অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिंधुदुर्गात रबर लागवड ठरतेय यशस्वी

सिंधुदुर्गात रबर लागवड ठरतेय यशस्वी

नारळ, सुपारी, काजू आणि आंबा यासाठी सिंधुदुर्ग प्रसिद्ध आहेच, त्याचबरोबरीने आता रबराची लागवड वाढते आहे. केरळमधील श्री. सुंदरेशन यांनी दोडामार्ग तालुक्‍यातील वीसघर-खराडी भागात तीन एकर क्षेत्रावर 1993 मध्ये रबराची लागवड केली. ती आता टप्प्याटप्प्याने वाढवत सात एकरापर्यंत केली आहे. या रबर शेतीतून चांगला आर्थिक नफा मिळविता येतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

सिंधुदुर्गातील हवामान आणि जमीन रबर लागवडीसाठी चांगली असल्याने सन 1986-87 च्या दरम्यान केरळमधील कन्नूर आणि कोट्टायम या जिल्ह्यांतील पंचवीस शेतकरी एकत्र आले. त्यांनी "इंटर स्टेट ग्रुप ऑफ फार्मिंग सोसायटी' स्थापन केली. वर्गणी काढून निधी जमवला आणि केरळबाहेर जाऊन रबराची लागवड करण्याचे निश्‍चित केले. जमिनीच्या शोधात ते सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्‍यात आले. येथील हवामान आणि डोंगर उताराची जमीन रबराच्या लागवडीसाठी योग्य असल्याचे लक्षात आल्यावर करार पद्धतीने लागवडीस सुरवात केली. या गटातील एक प्रयोगशील शेतकरी के. आर. सुंदरेशन यांनी दोडामार्ग तालुक्‍यात करार पद्धतीने रबर लागवडीची सुरवात केली. पुढे पैसा गुंतवत दोडामार्ग तालुक्‍यातील वीजघर-खराडी 1992 मध्ये दहा एकर जमीन त्यांनी खरेदी केली. शासनाच्या योजनेतून त्यांनी रबर लागवडीसाठी कर्ज घेतले. त्यांनी सुरवातीला तीन एकरात रबराची लागवड केली.

या रबर लागवडीबाबत सांगताना के. आर. सुंदरेशन म्हणाले, की मी 1988 मध्ये या भागात आलो. येथील हवामान आणि जमीन रबर लागवडीसाठी चांगली आहे. त्यामुळे 1992 मध्ये खराडी परिसरात जमीन खरेदी केली आणि पहिल्या टप्प्यात तीन एकरावर रबराच्या नं.105 या जातीची लागवड केली. टप्प्याटप्प्याने सात एकरापर्यंत रबर लागवड वाढवत नेली आहे. आमची जमीन हलकी आहे. अशा जमिनीतच 20 फूट x 10 फूट अंतरावर योग्य आकाराचे खड्डे खणून शेणखत, मातीने भरून एकरी 200 रोपांची लागवड केली. रोपे मला केरळमधील रबर बोर्डाकडून अनुदानावर मिळाली. सुरवातीच्या पाच वर्षांत या झाडांना वादळी वाऱ्याचा धोका अधिक असतो. एका झाडाचे आयुर्मान पस्तीस वर्षे एवढे असते. लागवडीनंतर पहिली चार वर्षे रोपांच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन केले. वेळोवेळी आळ्यात उगवणारे तण काढले. पहिली दोन वर्षे यामध्ये चवळीचे आंतरपीक घेतले.

साधारणपणे सन 2000 पासून रबराच्या चिकाची काढणी सुरू केली. जेव्हा खोडाची गोलाई 55 सें.मी होते, त्यानंतर ही झाडे टॅपिंग म्हणजेच चीक काढणीस योग्य ठरतात. त्यानुसार रबराचा चीक काढण्यास सुरवात केली. कलमांना जमिनीपासून 125 सें.मी. उंचीवर 30 अंशाचा कोन करून उतरती खाच पाडून मर्यादित क्रमशः साल काढली जाते. साल काढलेल्या ठिकाणी खाचेच्या खाली नारळाची करवंटी किंवा प्लॅस्टिकचा कप तारेने झाडाला बांधला जातो. त्यात चीक गोळा केला जातो. रबराच्या झाडाचे एक आड एक दिवस टॅपिंग केले जाते. वर्षातून मी साधारणपणे 110 दिवस टॅपिंग करतो. टॅपिंग करताना प्रत्येक वेळी 1.5 मि.मी. जाड व एक मि.मी. खोल साल खोडाबरोबर ठेवून काढली जाते. त्यामुळे साल परत लवकर भरून येते. झाडाला इजा होत नाही. आम्ही सकाळी चार ते सात या काळात टॅपिंग करतो. साल काढल्यानंतर चार तासांत चीक करवंटीत जमा होतो. चीक गोळा झाल्यावर प्रति लिटर चिकासाठी 1.6 लिटर पाणी मिसळतो.

चीक घट्ट होण्यासाठी योग्य प्रमाणात फॉर्मिक ऍसिड मिसळले जाते. हे सर्व द्रावण ट्रेमध्ये एक दिवस ठेवले जाते. दुसऱ्या दिवशी घट्ट झालेली चिकाची लादी स्वच्छ पाण्याने धुऊन साध्या आणि दातेरी चरकातून दाबून घेतो. त्यामुळे त्यातील ऍसिडयुक्त पाणी बाहेर पडते. हे तयार झालेले रबराचे तुकडे सावलीत वाळविले जातात. उच्च प्रतीचे रबर मिळविण्यासाठी रबर शीट "स्मोक हाऊस'मध्ये सुकविले जातात. साधारणपणे उत्पादनाचा विचार करायचा झाल्यास मला वर्षाला एकरी एक टन रबराचे उत्पादन मिळते. सध्या किलोला 200 रुपये असा दर आहे.

या रबराला टायर उद्योगाकडून मागणी आहे. याची विक्री कोल्हापूर, गोवा, बेळगाव या ठिकाणी होते. मागणी चांगली असल्याने ही रबर लागवड आर्थिकदृष्ट्या परवडते. पुढील दोन वर्षांत आणखी दोन एकर क्षेत्रातून रबर चिकाचे उत्पादन सुरू होणार आहे. उत्पादनाचा खर्च वजा जाता वर्षाला सुमारे दोन लाखांचे उत्पन्न या लागवडीतून मिळते. कुटुंबातील सर्वजण या रबर लागवडीमध्ये मेहनत करतो. त्यामुळे मजूर कमी प्रमाणात लागतात. रबर हे पीक सिंधुदुर्गात चांगल्या प्रकारे वाढते आहे. 
संपर्क - श्री. सुंदरेशन - 9421130785

रबर लागवडीतील संधी...

रबर लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने रबर बोर्डाची स्थापना केली. त्याचे मुख्य कार्यालय केरळमध्ये आहे. त्यामार्फत रबर लागवडीसाठी अनुदान देण्यात येते. सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात रबराची लागवड होऊ लागल्याने दोडामार्ग येथे बोर्डाचे प्रादेशिक कार्यालय सुरू झाले आहे. या कार्यालयातील अधिकारी एस. के. कुडाळकर म्हणाले, की सिंधुदुर्गात रबर लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. रबर लागवडीसाठी जीटी.1, पी.आर.107 आणि आर.आर.आय.एम. 600 या जाती चांगल्या आहेत. डोंगर उतार तसेच सपाट जमिनीवरही याची लागवड करता येते. रबर लागवडीसाठी अनुदानही मिळते. रबर बोर्डातर्फे कलमांचा पुरवठा तसेच तांत्रिक मार्गदर्शन केले जाते. 
संपर्क - 9423832507

रबर फायदेशीर....

कृषी महाविद्यालय, दापोली येथील वनस्पती शास्त्र विभागातील तज्ज्ञ विजय दळवी रबर लागवडीबाबत म्हणाले, की विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर आम्ही रबर लागवडीचे प्रयोग घेतले आहेत. कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत रबर लागवड होऊ शकते. लागवडीनंतर खोडाची गोलाई 55 सें.मी. होते त्यानंतर किफायतशीर चिकाचे उत्पादन मिळण्यास सुरवात होते.

एक आड एक दिवस चीक काढला जातो. प्रत्येक टॅपिंगपासून सरासरी एका झाडापासून 100 मि.लि. चीक मिळतो. म्हणजेच वर्षाला 12 ते 15 लिटर चीक मिळतो. त्यापासून चार ते पाच किलो सुके रबर तयार होते. चांगल्या उत्पादनासाठी झाडाचे खत- पाणी व्यवस्थापन आणि शास्त्रीय पद्धतीने टॅपिंग आवश्‍यक आहे. कृषी विद्यापीठातून शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन दिले जाते. 
संपर्क - श्री.दळवी - 02358 - 282415, 282130


स्त्रोत: अग्रोवन


अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate