অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

संत्रा सल्ला

संत्रा सल्ला


  • संत्रा पिकावर आंबिया बहराची फळे टिकून राहण्याच्या उद्देशाने बागेला पाणी देणे सुरू ठेवावे. पाण्याच्या पाळ्या 4 ते 5 दिवसांच्या अंतराने सुरू ठेवाव्यात, कारण या महिन्यात उष्णतामान 47 अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. शक्‍य असेल तेथे ठिबक सिंचनाने पाणी द्यावे.
  • संत्रा व मोसंबीच्या एक वर्षाच्या झाडाला 17 लिटर पाणी प्रतिदिवस प्रतिझाड द्यावे. चार वर्षांच्या झाडाला 74 लिटर आणि 8 वर्षांच्या झाडाला 188 लिटर प्रतिदिवस प्रतिझाड आणि 10 वर्षे आणि त्यावरील झाडाला 235 लिटर प्रतिदिवस प्रतिझाड द्यावे.
  • लिंबाच्या एक वर्षाच्या झाडाला 11 लिटर पाणी प्रतिदिवस प्रतिझाड, पाच वर्षांच्या झाडाला 42 लिटर प्रतिदिवस प्रतिझाड, आठ वर्षांच्या झाडाला 73 लिटर प्रतिदिवस प्रतिझाड आणि 10 किंवा जास्त वर्षांच्या झाडाला 108 लिटर प्रतिदिवस प्रतिझाड द्यावे.
  • झाडाच्या भोवताली काळा पॉलिथिन कागद (100 मायक्रॉन जाडी) किंवा गवत, गव्हांडा याचा थर झाडाच्या सभोवताली पसरावा. त्यामुळे बाष्पीभवन कमी होऊन ओलावा राहील.
  • नवीन बाग लागवडीकरिता 75 सें.मी. x 75 सें.मी. x 75 सें.मी.आकाराचे खड्डे खोदावेत. नागपुरी संत्र्याकरिता 6 x 6 मीटर अंतर ठेवावे. खोदलेले खड्डे सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमध्ये उघडे ठेवावेत.
  • मृग बहराची फळे तोडणीनंतर झाडावरील साल काढून टाकावी. झाडावर कार्बेन्डाझिम एक ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड तीन ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • झाडावरील फांद्या कापणीनंतर, कात्री सोडियम हायड्रोक्‍लोराइट 1-2 टक्के (1 ते 2 मिली प्रति लिटर) द्रावणामध्ये बुडवून निर्जंतुकीकरण करावे. झाडाच्या बुंध्यावर 60 सें. मीटरपर्यंत बोर्डोपेस्ट ब्रशने लावावी. बोर्डोपेस्ट तयार करण्याकरिता 1 किलो मोरचूद व 1 किलो चुना 5 लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्र करून 12 तासांच्या मध्ये पेस्ट करावी.
  • संत्रा झाडाच्या बुंध्यामधून डिंकाचा स्राव सुरू असेल किंवा तीक्ष्ण चाकूने खरडून त्या ठिकाणी मेटॅलॅक्‍झील अधिक मॅंकोझेब हे संयुक्त बुरशीनाशक किंवा फोसेटील आम्लाची पेस्ट लावावी.
  • फायटोप्थोराग्रस्त झाडावर मेफोनेक्‍झाम (मेटॅलॅक्‍झील एम 4 टक्के + मॅंकोझेब 64 टक्के) हे संयुक्त बुरशीनाशक 2.5 ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा फोसेटील आम्ल 2.5 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात द्रावण करून संपूर्ण झाड ओले होईपर्यंत फवारावे. तसेच हे द्रावण झाडाभोवतीही टाकावे.
  • फळगळ कमी करण्याकरिता 1.5 ग्रॅम 2, 4-डी किंवा जिब्रेलीक आम्ल आणि 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम ( 50 डब्ल्यूपी) आणि 1 किलो युरिया यांचे 100 लिटर पाण्यात द्रावण करून फवारणी करावी. 15 दिवसांनी पुन्हा दुसरी फवारणी करावी. यासोबत पाण्यात खंड पडला तर पोटॅशियम नायट्रेट 10 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात फवारणी करावी.
  • जूनमध्ये मृग बहार घेण्याकरिता संत्राबागांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याचा ताण द्यावा. खोडकिडा, इडरबेला किंवा साल खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी अळीने पाडलेल्या छिद्रातून इंजेक्‍शनच्या मदतीने डायक्‍लोरव्हॉस (76 ईसी) 5 मि.लि. प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून छिद्रात टाकावे. कापसाचा बोळा या द्रावणात बुडवून छिद्र बंद करावे.
  • मिलीबग - संत्र्यावरील मिलीबगच्या नियंत्रणाकरिता, झाडाभोवतालची जमीन चाळणी करून मोकळी करावी. झाडाच्या खोडाला प्लॅस्टिकच्या पट्ट्या लावून त्यावर ग्रीस लावावे. मुंग्यांचे वारूळ बागेतून नष्ट करावे, त्यासाठी क्‍लोरपायरीफॉस (20 ईसी) 5 मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून मुंग्यांच्या वारुळातून टाकावे. मिलीबग नियंत्रणासाठी क्‍लोरपायरीफॉस (20 ईसी) 2 मि.लि. किंवा डायक्‍लोरव्हास 2.5 मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून झाडावर व झाडाच्या बुंध्यावर फवारणी करावी.
  • शंख कीड - गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड या कीडनाशकांचा वापर करू शकतात. मेटाल्डिहाईडचे दाणे पूर्ण बगीच्यामध्ये झाडाखाली पसरून टाकावे. * जर हे आमिष उपलब्ध न झाल्यास दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गूळ + 25 ग्रॅम यीस्ट यांचे द्रावण तयार करावे. त्यामध्ये 50 किलो गव्हाचा किंवा भाताचा कोंडा टाकून चांगले मिसळावे व 10 ते 12 तास हे मिश्रण आंबवण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यामध्ये 100 ग्रॅम मिथोमिल किंवा 50 ग्रॅम थायामेथोक्‍झाम चांगल्या प्रकारे मिसळावे.


संपर्क -
- डॉ. दिनकर नाथ गर्ग, 9822369030
-0712-2500325
डॉ. एम. एस. लदानिया
(संचालक, राष्ट्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र.)

------------------------------------------------------------------------------------------------


स्त्रोत: अग्रोवन:

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate