অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पेरभात तंत्र एक पर्याय

मध्यम ते चांगल्या पावसाच्या प्रदेशामध्ये रोपवाटिका, चिखलणी व पुनर्लागवड या पारंपरिक पद्धतीऐवजी पेरभात पद्धती (एरोबिक राइस) अधिक उपयुक्त ठरू शकते, त्यासाठी एसआरआय पद्धतीचा अवलंब केल्यास फायदेशीर राहते.
भारतामध्ये किंबहुना जगामध्ये भात पिकाची लागवड करताना चिखलणी करून, रोपे तयार करून, रोपांची पुनर्लागवड केली जाते व भात पिकाच्या अवस्थेनुसार पाण्याचा थर उभा केला जातो. या पारंपरिक पद्धतीमुळे तणांचा बंदोबस्त करणे सहज शक्‍य होते; तसेच अधिक पावसाच्या प्रदेशात चिखलणी न केल्यास मातीबरोबर पेरलेले बियाणे वाहून जाण्याचा धोका असतो. मात्र, अति पावसाचा प्रदेश वगळता धरणे, तलाव व अन्य स्रोतांच्या पाण्यावरही भात लागवडीसाठी हीच पद्धती वापरली जाते. याचबरोबर मध्यम ते चांगल्या पावसाच्या (300 ते 1200 मि.मी.) प्रदेशातही अनाहुतपणे ही पद्धत अंगीकारली जाते. मात्र, भातामध्ये पाण्याचा अतिवापर व रोपवाटिका, रोप लागणी, चिखलणी करणे यासाठी अधिक मनुष्यबळ लागते. त्यामुळे अशा ठिकाणी पारंपरिक पद्धतीऐवजी एसआरआय पद्धतीचा अवलंब करणे आवश्‍यक आहे.

पारंपरिक पद्धतीतील अडचणी

एसआरआय (चार सूत्री) पद्धतीचा प्रसार करण्याचे प्रयत्न चालू असले, तरी या पद्धती तितक्‍या लोकप्रिय झाल्या नाहीत.
  • साधारणपणे शेतकरी तणांचे नियंत्रण, 10-15 दिवसांच्या रोपांची लागवडीतील अडणीमुळे ही पद्धती टाळतात. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी एसआरआय पद्धतीने विक्रमी उत्पादन काढले आहे.
  • पारंपरिक पद्धतीमध्ये भात पिकात पाण्याचा थर कमी- अधिक प्रमाणात पूर्ण हंगामभर शेतात असतो, यामुळे जागतिक तापमानवाढीसाठी कारणीभूत मानला जाणारा "मिथेन गॅस' जमिनीतून उत्सर्जित होतो. पर्यायाने भारत व चीन या प्रमुख भात उत्पादक देशांना याची भरपाई वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारात करावी लागते.
  • एकंदरीतच पाण्याचा सुयोग्य वापर, शेतीमध्ये कमी होणारे मनुष्यबळ, पर्यावरणाचा समतोल यासारख्या बाबींचा विचार करता आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेने एरोबिक राइस तंत्रज्ञानाचा विकास केला आहे.

काय आहे तंत्रज्ञान

  • गहू, ज्वारी पिकाप्रमाणे भात पीक घेण्याची पद्धत म्हणजेच एरोबिक राइस (Aerobic Rice) होय. अर्थात, भारतामध्येही कोरडवाहू क्षेत्रामध्ये घेतला जाणारा पेरभात म्हणजेच एरोबिक राइस होय.
  • यामध्ये रोपवाटिका, चिखलणी करणे, रोप लागवड, पाण्याचा थर उभा करणे या सर्व बाबी टाळल्या जातात. भाताची/ साळीची पेरणी करून गरजेच्या वेळीच सिंचन केले जाते.

भारतातील संशोधनातून पुढे आलेले निष्कर्ष

अखिल भारतीय समन्वित भात संशोधन प्रकल्पाद्वारे भारतभर विविध ठिकाणी संशोधन करण्यात आले, त्याचे प्रमुख निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत.
1) बियाण्याची मात्रा - 30-35 किलो प्रति हेक्‍टर (सुधारित जाती), 25-30 किलो प्रति हेक्‍टर (अधिक फुटवा येणाऱ्या जाती)
2) दोन ओळींतील अंतर - 20 ते 30 सें.मी.
3) पेरणीची वेळ - मॉन्सून आगमनानुसार
4) आंतरमशागत - 30 ते 45 दिवसांनी. आंतरमशागतीसाठी अधिक पावसाच्या प्रदेशात रोटरी ही (Rotary hoe), दातारी कोळपे वापरावे; तर कमी पावसाच्या प्रदेशात पास असलेले कोळपे वापरावे.
5) तणांचा बंदोबस्त - पेंडीमिथॅलीन (30 टक्के ईसी) 1.80 किलो प्रति हेक्‍टर पेरणीनंतर, परंतु उगवण्यापूर्वी फवारावे. गरज असल्यास 25 व 40 व्या दिवसांनी खुरपणी/ तुडवणी करावी.

खत व्यवस्थापन

1) पेरभात पद्धतीमध्ये लोहाची कमतरता आढळून येते. याकरिता शिफारशीत नत्र, स्फुरद व पालाशबरोबर 10 ते 15 किलो फेरस सल्फेट पेरणीबरोबर द्यावे.
2) जस्ताच्या कमतरतेमुळे "खैरा रोग' (पांढरट ओंब्या) दिसून येतो. यासाठी 10 किलो झिंक सल्फेट प्रति हेक्‍टरी वापरावे.
3) नत्राची मात्रा तीन हप्त्यांत द्यावी. - पेरणीवेळी, फुटवा अवस्था व ओंबी बाहेर पडतेवेळी.
4) स्फुरद व पालाश पेरणीवेळी पेरावे.
5) अझोला/ धैंचा यासारखी हिरवळीचे खत देणारी पिके पेरणीवेळी विस्कटावी. 40 ते 45 दिवसांनी जमिनीत गाडावी. यासाठी मनुष्यबळ लागले तरी जमिनीची सुपीकता निश्‍चितपणे वाढेल.

पाणी व्यवस्थापन

शेतात सतत पाणी उभे न करता केवळ आवश्‍यकता असताना पाण्याची पाळी द्यावी. साधारणपणे खालील पाण्याच्या संवेदनशील अवस्थेत प्रति पाणी 6 सें.मी. पाणी द्यावे.
1) पेरणीनंतर 25-30 दिवसांनी.
2) उत्तम वाढीच्या काळात 45 ते 50 दिवसांनी.
3) ओंबी/ तुरा बाहेर पडण्याची अवस्था - जातीनुसार (65 ते 75 दिवस).
4) फुलोरा अवस्था - 75 ते 85 दिवस (जातीनुसार)
5) दाणे भरतेवेळी.
लागवडीतील अन्य बाबी पारंपरिक पद्धतीनुसारच कराव्यात.
एरोबिक तंत्रज्ञानापुढील आव्हाने - या पद्धतीसाठी योग्य जातीचा विकास, तांदळाची प्रत चांगली राहण्यासाठी योग्य शिफारशी, तणांचे नियंत्रण यासाठी संशोधन प्रगतिपथावर आहे. लवकरच भारतीय शेतकऱ्यांना उत्तम वाण उपलब्ध होतील.
पेरभाताकरिता पेरसाळ संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून खालील शिफारस करण्यात आली आहे.
1) पेरभातासाठी मराठवाडा विभागाकरिता 80 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व पालाशबरोबर 10 किलोग्रॅम फेरस सल्फेट व झिंक सल्फेट द्यावे. पेरतेवेळी फेरस सल्फेट व झिंक सल्फेट देणे शक्‍य न झाल्यास पेरणीनंतर 20 व 45 दिवसांनी फेरस सल्फेट व झिंक सल्फेट 0.5 % द्रावणाची (अर्धा ग्रॅम प्रति लिटर) फवारणी करावी.
2) पेरभाताची पेरणी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केल्यास उत्पादनात लक्षणीय घट होत नाही. यामुळे पावसाचे आगमन जुलैच्या पहिल्या आठवड्यात झाल्यास पेरभाताची पेरणी करावी.
संपर्क - डॉ. के. टी. जाधव, 7588082851
(लेखक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत आहेत.)

-------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate