অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ओळख रानभाज्यांची - शेवळा


  • शास्त्रीय नाव - ऍमोरपोफॅलस कम्युट्यॅटस (Amorphophallus Commutatus)
  • कुळ - ऍरेसी (Araceae)
  • स्थानिक नावे - रानसुरण, जंगली सुरण, अरण्यसुरण.
  • संस्कृत नावे - मोगरी कंद, वज्रकंद.
  • इंग्रजी नावे - एलिफंट फूट याम, ड्रॅगन स्टॉक याम.
  • शेवळा ही वनस्पती केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांतील जंगलात आढळते. महाराष्ट्रामध्ये शेवळा वनस्पती कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र व अकोला येथील जंगलात आढळते.

ओळख

शेवळा ही वर्षायू, कंदवर्गीय वनस्पती आहे. 
कंद - रोपवर्गीय वनस्पतीचा कंद जमिनीत असतो. त्याचा आकार गोल-चपटा किंवा गोलाकार-उभट असतो. साधारणपणे 10 ते 12 सें.मी. व्यास व 4 ते 5 सें.मी. उंचीचा असतो. कंद गडद करड्या किंवा तांबूस-करड्या रंगाचा असतो. कंदावरची साल काढून, तुकडे करून ते सुकवितात. तुकडे दोरीत ओवून, ""मदनमस्त'' या नावाने बाजारात विकतात. हे तुकडे उदी रंगाचे, सुरकुतलेले असून, त्यावर पुळ्या असतात. पाण्यात भिजविल्यावर हे तुकडे फुगतात, नरम होतात. त्यांची चव पिठाळ, जरा कडू व तिखट असते. 
- पान - पावसाळ्यात जमिनीत असणाऱ्या कंदापासून एक पान तयार होते. पानाचा देठ 60 ते 80 सें.मी. लांब व 1.8 ते 2.2 सें.मी. रुंदीचा असतो. देठाचा वरील भाग निमुळता. देठ भरीव व त्वचेवर काळसर गडद हिरवे डाग असतात. देठाच्या टोकांवर त्रिविभागी संयुक्त पान असते. या पानांचा गोलाकार घेर 60 ते 70 सें.मी. इतका असतो. पर्णिका 12.5 ते 5.0 सें.मी. आकाराची, पसरट. 
- पुष्पमंजिरी व फुले - कंदापासून पान तयार होण्यापूर्वी एक ते दीड महिना अगोदर मे महिन्यात शेवळा वनस्पतीला कंदापासून पुष्पमंजिरी तयार होते. या वनस्पतीची मंजिरी लंबगोलाकार आकाराची असते. पुष्पमंजिरीचा देठ 30 ते 90 सें.मी. लांब व 1.8 ते 2.2 सें.मी. रुंद असतो. त्याच्या त्वचेवर काळसर गडद हिरवे डाग असतात किंवा संपूर्ण त्वचा काळसर तपकिरी रंगाची असते. पुष्पदांड्याच्या टोकावर 15 ते 25 सें.मी. लांब व 5 ते 12.5 रुंद, टोकाकडे निमुळते होणारे जांभळट-तपकिरी रंगाचे जाड आवरण असते. आवरणाच्या आतील बाजूस गुलाबी-पांढरट रंगाच्या पुष्पदांड्यावर लहान, देठरहित नर व मादी फुले असतात. नर फुले तपकिरी, जांभळट रंगाची, वरील बाजूस, पुंकेसर 2 ते 4, मादी फुले लालसर-तांबूस रंगाची. बीजांडकोश एक कप्पी. फळे लहान, गोलाकार, लालसर, गुच्छाने पुष्पदांड्याच्या टोकांवर येतात. बी एक, गोलाकार, लाल रंगाची. शेवळ्याला मे-जून महिन्यात फुले येतात. त्यावेळी पाने नसतात. फुलांना मांस कुजल्यासारखा अत्यंत घाणेरडा वास येतो.

शेवळ्याचे औषधी गुणधर्म

  • शेवळ्याचा कंद औषधात वापरतात. याच्या कंदाची पाने दूध आणि साखरेबरोबर वाजीकरणासाठी देतात. यामुळे मूत्रमार्गास उत्तेजन येते.
  • शेवळ्यासोबत काकड फळांचा होतो वापर - शेवळ्याचे कंद व कोवळी पाने भाजीसाठी वापरतात. शेवळा थोडा खाजरा असतो, म्हणून सोबत काकड (Garuga pinnata) या वनस्पतीची आंबट फळे घालतात. शेवळा भाजी पौष्टिक असते. काकड फळांचा रस काढतात. या रसामुळे भाजी खाजत नाही. ही फळे आवळ्यासारखी दिसतात.

शेवळ्याच्या कंदाची भाजी

* पाककृती - 1 
साहित्य - शेवळ्याचे कंद, काकड फळे, चिरलेला कांदा, तिखट, हळद, लसूण पाकळ्या, हरभऱ्याच्या डाळीचा भरडा, तेल, मीठ, चिंच, गरम मसाला, कोथिंबीर इ. 
कृती - हरभऱ्याची डाळ थोडी गुलाबी रंग येईपर्यंत भाजून मिक्‍सरवर जरासा जाडसर भरडा करावा. प्रथम शेवळा कंदावरची साल काढून, त्याचा देठाकडचा केशरी रंगाचा भाग काढून टाकावा. कंदाचे चिरून बारीक तुकडे करून स्वच्छ धुऊन घ्यावेत. नंतर तेलावर बारीक चिरलेली भाजी थोडा वेळ परतून घ्यावी. नंतर काकड फळांतील बिया काढून टाकून फळांचा रस काढावा. तेलावर बारीक चिरलेला कांदा, लसूण फोडणीला घालावा. फोडणी परतल्यावर हळद, तिखट, गरम मसाला घालून परतावे. त्यात मीठ व काकडचा रस घालावा. दोन चमचे चिंचेचा कोळ घालून थोडी वाफ आल्यावर डाळीचा भरडा घालून चांगले परतावे. चांगली वाफ येऊ द्यावी, म्हणजे भरडा थोडा सुका होतो व शिजतो. भाजी शिजल्यानंतर वरून कोथिंबीर घालावी. 
- कोळंबी किंवा खिमा घालूनही भाजी करता येते.
* पाककृती 2 - 
साहित्य - शेवळाचे कंद, काकड फळे, शेंगदाणे, हरभरा डाळ, चिंचेचा कोळ, डाळीचे पीठ, गूळ, तिखट, मीठ, काळा मसाला, ओले खोबरे, हिंग, मोहरी, हळद इ. 
कृती - शेंगदाणे व हरभऱ्याची डाळ भिजवून नंतर शिजवून घ्यावे. साल काढलेल्या कंदाचे चिरून तुकडे करावेत. ते पाण्याने धुतल्यानंतर शिजवून पाणी काढून घोटून घ्यावेत. त्यात थोडे डाळीचे पीठ घालावे. नंतर त्यात भाजीचे पाणी घालावे. चिंचेचा कोळ, गूळ, तिखट, मीठ, काळा मसाला घालून पळीवाढी भाजी करावी. ओले खोबरे घालावे. वरून तेलामध्ये हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी द्यावी. काही ठिकाणी ही भाजी तांदळाच्या धुवणात शिजविण्याची पद्धत आहे.

शेवळ्याच्या पानांची भाजी

साहित्य - शेवळ्याची कोवळी पाने, मूगडाळ, लाल मिरच्या, आमसुले, दाणेकुट, नारळ चव, गूळ, मीठ, तेल, हिंग, मोहरी, हळद, तिखट इ. 
कृती - शेवळ्याची कोवळी पाने धुऊन बारीक चिरावीत. आमसुले पाण्यात भिजत ठेवावीत. तेलाच्या फोडणीत लाल मिरच्या व मूगडाळ घालावी. थोड्या वेळाने चिरलेली पाने घालावीत. नंतर आमसुलाचा कोळ घालावा. मीठ, तिखट, गूळ घालून भाजी शिजवावी, नंतर दाणेकूट व नारळचव घालावा. 
- डॉ. मधुकर बाचूळकर

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate