অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लसूण

प्रस्‍तावना

लसूण हे कंदर्प कुलातील एक मसाल्‍याचे पीक आहे. अन्‍नपदार्थ स्‍वादीष्‍ट होण्‍यासाठी दैनंदिन आहारात लसणाचा उपयोग करतात. लसणात प्रोपील डायसल्‍फाईड व लिपीड ही द्रव्‍ये असतात. चटण्‍या, भाजी व लोणचे यात लसणाचा वापर केला जातो. पोटाच्‍या विकारावर पचनशक्‍ती, कानदुखी डोळयातील विकार डांग्‍या खोकला इत्‍यादीवर उपचारासाठी गुणधर्मही लसणात आहेत.

महाराष्‍ट्रात जवळ जवळ 5000 हेक्‍टर जमीन हया पिकाखाली असून नासिक पुणे ठाणे तसेच मराठवाडा विदर्भात लागवड केली जाते.

हवामान व जमीन

समशितोष्‍ण हवामान लसूण लागवडीस उपयुक्‍त असते. मात्र अति उष्‍ण व अति थंड हवामान या पिकास मानवत नाही. समुद्रसपाटीपासून 1000 ते 1300 मीटर उंचीपर्यंत लसणाची लागवड करता येते. पिकाच्‍या वाढीच्‍या काळात 75 सेमी पेक्षा जास्‍त पाऊस पडत असल्‍यास पिकाची वाढ चांगली होत नाही. याकरता ऑक्‍टोबर महिन्‍यात केलेली लागवड अधिक उत्‍पादन देते. दिवसाचे 25 ते 28 अंश सें. ग्रे. व रात्रीचे 10 ते 15 अंश सें.ग्रे. तापमानात गडयांची वाढ चांगली होते.

मध्‍यम खोलीच्‍या भरपूर सेंद्रीय खते घातलेल्‍या रेती मिश्रित कसदार तणविरहित जमिनीत पीक चांगल्‍याप्रकारे घेता येते. हलक्‍या प्रकारच्‍या जमिनी, चिकण मातीच्‍या जमिनी लागवडीस योग्‍य नसतात.

पूर्वमशागत

मध्‍यम खोलीची नांगरट करुन ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. जमीन तयार करते वेळी हेक्‍टरी 30 गाडया (15 टन) शेणखत मिसळावे. वर पाणी देण्‍यास सोईस्‍कर अशा आकाराचे (3×2) अथवा (3.5×2मी) सपाट वाफे तयार करावेत.

जाती व लागवड

महाराष्‍ट्रात पांढ-या रंगाच्‍या जामनगर जातीची तसेच गोदावरी, श्रवेता या जातीची लागवड केली जाते. लसणाची लागवड ऑक्‍टोबर-नोव्‍हेबर महिन्‍यात साध्‍या वाफयात कोरडया   10×7.5  सेमी वर करतात. गडडे फोडून पाकळया किंवा काडया सुटया करुन टाकून मातीने झाकतात. त्‍यासाठी हेक्‍टरी 500 ते 600 किलो कुडयाच्‍या स्‍वरुपात बियाणे लागते. लागण झाल्‍यानंतर कुडया निघणार नाहीत असे पाणी द्यावे.

बियाण्‍याची निवड

लसणाच्‍या गाठया एकावर एक अशा गोलाकार पाकळयांनी बनलेली असते. गाठयातील पाकळया सुटया करण्‍यासाठी गडडे पायाखाली तुडवून मग ऊफवून साफ केल्‍या जातात.  लागवडीसाठी मोठया निरोगी व परिपक्‍व पाकळयांच्‍या उपयोग करावा.

वरखते

लावणीच्‍या वेळी लसणास हेक्‍टरी 50 किलो युरीया 300 किलो सुपर फॉस्‍फेट व 100 किलो म्‍युरेट ऑफ पोटॅश मिसळून द्यावा म्‍हणजे पिकांची वाढ जोमदार होते.

आंतर मशागत

मसणाच्‍या पाकळया लावल्‍यानंतर एक महिन्‍याने खुरपणी करुन गवत काढून घ्‍यावे. त्‍यानंतर तण पाहुन 1-2 वेळा निंदणी करावी. लागवडीनंतर अडीच महिन्‍यांनी लसणाचे गाठे धरण्‍यास सुरुवात होते. यावेळी हात कोळपणी करुन माती चांगली मोकळी ठेवावी म्‍हणजे मोठया आकाराचे व चांगले भरदार गाठे धरण्‍यास मदत होते. त्‍यानंतर खुरपणी अथवा कोळपणी करु नये.

पाणी देणे

लावणीनंतर पाण्‍याची पहिली पाळी सावकाश द्यावी. दुसरी पाळी त्‍यानंतर 3-4 दिवसांनी आणि पुढच्‍या हवामानानुसार 8 ते 12 दिवसांनी द्याव्‍यात. गडडे पक्‍के होताना वर पाण्‍याच्‍या दोन पाळीतील अंतर वाढवावे. काढणीच्‍या दोन दिवस अगोदर पाणी द्यावे. त्‍यानंतर वरपाणी देऊ नये. म्‍हणजे गडडे काढणे सोपे जाते व गडडे फुटले जात नाही.

किड व रोग

किडी

बोकडया : ही किड पानातील रस शोषुन झाडे अशक्‍त्‍ा बनवतात.

उपाय सायपर मेथ्रीन 25 टक्‍के प्रवाही 5 मिली 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.

रोग

करपा व भुरी : या दोन्‍ही रोगांमुळे अनुक्रमे पाने गर्द तांबडया रंगाची व पांढ-या रंगाची होतात व अटळ स्थितीत झाडे मरतात.

उपाय ताम्र्रयुक्‍त बुरशीनाशकाचा वापर करावा.

काढणी व उत्‍पादन

लावणीनंतर साडेचार ते पाच महिन्‍यांनी हे पीक काढणीस योग्‍य होते. पिवळी पडावयास लागली म्‍हणजे गाठे काढावयास तयार झााले असे समजावे. लसून पातीसह तसाच बांधून ठेवावा. म्‍हणजे 8 -10 महिने टिकतो विक्रीसाठी पाती कापून गडडे स्‍वच्‍छ करुन आकाराप्रमाणे प्रतवारी करुन बाजारात पाठवतात. जमिनीचे पोत, खते व जात यावर लसणाचे उत्‍पादन अवलंबून असते. दर हेक्‍टरी 9 ते 10 टन उत्‍पादन मिळते.

स्त्रोत: कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 5/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate