অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दुष्काळातही दर्जेदार शेवगा

जालना जिल्ह्यातील सिंधी काळेगाव येथील युवा शेतकरी राम बाबूराव खरजुले यांनी पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून दोन एकरांत शेवगा लागवड केली. या शेतीतून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने त्यांना शेतीत प्रगती करता आली. यंदा आपल्या एकूण आठ एकर क्षेत्रात त्यांनी ठिबक सिंचन केले आहे. कपाशीचे आंतरपीक, झेंडू, ऍपल बेर आदींच्या प्रयोगातून त्यांनी आपली धडपडी वृत्तीही दाखवली आहे.
जालना जिल्ह्यात पावसाची परिस्थिती गेल्या काही वर्षांपासून गंभीर होत चालली आहे. कित्येक एकरांवरील मोसंबीच्या बागा शेतकऱ्यांना काढून टाकाव्या लागल्या.

जालना तालुक्‍यात सिंधी काळेगाव येथील राम बाबूराव खरजुले यांची वडिलोपार्जित आठ एकर जमीन आहे. आई- वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. पूर्वी ते पारंपरिक पद्धतीने शेती करायचे. त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. पूर्वी कापूस हे त्यांचे मुख्य पीक होते. मात्र या पिकातून वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नाचा लाभ होत नाही, असे त्यांच्या अनुभवास आले. पीक परिस्थितीत बदल आवश्‍यक वाटू लागला.

शेवगा शेतीने दिली दिशा

जालना मार्केट राम यांच्या गावापासून केवळ पाच किलोमीटरवर आहे. मार्केटमध्ये त्यांचे येणे-जाणे कायम होत असतेच. एके दिवशी ते नेहमीप्रमाणे मार्केटला गेले असता शेवग्याच्या शेंगांची विक्री करणारा शेतकरी त्यांनी अभ्यासला.

चांगला दर व चांगली पट्टी त्याच्या हातात पडते हे राम यांच्या लक्षात आले. आपणही या पिकाचा प्रयत्न करावा असे वाटून त्यांनी या पीक लागवडीचे धाडस केले. गावपरिसरात हा पहिलाच प्रयोग होता.

शेवगा पिकाचे व्यवस्थापन

यंदा शेवगा पिकाचे हे तिसरे वर्ष आहे. पिकाची सुरवात करताना दोन वर्षांपूर्वी सुमारे दोन एकरांत लागवडीचे नियोजन केले. पुणे भागातील रोपवाटिकेतून शेवगा वाण आणले. लागवडीपूर्वी शेणखत टाकून जमिनीची नांगरट करून मशागत केली. लागवडीपूर्वी दोन किलो बियाणे रात्रभर कोमट पाण्यात भिजवून घेतले, त्यामुळे बियाण्याची उगवम क्षमता चांगली मिळाली. तणांचे प्रमाण वाढल्यानंतर वेळोवेळी खुरपणी केली. पाण्याच्या नियोजनासाठी लागवडीपूर्वी ठिबक सिंचनाचे नियोजन केल्यामुळे आवश्‍यकतेनुसार काटेकोर पद्धतीने पाणी देण्यात आले. नियोजनानंतर झाडे बहरात आली. प्रति झाडाला पंधरा ते पंचवीस किलोपर्यंत शेंगा मिळाल्या. हवामानाच्या बदलानुसार किडी-रोगावर नियंत्रण राखण्यासाठी कीडनाशकांच्या आवश्‍यकतेनुसार फवारण्या केल्या.

स्थानिक बाजारपेठेचा झाला फायदा

सिंधी काळेगावपासून जालना बाजारपेठ जवळ असल्याने येथील बाजारपेठेचा फायदा झाला. डिसेंबर महिन्यात उत्पादन सुरू झाले. शेंगांचा दर्जा चांगला असल्याने दर चांगला मिळाला. नागपूर बाजारपेठेत जाण्यासाठी वाहतूक खर्च येत असल्याने शेवग्याची विक्री जालना बाजारपेठेतच करण्यात येते.
तीन वर्षांतील उत्पादन- उत्पन्नाचा ताळमेळ सांगायचा तर पहिल्या वर्षी दोन एकरांत 20 टन म्हणजे एकरी 10 टनांपर्यंत उत्पादन मिळाले.

किलोला 92 रुपये दर

तीन वर्षांत मिळणाऱ्या दराची सरासरी पाहिली, तर प्रति क्विंटल अडीच हजार, तीन ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत दर मिळतो. मात्र काही कालावधीत तो तेजीतही असतो. क्विंटलला तो पाच ते सहा हजार रुपयांपर्यंतही मिळाला आहे. पहिल्या वर्षी दोन एकरांत सात लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले. खर्च सुमारे एक लाख रुपये आला.

पहिल्या वर्षी चांगले यश पदरात पडल्यानंतर आत्मविश्‍वास व हुरूप वाढला. मात्र पुढील वर्षी दुष्काळी परिस्थितीने समस्या निर्माण केल्या. पिकाला पाणी कमी पडले. दोन एकरांत केवळ पाच ते सहा टन उत्पादन हाती आले.

यंदाच्या वर्षी प्रतिकूल परिस्थितीमुळे बहार लांबल्याचे राम यांनी सांगितले. सद्यःस्थितीत शेवग्याच्या शेंगांची विक्री सुरू आहे. जालना मार्केटला सहा हजार रुपये दराने त्यांनी सुमारे 80 किलो मालाची विक्री केली आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी किलोला 92 रुपये दराने त्यांनी 40 किलोपर्यंत शेंगांची विक्री केली आहे. सर्व खर्च जाता दोन एकरांतून वर्षाला सुमारे चार ते साडेचार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचे राम यांनी सांगितले. अर्थात दर चांगला असेल तर! हे सांगायला ते विसरले नाहीत.

बियाणे विक्री ठरतेय फायदेशीर

राम यांनी गेल्या वर्षी शेवगा शेंगांच्या बियाण्याचीही विक्री केली. त्यातून सुमारे दोन लाख रुपये मिळवले. बियाण्याला प्रति किलो अडीच ते तीन हजार रुपये दर मिळत असल्याचे राम यांनी सांगितले.

संरक्षित पाण्याची सोय

या वर्षी सर्वच म्हणजे आठ एकराला ठिबक सिंचन करण्यात आले आहे. पाण्यासाठी दोन विहिरी असूनही पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते, त्यामुळे शेवग्याच्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनातून एक किलोमीटर अंतराच्या तलावावरून पाइपलाइन करून संरक्षित पाणी मिळवले.

झेंडू व ऍपल बेरची लागवड

राम यांना शेवगा पिकाच्या लागवडीमुळे विविध प्रयोग करण्याची आवड निर्माण झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते एक ते दीड एकर क्षेत्रात कोलकता झेंडूची लागवड करतात.

गणपती उत्सव तसेच अन्य सण लक्षात घेता एक ते दीड एकरात पन्नास ते साठ हजार रुपयांचे उत्पन्न ते घेतात. शेवगा पिकात त्यांनी कपाशीचे आंतरपीक घेऊन दोन एकरांत 14 क्विंटल उत्पादनही घेतले आहे. त्यातील उत्पन्नातून शेवगा पिकातील उत्पादन खर्च कमी केला आहे. शेवग्यात त्यांनी चवळीचे पीकही घेतले. मात्र त्याला चांगला दर न मिळाल्याने हा प्रयोग नुकसानात गेला.

दीड एकरात डाळिंबाची नवी लागवड आहे. एक एकरात ऍपल बेर फळाचा धाडसी प्रयोग केला आहे. त्याचे उत्पादन अद्याप सुरू व्हायचे आहे. अशा रितीने सतत नवे प्रयोग करण्याची धडपडीवृत्ती मात्र राम यांनी कायम ठेवली आहे.
संपर्क- राम खरजुले- 7709239038


स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate