपूर लिंबू रोपामध्ये रोगग्रस्त झाडातील कलमडोळा वापरल्यास अशा रोपातील पानात वैशिष्ट्यपूर्ण पिवळे रंगाचे ठिपके दिसतात. हा विषाणूजन्य रोग असून रोगट कलमाद्वारे या रोगाचा प्रसार होतो. 
व्यवस्थापन - रोगमुक्त कलमांचा वापर लागवडीसाठी करावा. छाटणीसाठी वापरलेली कात्री प्रत्येक वेळी सोडिअम हायपोक्‍लोराइटच्या (15 मि.लि. प्रति लिटर पाणी) द्रावणात बुडवून निर्जंतुक करावी. रोगग्रस्त झाडे बागेतून काढून टाकावीत.

- डॉ. जगताप - 7588695336, 
अखिल भारतीय समन्वीत लिंबूवर्गीय फळे संशोधन प्रकल्प, 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate