অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्ट्रॉबेरीची लागवड

स्ट्रॉबेरीसाठी उपयुक्त हवामान

  • समशीतोष्ण हवामानास हे पीक चांगला प्रतिसाद देते.
  • स्ट्रॉबेरीच्या उत्तम वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश आणि 10-25 अंश सें. तापमान पोषक ठरते. परदेशातून आयात केलेल्या (कॅलिफोर्निया) जातींना सरासरी 30 अंश ते 37 अंश से. तापमान, 60 ते 70 टक्के हवेतील आर्द्रता आणि भरपूर सूर्यप्रकाश असे हवामान चांगले मानवते.

स्ट्रॉबेरीसाठी जमिनीची निवड

स्ट्रॉबेरीच्या उत्तम वाढीसाठी पाण्याचा उत्तम निचरा असणारी हलकी, मध्यम काळी, वालुकामय पोयटा, गाळाची जमीन असावी. जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक 5.5 ते 6.5 या दरम्यान योग्य असतो. भुसभुशीत - वालुकामय जमिनीत स्ट्रॉबेरीच्या रोपांची मुळे जोमाने वाढतात.

स्ट्रॉबेरीच्या विविध जाती

  • महाराष्ट्रात प्रामुख्याने सेल्वा, चॅन्ड्‌लर, स्वीट चार्ली, कॅमारोझा, रागिया, डग्लस, फेस्टिवल, ओसो ग्रॅंडी, विंटर डॉन, केलजंट, पजारो इत्यादी कॅलिफोर्नियन जातींची आयात केली जाते.
  • स्ट्रॉबेरी पिकाच्या विविध जाती दिवस व रात्रीच्या कालावधीस विशेष प्रतिसाद देतात. हा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता स्ट्रॉबेरीमध्ये शॉर्ट डे जाती व डे न्युट्रल जाती अशा दोन प्रकारच्या जाती आढळतात.
  • शॉर्ट डे जाती - या जातींना दिवस लहान व रात्र मोठी असताना फुले येतात. सूर्यप्रकाशाचा कालावधी ठराविक कालावधीपेक्षा (10 तास) जास्त असल्यास या जातींना फुले येत नाहीत. उदा. डग्लस, चॅंडलर, पजारो, ओसो ग्रॅंडी इ.
  • डे न्युट्रल जाती - या जातींना दिवस कितीही लहान किंवा मोठा असला तरी वाढीवर व फुलधारणेवर परिणाम होत नाही. अशा जातींना वर्षभर फुले येतात. उदा. सेल्वा, फर्न, आयर्विन इ. भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली यांनी विकसित केलेली पुसा अर्ली ड्‌वार्फ ही जात डे न्युट्रल प्रकारची आहे.

पूर्वमशागत

उन्हाळ्यात जमिनीची उभी-आडवी खोलवर नांगरट करून, तव्याच्या कुळवाने ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी.

  • तणांचे व जुन्या पिकांचे अवशेष गोळा करून नष्ट करावेत.
  • हिरवळीच्या खतासाठी धेंचा किंवा तागासारखे पीक जमिनीत घ्यावे.
  • शक्‍यतो स्ट्रॉबेरी लागवडीच्या अगोदर घेतल्या जाणाऱ्या पिकास शेणखत अथवा कंपोस्ट खत एकरी 8 ते 10 टन दिलेले असावे.

गादीवाफे

  • स्ट्रॉबेरीची मुळे मातीच्या वरच्या 15 ते 20 सें.मी. पर्यंतच्या थरातच वाढतात. स्ट्रॉबेरीच्या चांगल्या वाढीसाठी मऊ आणि भुसभुशीत गादी वाफे तयार करावेत.
  • गादी वाफ्यावर स्ट्रॉबेरीची लागवड दोन ओळी, तीन ओळी अथवा चार ओळी पद्धतीनेसुद्धा केली जाते. त्यानुसार योग्य आकाराचे तयार करावेत.
  • दोन ओळी पद्धतीसाठी - 90 सें.मी. रुंद व 30 ते 45 सें.मी. उंची असलेल्या गादीवाफ्यावर दोन रोपांतील अंतर 30 सें.मी. व दोन ओळीतील अंतर 60 सें.मी. असावे. दोन ओळी पद्धतीत प्रति एकर 22 ते 25 हजार रोपे लागवडीसाठी लागतात.
  • तीन ओळी पद्धतीसाठी - 120 सें.मी. रुंद व 30 ते 45 सें.मी. उंची गादी वाफे करावेत.
  • चार ओळी पद्धतीनेही लागवड होत असली तरी आंतरमशागत, फळ तोडणी, गादीवाफ्यास प्लॅस्टिक मल्चिंग करणे या मध्ये अडचणी येत असल्याने प्रामुख्याने दोन ओळी पद्धतीने लागवड सोईस्कर ठरते.

रोपे अशी असावीत...

  • रोपे एकसारख्या समान वाढीची, 4 ते 5 पाने असलेली असावीत.
  • रोपांची पाने निरोगी व गर्द हिरव्या रंगाची असावीत.
  • तसेच रोपांना फुलधारणा झालेली नसावी.
  • रोपांची मुळे लांब, पांढऱ्या रंगाची असावीत.
  • रोपे किडी व रोगांपासून मुक्त असल्याची खात्री करावी.
  • खात्रीशीर रोपवाटिकेत व शक्‍यतो प्लॅस्टिक पिशवीत वाढविलेली रोपे लागवडीसाठी निवडावीत.
  • रोपे जमिनीतून खोदून काढताना मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. कुजलेली मुळे आढळल्यास अशी रोपे काढून टाकावीत. रोपांच्या मुळांना लागलेली माती स्वच्छ धुऊन रोपे मेटॅलॅक्‍झील 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात 15 ते 20 मिनिटे पानांसहित बुडवून ठेवावीत.

रोपांची गादीवाफ्यावर लागवड

  • स्ट्रॉबेरीची लागवड उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिन्ही हंगामांत करता येते; परंतु महाराष्ट्रातील ऑक्‍टोबर ते मार्च या कालावधीतील हवामान स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी पोषक आहे.
  • पश्‍चिम घाटातील डोंगराळ प्रदेशात स्ट्रॉबेरीची लागवड पाऊस थांबताच म्हणजे ऑक्‍टोबर - नोव्हेंबर महिन्यात तर सपाट प्रदेशात जुलै - ऑगस्ट महिन्यात करणे योग्य ठरते.
  • तयार केलेल्या गादीवाफ्यांवर दोन ओळी पद्धतीने लागवड करण्यासाठी 1 फूट x 1 फूट अंतरावर खड्डे करून त्यात 150 ते 200 ग्रॅम चांगले कुजलेले शेणखत, 5 ग्रॅम मिथाईल पॅराथिऑन पावडर किंवा चिमूटभर फोरेट (10 जी) आणि आवश्‍यक रासायनिक खतांची मात्रा टाकून ते व्यवस्थित मिसळावे. त्या मिश्रणात मध्यभागी मूठभर माती टाकून त्यात रोप लावावे. प्लॅस्टिक पिशवीतील रोप असल्यास ती पिशवी काढून त्याच्या बुडातील थोडी माती मोकळी करून ते रोप लावावे.
  • रोपाचा सुरवा (कोंब) जमिनीत गाडला जाणार नाही याची काळजी घेऊन बाहेरील मातीने मुळे पूर्णपणे झाकावीत.

असे घडताहेत स्ट्रॉबेरी पिकात बदल
क्षेत्रात झाली वाढ

  • पूर्वी स्ट्रॉबेरी या फळपिकाची लागवड मर्यादित क्षेत्रावर आणि ठराविक थंड हवेच्या ठिकाणी (सिमला, महाबळेश्‍वर, उटी) होत असे.
  • भारतामध्ये सर्वसाधारणपणे 850 ते 900 हेक्‍टर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड होत असे.
  • मात्र केवळ महाराष्ट्रातच महाबळेश्‍वर, पाचगणी, वाई, मेढा, गोरेगाव (जि. सातारा), चंदगड (जि. कोल्हापूर), पुणे, लोणावळा (जि. पुणे), नाशिक, इगतपुरी, सुरगाणा (जि. नाशिक ) व नागपूरकडील लागवड वाढली आहे. त्याचे एकत्रित क्षेत्र 900 हेक्‍टरपेक्षा अधिक आहे.
  • 2) परदेशी जातींची लागवड -
  • भारतामध्ये स्ट्रॉबेरीच्या काही देशी जाती उपलब्ध होत्या. मात्र सन 1990-91 मध्ये कॅलिफोर्निया येथून सेल्वा, चॅन्डलर व पजारो या जाती लागवडीसाठी आयात करण्यात आल्या.
  • या नवीन जातींच्या लागवडीमुळे प्रति हेक्‍टरी उत्पादकता 2.5 टनापासून 7.0 टनांपर्यंत वाढलेली दिसून येते.
  • प्रत्यक्ष कॅलिफोर्नियन जातींची प्रति हेक्‍टरी उत्पादनक्षमता 30.0 टनांपासून 50.0 टनांपर्यंत आहे. म्हणजेच भारतात प्रति हेक्‍टरी स्ट्रॉबेरी फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढविणे शक्‍य आहे.

स्ट्रॉबेरी फळातील पोषक मूल्ये घटक

1) पाणी - 87.8%, 2) प्रथिने - 0.7%, 3) स्निग्ध पदार्थ - 0.2%, 4) खनिजे - 0.4%, 5) तंतुमय पदार्थ - 1.1%, 6) कर्बोदके - 9.8%, 7) फॉस्फरस - 0.08%, 8) लोह - 1.8%, 9) ऊर्जा मूल्य (100 ग्रॅम) - 44 मि. ग्रॅम, 10) जीवनसत्त्व ब 1-30 मि. ग्रॅम, 11) जीवनसत्त्व क - 52 मि. ग्रॅम.

स्त्रोत - अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate