অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अतिरिक्त मळीवर तोडगा

आपल्या समाजासमोर अनेक प्रश्‍न "आ' वासून उभे असतात. अशा प्रश्‍नांची उत्तरे अत्यंत सोपी व व्यवहार्य असतात, मात्र प्रश्‍न आणि उत्तर यांच्या सांगड घालण्याच्या मानसिकतेसंदर्भातील अभावामुळे प्रश्‍न सुटणे कठीण होते. हेच उसाच्या अतिरिक्त मळीचे काय करावे, याबाबत झाले आहे. मात्र या प्रश्‍नाचा बागुलबुवा न करता त्यावर सुटसुटीत व व्यवहार्य तोडगा काढणे शक्‍य असल्याचे मत पुणे येथील अभ्यासक दीपक कान्हेरे यांनी व्यक्त केले आहे.

पाऊस चांगला झाल्याने उसाचे बंपर पीक आले, त्यामुळे लांबलेला कारखान्यांचा गळीत हंगाम, तसेच वाढीव गाळप आणि उद्‌भवलेला मळी (मोलॅसिस)चा प्रश्‍न निर्माण झाला.

एखाद्या साखर कारखान्याने आपली गाळपक्षमता वाढवली, तर साखरेचे उत्पादन वाढणार हे निश्‍चित! मात्र त्याच प्रमाणात मळीचे उत्पादनदेखील वाढणार हे तितकेच खरे. सहकार खात्याने या वाढीव क्षमतेला परवानगी देताना मळीच्या विल्हेवाटीचा अगर साठवणुकीचा अंदाज घेतला नव्हता का? असा प्रश्‍न पडतो. किंबहुना मळीचे वाढीव उत्पादन आणि त्यावर आधारित कारखान्यांचा मद्यार्कनिर्मिती प्रकल्प यातून साधली जाणारी नफ्याची व्यावहारिक गणितेही लक्षात घेतली पाहिजे.

मळीतून मद्यार्क काढल्यावर शिल्लक उरणाऱ्या "स्पेंट वॉश'वर अनेक कारखाने बायोमिथेनेशन तत्त्वाने जैववायू (बायोगॅस) निर्मिती करून आपले सहवीजनिर्मिती (को-जनरेशन) प्रकल्प अतिशय व्यवहार्यपणे चालवीत आहेत. अतिरिक्त मळीचे काय करावे? या "ऍग्रोवन'मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीतील आकडेवारी लक्षात घेता केवळ सोदाहरण स्पष्ट व्हावे म्हणून एक व्यावहारिक पर्याय येथे मांडत आहे.

एकूण साखर कारखाने- 161
मळीची वाढीव उपलब्धता - 12 लाख मे. टन
या दोन आकडेवारींचा संदर्भ लक्षात घेता असे म्हणण्यास हरकत नाही की संपूर्ण वर्षभरात प्रति कारखान्यामागे सुमारे 7400 मे. टन एवढ्या मळीची विल्हेवाट करावी लागेल, म्हणजेच प्रति दिन सुमारे 20 टन मळीची वासलात लावणे हा मूळ प्रश्‍न आहे.

वर उल्लेखिलेल्या आकडेवारीवरून पुढील गोष्टी स्पष्ट होतात

  • एक किलो मळी (मोलॅसिस) सुमारे 500 लिटर बायोगॅस देते.
  • वीस टन मळीपासून मिळणारे बायोगॅसचे उत्पादन हे सुमारे दहा हजार घनमीटर प्रति दिन.
  • एक किलोवॉट वीज निर्मितीसाठी आवश्‍यक असलेला बायोगॅस - 12 घनमीटर
  • रोजच्या बायोगॅस उत्पादनामुळे प्रति दिवस प्रति कारखाना उपलब्ध होणारी वीज ही सुमारे पाऊण मेगावॉट.
  • संपूर्ण वर्षभरात 135 मेगावॉट वीजनिर्मिती व तीही विकेंद्रित स्वरूपात उपलब्ध होणार प्रति कारखाना, प्रति दिवस.
  • बायोगॅस प्रकल्पातून बाहेर पडणारी "स्लरी' हे एक उत्तम सेंद्रिय खत असते.
  • दररोजची बायोगॅस निर्मिती ही सुमारे दहा हजार घनमीटर असल्यामुळे प्रत्येक प्रकल्प कार्बन क्रेडिटसाठी पात्र.
  • कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून मिळणारे वाढीव उत्पन्न हे सुमारे 2.5 कोटी प्रति वर्ष प्रति कारखाना
  • संपूर्ण प्रकल्प हा कोणतेही प्रदूषण न करणारा आणि वीजनिर्मितीतून राज्याच्या वीज उपलब्धतेचा प्रश्‍न काही अंशी सोडवणारा.
  • ही व्यवहार्य मांडणी समजावून घेतल्यावर सरकारकडे पॅकेजचा आग्रह कशाला धरायला हवा.
  • या सर्वांचा विचार केला तर राज्य सरकारला हैराण करणाऱ्या या प्रश्‍नावर यातून तोडगा काढता येऊ शकतो.
  • (लेखक जैवइंधन विषयातील तज्ज्ञ आहेत.)

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate