অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अशी करावी गहू लागवड

गहू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी. जिरायती गव्हाची पेरणी ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी 15 नोव्हेंबरनंतर उशिराने केल्यास प्रत्येक पंधरवड्यात गव्हाचे उत्पादन हेक्‍टरी 2.5 क्विंटल एवढे घटते असे आढळून आलेले आहे.
पश्‍चिम महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रातील काळ्या जमिनीत सोयाबीन- गहू या पीक पद्धतीमध्ये गव्हाची पेरणी 12 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत करावी. बागायत उशिरा गव्हाची पेरणी उशिरात उशिरा म्हणजे डिसेंबरअखेरपर्यंत करावी. उशिरा पेरणी केलेल्या गव्हास थंड हवामानाचा कालावधी कमी मिळत असल्यामुळे उत्पादनात बरीच घट येते.

पेरणीच्या पद्धती

बागायत वेळेवर पेरणीसाठी जमिनीत ओलावा नसल्यास जमीन ओलावून घ्यावी. वाफसा आल्यानंतर जमीन कुळवावी. पेरणीसाठी प्रति हेक्‍टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावे. रासायनिक खतांचा पहिला हप्ता आणि गहू बियाणे दोन चाड्यांच्या पाभरीने एकत्रित पेरावे. एकेरी पेरणी करावी. त्यामुळे योग्य प्रकारे आंतरमशागत करता येते.
बागायत उशिरा पेरणीसाठी प्रति हेक्‍टरी 125 ते 150 किलो बियाणे रासायनिक खतांच्या पहिल्या हप्त्यासह दोन चाड्यांच्या पाभरीने एकेरी पद्धतीने पेरावे. 
गव्हाच्या बियाण्यास पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास तीन ग्रॅम थायरमची बीज प्रक्रिया करावी. यानंतर प्रति किलो बियाण्यासाठी 25 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टरची बीजप्रक्रिया करावी. हे जिवाणूसंवर्धक कीडनाशक आणि रासायनिक खतांबरोबर एकत्रित मिसळू नये. जिवाणूसंवर्धकामुळे बियाण्याची उगवण लवकर व चांगली होते, तसेच उत्पादनातही वाढ होते.

पीक व्यवस्थापन

बागायत वेळेवर पेरणीसाठी प्रति हेक्‍टरी 25 ते 30 गाड्या शेणखत वापरावे, तसेच प्रति हेक्‍टरी 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद (375 कि. सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 40 किलो पालाश (65 कि. म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. निम्मे नत्र (130 कि. युरिया) आणि संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेले निम्मे नत्र (130 कि. युरिया) पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी करून द्यावे.
बागायत उशिरा पेरणीसाठी पेरणीच्या वेळी प्रति हेक्‍टरी 40 किलो नत्र (87 कि. युरिया), 40 किलो स्फुरद (250 कि. सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 40 किलो पालाश (65 कि. म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे.
पेरणीनंतर तीन आठवड्यांनी शेताची खुरपणी करून प्रति हेक्‍टरी 40 किलो नत्राची मात्रा (87 कि. युरिया) द्यावी.

पाणी व्यवस्थापन

जिरायती गहू पिकाची वाढ ही जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावरच होत असते. बागायत वेळेवर आणि बागायत उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकासाठी जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या कमी- जास्त होऊ शकतात. गहू पिकास देण्यासाठी एकच पाणी उपलब्ध असेल तर ते पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी द्यावे.

सुधारित वाण

  • जिरायती पेरणीसाठी - पंचवटी (एनआयडीडब्ल्यू- 15), शरद (एकेडीडब्ल्यू- 2997- 16)
  • जिरायती आणि मर्यादित सिंचन - नेत्रावती (एनआयएडब्ल्यू- 1415)
  • बागायत वेळेवर पेरणीसाठी - तपोवन (एनआयएडब्ल्यू- 917), गोदावरी (एनआयडीडब्ल्यू- 295), त्र्यंबक (एनआयएडब्ल्यू-     301), एमएसीएस- 6222
  • बागायत उशिरा पेरणीसाठी - एनआयएडब्ल्यू- 34, एकेएडब्ल्यू- 4627
दोन पाणी उपलब्ध असतील तर पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी आणि दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे आणि तीन पाणी उपलब्ध असतील, तर पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी, दुसरे पाणी 42 ते 45 दिवसांनी आणि तिसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे. 
- 02550 - 241023 
कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate