অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

संत्रा,मोसंबी-फळगळ

संत्रा- मोसंबीमध्ये अंदाजे 60 टक्के फुले आंबिया बहरात, 30 टक्के फुले मृग बहरात आणि दहा टक्के फुले सप्टेंबर- ऑक्‍टोबर या काळात हस्त बहरात झाडावर येतात. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे केलेल्या अभ्यासात असे दिसून आले, की आंबिया बहरात एका झाडावर सरासरी 30,000 फुलांपैकी 78 टक्के फुलांची फळधारणा झाली. यापैकी शेवटपर्यंत फक्‍त चार टक्के फळे टिकून राहिली. मृग बहरात आलेल्या 15,000 फुलांपैकी फक्‍त 76 टक्के फुलांची फळधारणा झाली व त्यापैकी शेवटपर्यंत पाच ते 5.5 टक्के फळे झाडावर टिकून राहिली.

यावरून असे दिसून येते, की आंबिया बहरात जरी मृग बहरापेक्षा दुप्पट फुले येत असली तरी शेवटी फारच कमी फळे झाडावर टिकून राहतात. फळांची गळ विविध कारणांमुळे होते. त्यामध्ये नैसर्गिक परिस्थिती, पाण्याची आणि मूलद्रव्यांची कमतरता, संजीवकांचा अभाव, किडी व रोगांचा प्रादुर्भाव ही प्रमुख कारणे आहेत.

फळगळीची कारणे

नैसर्गिक फळगळ

आंबिया बहरामध्ये फेब्रुवारी- मार्च महिन्यात फळधारणा झाल्यावर उष्ण तापमानात एकदम वाढ होऊन फळे गळतात, शिवाय दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात या काळात जास्त फरक असल्यामुळे फळांची गळ जास्त होते. झाडावर निसर्गतः आवश्‍यकतेपेक्षा जास्त फुले येतात. फळे टिकून राहण्याकरिता त्यांच्यात स्पर्धा निर्माण होते. जेवढ्या फळांना झाडावर पोसण्याची क्षमता त्या झाडात असते, तेवढीच फळे झाडावर टिकून राहतात. त्यामुळे नैसर्गिकरीत्याच फुलांची व फळांची गळ होत असते.

वातावरणाचा परिणाम

संत्रा- मोसंबीमध्ये तापमान, आर्द्रता आणि वारा या बाबी फळगळतीस कारणीभूत ठरतात. मागील काही वर्षांमध्ये एप्रिल महिन्यात तापमानात झालेल्या वाढीमुळे खूप मोठ्या प्रमाणात आंबिया बहराच्या फळांची गळ झालेली आढळली. तापमानात वाढ झाल्यास विशेषतः लहान फळांची गळ फार मोठ्या प्रमाणात होते. तापमानासोबतच हवेतील आर्द्रतासुद्धा फळगळतीस कारणीभूत ठरते.

अनियमित पाणीपुरवठा

फळधारणा झाल्यानंतर झाडांना नियमित पाणी न दिल्यास फळांची गळ होते. आंबिया फळे टिकविण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्‍यकता असते. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असली तर फळगळ होऊ शकते, तसेच जमिनीत प्रमाणापेक्षा जास्त पाणी असल्यास फळगळ होते.

बागेचे व्यवस्थापन

बागेत पावसाळ्यात पाणी साचून राहिल्यास फळांची गळ होते, त्याचप्रमाणे आवश्‍यकतेपेक्षा जास्त प्रमाणात तसेच चुकीच्या पद्धतीने झाडाला पाणी दिल्यास फळगळ होते. बऱ्याच बागांमध्ये सल काढण्यात येत नाही. सल न काढल्यास त्यावर बुरशीची वाढ होऊन फळगळीस कारणीभूत ठरते. अशा बागेत फळे काढल्यानंतर फळांची सड लवकर होते.

किडी व रोगांचा प्रादुर्भाव

किडी व रोगांमुळे खूप मोठ्या प्रमाणात फळगळ आढळून येते. आंबिया बहराची फळे रस शोषण करणाऱ्या पतंगांमुळे ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या महिन्यांत गळतात. ही फळे दाबून पाहिल्यास त्यांना छिद्र पडलेले दिसते आणि त्यातून रसाची चिरकांडी उडते. काही फळे बुरशीमुळे (उदा. फायटोप्थोरा, कोलोटोट्रिकम, अल्टरनेरिया) गळतात. अल्टरनेरिया बुरशीची फुलांच्या बीजांडावर लागण होऊन फळ काढणीच्या अवस्थेत आल्यावर फळांची गळ होते.

अन्नद्रव्यांची कमतरता

काही बागांमध्ये फळधारणा चांगली झाल्यानंतरसुद्धा फळांची गळ होते. खूप कमी फळे झाडावर शिल्लक राहतात. फळांची प्रत चांगली राहत नाही. झाडांची फळधारणा व ती टिकवून ठेवण्याची क्षमता या बाबी जमिनीचा मगदूर आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता यावर अवलंबून असतात. जमिनीत चुना आणि जस्ताचे प्रमाण कमी असल्यास मोठ्या प्रमाणावर फळगळ होते. झाडातील नैसर्गिक संजीवकांचे प्रमाण कमी झाल्यास फळांची गळ होते. या फळगळीमुळे मात्र उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. ही फळगळ वेळीच उपाययोजना करून थांबविणे आवश्‍यक असते.

आंबिया बहरात फुलांची वेगवेगळ्या टप्प्यांत होणारी गळ

अ.क्र. - फळगळ होण्याचा कालावधी - वेळ - गळ (टक्के)
1) फळधारणेची वेळ - फेब्रुवारी- मार्च - 67.00 टक्के
2) उन्हाळा एप्रिल- मे - 19.20 टक्के
3) पक्वतेपूर्वी - जून- सप्टेंबर - 7.8 टक्के
4) तोडणीपूर्वी - ऑक्‍टो- डिसेंबर - 1.2 टक्के

फळगळ कमी करण्याकरिता उपाययोजना

1) खतांची (सेंद्रिय व रासायनिक) मात्रा शिफारशीप्रमाणे योग्य प्रमाणात व योग्य वेळी द्यावी. नत्राची अर्धी मात्रा, पूर्ण स्फुरद व पूर्ण पालाशची मात्रा पहिले पाणी देण्याच्या वेळी द्यावी. उरलेली नत्राची अर्धी मात्रा फळे वाटाण्याएवढी झाल्यावर द्यावी. खते रिंग पद्धतीनेच द्यावीत. खते ठिबक सिंचनाबरोबर देता आली तर फायदेशीर ठरते.
जमिनीची मगदूर, झाडाचे वय आणि शाखीय वाढ पाहून पाण्याच्या पाळ्या आठ ते 12 दिवसांच्या अंतराने द्याव्यात. पाणी दुहेरी रिंग पद्धतीने द्यावे.
2) पाणीटंचाई असल्यास एक दांड पद्धत किंवा दुहेरी दांड पद्धतीने किंवा अर्धे आळे पद्धतीने झाडांना पाणी द्यावे. ठिबक सिंचनाची सोय करावी.
3) पावसाळ्यात बागेत पाणी साचू न देता पाण्याचा निचरा होण्याची काळजी घ्यावी. मुख्यतः ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यांत बागेत पाणी साचून राहिल्यास व पाण्याचा निचरा न झाल्यास फळांची गळ होते. बागेत पाणी साचून राहत असल्यास दोन किंवा तीन ओळींत एक याप्रमाणे चर काढून पाणी बागेच्या बाहेर काढावे.
4) बागेच्या भोवती दक्षिण व पश्‍चिम दिशेस हेटा, शेवरी यांसारखी वाराप्रतिबंधक झाडे लावावीत.
5) झाडावरील सल नियमित काढावी. शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करावी.
6) आंबिया बहरातील फळांची गळ प्रथमावस्थेत आणि ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या काळात होते, ती गळ कमी करण्यासाठी या काळात प्रत्येक महिन्यात तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार दहा पी.पी.एम. एन.ए.ए. अधिक एक टक्का युरिया (दहा ग्रॅम युरिया प्रति लिटर पाणी) या तीव्रतेचा संजीवकांचा फवारा द्यावा. झाडावर साधारणतः 600 ते 800 इतकीच फळे घ्यावीत.
7) आंबिया बहराच्या फळांतील रस शोषणाऱ्या पतंगांचा प्रादुर्भाव सप्टेंबर- ऑक्‍टोबर महिन्यांत मोठ्या प्रमाणात आढळतो. यासाठी बागेच्या परिसरातील तणांचे नियंत्रण करावे. यामुळे पतंगांचा उपद्रव कमी होण्यास मदत होते. बागेत रात्री धूर केल्यास पतंगांचा प्रादुर्भाव कमी होतो. दररोज खाली पडलेली फळे उचलून खड्ड्यात पुरून टाकावीत. पतंग प्रकाशाकडे आकर्षित होतात. प्रकाश सापळ्याच्या खाली पसरट भांड्यात गुळाचे पाणी, संत्र्याचा रस आणि मॅलॅथिऑन कीटकनाशकाचे द्रावण तयार करून ठेवावे. या द्रावणात पतंग येऊन पडतात.

 

स्त्रोत -अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate