অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भात लागवड ड्रमसीडर पद्धत

सध्या शेतकऱ्यांच्या शेतात तीन अवस्था दिसून येतात

१. रोपवाटिका सुकून गेल्या आहेत.
२. पाण्याअभावी बियांची उगवण कमी झालेली आहे.
३. पाणी उपलब्ध असल्याने रोपवाटिका वाचल्या, मात्र रोपांचे वय ३०-३५ दिवसांपेक्षा अधिक आहे.

उपाययोजना

१. गेल्या काही दिवसांपासून कोकणात चिखलणी होऊ शकेल असा पाऊस झाला. उशीर झालेला असल्याने शेतकऱ्यांनी एका चुडात २ ते ३ रोपांऐवजी ४ ते ५ रोपे लावावी लागतील. रोपे कमी पडण्याची शक्यता आहे.
२. रोपवाटिका तयार असल्या तरी पुरेसा पाऊस नसल्याने चिखलणी शक्य नाही. जमिनीत ओलावा चांगला आहे. अशा ठिकाणी शेतात हलकी नागरंट/ उखळणी करून तण मारून घ्यावे.
  • जमिनीत पुरेशी ओल असताना भाताची रोपे २० x १५ सें. मी. अथवा २५ x२५ सें. मी. अंतरावर ठोंबा पद्धतीने लागवड करावी.
  • नंतर भात पिकामध्ये तण ४ ते ५ पाने या अवस्थेत असताना बिस्पिपिबँक सोडियम (१० टक्के एससी) १० मिलि प्रति १५ लिटर पाण्यातून भात पिकामध्ये फवारावे.
  • प्रत्येक शेतकऱ्याकडे हळवी (हलकी), निम-गरवी (मध्यम) आणि गरवी (भारी) जमीन असते. अति गरवे भात घेऊ नये आणि हळव्या जातीचे भात निम-गरव्या जमिनीमध्ये घ्यावे आणि निम-गरव्या जातीच्या भाताची गरव्या जमिनीमध्ये लागवड करावी.
३. अगोदर रोपे शिल्लक नसलेल्या शेतकऱ्यांनी मॅट पद्धत, दापोग पद्धत रोपवाटिका तयार करण्यासाठी वापरू नये. कारण त्यासाठी साधारण १४ दिवस कालावधी रोेपे तयार होण्यासाठी लागेल. तेव्हा आता शेतकऱ्यांनी एक तर टोकण पद्धतीने भात लागवड करावी अथवा ड्रम सीडरचा वापर करून भात पेरणी करावी.

बियाणे आणि अंतर

टोकण पद्धतीत बियाणे ३५-४० किलो प्रति हेक्टरी
लागवड अंतर २० x १५ सें. मी. टोकण ४-५ दाणे प्रति टोकणात

बीजप्रक्रिया

१) बी टोकण्यापूर्वी प्रथम मिठाच्या ३ टक्के द्रावणात बुडवून घ्यावे. जे बियाणे पाण्यावर तरंगते ते हलके आणि खराब असल्याने फेकून द्यावे आणि तळाशी असलेले बियाणे काढून नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत सुकवावे.
२) त्यानंतर बियाण्यास प्रति किलोस २ ग्रॅमप्रमाणे थायरम बीजप्रक्रिया करावी आणि नंतर पेरणीसाठी वापरावे.

लागवड पद्धत

टोकण लागवडीसाठी पहिली पद्धत -
  • भात लागवडीचे अंतर दोन ओळींत २० सें. मी. आणि दोन टोकणांमध्ये १५ सें. मी. अंतर ठेवावे. आता यासाठी आपणास प्रथम नांगरणी, फळी मारून झाल्यावर दोरीच्या साह्याने आपण सरळ दोरी धरून आखणी करावी. प्रथम २० सें. मी. अंतरावर दोरी धरल्यानंतर दोरीच्या साह्याने सरी पाडून घ्यावी. नंतर पाडलेल्या छोट्या सरीमध्ये साधारण १५ सें. मी. अंतरावर चार-पाच दाणे टाकावे आणि ते मातीने झाकून घ्यावे. काही ठिकाणी जमिनीत ओलावा अधिक असल्यास आखणी न करता दोरी धरून १५ सें. मी. अंतरावर बी टोकावे.
  • टोकण केल्यानंतर मातीत पुरेसा ओलावा आवश्यक आहे. नसल्यास किंवा पावसाची शक्यता नसेल तर विहिरीतील पाणी द्यावे. पेरणीनंतर ३-४ दिवसांनी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना तणनाशक ऑक्झिडायरजील (६ ईसी) साधारणपणे ३.३ मिलि प्रति लिटर अथवा पेंडीमेथॅलीन (३० ईसी) ८.३ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून भातावर फवारावे. हे शक्य न झाल्यास भात पिकामध्ये तण ४ ते ५ पान या अवस्थेत असताना बिस्पिरिबॅक सोडियम (Bispyribac sodium a.i.) असलेले १० मिलि प्रति १५ लिटर पाण्यातून भात पिकामध्ये फवारावे. तणनाशकांचा वापर केल्यामुळे निंदणीचा खर्च वाचेल. त्यानंतर आवश्यकता पडल्यास पेरणीनंतर १५ दिवसांनी एखादी निंदणी करावी लागते.
भात पेरणीसाठी दुसरी पद्धत -
ड्रम सीडर - ड्रम सीडरचा वापर करून भात पेरणी करावी. ड्रममध्ये बियाणे भरून दोन व्यक्तींच्या साह्याने एका दिवसात दोन एकर क्षेत्रावर भात पेरणी करता येते.
  • ड्रम सीडरची लांबी ११७५ मि. मी., रुंदी ६१० मि. मी., उंची १५४० मि. मी. असून, वजन २१ किलो असते.
  • दोन ओळींत अंतर २२.५ सें. मी.
  • एकरी २० ते २५ माणसांची बचत होते.
  • भात पुनर्लागवड खर्चात ९० टक्के बचत होते.
  • बियाणे १५ ते २० किलो एकर लागते.
रहू पद्धती -
या वेळी अनेकांची रोपवाटिका जळाली असून, रोपांची कमतरता आहे. त्यांनी रहू पद्धतीने भात लागवडीचे नियोजन केल्यास अपेक्षित उत्पादन मिळविणे शक्य आहे.
  • या पद्धतीमध्ये २४ तास बियाणे पाण्यात भिजत ठेवावे. नंतर पाण्यातून बियाणे काढून ते ओल्या पोत्यात थोडे सैल ठेवून पोत्याचे तोंड बांधून उबदार आणि सावलीच्या ठिकाणी ठेवावे.
  • बियाण्यास भाताच्या पेंड्यांनी झाकल्यास उबदार राहून अंकुरांची वाढ चांगली होते.
  • त्यावर पाणी शिंपडावे. पोत्यात पुरेसा ओलावा राहील याची दक्षता घ्यावी .
  • तापमानानुसार साधारणपणे ३६ ते ४८ तासांत बियाण्यास मोड येतात.
  • त्यानंतर पोत्यातून बियाणे हलक्या हाताने काढून मोकळे करावे.
  • अशा प्रकारे मोड आलेले बियाणे चिखलणी केलेल्या शेतात फोकून द्यावे.
- भारत कुशारे, ९८५०२६०३५५.
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, जि. ठाणे येथे कार्यरत आहेत.)

-----------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate