অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पारंपारिक जनुकीयहून सरस

पिकांच्या संकरित जाती विकसनासाठी जनुकीय अभियांत्रिकीचा वापर वाढत आहे. मात्र, पारंपरिक पैदास पद्धतीने दुष्काळ प्रतिकारक मका जातीच्या विकसनामध्ये जनुकीय सुधारित पैदास पद्धतीला मागे टाकले आहे. आफ्रिकेतील मका सुधार कार्यक्रमामध्ये गेल्या दहा वर्षात 13 देशांसाठी सुमारे 153 मका जाती पारंपरिक पद्धतीने विकसित केल्या असून, जनुकीय सुधारित जातीच्या विकसनासाठी अद्यापही प्रयत्न सुरू आहेत. अर्थात, अन्य बाबींचा यामध्ये विचार करण्यात आलेला नाही.
गेल्या काही वर्षामध्ये तापमान व पावसामध्ये सातत्याने बदल होत असून, दुष्काळाच्या वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे तग धरतील, अशा पिकांच्या जातींसाठी शेतकऱ्यांची मागणी वाढत आहे. त्याचप्रमाणे खतांच्या किमती वाढत चालल्या असल्याने कमी अन्नद्रव्यामध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या जातींच्या मागणीतही वाढ होत आहे. आफ्रिकेसारख्या देशामध्ये दुष्काळामुळे मका उत्पादनामध्ये 25 टक्‍क्‍यापर्यंत घट होते. त्यामुळे आफ्रिकेसाठी दुष्काळ प्रतिकारक मका प्रकल्पाची आखणी 2006 मध्ये केली होती. या कार्यक्रमामध्ये 13 देशासाठी 153 मका जाती विकसित करण्यात आल्या आहेत. या जाती चांगल्या पावसामध्ये व्यावसायिक जातीइतकेच किंवा अधिक उत्पादन देतात. दुष्काळाच्या वातावरणामध्ये उत्पादनामध्ये दुष्काळातील नेहमीच्या उत्पादनाच्या 30 टक्‍क्‍यापर्यंत वाढू शकते.

या प्रकल्पाचा शेवट 2016 मध्ये होणार असला, तरी कार्यक्रमाचे नेमके विश्‍लेषण करणारा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार, 13 देशातील दारिद्य्ररेषेखालील लोकांच्या संख्येमध्ये 9 टक्के घट होण्यास मदत झाली आहे. एकट्या झिंबाब्वेमध्ये ही संख्या पाच लाखांपर्यंत पोचते. 
प्रकल्पाच्या यशामागे आंतरराष्ट्रीय मका आणि गहू सुधार केंद्र (CIMMYT) बीज बॅंकेतून उपलब्ध झालेल्या विविध जाती होत्या. सीमिट आणि नायजेरिया येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रॉपिकल ऍग्रिकल्चर या संस्थेतील पैदासकारांनी पाण्याच्या कमतरतेमध्ये तग धरणाऱ्या मका जातींपासून संकरित जाती विकसित केल्या. या जाती आफ्रिकेमध्ये यशस्वी ठरल्या आहेत.

पाण्याच्या कमतरतेमध्ये उत्पादनामध्ये घट का येते

सीमिट संस्थेतील जनुकीय स्रोत कार्यक्रमाचे संचालक केविन पिक्‍सले म्हणाले, की जाती विकसनाचे काम कमी वेळेमध्ये आणि खर्चामध्ये बीज बॅंकेमुळे होण्यास मदत झाली आहे. पिकांच्या परागीकरणाच्या प्रक्रियेसाठी पेरणीपासून लागणाऱ्या दिवसावर अनेक बाबी अवलंबून असतात. पाण्याच्या कमतरतेमध्ये पिकातील स्त्री केसर उशिरा तयार होतात. पुंकेसर आधीच येऊन गेलेले असतात, त्यामुळे उत्पादनामध्ये घट येते.
स्त्रीकेसर आणि पुंकेसर निर्मितीच्या वेळेतील फरक कमी केल्याने दुष्काळासाठीची प्रतिकारकता विकसित करणे शक्‍य होते. त्यासाठी पैदासकारांनी प्रयत्न केले.

दुष्काळ, नत्र कमतरता प्रतिकारकता आणि जनुके

दुष्काळ प्रतिकारकता हा गुणधर्म अत्यंत गुंतागुंतीचा असून, त्यामध्ये अनेक जनुकांचा समावेश असतो. त्यासाठी ट्रान्सजेनिक तंत्राचा वापर (एका वेळा एक जनुकाला लक्ष्य करणे) ही पद्धती वेळखाऊ ठरू शकते. त्यासाठी सीमिट आणि अन्य सहा संशोधन संस्थांनी कृषी क्षेत्रातील जैवतंत्रज्ञानातील मोठी खासगी कंपनी यांच्या सहकार्याने जनुकीय सुधारित जाती विकसनासाठी प्रयत्न केले आहेत. त्यातून तयार होणारी जनुकीय सुधारित मका जात 2016 पर्यंत शेतकऱ्यांच्या सेवेत असेल. 
दुष्काळ प्रतिकारकतेसोबतच नत्राच्या कमतरतेमध्ये वाढण्याची क्षमता असलेली मका जात तयार करण्याचे आव्हान होते. आफ्रिकेतील शेतकरी पिकांसाठी शिफारशीत मात्रेत खते आर्थिक कारणांमुळे देऊ शकत नाहीत. पर्यायाने उत्पादनमध्ये घट येते. ही मोठी समस्या असल्याचे सीमिट संस्थेतील मका पैदासकार बिस्वनाथ दास यांनी सांगितले. 
प्रक्षेत्र चाचणीमध्ये पारंपरिक पद्धतीने मिळवलेल्या संकरित मका जातीचे नत्र कमतरतेमध्येही हेक्‍टरी एक टनापर्यंत उत्पादन वाढले. गेल्या 10 वर्षापासून जनुकीय सुधारित जातींसाठी प्रयत्न सुरू आहेत.

संदर्भ: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate