অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

संत्रा, मोसंबी काढणी, हाताळणी करा शास्त्रीय पद्धतीने

सध्या मृग बहराच्या फळकाढणीला सुरवात होत आहे. संत्रा, मोसंबी बागेतील फळांची काढणी योग्य वेळी व काळजीपूर्वक केल्यास मोठे नुकसान टाळता येते. त्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करावा.

साधारणपणे संत्रा/मोसंबी फळझाडांवर लागवडीच्या 5 वर्षांनंतर फळधारणेस सुरवात होते. झाडाचे उत्पन्न हे वाण, वय, व्यवस्थापन, स्थळ आणि खुंट इत्यादी बाबींमुळे कमी-अधिक असू शकते. संत्रा फळांची काढणी व हाताळणी काळजीपूर्वक केल्यास फळे खराब होण्याचे प्रमाण कमी होते. काढणीनंतर संत्रा फळांची अयोग्य हाताळणी, अयोग्य पॅकिंग, सदोष वाहतूक, साठवणुकीच्या अपुऱ्या सोयी व काढणीनंतर फळांवर करावयाच्या प्रक्रियेचा अभाव यामुळे अंदाजे 25 टक्के फळे विक्रीस अयोग्य होतात.

संत्रा फळांची काढणी केव्हा करावी?

फळधारणेपासून काढणीसाठी फळे तयार होण्यास 270 ते 280 दिवस लागतात. काढणीपूर्वी फळांचा रंग व आकार लक्षात घेऊन निर्णय घेणे आवश्‍यक आहे. मृग बहराच्या फळांची तोडणी फेब्रुवारी - मार्च महिन्यात केली जाते. संत्रा फळांची काढणी एकदाच न करता तीन किंवा चार वेळा करावी. तसेच बाजारातील आवक नियंत्रणात राहत असल्याने दरही चांगला मिळण्यास मदत होते. संत्राची प्रतही सुधारण्यास मदत होते.

तोडणीपूर्वी घ्यावयाची काळजी

संत्रावर्गीय फळे केळी व आंब्यासारखी झाडावरून तोडल्यानंतर पिकत नाहीत. म्हणून ती पिकेपर्यंत झाडावरच ठेवायला हवीत. परिपक्व होण्यापूर्वी तोडल्यास फळांत रस कमी भरतो, साखरेचे प्रमाण कमी असते आणि ती आंबट राहतात. फळे तोडताना इजा होऊ देऊ नये. जमिनीवर पडलेल्या फळांची पॅकिंग करू नये. कारण वाहतुकीदरम्यान अशी फळे लवकर सडतात.

संत्रा/मोसंबीच्या तोडणीसाठी मापदंड

साधारणपणे फळे झाडावर पूर्ण पक्व झाल्यावर, म्हणजेच हिरवा रंग जाऊन पिवळा रंग यायला सुरवात झाली, की फळे काढली जातात. रंगावरून फळे काढण्याची पद्धत पूर्णपणे योग्य नाही.

  • जवळपास पाऊण भाग पिवळ्या, नारिंगी रंगांच्या निवडक फळांची तोडणी करावी. ज्यात एकूण द्राव्य घनपदार्थ (टी.एस.एस.) आणि आम्ल यांचे गुणोत्तर मृग बहराच्या फळात 14 पेक्षा कमी नसावे. एकूण द्राव्य घन पदार्थाची मात्रा (टीएसएस) किमान 10 टक्के एवढी असायला हवी.
  • यासाठी रिफ्रॅक्‍टोमीटरचा वापर करता येतो.
  • आम्लाचे प्रमाण संत्र्यांमध्ये 0.70 टक्का, तर मोसंबीमध्ये 0.30 ते 0.40 टक्का असायला पाहिजे.
  • वरील नमूद केलेले एकूण द्राव्य घन पदार्थ व आम्ल यांचे किमान प्रमाण फळांमध्ये आढळून आल्यानंतर तोडणी करावी. केवळ फळांला चांगला रंग येण्यासाटी वाट पाहू नये.

फळांची तोडणी कशी करावी?

तोडणीनंतर फळे अधिक काळ चांगल्या स्थितीत राहण्यासाठी फळांची तोडणी योग्य पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे.

  • प्रचलित पद्धतीत फळाला पीळ देऊन व ओढून फळे तोडली जातात. यामुळे देठाकडील भागाला इजा होऊन फळाला छिद्र पडते. त्यामुळे साठवणुकीमध्ये देठाकडील इजा झालेल्या सालीच्या भागात बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता बळावते. फळांचा दर्जा व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो.
  • झाडावरून फळे काढताना ती ओढून न घेता देठासह कापावीत. फळांची तोडणी करताना 2 मि.मी. एवढा देठ ठेवणे योग्य असते. याकरिता क्‍लिपरचा वापर करावा. क्‍लिपरने तोडणीचा वेग कमी असतो, परंतु सवयीने हे काम करता येते. फळेही नासत नाहीत.
  • दिवसभरात केव्हाही फळे काढली जाऊ शकतात. परंतु फळे उन्हात राहिल्यास फळांची साल करपून फळांचा दर्जा व टिकाऊपणावर विपरीत परिणाम होतो.
  • फळे परिपक्व होताना गर्द हिरवा रंग जाऊन फिक्कट हिरवा अथवा फिक्कट नारिंगी रंग येतो. सुरवातीला घट्ट असलेली साल थोडी सैल होते. सालीवर चकाकी येऊन त्यावरील तैलग्रंथीचे ठिपके स्पष्ट दिसू लागतात.
  • फळे झाडावर जास्त दिवस ठेवल्यास फळांची साल ढिली (पोला) होते. म्हणून दूरच्या बाजारपेठेत पाठवायची असल्यास फळे कमी पिवळी असताना तोडावीत.
  • तसेच फळे पक्व होताना जिबरेलिक ऍसिडचे (10 पी.पी.एम.) 10 मिलिग्रॅम प्रति लिटर द्रावण फवारल्यास फळांना नारिंगी रंग येतो. अशी फळे 1 महिन्यापर्यंत उशिरा तोडता येतात.

फळांची हाताळणी

  • पिशवीत एकत्र केलेली फळे प्लॅस्टिकच्या हवेशीर अशा क्रेट्‌समध्ये भरावीत. क्रेट्‌स सावलीत ठेवावेत. एका क्रेटमध्ये 15 ते 17 किलो म्हणजे 100 ते 125 फळे बसतात.
  • गवत जमिनीवर पसरवून त्यावर फळांचा ढीग करू नये. तसेच ट्रक किंवा बैलगाडीत गवत पसरवून त्यावर फळांचा ढीग करून वाहतूक केली जाते. या पद्धतीत वाहतूक स्वस्त पडली, तरी 15 ते 20 टक्के फळांचे नुकसान होते.

फळांची विक्रीपूर्व प्रक्रिया

तोडलेली फळे एका आठवड्यानंतर आकसतात आणि खराब होऊ लागतात. अधिक तापमान असलेल्या हंगामात फळे साठविण्याची समस्या असते. मेणाच्या द्रावणात (6 टक्के) फळे बुडवून काढल्यास व नंतर कोरूगेटेड कार्डबोर्ड किंवा फायबर बोर्डाच्या पेट्यांमध्ये भरून लांब पल्ल्याच्या बाजारपेठेत विक्रीस पाठवावीत. फळे खराब होण्याच्या प्रमाणात घट होते. परंतु फळे शीतगृहात ठेवणे अधिक चांगले असते.

फळांची प्रतवारी

फळांची प्रतवारी आकारमानावरून करावी. याकरिता ग्रेडिंग (प्रतवारी यंत्र) मशिनचा वापर करण्यात येतो. आकारमानानुसार नागपुरी संत्र्याचे 90 टक्के पीक तीन प्रकारच्या ग्रेडमध्ये विभागता येते. फळांची प्रतवारी केल्यास फळांची बांधणी आणि विक्री सुलभ होते. तसेच फळांना वाजवी दर मिळण्याची खात्री असते.

ग्रेड (प्रत) +आकार +फळांचा व्यास 
अ किंवा 1 +मोठा +7.50 ते 8.50 सें.मी. 
ब किंवा 2 +मध्यम +6.40 ते 7.41 सें.मी. 
क किंवा 3 +लहान +5.5 ते 6.41 सें.मी.
प्रत्येक प्रतवारीत उदा. मोठा जास्तीत जास्त (90 ते 95 टक्के) 7.50 ते 8.50 सें.मी. असावीत. एका ग्रेडमध्ये 5 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त फळे लहान किंवा मोठ्या ग्रेडची नसावीत. अतिशय लहान (5.50 सें.मी. व्यासापेक्षा कमी) व मोठी (8.50 सें.मी.पेक्षा मोठी) फळे बाजाराच्या आणि स्टोअरेजच्या दृष्टीने उपयोगी नसतात.

बुरशीनाशक व मेणाची प्रक्रिया

  • फळे सावलीत कोरडी करून त्यावर 6 टक्के मेणाचे आवरण द्यावे.
  • खराब, सडकी फळे बाजूला काढावीत.
  • कोरूगेटेड कार्डबोर्ड किंवा फायबर बोर्डाच्या पेट्यांत गुणवत्तेनुसार ती हळूवार ठेवावीत.

फळांची बांधणी (पॅकिंग)

  • प्रतवारीने छाटलेली फळे कोरूगेटेड फायबर बोर्डच्या डब्यांमध्ये व्यवस्थित भरावी.
  • एका डब्याच्या चारही पृष्ठभागाच्या 4 ते 5 टक्के एवढी जागा हवेसाठी लांब आकाराचे छिद्र म्हणून ठेवावी. हे डबे युनिव्हर्सल किंवा टेलिस्कोपिक पद्धतीचे, 90 टक्के आर्द्रता सहन करणारे, 16 ते 19 किलो प्रति वर्ग सेंटिमीटर बर्सटिंग शक्तीचे असावेत. डब्यांचा आकार आयात करणाऱ्या देशांनी निर्देशिल्याप्रमाणे असावा.
  • देशांतर्गत बाजारासाठी 45.5 x 35 x 35 सेंटिमीटर अथवा 50 x 30 x 30 सेंटिमीटर अथवा योग्य आकाराचे डबे निवडावेत.
  • विविध रंगांत छपाई केलेले व मालाची प्रतवारी, संख्या, तारीख, पॅकिंग करणाऱ्याचे नाव, पत्ता इत्यादी सर्व माहितीसह डबे बाजारात पाठवावेत.
  • पॅकिंग करताना गवताचा वापर टाळावा व प्रतवारी मिसळू नये.

फळांची साठवण

  • पूर्ण पक्व झालेली, परंतु हिरव्या रंगाची फळे शीतगृहात 11 ते 13 अंश सेल्सिअस तापमान व 85 ते 90 टक्के आर्द्रता असताना 3 ते 4 आठवडे ठेवल्यास फळांना चांगला नारिंगी रंग येतो. त्यामुळे बाजारभाव चांगला मिळतो.
  • लांब अवधीच्या संत्रा फळांच्या साठवणुकीसाठी शीतगृहात तापमान 6 ते 7 अंश सेल्सिअस व आर्द्रता 90-95 टक्के असावी. शीतगृहातील आर्द्रतेपासून संरक्षण करण्यासाठी या डब्यांना बाहेरून प्लॅस्टिकचे लॅमिनेशन असावे.
  • कमी अवधीच्या (20 ते 25 दिवस) साठवणुकीसाठी पाण्याच्या बाष्पीभवनावर आधारित शीतगृहाची शिफारस केलेली आहे. यात 1 ते 1.5 टन एवढा संत्रा साठवता येतो.


संपर्क : डॉ. सुरेंद्र रा. पाटील, 9881735353 
(उद्यानविद्या महाविद्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 8/8/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate