অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बाजरी

प्रस्तावना

बाजरी हे पीक अधिक सहनशील आणि धान्याबरोबरच चारा देणारे पीक आहे. आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये महत्त्वाच्या असलेल्या पिकाची खरिपात लागवड करताना योग्य ती काळजी घेतल्यास चांगले उत्पादन मिळवणे शक्‍य होईल.

बाजरी पिकांचे महत्त्व

  1. पाऊस उशिरा, अनिश्‍चित व कमी प्रमाणात झाला तरी इतर तृणधान्यापेक्षा अधिक धान्य व चारा उत्पादन देणारे हे पीक आहे.
  2. आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये या पिकाला महत्त्व आहे.
  3. कमी कालावधीत तयार होणारे तृणधान्य पीक असल्यामुळे खरिपानंतर रब्बीची पिके वेळेवर घेता येतात.
  4. सोयाबीन, गहू व बटाटा या पिकांमधील सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी या पिकांचा फेरपालटीचे पीक म्हणून उपयोग होतो.
  5. बाजरीपासून तयार केलेले पोल्ट्री फीड, अंडी देणाऱ्या कोंबड्यांना (लेअर) दिल्यास अंड्यामधील अनावश्‍यक कोलेस्टेरॉलचे ( LDL) प्रमाण हे मक्‍यापासून बनविलेल्या पोल्ट्री फीडच्या वापरातून उत्पादित अंड्यामधील प्रमाणापेक्षा कमी असते.

हवामान

  1. 400 ते 500 मी.मी. पावसाचे प्रमाण असलेल्या भागात हे पीक घेतात.
  2. उष्ण व कोरडे हवामान या पिकास चांगले मानवते.
  3. पिकाची उगवण व वाढ 23 ते 32 अंश सेल्सिअस तापमानात चांगली होते.
  4. पिकाच्या संपूर्ण वाढीच्या काळात स्वच्छ सूर्यप्रकाश अधिक उत्पादनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे.

जमीन व पूर्वमशागत

  1. अधिक उत्पादनासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असावा.
  2. चांगल्या उगवणीसाठी जमीन भुसभुशीत, ढेकळे विरहित व दाबून घट्ट केलेली असावी. यासाठी अर्धा फूट खोल नांगरट करून दोन ते तीन वखराच्या पाळ्या देऊन शेवटच्या वखरणीपूर्वी कुजलेले शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. पेरणीपूर्वी फळी फिरवून जमीन एकसारखी दाबून घ्यावी म्हणजे पेरणीनंतरच्या जोरदार पावसामुळे बी दडपून उगवणीवर विपरीत परिणाम होणार नाही.

बाजरीचे संकरित व सुधारित वाण

अ.क्र.वाणाचे नाव पिकाचा कालावधी उत्पादन क्षमता धान्य (क्विंटल / हे.)वाणाची वैशिष्टे
संकरित वाण
श्रध्दा (आर.एच.आर.एबी.एच-८६०९) ७० ते ७५ दिवस सरासरी २५ ते २७ लवकर पक्व होणारा वाण, गोसावी रोगास प्रतिकारक्षम, दाणे टपोरे व हिरव्या रंगाचे, कणीस घट्ट असून कणसावर कमी अधिक प्रमाणात केस असल्याने पाखरांपासून कमी उपद्रव
सबुरी (आर. एच.आर.एबी.एच.८९२४) ७६ ते ८० दिवस सरासरी ३० दाणे टपोरे, गोसावी रोगास प्रतिकारक्षम, कणीस घट्ट असून कणसावर कमी अधिक प्रमाणात केस असल्याने पाखरांपासून कमी उपद्रव
सबुरी (आर. एच.आर.एबी.एच.८९२४) ७६ ते ८० दिवस सरासरी ३० दाणे टपोरे, गोसावी रोगास प्रतिकारक्षम, कणीस घट्ट असून कणसावर कमी अधिक प्रमाणात केस असल्याने पाखरांपासून कमी उपद्रव
शांती (आर. एच.आर.एबी.एच.९८०८ ८० ते ८५ दिवस सरासरी ३० मध्यम उंची पिक जमिनीवर लोळत नाही, दाणे टपोरे व राखी रंगाचे, कणीस मध्यम घट्ट, भाकरी चवीला चांगली आणि गोसावी रंगास प्रतिकारक्षम
ए.एच.बी. १६६६ ७६ ते ८५ दिवस सरासरी ३० दाणे टपोरे व राखी रंगाचे, कणीस घट्ट, गोसावी रंगास प्रतिकारक्षम
सुधारीत वाण
आय.सी.टी.पी.-८२०३ ७५ ते ८० दिवस सरासरी १५ ते २० कणीस जड घट्ट, दाणे टपोरे, राखी रंगाचे, गोसावी रोगास बळी पडत नाही.
समृद्धी (ए.आय. एम.पी. – ९२९०१) ८० दिवस सरासरी २५ ते २८ दाणे टपोरे, राखी रंगाचे, गोसावी रोगास प्रतिकारक्षम, कणीस घट्ट व टोकाला निमुळते.
परभणी संपदा (पी.पी.सी. ६) ७५ ते ८० दिवस सरासरी २५ ते ३० दाणे टपोरे असून कान्ड्यातील रंग फिकट गुलाबी, गोसावी रोगास प्रतिकारक्षम.

 

बियाणे व बीजप्रक्रिया

भरघोस उत्पादनासाठी स्थानिक वाणाऐवजी बाजरीचे सुधारित किंवा संकरित वाणांचे बियाणे हेक्‍टरी 3 ते 3.5 किलो या प्रमाणात पेरणीसाठी वापरावे. अरगट आणि गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे वापरावे. बियाणे पेरणीपूर्वी 20 टक्के मिठाच्या द्रावणात (10 लिटर पाणी + 2 किलो मीठ) टाकावे. त्यात वर तरंगणाऱ्या बुरशी पेशी व हलके बी काढून त्याचा नाश करावा, राहिलेले बी स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत वाळवावे. मेटेलॅक्‍झील या रसायनाची बीजप्रक्रिया (6 ग्रॅम प्रति किलो बियाणे) या प्रमाणात करावी. या सर्व प्रक्रियेनंतर ऍझोस्पिरिलम व पीएसबी हे जिवाणू संवर्धक 20 ते 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात गुळाच्या द्रावणात (250 ग्रॅम गूळ + 1 लिटर पाणी) एकत्र करून बियाण्यास चोळावे व सावलीत सुकवून 4 ते 5 तासांच्या आत पेरणीसाठी वापरावे.

पेरणी

पावसाळा सुरू झाल्यानंतर 75 ते 100 मी.मी. पाऊस झाल्यास पेरणी करावी. खरीप बाजरीची पेरणी 15 जून ते 15 जुलै या कालावधीत जमिनीत चांगली ओल असताना दोन ओळींत 45 सें.मी. तर दोन रोपांत 12 ते 15 सें.मी. अंतर राहील अशा बेताने करावी. पेरणी शक्‍यतो दोन चाड्याच्या पाभरीने (तिफन) करावी म्हणजे रासायनिक खते बियाण्यासोबत व बियाण्याच्या खाली दिल्यामुळे त्यांची उपयुक्तता वाढून चांगले उत्पादन मिळते. बाजरीची पेरणी दोन ते तीन सें.मी. पेक्षा जास्त खोल करू नये. अन्यथा, यापेक्षा खोलीवर केल्यास उगवण कमी प्रमाणात होते. यासाठी पाभरीच्या फणास टोकाकडे कापडाची चुंबळ बांधावी म्हणजे पाभरीचे फण जमिनीत जास्त खोल जाणार नाहीत व बियाणे अपेक्षित खोलीवर पेरले जाईल. आपत्कालीन परिस्थितीत उशिरात उशिरा 30 जुलैपर्यंत बाजरी पिकांची पेरणी करता येते.

खत व्यवस्थापन

अधिक उत्पादनासाठी दहा किलो झिंक सल्फेट प्रति हेक्‍टरी पूर्वमशागतीच्या वेळेस जमिनीतून द्यावे. स्फुरदाची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेटमधून दिल्यास पिकास कॅल्शिअम व सल्फर ही अतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्येही मिळतात. (माती परीक्षणानुसारच रासायनिक खते द्यावीत.)

आंतरमशागत

पेरणीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी गरजेनुसार विरळणी करावी किंवा नांग्या भरून दोन रोपांतील अंतर 12-15 सें.मी. ठेवावे. जमिनीत चांगली ओल असल्यास विरळणी केलेली रोपे नांग्या भरण्यास वापरता येतात. तीस ते चाळीस दिवसांपर्यंत पीक तणविरहित राहण्यासाठी खुरपणी किंवा डवरणी करावी. एक महिन्यानंतर पिकास नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. कोरडवाहू पिकास युरिया देताना जमिनीत चांगली ओल असणे गरजेचे आहे.

हंगाम - माध्यान्ह - उपाययोजना

चांगल्या उगवणीनंतर मधल्या काळात पावसाचा खंड पडला तर मृद्‌बाष्पाची गरज भागविण्यासाठी डवरणी करून जमिनीचा वरचा पापुद्रा मोकळा करावा. यालाच डस्ट मल्चिंग म्हणतात. पिकातील काढलेले तण दोन ओळींत पसरून ठेवावे. डवरणी करताना डवऱ्याला खाली दोरी बांधल्यास पिकाला मातीची भर बसेल व पडणाऱ्या पावसाचे पाणी तयार झालेल्या सरीमध्ये व्यवस्थित मुरले जाऊन त्याचा उपयोग पिकाच्या पुढील वाढीच्या काळात होतो.

पाणी व्यवस्थापन

बाजरी पिकास फुटवे येण्याची वेळ, पीक पोटरी अवस्थेत असताना आणि कणसात दाणे भरताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. या अवस्थेत जमिनीत पुरेशी ओल नसल्यास पिकास संरक्षित ओलित म्हणून पावसाचा अंदाज बघून हलकेसे पाणी द्यावे.

आंतरपीक

अन्नद्रव्यासाठी व जागेसाठी स्पर्धा नसलेला कालावधी या तत्त्वानुसार बाजरी + तूर ही आंतरपीक पद्धती सर्व दृष्टीने फायदेशीर आहे. यासाठी बाजरी व तूर यांची आंतरपीक म्हणून पेरणी करताना याचे ओळीचे प्रमाण 2ः1 (बाजरी ः तूर) किंवा 4ः2 ठेवावे. या प्रमाणेच बाजरीत सोयाबीन, सूर्यफूल ही पिकेसुद्धा 4ः2 या प्रमाणात आंतरपीक म्हणून घेता येतात.
हलक्‍या जमिनीत आणि कमी पाऊस असणाऱ्या प्रदेशात बाजरी + मटकी 2ः1 या प्रमाणात आंतरपीक अवलंब करावा.

तणनाशकाचा वापर

गरजेनुसार बाजरी पिकात तणनाशकांचा वापर करता येतो. यासाठी ऍट्राझीन किंवा सिमाझीन हे उगवणपूर्व (पेरणीनंतर परंतु बी उगवण्यापूर्वी) तणनाशक हेक्‍टरी 1.5 ते 2 किलो 600 ते 700 लिटर पाण्यासोबत फवारावे. फवारणी नंतर 15 ते 20 दिवस पिकात खुरपणी किंवा डवरणी करू नये. तसेच पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी 2,4-डी (फक्त सोडिअम साल्ट) हे उगवणपश्‍चात तणनाशक हेक्‍टरी 1250 ग्रॅम या प्रमाणात 600 लिटर पाण्यासोबत तणावर फवारावे. तणनाशक फवारणीपूर्वी तज्ज्ञाचा सल्ला अवश्‍य घ्यावा.

स्त्रोत: एग्रोवन
aAqua

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate