অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सोयाबीनची पट्टा पेरपद्धत

अमरावती जिल्ह्यात पूर्णानगर (ता. भातकुली) येथे त्र्यंबकराव हरणे यांनी मागील वर्षी सलग सोयाबीन, सोयाबीन-तूर आंतरपीक, तसेच रब्बीमध्ये हरभऱ्याची लागवड पट्टापेर पद्धतीने केली. त्यातून केवळ उत्पादनवाढच नव्हे, तर अन्य अनेक फायदे साधले. यंदाही पट्टा पद्धतीचाच वापर ते करणार आहेत.

पूर्णानगर (ता. भातकुली) येथे त्र्यंबकराव हरणे यांची सुमारे 26 एकर शेती आहे. त्यांचे मूळ गाव टाकरखेडा, ता. अंजनगाव सुर्जी येथे आहे. तेथील वडिलोपार्जित शेती त्यांनी भावास करण्यासाठी दिली आहे. कृषी साहायक म्हणून नोकरीस पूर्णानगर येथे असलेल्या आपल्या भावासोबत ते पूर्वीपासून राहतात. तिथेच त्यांनी शेती विकत घेतली. तेथेच स्थायिकही झाले. त्यांचा मुलगा संजय हा पदवीधर असून तोही शेतीच करतो.

सुधारित तंत्राची प्रेरणा मिळाली

मागील वर्षी पूर्णानगर येथे कृषी विभागाने खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या वेळी अमरावतीच्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील कृषी विद्यावेत्ता प्रा. जितेंद्र दुर्गे यांनी पट्टा पेरपद्धतीने सोयाबीन, तसेच सोयाबीनःतूर आंतरपिकाची लागवड या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमातून प्रेरणा घेत हरणे यांनी सुधारित पद्धतीचा अवलंब आपल्या शेतात करायचे ठरवले. सुमारे 12 एकर क्षेत्राची निवड केली. यापैकी पाच एकर क्षेत्रात सलग सोयाबीनची, तसेच सात एकर क्षेत्रात सोयाबीन- तूर आंतरपिकाची पट्टा पेरपद्धतीने पेरणी केली. पाच एकरातील सोयाबीनची कापणी झाल्यानंतर त्याच शेतात रब्बीमध्ये हरभरा पिकात पट्टा पेरपद्धत वापरली.

असे केले प्रयोग

प्रयोग-1 सलग सोयाबीन

पाच एकरांत सोयाबीनची पट्टा पेरपद्धतीने लागवड करण्यासाठी ट्रॅक्‍टरचलित सात दात्यांच्या पेरणी यंत्राचा उपयोग केला. पेरणीवेळी पेरणी यंत्राच्या बियाण्याच्या कप्प्यातील मधले चौथे छिद्र बंद केले. म्हणजेच चौथी ओळ खाली ठेवली. पेरणी करताना प्रत्येक वेळी एक ओळ (आठवी ओळ) रिकामी ठेवली. अशा प्रकारे प्रत्येक तीन ओळींनंतर चौथी ओळ रिकामी राहिली. या प्रत्येक चौथ्या ओळीच्या ठिकाणी डवऱ्याच्या फेऱ्याच्या वेळी डवऱ्याच्या जानोळ्याला दोरी गुंडाळून गाळ पाडून घेतला. अशा प्रकारे सोयाबीनचे पीक गादीवाफ्यावर करून घेतले.

डवऱ्याच्या फेऱ्याच्या पश्‍चात प्रत्येकी तीन ओळींचे पट्टे व त्यानंतर सरी असे चित्र तयार झाले. दोन वेळा निंदणी व दोन वेळा डवरणी केली. पहिल्या पाच आठवड्यांत (सुमारे 35 दिवसांत) आंतरमशागत पूर्ण केली. त्यानंतर वाढरोधक, कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी केली. पीक साधारणतः आठ आठवड्यांचे (55 दिवसांचे) झाल्यानंतर पुन्हा कीडनाशकांची फवारणी केली. यानंतरच्या दरम्यान पावसात साधारणतः तीन आठवड्यांचा मोठा खंड पडूनसुद्धा पिकाला कोणत्याही प्रकारे नुकसान झाले नाही. कारण डवऱ्याच्या फेऱ्याच्या वेळी प्रत्येक चौथ्या ओळीच्या ठिकाणी डवरणीपश्‍चात पावसाचे पाणी सरीत मुरले व जिरले. अशा प्रकारे मूलस्थानी जलसंवर्धनाच्या माध्यमातून जमिनीतील ओलावा टिकून राहिला. एकूण व्यवस्थापनातून पाच एकर क्षेत्रातून सोयाबीनचे 50 क्विंटल उत्पादन, म्हणजे एकरी 10 क्विंटल उत्पादन मिळाले. त्याला चार हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

प्रयोग 2- हरभरा

सोयाबीन काढणीनंतर याच शेतात रब्बीत हरभऱ्याची लागवडही पट्टा पेरपद्धतीने केली. हरभऱ्याचे ट्रॅक्‍टरचलित पेरणीयंत्र सहा दात्यांचे होते. ट्रॅक्‍टरने पेरणी करताना प्रत्येक वेळी पलटून येताना-जाताना एक ओळ रिकामी अशाप्रकारे शेतात प्रत्येक सातवी ओळ रिकामी ठेवण्यात आली. सहा-सहा ओळींचे पट्टे शेतात तयार झाले. पेरणीनंतर लगेच रिकाम्या ठेवलेल्या सातव्या ओळीच्या ठिकाणी तुषार सिंचनाद्वारे ओलित केले. पीक 20 दिवसांचे झाल्यानंतर मजुरांच्या साहाय्याने निंदणी केली. यानंतर कीटकनाशक व बुरशीनाशकाची पहिली फवारणी केली. हरभऱ्याचे पीक फुलोऱ्यात येताना तुषार सिंचनाद्वारे दुसरे ओलित दिले. यानंतर पुन्हा कीडनाशकांची फवारणी केली. पाच एकर क्षेत्रातून हरभऱ्याचे 55 क्विंटल, म्हणजे एकरी 11 क्विंटल उत्पादन मिळाले. प्रति क्विंटल 2500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

प्रयोग ३

सात एकरांत सोयाबीन- तूर पीक पद्धत पट्टा पद्धतीने घेताना तीन ओळी सोयाबीन व दोन ओळी तूर याप्रमाणे पट्ट्यात पेरणी केली. तूर पिकाच्या दोन्ही बाजूंनी रिकामी ओळ आल्यामुळे त्या ठिकाणी सरी पाडून घेतल्या. त्यानंतर सोयाबीनच्या तीन ओळींसोबतच तुरीच्या दोन ओळीही गादीवाफ्यावर आल्या. सात एकर क्षेत्रात साडेतीन बॅग सोयाबीनची पेरणी झाली. (म्हणजेच साडेतीन एकर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली.) उरलेल्या क्षेत्रात रिकाम्या ओळी व तुरीच्या दोन ओळी असे समीकरण झाले. तुरीचे पीक साधारणतः 80 दिवसांचे असताना शेंडे खुडून घेतले. साडेतीन बॅग सोयाबीन बियाण्यापासून 45 क्विंटल उत्पादन मिळाले. 4500 रुपये प्रति क्विंटल दर सोयाबीनला मिळाला. सोयाबीन कापणीनंतर त्या शेतात रब्बी हंगामाचे मुख्य पीक तूर बनले. तुरीचे शेंडे खुडले असल्याने फांद्यांच्या संख्येत वाढ झाली, बुंधा जाडा झाला, खोड बळकट बनले. सात एकर क्षेत्रातून तुरीचे 46 क्विंटल उत्पादन मिळाले. 4300 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे दर मिळाला.

बारा एकर क्षेत्रांत दोन्ही हंगामांचा वार्षिक ताळेबंद

पीक पद्धती---- क्षेत्र (एकर)---- उत्पादन खर्च (रुपये)---- उत्पन्न (रुपये)

1) सलग सोयाबीन 5 ---- 37, 845 200000

2) सलग हरभरा 5 45, 650 1,37, 500

3) सोयाबीन-तूर आंतरपीक 7 78, 355

सोयाबीन- 1,80 000

तूर- 1,97, 800

एकूण 1,61, 890 रु. 7, 15, 300 रु.

पट्टा पेरपद्धतीचे फायदे

  • मूलस्थानी पावसाच्या पाण्याचे संवर्धन
  • सूर्यप्रकाशाचा पुरेपूर उपयोग
  • शेतात हवा खेळती राहते
  • ओलिताची सोय असल्यास पाणी देणे सोयीचे
  • तुषार सिंचनाचा होतो फायदा
  • कीडनाशक फवारणी करणे अत्यंत सोयीचे
  • पिकाची निगराणी वा निरीक्षण सुलभ करता येते
  • प्रत्येक पट्ट्याचे व्यवस्थापन सोयीचे होते
  • बियाणे वापरात व खर्चात बचत होते
  • पिकाची एकसमान वाढ होते

हे सर्व फायदे लक्षात घेतल्यास सोयाबीन, उडीद, मूग या पिकांची सलग लागवड करणाऱ्या, तसेच मूग, उडीद, सोयाबीन पिकासोबत तूर आंतरपीक पद्धतीत समस्या कमी होऊन उत्पादकतेत निश्‍चित भर पडते.दोन वर्षांपूर्वी सात एकरांत पारंपरिक सोयाबीन-तूर पद्धतीत सोयाबीनचे 35 क्विंटल उत्पादन मिळाले होते. हेच उत्पादन मागील वर्षी पट्टा पद्धतीत 45 क्विंटलपर्यंत मिळाले आहे. पूर्वी सलग सोयाबीनमध्येही एकरी सात ते आठ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायचे. यंदा दहा क्विंटलपर्यंत पोचलो आहे. पट्टा पद्धत फायदेशीर वाटली आहे.

(लेखक श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती येथे कार्यरत आहेत.)

त्र्यंबकराव हरणे- ७३५०५९३३०८

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate