অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भाताची "एसआरआय" पद्धत

भाताच्या सुधारित एसआरआय (सिस्टिम ऑफ राइस इंटेंसिफिकेशन) अर्थात सघन पद्धतीच्या लागवडीमुळे भात उत्पादकांना कमी खर्चात, कमी वेळेत तसेच मजुरी व बियाणे व अन्य निविष्ठांत बचत करून उत्पादन वाढवणे शक्‍य झाले आहे.

"एसआरआय' पद्धतीने भात लागवडीचे तंत्र

भात लागवडीची एसआरआय (सघन) पद्धतीमुळे कमी खर्चात, कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळविता येणे शक्‍य आहे. या सुधारित लागवड तंत्रज्ञानातील बारकावे शेतकऱ्यांनी समजावून घेतल्यास पारंपरिक पद्धतीपेक्षा भाताचे चांगल्या दर्जाचे अधिक उत्पादन घेता येणे शक्‍य आहे.

एसआरआय (सघन) लागवड पद्धतीमुळे भाताची रोपे बळकट होतात. रोपांची मुळे लांब असल्याने कमी पाण्यातही तग धरतात. बळकट मुळांमुळे मातीमधील सिलिकॉन अधिक प्रमाणात शोषून घेतले जाते. या पद्धतीने पारंपरिक, तसेच सुधारित, संकरित जातींची लागवड करता येते.

अशी तयार करा रोपवाटिका

या पद्धतीने लागवड करण्यासाठी एकरी दोन ते तीन किलो चांगल्या प्रतीचे, 80 टक्के उगवणक्षमता असलेले शिफारशीत बियाणे निवडावे. रोपवाटिकेत बियाणे पेरणीपूर्वी तीन टक्के मिठाच्या द्रावणात दहा मिनिटे बियाणे बुडवावे. या द्रावणात तरंगणारे बियाणे काढून टाकावे, पाण्यात बुडलेले बियाणे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन घ्यावे. त्यानंतर पाणी काढून 24 तास हे बियाणे सुती कापडामध्ये झाकून ठेवावे. या अंकुर फुटलेल्या बियाणांची मुळे दोन ते तीन मिलिमीटर लांबीची असतात.

रोपवाटिकेची गादीवाफा पद्धत

1) रोपवाटिकेच्या प्रत्येक 100 चौ. मीटर भागासाठी चार क्‍युबिक मीटर खतमाती मिश्रण मिसळावे. यासाठी साधारणपणे सात भाग मातीमध्ये दोन भाग चांगले वाळलेले शेणखत, गिरीपुष्प पाला, गांडूळखत आणि एक भाग भात तुसांची काळसर राख मिसळावी.
2) रोपवाटिकेत पेरणीसाठी खतमाती मिश्रणाचे दहा सें.मी उंचीचे आणि गरजेइतके लांब गादीवाफे तयार करावेत. प्रत्येक वाफ्यामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा सोडावी. गादीवाफ्यावर अंकुरलेले बियाणे पेरावे. त्यावर भाताच्या पेंढ्याचे आच्छादन करावे, झारीने पाणी द्यावे. पेंढा दोन दिवसांनी काढावा. त्यानंतर 8 ते 12 दिवसांनी रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात. ही रोपे बारीक लाकडी पट्टी किंवा ऍल्युमिनिअम (एक मि.मी.जाडीचे) पत्र्याचा वापर करून रोपांना मातीसकट उचलून मुळांना धक्का न देता मुख्य शेतात पुनर्लागवडीसाठी न्यावीत.

मॅट पद्धतीची रोपवाटिका

या रोपवाटिकेसाठी समतल जमिनीची निवड करावी. त्यानंतर जमिनीवर केळीची पाने किंवा प्लॅस्टिक शीट पसरावे. ज्यामुळे रोपांची मुळे मातीत जाणार नाहीत, त्यानंतर या प्लॅस्टिक शीटवर लाकूड, विटा किंवा बांबूची चौकट तयार करावी. या चौकटीचा आकार एक मी. लांब, 0.3 मी. रुंद आणि चार सें.मी. उंच इतका ठेवावा, त्यामुळे ही चौकट समान भागामध्ये विभागलेली असेल (किंवा 12 ु 12 इंचांची छोटी चौकट वापरावी). याचा फायदा म्हणजे छोट्या भागांमुळे रोपांचा पुनर्लागवडीसाठी उपयोग होतो, रोपांच्या मुळांचे नुकसान होत नाही. त्यानंतर ही चौकट गादीवाफ्यासाठी तयार केलेल्या मातीच्या मिश्रणाने भरावी.
2) बीजप्रक्रिया केलेले बियाणे या मातीत पेरून त्यावर दोन ते तीन सें.मी. माती पसरावी. मग भाताच्या पेंढ्याने गादीवाफे झाकून ठेवावेत. त्यावर लगेच झारीने पाणी शिंपडावे. साधारणपणे पाच दिवसांपर्यंत रोपवाटिकेला दिवसातून दोन वेळा पाणी द्यावे. रोपवाटिका 8 ते 12 दिवसांची झाल्यानंतर ही रोपे बारीक लाकडी पट्टी किंवा ऍल्युमिनिअम (एक मि.मी. जाडीचे) पत्र्याचा वापर करून रोपांना मातीसकट उचलून मुळांना धक्का न देता मुख्य शेतात पुनर्लागवडीसाठी न्यावीत.

पुनर्लागवडीची सूत्रे


एसआरआय पद्धतीने लागवड करण्यासाठी पारंपरिक पद्धतीप्रमाणेच शेतीची मशागत करावी. मशागतीनंतर मात्र शेतामध्ये समतलता काळजीपूर्वक ठेवावी, म्हणजे पाणी सगळीकडे सारख्या प्रमाणात लागू शकेल. शेतात प्रत्येकी तीन मीटर अंतरावर निचरा होण्यासाठी पाट काढून द्यावा. मार्करच्या साह्याने 25 x 25 सें.मी. अंतरावर उभ्या आणि आडव्या रेषा ओढाव्यात. प्रत्येक फुलीच्या मध्यावर रोप लागवडीचे नियोजन करावे. पिकाला रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा वापर माती परीक्षणानुसार करणे आवश्‍यक आहे. एसआरआय पद्धतीमुळे खतांचा आणि पाण्याचा काटेकोरपणे वापर केला जातो, त्यामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा या पद्धतीमध्ये रासायनिक खते आणि पाण्याच्या वापरात बचत होते.
रोपांची लवकर पुनर्लागवड
8 ते 12 दिवसांच्या दोन पानांच्या रोपांची पुनर्लागवड केल्यामुळे फुटवे फुटव्यांची संख्या वाढते. रोपे वरवर लावल्यास लगेच मुळे धरतात. अंगठा व तर्जनीचे बोट वापरून रोपे अलगद फुलीच्या मध्यावर लावावीत.

काळजीपूर्वक पुनर्लागवड

कुठलीही इजा न करता रोपे मातीसह उचलून घेऊन शेतामध्ये वर-वर लावावीत. रोप सशक्त व बळकट होऊन त्याला भरपूर मुळे फुटतात. रोपे जमिनीतील पोषणद्रव्ये नैसर्गिकरीत्या शोषून घेतात.

लागवडीचे अंतर


लागवड करताना रोपांचा चुडा न लावता एकाच रोपाची 25 x 25 सें.मी. या अंतराने लागवड करावी, त्यामुळे मुळांची आणि फुलोऱ्याची वाढ चांगली होते.

खुरपणी/ कोळपणी


आंतरमशागतीसाठी कोळपणी यंत्र वापरावे. दोन वेळा खुरपणी आवश्‍यक आहे.

पाणी व्यवस्थापन


जमिनीत ओल टिकून राहील, परंतु जमीन चिबड होणार नाही अशा पद्धतीने पिकाला पाणीपुरवठा करावा.

कंपोस्ट खताचा वापर


या पद्धतीने लागवड करताना हेक्‍टरी दहा टन कंपोस्ट खत लागवडीपूर्वी मिसळावे. सेंद्रिय खत उपलब्ध नसेल तर शिफारशीत प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवीत जाणे आवश्‍यक आहे.
एसआरआय पद्धतीने भात लागवड करताना 8 ते 12 दिवसांच्या रोपांची लागवड केली जाते. त्यामुळे मुळांचा चांगला विकास होऊन 30 ते 50 फुटवे मिळतात. पीक व्यवस्थापनाच्या या सहाही तंत्रांचा वापर केल्यास प्रत्येक रोपाला 50 ते 100 फुटवे येतात, फुटवे उत्पादनक्षम असतात. त्यांना जास्त लोंब्या येतात, लोंब्यांमध्ये अधिक व भरीव दाणे असतात.

स्त्रोत : अग्रोवन


अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate