অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लागवड ऍस्टरची....

ऍस्टरमधील विविध प्रकार, पाकळ्यांची रचना आणि रंग, तसेच फुलांचा टिकाऊपणा या गुणधर्मामुळे या फुलाला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. इतर फुलझाडांच्या तुलनेने ऍस्टरची लागवड सोपी, कमी खर्चाची असते. शिवाय फुलांची उपलब्धता लागवडीपासून थोड्याच दिवसांत होते, त्यामुळे कमी कालावधीत चांगले उत्पन्न या फुलांपासून मिळू शकते.
ऍस्टर पिकास फार कडक थंडी मानवत नाही, तसेच कडक ऊनही मानवत नाही. खानदेश, विदर्भातील उन्हाळ्याचा काळ आणि कोकणपट्टीत पावसाळ्याचा काळ वगळला तर राज्यात वर्षभर लागवड करता येते. लागवडीचे नियोजन करताना लागवडीचा हंगाम, मोजक्‍या जातींची निवड, लागवडीचे क्षेत्र, पाण्याची उपलब्धता या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा. उपलब्ध जमीन आणि पाणीपुरवठा याच बरोबर किती काळ बाजारपेठेत पुरवठा करण्यात येईल या बाबींवर भर द्यावा. लागवड करताना सगळे क्षेत्र एकाच वेळी न लावता तीन अगर चार टप्प्यांत लावावे, म्हणजे फुले अधिक काळ बाजारात पाठविता येतील. मध्यम, उत्तम पाण्याचा निचरा होणारी आणि सेंद्रिय खतयुक्त जमीन या फुलपिकास आवश्‍यक असते. वरकस, हलक्‍या जमिनी तसेच चुनखडीयुक्त जमिनीत याची लागवड करू नये.

प्रकार आणि जाती

ऍस्टरमध्ये फुलांच्या आकारावरून, पाकळ्यांच्या रचनेवरून, दांड्याच्या लांबीनुसार आणि कालावधीनुसार अनेक प्रकार आणि जाती आढळतात.

रामकाठी प्रकार

या प्रकारात गुलाबी, पांढरा व जांभळा अशा रंगांची फुले येणाऱ्या जाती आहेत. यात फांद्यांची संख्या कमी असते. झाडे फारशी न पसरता उंच वाढतात. 

गरवा प्रकार

यात विविध रंगांची फुले येणाऱ्या जाती आहेत. पिकांची वाढ उंच आणि पसरट होते. पीक तयार होऊन हंगाम संपण्यास 150 दिवसांचा कालावधी लागतो.

निमगरवा प्रकार

या प्रकारातील जातींची वाढ मध्यम स्वरूपाची 45 सें.मी. पासून 60 सें.मी.पर्यंत उंच वाढतात. फुलांचा हंगाम 100 ते 120 दिवसांत संपतो. 
पावडर पफ  -  भरगच्च फुले निळ्या रंगाची आणि मोठ्या आकाराची असतात. 
आट्रीम फ्लम - आकर्षक निळ्या रंगाची आणि मोठ्या आकाराची फुले असतात.

जाती

  1. फुले गणेश व्हाइट -  ही जात लांब दांड्याची फुले मिळण्यासाठी उपयुक्त असून, फुले शुभ्र पांढऱ्या रंगाची असतात. हंगाम चार ते पाच महिन्यांचा असतो. फुलांचे चांगले उत्पादन मिळते. फुलदाणीमध्ये जास्त काळ फुले टिकतात.
  2. फुले गणेश पिंक -  फुलावर लवकर येणारी जात असून, निमपसरी, आकर्षक गुलाबी रंगाची फुले मिळतात. हंगाम चार ते पाच महिने असतो.
  3. फुले गणेश व्हायलेट -  ही जात निमपसरी, फुलावर लवकर येणारी आणि गडद जांभळ्या रंगाची फुले मिळतात. हंगाम चार ते पाच महिने असतो.
  4. गणेश पर्पल -   फुले फिक्कट जांभळ्या रंगाची असतात. फुलांचे चांगले उत्पादन मिळते.

लागवडीपूर्वी जमिनीची दोन वेळा खोल नांगरट करावी. धसकटे व हरळीच्या काशा वेचून घेऊन जमीन स्वच्छ करावी. हेक्‍टरी 12 टन शेणखत चांगले जमिनीत मिसळून घ्यावे. लागवडीपूर्वी हेक्‍टरी 50 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. रासायनिक खतांची मात्रा माती परीक्षणानुसार द्यावी. नंतर 60 सें. मी. अंतरावर सरी-वरंबे तयार करावेत. ऍस्टरची लागवड 60 x 30 सें. मी. किंवा 45 x 30 सें.मी. 45 x 45 सें.मी. अंतरावर करतात. सरी-वरंबा पद्धतीने लागवड करताना वरंब्याच्या मध्यभागी लागवड करावी. लागवडीपूर्वी रोपांची मुळे शिफारशीत बुरशीनाशकांच्या द्रावणात बुडवून घ्यावीत. रोपांची लागवड सायंकाळी करावी. लागवडीनंतर पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे.

लागवडीनंतर दहा दिवसांनी पाच किलो ऍझोटोबॅक्‍टर किंवा ऍझोस्पिरीलम 50 किलो ओलसर शेणखतात मिसळावे. या मिश्रणाचा ढीग करून तो प्लॅस्टिकच्या कागदाने आठवडाभर झाकून ठेवावा. अशाच प्रकारे दहा किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक आणि पाच किलो ट्रायकोडर्मा प्रत्येकी 50 किलो शेणखतात मिसळून वेगवेगळे ढीग करून आठवडाभर झाकून ठेवावेत. एक आठवड्यानंतर तिन्ही ढीग एकत्र मिसळून एक हेक्‍टर क्षेत्रातील पिकाला द्यावे. गरजेनुसार खुरपणी करावी. त्यामुळे रोपांच्या वाढीला तणांचा त्रास होणार नाही. लागवडीनंतर चार ते पाच आठवड्यांनी हेक्‍टरी 50 किलो नत्राचा हप्ता द्यावा. ऍस्टर पिकाच्या मुळ्या जास्त खोलवर जात नसल्यामुळे लागवड केलेले वरंबे नेहमी वाफसा अवस्थेत राहतील याची काळजी घेणे जरुरीचे आहे. साधारणपणे ऍस्टर पिकास आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे, ऍस्टर पिकास कळ्या येऊ लागल्यानंतर फुले येईपर्यंत पाण्याचा ताण देऊ नये. अन्यथा, फुलांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. साधारणपणे जातीनुसार अडीच ते चार महिन्यांत फुले येतात. फुलांची तोडणी दोन ते तीन दिवसांच्या अंतराने करावी. पूर्ण वाढ झालेली आणि उमललेली फुले 10 ते 20 सें.मी. दांड्यासह कापून घ्यावीत. बाजारपेठेच्या मागणीनुसार जुडी करून विक्रीसाठी पाठवावीत. 

संपर्क -  020 - 25693750 
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेश खिंड, पुणे

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate