অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सोयाबीन उत्पादन

निवड केलेल्या सोयाबीनच्या वाणांची उगवणक्षमता पेरणी करण्याअगोदर तपासावी. किमान 70 टक्के उगवणक्षमता असल्याची खात्री करावी. पेरणी 45 x 5 सें.मी. किंवा 30 x 7.5 सें.मी. अंतरावर पाभर किंवा ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्राच्या साह्याने करावी. सर्व रासायनिक खते पेरणीच्या वेळेसच द्यावीत. 
1) आपल्या विभागासाठी ज्या वाणांची शिफारस करण्यात आली आहे, त्यातून तीन ते चार वाणांची निवड करून बियाण्याची उपलब्धता पेरणी अगोदरच करून ठेवावी. 
2) सोयाबीनची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. परंतु अत्यंत हलक्‍या जमिनीत अपेक्षित उत्पादन येत नाही. जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त तथा रेताड जमिनीत लागवड करू नये. जमिनीत सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असली पाहिजे. 
3) सोयाबीन पिकाच्या योग्य व्यवस्थापनासाठी जमिनीची दोन ते तीन वर्षांत किमान एकदा खोल नांगरणी करावी. पूर्वीच्या पिकाच्या काढणीनंतर उन्हाळ्यामध्ये एक खोल नांगरणी (30 ते 45 सें.मी.) करून नांगरणीच्या विरुद्ध दिशेत दोन वखराच्या पाळ्या देऊन जमीन समपातळीत करावी. शेवटच्या वखर पाळीपूर्वी हेक्‍टरी 20 गाड्या (पाच टन) शेणखत जमिनीत पसरून द्यावे. 
4) मॉन्सूनच्या आगमनावर पेरणी अवलंबून असते. मराठवाडा विभागात सोयाबीनची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत करता येते. साधारणपणे 75 ते 100 मि.मी पर्जन्यमान झाल्यावर जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करूनच करावी. 
5) निवड केलेल्या सोयाबीनच्या वाणांची उगवणक्षमता पेरणी करण्याअगोदर तपासावी. किमान 70 टक्के उगवणक्षमता असल्याची खात्री करावी. 
6) बीजप्रक्रिया - सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास थायरम (4.5 ग्रॅम प्रति किलो) किंवा कार्बेन्डाझिम 50 डब्ल्यूपी (तीन ग्रॅम प्रति किलो) किंवा थायरम अधिक कार्बेन्डाझिम 2-1 या प्रमाणात तीन ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रियेसाठी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा विरीडीचा (आठ ते 10 ग्रॅम/ किलो बियाणे) वापर करावा. 
7) बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया केल्यानंतर 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धक (ब्रेडी रायझोबियम) + 250 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक (पीएसबी) प्रति 10 किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. यानंतर सावलीमध्ये बियाणे वाळवून शक्‍य तेवढ्या लवकर पेरणी करावी. बीजप्रक्रियेसाठी मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या द्रवरूप जैविक खताचा वापर करावा. 
8) आंतरपीक पद्धती - 
आंतरपीक पद्धतीत सोयाबीनची लागवड जास्त फायदेशीर आढळून आली आहे. कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीन + तूर आंतरपीक पद्धतीत 2ः1 किंवा 4ः2 हे प्रमाण फायदेशीर आढळून आले आहे. तसेच ओलिताखाली सोयाबीन + कापूस 1ः1 किंवा 2ः1 या प्रमाणात घ्यावे.

योग्य वाणांची निवड

लागवडीसाठी परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एमएयूएस 47 (परभणी सोना), एमएयूएस 61 (प्रतिकार), एमएयूएस61-2 (प्रतिष्ठा), एमएयूएस 71 (समृद्धी), एमएयूएस 81 (शक्ती), एमएयूएस 158, एमएयूएस 162 इ. सुधारित वाणांची निवड करावी. तसेच जबलपूर येथील जवाहरलाल नेहरू कृषी विश्‍वविद्यालयाने विकसित केलेल्या जेएस 335, जेएस 93-05, जेएस 97-52, जेएस 95-60 आणि इंदूर येथील सोयाबीन संचालनालयाने विकसित केलेल्या एनआरसी 37 या वाणाची निवड करावी.

लागवडीचे अंतर व पद्धत

1) सोयाबीनच्या मध्यम आकार असलेल्या वाणांसाठी (एमएयूएस 71, एमएयूएस 81, एमएयूएस 158, एमएयूएस 162, जेएस 335, जेएस 93-05 इ. साठी) हेक्‍टरी 65 किलो (एकरी 26 किलो) बियाणे वापरावे. हेक्‍टरी झाडांची संख्या 4.4 ते 4.5 लाख ठेवावी. 
2) सोयाबीनची पेरणी 45 x 5 सें.मी. किंवा 30 x 7.5 सें.मी. अंतरावर पाभर किंवा ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्राच्या साह्याने करावी. 
3) पेरणी करते वेळेस बियाणे 2.5 ते 3 सें.मी. खोलीपेक्षा जास्त खोल पेरू नये, अन्यथा बियाण्याची उगवण कमी होऊन उत्पादनात घट येऊ शकते. 
4) मॉन्सूनच्या पावसाच्या आगमनास उशीर झाल्यास किंवा पेरणीस विलंब झाल्यास सोयाबीनच्या हळव्या वाणांची लागवडीमध्ये निवड करून पेरणीसाठी प्रति हेक्‍टरी 25 टक्के जास्त बियाणे वापरावे. दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे.

रासायनिक खतांची मात्रा

1) सोयाबीनसाठी 30 किलो नत्र + 60 किलो स्फुरद + 30 किलो पालाश + 20 किलो गंधक प्रति हेक्‍टरी पेरणीच्या वेळेसच द्यावे. 
2) स्फुरद देण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा वापर केला तर अतिरिक्त गंधक देण्याची आवश्‍यकता नाही. परंतु इतर गंधकरहित खतांचा (18ः18ः10, 12-32-16, 10-26-26. डीएपी इ.) खतांचा वापर केला तर 20 किलो गंधक प्रति हेक्‍टर द्यावे. 
3) सर्व रासायनिक खते पेरणीच्या वेळेसच द्यावेत. पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा. तसेच माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा कमी-जास्त करावी. 
4) पेरणीसाठी ट्रॅक्‍टरचलित पेरणी व खत यंत्राचा वापर केल्यास खत बियाण्याच्या पाच ते सात सें.मी. खाली पडेल, अशा रीतीने पेरणी करावी. कोणत्याही परिस्थितीत बियाण्यास खतांचा स्पर्श होऊ देऊ नये. 
5) रासायनिक खताबरोबर हेक्‍टरी 10 किलो फोरेट दिल्यास खोडमाशी व चक्री भुंग्याचे व्यवस्थापन करण्यास मदत होते.

अ. क्र. खते प्रति हेक्‍टर

1) युरिया (40 कि. ग्रॅ.) + 10-26-26 (115 कि. ग्रॅ.) + सिंगल सुपर फॉस्फेट (187.5 कि. ग्रॅ.) 
2) युरिया (16.30 कि. ग्रॅ.) + 12-32-16 (187 कि. ग्रॅ.) + गंधक (20 कि. ग्रॅ.) 
3) युरिया (65 कि. ग्रॅ.) + सिंगल सुपर फॉस्फेट (375 कि. ग्रॅ.) + म्युरेट ऑफ पोटॅश (50 कि. ग्रॅ.) 
4) युरिया (14.34 कि. ग्रॅ.) + डाय अमोनिअम फॉस्फेट (130.4 कि. ग्रॅ.) + म्युरेट ऑफ पोटॅश (50 कि. ग्रॅ.) + गंधक (20 कि. ग्रॅ.) 
5) 15-15-15 (200 कि. ग्रॅ.) + सिंगल सुपर फॉस्फेट (187.5 कि. ग्रॅ.) 
6) 18-18-10 (166 कि. ग्रॅ.) + सिंगल सुपर फॉस्फेट (187.5 कि. ग्रॅ.) + म्युरेट ऑफ पोटॅश (22.33 कि. ग्रॅ.)

वेळीच करा तणांचे नियंत्रण

1) पेरणीनंतर पिके 20 ते 30 दिवसांचे असताना दोन कोळपण्या करून शेत तणविरहित ठेवावे. मागील काही वर्षांपासून पेरणीनंतर निरंतर पडणाऱ्या पावसामुळे किंवा मजुरांच्या कमतरतेमुळे कोळपणी करण्यास अवघड होत आहे. अशा परिस्थितीत तणनाशकांचा वापर प्रभावी ठरतो. 
2) पेरणीनंतर, परंतु उगवण्यापूर्वी पेंडामिथॅलीन (2.5 ते 3.3 लिटर प्रति हेक्‍टर) पाण्यातून फवारावे किंवा पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी व तणे दोन ते चार पानांच्या अवस्थेत असताना क्‍लोरीम्युरान इथाईल 36 ग्रॅम प्रति हेक्‍टर किंवा इमेझेथापर किंवा क्विजालोफाप इथाईल एक लिटर प्रति हेक्‍टर किंवा फेनाक्‍सीप्राप-पी-इथाईल 0.75 लिटर प्रति 700-800 लिटर पाण्यातून करावी. 
3) तणनाशकाची फवारणी फ्लॅट पॅन किंवा फ्लड जेट नोजल लावून ओलावा असलेल्या जमिनीवरच करावी. 
4) सोयाबीन पिकामध्ये दरवर्षी आलटून-पालटून वेगवेगळ्या तणनाशकांचा वापर करावा.

संजीवकाचा वापर

सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी सायकोसील 500 पी.पी.एम.ची (10 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी) फवारणी फुले लागण्याच्या अवस्थेत करावी.

पाण्याचे नियोजन

सोयाबीनमध्ये रोप, फुलोऱ्याची व शेंगा भरण्याची अवस्था या पाण्याच्या ताणास संवेदनशील आहेत. या कालावधीत 15-20 दिवसांची पावसाची उघडीप झाल्यास या अवस्थेत पिकास पाणी दिल्यास उत्पादनात भर पडते.
संपर्क - डॉ. बेग 7304127810 
(लेखक अखिल भारतीय समन्वित सोयाबीन संशोधन योजना, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत आहेत.)

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate