অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भाज्यांमधील जीवनसत्त्व

 

जीवनसत्त्वे व खनिजे भाज्यांत, पालेभाज्यांत मुबलक प्रमाणात असतात. मात्र प्रत्येक भाजीत त्यांचे प्रमाण वेगवेगळे असते. भाज्यांत प्रामुख्याने कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम व आयोडिन ही खनिजे असतात.
- माठ, मेथी, शेवग्याचा पाला यामध्ये कॅल्शियम आढळते. स्नायूंच्या कार्याकरिता हाडे, दात बळकटीसाठी, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी कॅल्शियमची आवश्‍यकता असते.
- मेथी, माठ, आळू, कोथिंबीर, लाल माठ अशा अनेक पालेभाज्यांत लोह असते. रक्तक्षय असणाऱ्यांनी हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी पालेभाज्या अधिक खाणे आवश्‍यक आहे. सोडियम, पोटॅशियम, आयोडिन, कोबाल्ट, मॅंगेनिज, झिंक वगैरे शरीरात आवश्‍यक असणारी खनिजे प्रामुख्याने पालेभाज्यांतच असतात.

कोणत्या भाज्या कुणी खाव्यात?


प्रत्येक व्यक्तीने रोज 100 ते 125 ग्रॅम पालेभाज्या, भाज्या खाण्याची आवश्‍यकता आहे.
- माठ, पालक, आळूची पाने, मुळ्याचा पाला, कोबी, शेपू, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता, गाजर या भाज्यांमध्ये "अ' जीवनसत्त्व असते. सर्व प्रकारच्या पालेभाज्यांमधून शरीरास "ब' जीवनसत्त्व मिळते. जखमा भरण्यास, उत्साह आणि तरतरी येण्यास, तसेच त्वचा सुंदर व टवटवीत ठेवण्यात "क' जीवनसत्त्व उपयोगी असते. ताज्या पालेभाज्यांतून शरीरास "क' जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात मिळते.
- रक्तदाब (ब्लडप्रेशर) जास्त असणाऱ्या व्यक्तींनी करडई, पालक, मुळ्याची पाने, पुदिना, राजगिरा, चवळी यासारख्या सोडियम असणाऱ्या भाज्या अल्प प्रमाणात खाव्यात.
- आम्लपित्त असणाऱ्यांनी मेथी, पुदिना, कोथिंबीर या भाज्या कमी प्रमाणात खाव्यात.

भाज्या का महत्त्वाच्या?


- आपल्या पेशींमधील चयापचयाच्या क्रियेमधून शरीरात घातक अशी विषारी द्रव्ये तयार होतात, त्यांना "ऑक्‍सिडंट्‌स' असे म्हणतात. त्यामुळे पेशींचे कार्य हळूहळू बिघडू लागते. परिणामी, शरीर लवकर थकते, आयुर्मर्यादा कमी होते, अकाली वृद्धत्व येते. हे सर्व टाळण्याकरिता पालेभाज्या व फळे खाल्ल्यास या घातक द्रव्यांचा नाश होतो. द्रव्यांच्या विरुद्ध कार्य करणारी "अँटिऑक्‍सिडंट' कार्यरत राहतात. शरीर निरोगी राहण्याकरिता, दीर्घायुष्य लाभण्याकरिता पालेभाज्या आहारातून अवश्‍य खाव्यात.

रानभाज्यांचे फायदे...


- पालेभाज्यांच्या लागवडीसाठी मशागतीपासून अनेक क्रिया कराव्या लागतात. त्या तुलनेत पावसाळ्यात रानभाज्या आपोआप उगवतात. लागवड व देखभाल खर्च करावा लागत नाही.
- रानभाज्यांची नैसर्गिक चव स्थिर असते. सशक्त असलेल्या रानभाज्यांवर रोगांचा, किडींचा प्रादुर्भाव झालेला नसतो. यामुळे रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने निश्‍चितच जास्त उपयुक्त आहेत.

काय करता येईल रानभाज्यांसाठी...


- पिढ्यान्‌पिढ्या वापरल्या जाणाऱ्या रानभाज्या, विशिष्ट हंगामात येणाऱ्या जंगली वनस्पती आपल्या आहारातून कालबाह्य झाल्या असून, सगळीकडे फ्लॉवर, कोबी, बटाटा, दुधी भोपळा, टोमॅटो याच भाज्यांची रेलचेल आहे.
- शहरातीलच नव्हे, तर खेड्यापाड्यांतील लोकही रानभाज्यांची ओळख पूर्णपणे विसरून गेले आहेत. त्यामुळे भाज्या ओळखण्यापासून ते सरस अशा पाककृती तयार करण्यापर्यंत व पुढे त्यांचा प्रसार करण्यापर्यंत मोठ्या कामाची आवश्‍यकता आहे. त्यामुळे...
- ऍनिमिया, मधुमेह, स्थूलपणा, मासिक पाळीच्या तक्रारी हे विकार दूर ठेवता येतील.

 

-डॉ. मधुकर बाचुळकर

स्त्रोत:अग्रोवन - ऍग्रो व्हिजन

 

अंतिम सुधारित : 4/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate