অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भात उत्पादनाचे नवीन तंत्रज्ञान

सुधारित तंत्रज्ञान वापरल्याने वाढले भाताचे उत्पादन

- भंडारा जिल्ह्यात सामूहिक स्तरावर कृषी विभागाचा प्रयोग
- संकरित वाण, एसआरआय पद्धतीचे तंत्र 
- हेक्‍टरी उत्पादनात दुपटीने वाढ

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत 2012-13 मध्ये भंडारा तालुक्‍यातील मौजे इंदूरखा येथील शेतकऱ्यांमध्ये सामूहिक स्तरावर संकरित भात पीक प्रयोग राबवण्यात आला. पारंपरिक भात शेतीत बदल करताना एसआरआय पद्धतीचा वापर केल्याने उत्पादन खर्च, निविष्ठांच्या वापरात बचत झालीच; शिवाय प्रति एकरी उत्पादनातही वाढ झाली. सन 2011-12 मध्ये असलेले एकूण 43 लाख क्विंटल भाताचे उत्पादन 2012-13 मध्ये 52 लाख क्विंटलपर्यंत पोचले. 
- आर. बी. चलवदे

मौजे इंदूरखा गावाचे भौगोलिक क्षेत्र सुमारे 398 हेक्‍टर आहे. 260 हेक्‍टर क्षेत्र भात पिकाखाली आहे. खरिपात मुख्यत्वे याच पिकाची लागवड केली जाते. शेती व त्यावर आधारित उद्योग हेच येथील ग्रामस्थांच्या उदरनिवार्हाचे एकमेव साधन आहे. भाताची लागवड पारंपरिक पद्धतीने केली जात असल्याने त्यातून किफायतशीर उत्पादन मिळत नाही, त्यामुळे आर्थिक स्थैर्य कसे गाठता येईल, याचा विचार शेतकरी करू लागले. त्यातूनच गावातील प्रगतिशील शेतकरी रामभाऊ इसन कडव, अशोक चौधरी व अन्य शेतकऱ्यांनी भंडाऱ्याचे तालुका कृषी अधिकारी बी. आर. कोकोडे यांच्याशी संपर्क साधला. त्यातून गावात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत 2012-13 मध्ये संकरित भात पीक प्रकल्प राबविण्याचे नियोजन केले.

प्रकल्पाची सुरवात

सर्वप्रथम श्री. कोकोडे, मंडळ कृषी अधिकारी ए. डी. कस्तुरे यांनी गावात ग्रामसभा घेऊन दहा गटप्रमुखांची निवड केली. त्यांच्या मदतीने अन्य लाभार्थ्यांची निवड केली. यात शेतकऱ्यांना संकरित भात बियाणे, सह्याद्री वाणाचे बियाणे हेक्‍टरी सात किलो, युरिया- डीएपी ब्रिकेट्‌स, रासायनिक व जैविक कीटकनाशके व बुरशीनाशके आदी निविष्ठा देण्यात आल्या. कृषी सहायक जी. पी. रणदिवे, जी. एच. मेश्राम, कृषी पर्यवेक्षक एस. के. झंझाड यांनी शेतकऱ्यांची पायाभूत माहिती, कुटुंबाची तसेच त्यांच्याकडील साधनांची माहिती संकलित करण्याचे काम केले व त्यानुसार प्रकल्प राबविण्याचे नियोजन केले.

एसआरआय पद्धतीबाबत मार्गदर्शन

प्रकल्पांतर्गत दुसरे हंगामी प्रशिक्षण ग्रामपंचायत इंदूरखा येथे आयोजित केले, त्यात डी. एस. काटेखाये व एस. एम. भाकरे यांनी भात पीक तंत्रज्ञान, पेरणी ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पारंपरिक भातशेतीच्या तुलनेत एसआरआय पद्धतीने लागवडीचे महत्त्व समजावून दिले. एसआरआय पद्धत पारंपरिक पद्धतीपेक्षा कशी फायदेशीर ठरू शकते, याबाबतही मार्गदर्शन केले. एसआरआय पद्धतीने बियाण्यात, लागवड खर्चात, खताच्या मात्रेत; तसेच मजुरीवर होणाऱ्या खर्चात बचत होते, उत्पादनात दुपटीने वाढ होते, याबाबत माहिती देण्यात आली. भाताची रोवणी करणाऱ्या महिलांना हंगामापूर्वी या पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले. याबरोबरच लागवडीकरिता जमीन तयार करणे, बीजप्रक्रिया करणे, हिरवळीच्या खतांचे नियोजन, गादी वाफ्यावर रोपे तयार करणे, लागवडीकरिता निरोगी रोपांची निर्मिती करणे, ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने चिखलणी करणे, एसआरआय पद्धतीने रोवणी, खतांचे नियोजन, तणांचे तसेच किडी- रोगांचे नियंत्रण आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन केलेच, शिवाय पिकाच्या वाढीच्या प्रत्येक अवस्थेत त्यांना सल्ला दिला.

शेतकऱ्यांनीही मिळालेल्या मार्गदर्शनानुसार भाताचे व्यवस्थापन केले, परिणामी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 75 क्विंटल म्हणजे एकरी 30 क्विंटलपर्यंत सरासरी उत्पादन मिळाले. भंडाऱ्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे यांनीही प्रायोगिक प्रकल्पाची पाहणी केली. शेतकऱ्यांशी चर्चा करून पणन व प्रक्रिया उद्योगाबाबत पुढील मार्गदर्शन केले. उन्हाळी भाताच्या लागवडीसाठीही एसआरआय पद्धतीचा अवलंब करण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम कृषी विभागाने सुरू केले आहे. यात प्रगतिशील शेतकऱ्यांची, तसेच कृषी विभागाच्या तालुका स्तरापर्यंतच्या अधिकाऱ्यांची सभा घेऊन त्या पद्धतीने नियोजन सुरू आहे. प्रयोगाची यशस्विता लक्षात घेऊन पुढील वर्षीही एसआरआय पद्धतीनेच भाताची लागवड करण्याचा निश्‍चय गावातील शेतकऱ्यांनी केला आहे. 
शेतकऱ्यांना एसआरआय पद्धतीने संकरित भात वाणाचे मिळालेले उत्पादन

प्रकल्पाचे नियोजन व झालेले फायदे

  • कमी कालावधीचे संकरित वाण वापरल्यामुळे भाताचे पीक लवकर काढणीस आले, त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचाही फायदा घेता आला. प्रकल्प राबविल्यामुळे भंडारा जिल्ह्याच्या रब्बी पिकाच्या क्षेत्रात मागील वर्षाच्या तुलनेत चांगली वाढ झाली.
  • सुधारित भात लागवड पद्धतीचे भंडारा जिल्ह्यात एकूण 80 प्रकल्प राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत राबविण्यात आले.
  • प्रकल्पाबाहेरील शेतकऱ्यांनाही संकरित वाणाची व एसआरआय पद्धतीची माहिती देण्यात आली, यामुळे भंडारा जिल्ह्यातील एकूण भात पिकाचे उत्पादन 20 टक्‍क्‍यांनी वाढले.
  • सन 2011-12 मध्ये एकूण 43 लाख क्विंटल भाताचे उत्पादन मिळाले होते. सन 2012-13 मध्ये एकूण 52 लाख क्विंटल उत्पादन मिळाले.
  • सुमारे नऊ लाख क्विंटल अधिक उत्पादन मिळाल्यामुळे सुमारे 112 कोटी रुपयांचा फायदा झाला.
  • प्रकल्पाचे प्रभावी नियोजन, कृषी विभागाचे प्रयत्न, शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग यामुळे भंडारा जिल्ह्याच्या भात उत्पादकतेमध्ये चांगली वाढ होऊन जिल्हा विभागात प्रथम क्रमांकावर आला.

देशाची अन्नसुरक्षा त्यातून वाढीस लागली.

संपर्क - आर. बी. चलवदे - 7588009838
जी. पी. रणदिवे (कृषी सहायक) - 9423192153
रामभाऊ इसन कडव (शेतकरी) - 9422830211

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate