অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टोमॅटोवरील किडी – रोग

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

कृषि विज्ञान केंद्र

विभागीय कृषी संशोधन केंद्र,

यवतमाळ

दैनंदिन आहारात टोमॅटोला महत्वाचे स्थान आहे. टोमॅटोमध्ये ‘अ’,’ब’,’क’ हि जीवनसत्वे तर चुना, लोह इत्यादी खनिजे विपुल प्रमाणात आढळतात. उत्तम प्रतीची लालभडक टोमॅटोची फळे ग्राहकास खरेदीचे समाधान तर शेतक-याला अधिक आर्थिक लाभ मिळवून देतात. पिकलेल्या लाल टोमॅटो फळांना त्यामुळे बाजारपेठेमध्ये सदाबहार मागणी असते.

भारतात भाजी पिकांमध्ये भेंडी व कांदा पिकांखालोखाल टोमॅटो पिकाखालील क्षेत्र सर्वात अधिक म्हणजे जवळपास ३.५ लाख हेक्टर एवढे आहे. महाराष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र जवळपास ११ हजार हेक्टर एवढे आहे. उत्पादनाच्या बाबतीत उत्तरप्रदेश व कर्नाटक खालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. विदर्भात सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात टोमॅटोची लागवड केली जाते.

सध्या टोमॅटो लागवडीकरिता सरळ वाणांबरोबरच संकरित वाणांवर मोठया प्रमाणावर वापर होतांना दिसुन येते. या पिकांच्या संकरित वाणांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव त्यामानाने अधिक आढळून येतो.

महाराष्ट्रात हे पिक मे-जुन, ऑगस्ट व ऑक्टोबर अशा वर्षातील तीन हंगामात घेतले जाते. त्यामुळे या पिकावरील किडी व रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावा-वर नियंत्रण ठेवणे फळांची प्रत तसेच उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्ताचे आहे. म्हणूनच या पिकावर येणा-या किडी व रोगांची लक्षणे तसेच त्याबाबत करावयाच्या नियंत्रणात्मक उपाययोजना याविषयीची शास्त्रीय माहिती असणे आवशक आहे.

टोमॅटोवरील प्रमुख किडी

फुलकिडे (थ्रीप्स टॅबसी, सर्टोथ्रीप्स, डॉरसॉलिस, फ्रॅन्कीनिएला त्सल्झी)

लक्षणे : पिवळसर करड्या रंगाचे पिल्ले व प्रौढ पाने खरचटून त्यातून बाहेर येणारा रस शोषण करतात. त्यामुळे पानांवर पांढरे ठिपके निर्माण होऊन पिकामध्ये विषाणूजन्य "स्पॉटेड विल्ट" या रोगाचा प्रसार होतो.

नियंत्रण

अ) रोपवाटिकेत बी उगवणीनंतर एन्डोसल्फान ३५ टक्के प्रवाही ११ मि. लि. किंवा मॅलाथीऑन ५० टक्के प्रवाही १० मि. ली. किंवा डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मि. ली. यापैकी कुठल्याही एका किटकनाशकाची १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

ब ) पुनर्लागणीनंतर प्रादुर्भाव दिसताच वरीलपैकी कुठल्याही एका किटकनाशकाची १५ दिवसाच्या अंतराने गरजेनुसार फवारणी करावी.

क) एकात्मिक किडव्यवस्थापनांतर्गत पद्धतींचा वापर करावा.

पांढरी माशी ( बेमिसीया टॅबॅसी)

लक्षणे : पांढरट रंगाचे पिल्ले व प्रौढ पानांतून रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडुन पिकात ‘लिफकर्ल’ या विषाणुजन्य रोगाचा प्रसार होतो.

नियंत्रण

अ) रोपवाटिकेत व पुनर्लागानिनंतर वरीलप्रमाणे उपाययोजना करावी.

ब) एकात्मीक किडव्यवस्थापनांतर्गत उपायांचा अवलंब करावा.

३) लाल कोळी : (टेट्रॅनिकस सिनेबॅरिनस)

लक्षणे : फिक्कट लालसर रंगाचे पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषण करतात. पानांवर रेशमी जाळे तयार करतात, त्यामुळे झाडाची वाढ खुंटते.

नियंत्रण

अ ) प्रादुर्भाव दिसून येताच पाण्यात मिसळणारी गंधक भुकटी ८० टक्के २५ ग्रॅम किंवा डायकोफॉल २० मि. ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवशक्यता भासल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

ब ) एकात्मिक किडव्यवस्थापनांतर्गत उपायांचा अवलंब करावा.

४ ) पाने पोखरणारी अळी /नागअळी: (लिरीओमायझाट्रायफोली)

लक्षणे :- प्रौढ माशी लहान तपकिरी रंगाची असते. पिवळसर रंगाची अळी पानांच्या आत राहून पान पोखरत फिरते. त्यामुळे पानांवर पांढरट रंगाच्या नागमोडी रेषा तयार होतात.

नियंत्रण

अ) डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मि. ली. किंवा सायपरमेथ्रीन २५ टक्केप्रवाही ५ मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ब) एकात्मिक किडव्यवस्थापनांतर्गत उपायांचा अवलंब करावा.

५ ) फळे पोखरणारी अळी (हेलिकोव्हरपा आरमीजेरा)

लक्षणे : हिरव्या रंगाची मोठी अळी फळे पोखरून आतील गर खाते. किडग्रस्त फळे बुरशी लागून सडतात त्यामुळे खूप नुकसान होते. हि अळी कापूस ( बोंडअळी ) तुर व हरभरा ( घाटेअळी ) या पिकावर आढळते.

नियंत्रण

अ )एन्डोसल्फाnन ३५ टक्के प्रवाही २० मि.ली. १० लिटर पाण्यातून फवारणी करावी

ब ) घाटेअळीचा विषाणू ( एच.ए.एन.पी.व्ही .) २५० एल.ई.प्रती हेक्टरी या प्रमाणात फवारणी करावी.

क ) एकात्मिक किडव्यवस्थापनांतर्गत उपायांचा अवलंब करावा.

टोमॅटोवरील प्रमुख रोग

करपा

लक्षणे : पानांवर वर्तुळाकार काळपट ठिपके आढळतात. प्रादुर्भावाची तिव्रता अधिक असल्यास सर्व फांद्या करपतात.

नियंत्रण

अ ) मॅन्कोझेब २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात किंवा

ब ) निंबोळी अर्क ५ टक्के पुनर्लागनिनंतर १५ दिवसांचे अंतराने ५ फवारण्या कराव्यात.

क ) एकात्मिक किडव्यवस्थापनांतर्गत उपायांचा अवलंब करावा.

फळकुज

लक्षणे : फळांवर चट्टे पडून फळे गळतात व सडतात.

नियंत्रण

अ ) मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा प्रापिनेब ( अॅट्रॉकॉल ७० टक्के पाण्यात मिसळणारी पावडर) १५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून १० दिवसाच्या अंतराने ४ फवारण्या कराव्यात

ब ) एकात्मिक किडव्यवस्थापनांतर्गत उपायांचा अवलंब करावा.

पर्णगुच्छ

लक्षणे : रोगात झाडाची पाने आकाराने लहान होतोत. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते.

नियंत्रण

अ ) रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.

ब ) रस शोषण करणा-या किडींचे नियंत्रण करावे.

क ) एकात्मिक किडव्यवस्थापनांतर्गत उपायांचा अवलंब करावा.

एकात्मिक किडव्यवस्थापनांतर्गत उपाययोजना

१) रोपवाटिकेत बी पेरणी पूर्वी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रती १ किलो बियाण्यास या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे जमिनिद्वारे प्रसार होणा-या रोगाचे नियंत्रण होते.

२) रोपवाटिके तील रोपावर मसलीन किंवा सध्या नायलॉन कापडाचे आच्छादन घालावे. त्यामुळे रोपांचे रस शोषण करणा-या किडींपासून संरक्षण होते. तसेच विषानुजन्य रोगाचा प्रसार होणार नाही.

३) पुनरर्लागणीपूर्वी टोमॅटोला रोपे मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के १५ मि. ली. १० लिटर पाणी या प्रमाणात १ तास बुडवून वापरल्यास या पिकावर सुरुवातीच्या काळात येणा-या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

४) टोमॅटोच्या प्रत्येक १० ओळींनंतर दोन ओळीमध्ये १५ दिवस वयाची आधीच तयार केलेली झेंडूची रोपे लावल्यास या पिकावर येणा-या फळे पोखरणा-या (हेलोकोव्हरपा) अळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

५) पेरणीपूर्वी जमिनीची खोलवर नंगरणी करावी तसेच पूर्वीच्या तुर, कपाशी, हरभरा, वांगी, मिरची या पिकांच्या शेतात शक्यतोवर टोमॅटोची लागवड करू नये.

६) पांढ-या माशीच्या नियंत्रणाकरिता शेतात पिवळ्या रंगाच्या चिकट सापळ्यांचा प्रत्येकी १० प्रती हेक्टरी या प्रमाणात वापर करावा. या करिता सध्या टीनपत्राचा सहजपणे वापर करता येईल.

७) पाने पोखरणा-या तसेच फळे पोखरणा-या अळींच्या नियंत्रणाकरिता ५% निंबोळी अर्काचा वापर करावा.

८) फळे पोखरणा-या अळीच्या सर्व्हेक्षणाकरिता शेतात दर हेक्टरी ५ या प्रमाणात लैंगिक सापळ्यांचा (फेरोमोन ट्रॅप्स ) वापर करावा. या सापळ्यांमध्ये ८ ते १० नरपतंग दर दिवसाला प्रति सापळा सतत दिवस आढळल्यास किटकनाशकांचा वापर करावा. सापळ्यांमध्ये अटकलेल्या पतंगाचा नाश करावा.

९) झेंडूच्या फुलांवर हेलीकोव्हरपा अळीची अंडी दिसू लागल्यास घाटे अळीचा विषाणू ( एच.एन.पी.व्ही.) २५० एल.ई प्रती हेक्टरी या प्रमाणात ६ टे ७ दिवसांच्या अंतराने ३ फवारण्या केल्यास या किडीचे प्रभावीपणे नियंत्रण होते.

१०) झेंडूच्या फुलांवर फळे पोखरणा-या ( हेलीकोव्हरपा ) अळीची अंडी आढळताच अंड्यासह फुलांचा नाश करावा. तसेच पिकात ट्रायकोग्रामा प्रिटीओसम या परोपजीवी किटकाची अंडी हेक्टरी १.२० लाख या प्रमाणात सोडवीत. मात्र त्यानंतर किटकनाशकांची फवारणी करू नये.

११) फळे काढणीच्या वेळेस झाडावरील तसेच झाडांच्या खाली पडलेली किडकी, सडकी फळे, रोगग्रस्त झाडाचे अवयव ईत्यादींचा नाश करावा.

१२) सिथेटीक पायरॉथ्रोईड या समुहातील किटकनाशकांचा अति वापर टाळावा, जेणेकरून या पिकावर येणा-या पांढ-या माशीचा प्रादुर्भाव आटोक्यात राहील.

किटकनाशकांचा प्रतिक्षाकाळ

झाडांवर फळे असतांना एन्डोसल्फानची फवारणी केल्यास फळे तोडणीकारीता प्रतीक्षाकाळ हा ६ ते ७ दिवसांचा ठेवावा. मोनोक्रोटोफॉस करिता १० दिवसांचा तरin सायपरमेट्रीन (२५%) या किटकनाशकासाठी ५ दिवसांचा प्रतीक्षाकाळ ठेवावा.

 

माहितीदाता :- डॉ. प्रमोद यादगीरवार , सहा. प्राध्यापक (किटकशास्त्र ) किंवा

डॉ. श्रीकांत खोडके ,सहा.प्राध्यापक (वनस्पती रोगशास्त्र)

दूरध्वनी क्र.(०७२३२) २४१७४५/२४८२३५

अंतिम सुधारित : 6/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate