অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दुधी भोपळा

भोपळा, दुधी

(दुध्या; हिं. कद्दू, तुमरी, लौकी; गु. दुघी, तुंबडा; क. हळगुंबळा; सं. तुंबक, कटुतुंबी;

इं.बॉटल गोर्ड, कॅलबश गोर्ड, कॅलबश कुकंबर; लॅ. लॅजिनेरिया सायसेरेरिया, लॅ. ल्पूकँथा; कुल-कुकर्बिटेसी). या सुपरिचित केसाळ वेलीचे ⇨कारले, ⇨काकडी इत्यादींशी सामान्य शारीरिक लक्षणांत साम्य दिसून येते [⟶ कुकर्बिटेसी]. ॲबिसिनिया, मोलकाझ बेटे व भारत (मलबार, डेहराडून) येथे जंगली अवस्थेत आढळते. ही मूळची आफ्रिकेतील असून हिची फळे समुद्राच्या पाण्याबरोबर वाहात जाऊन ही अमेरिका खंडात पोहोचली असे मानण्यात येते. इ. स. पू. ७००० ते ५,५०० या काळातील मेक्सिकोच्या गुहांतून दुध्या भोपळ्याचे अवशेष मिळाले आहेत. तसेच इ. स. पू. ३,५००-३,००० या काळातील ईजिप्तमधील थडग्यांत या भोपळ्याच्या सालीचे अवशेष मिळाले आहेत.

सध्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन व भारत येथे ही वेल सर्वत्र लागवडीत आहे. फुले पांढरी व एकलिंगी, एका किंवा भिन्न झाडांवर असतात. फळाचा विशेष सामान्य आकार लांबट (बाटलीसारखा) अथवा गोलाकार अथवा चंबूसारखा असतो. गोल थबक्या आकाराची फळेही आढळून येतात. तुंबा अथवा तुंबी दुध्या या नावाने
या आकाराच्या फळांचा प्रकार ओळखला जातो. फळाची लांबी १.८ मी.पर्यंत आणि वजन ९ किग्रॅ.पर्यंत असते. फळाचा रंग फिकट हिरवा असून साल गुळगुळीत असते. फळे पिकली म्हणजे सालीचा रंग पांढरा होतो. बी पांढरे, लांब (१.६ ते २ सेंमी.), गुळगुळीत; फळातील मगज (गर) मऊ व खाद्य असून त्याची भाजी व दुधी हलवा करतात. पाने रेचक; काढा साखर घालून काविळीवर देतात. फळे रेचक, मूत्रल (लघवी साफ करणारी), कफ व पित्त शामक, थंड, डोकेदुखीवर बियांचे तेल लावतात. बिया व मुळे जलोदरावर उपयोगी आहेत.

प्रकार

लागवडीतील व जंगली असे दुधी भोपळ्याचे दोन मुख्य प्रकार आहेत. जंगली प्रकारची फळे कडू असतात. वाळलेली फळे हलकी असून त्यांची साल कठीण व अच्छिद्र असते; त्यामुळे त्यात पाणी शिरत नाही. भोई लोक त्यांचा नदीत तरून जाण्यासाठी वापर करतात. पाणी ठेवण्यासाठीही त्यांचा वापर करतात. लागवडीतील प्रकारांत निरनिराळ्या जमिनींसाठी व हवामानांसाठी योग्य असे पुढील सुधारित प्रकार उपलब्ध आहेत.

(१) पुसा समर प्रॉलिफिक लाँग : भरपूर उत्पन्न देणारा प्रकार. फळे ४० ते ५० सेंमी. लांब व २० ते २५ सेंमी. घेराची असतात. १०० सेंमी. लांब फळेही आढळून येतात. प्रत्येक वेलीला १०-१५ चांगल्या आकारमानाची फळे धरतात. हेक्टरी उत्पादन १२,००० किग्रॅ. मिळते. (२) पुसा समर फ्रॉलिफिक राउंड : फळे हिरवी, गोल व १५ ते १८ सेंमी. घेराची असतात. उन्हाळी व पावसाळी अशा दोन्ही हंगामांसाठी योग्य. (३) पुसा मेघदूत : फळे लांब व फिकट हिरवी. हेक्टरी उत्पादन २५,००० किग्रॅ. मिळते. (४) पुसा खरसाई (लांब) :फळे ३८ ते ४५ सेंमी. लांब असतात. उन्हाळी व पावसाळीं हंगामांसाठी योग्य. (५) पंजाब गोल : फळे गोलाकार, मृदू व चकचकीत असतात. हेक्टरी उत्पादन १७,५०० किग्रॅ. मिळते. (६) पंजाब लांब : पावसाळी हंगामासाठी योग्य. हेक्टरी उत्पादन २०,००० किग्रॅ. मिळते (७) पुसा मांजरी फळे गोल, फिकट हिरवी असून हेक्टरी उत्पादन २५,३०० किग्रॅ. मिळते.

हवामान व जमीन

हे मुख्यतः उन्हाळी पीक आहे. त्याला कडाक्याची थंडी मानवत नाही. हे पीक सर्व प्रकारच्या जमिनींत येते; परंतु चांगल्या निचऱ्याची व खताची भरपूर मात्रा असलेली जमीन चांगली. या पिकाची मुळे खोल जात नाहीत. खताची मात्रा कमी असलेल्या जमिनीत हे पीक चांगले येत नाही.

हंगाम

सर्वसाधारणपणे वर्षातून दोन पिके घेतात.

उन्हाळी पीक ऑक्टोबरच्या मध्यापासून मार्चच्या मध्यापर्यंत आणि पावसाळी पीक मार्चच्या सुरुवातीपासून जुलैच्या मध्यापर्यंत पेरतात. उन्हाळी पिकासाठी गोल आकाराच्या फळांची लागवड केली जाते व लांब आकाराची फळे असलेला प्रकार पावसाळी हंगामात लावतात.

लागवड

प्रथम वाफ्यात रोपे तयार करून त्यांना २-३ पाने फुटल्यावर त्यांचे स्थलांतर करून लागवड करतात अथवा जागेवर १.५ ते २ मी. अंतरावर खड्डे करून त्यांत खत घालून एका जागी ४ ते ५ बिया लावतात. बिया उगवून आल्यावर जोमदार १-२ रोपे ठेवून बाकीची उपटून टाकतात. उन्हाळी पिकाचे वेल बहुधा जमिनीवरच वाढू देतात. पावसाळी पिकाचे वेल घरांच्या छपरावर मिंतीवर, मांडवावर अथवा झाडावर वाढू देतात.

फळांची काढणी

लागणीपासून दोन ते अडीच महिन्यांत भाजीसाठी कोवळी फळे काढणीस सुरुवात होते. पुढे दोन ते अडीच महिन्यांपर्यंत तोडणीचे काम चालू राहाते. फळे जून झाल्यावर मगज रेषाळ व कोरडा होतो व बिया कठीण बनतात. ऑक्टोबर ते मार्च हंगामातील पिकाची फळे मार्च ते जुलै या काळात मिळतात व पावसाळी पिकाची फळे नोव्हेंबर-डिसेंबर या काळात मिळतात. फळे तोडताना त्यांचे देठ ठेवूनच तोडतात व बाजारात फळे पाठविते वेळी घर्षणाने साल खराब होऊ नये म्हणून ती कागदात गुंडाळून कडू लिंबाची पाने घातलेल्या टोपल्यातून पाठवितात. प्रत्येक वेलीला ०.५ ते १.५ किग्रॅ. वजनाची १०-१५ फळे येतात. हेक्टरी १०,००० ते १५,००० किग्रॅ. कोवळी फळे मिळतात.

वेलीला २ आणि ४ पाने असलेल्या अशा दोन अवस्थांत वृद्धी हॉर्मोने [वाढीचे नियंत्रण करणारी हॉर्मोने; ⟶ हॉर्मोने] अथवा काही रसायने फवारल्याने स्त्री-पुष्पांची संख्या वाढून फळांची संख्या वाढते. मॅलेइक हायड्रॅझाइड (एमएच) आणि टिबा (टीआयबीए) ही वृद्धी हॉर्मोने विशेष परिणामकारक असल्याचे आढळून आले आहे. बोरॉन व कॅल्शियम यांचाही चांगला उपयोग होतो.

रोग

दुधी भोपळ्यावर करपा, फळकूज व केवडा हे रोग पडतात. करपा रोग कोलेटॉट्रिकम लॅजेनेरियम या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) होतो. फळावर प्रथम तांबूस जलासिक्त (पाण्याने भरलेले) ठिपके दिसतात. नंतर ते काळे पडतात. उपाय म्हणून बोर्डों मिश्रणाची फवारणी करतात. फळकूज रोग पिथियम ॲफानिडार्‌मेटम या कवकामुळे होतो. जमिनीला लागून असलेल्या फळाच्या पृष्ठभागावर जलासिक्त ठिपके आढळतात. रोगट भाग वाढत जातो व त्यावर कवकाची पांढरी कापसासारखी वाढ दिसून येते. भोपळ्याखाली गवत पसरणे आणि ०.८ शक्तीचे बोर्डो मिश्रण फवारणे यामुळे फायदा होतो. केवडा रोगामुळे वेलीची पाने पिवळी पडून वाळतात व गळतात. हा व्हायरसजन्य रोग आहे.

कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे रोगाला आळा वसतो.

कीड

या पिकावर तांबडा भुंगेरा व फळमाशी या किडींपासून विशेष उपद्रव होतो.

तांबडा भुंगेरा

(ऑलॅकोफोरा फोव्हीकॉलिस) ही कीड पीक लहान असताना कोवळी पाने खाते. सूर्योदयापूर्वी हे भुंगेरे वेचून मारतात कारण त्या वेळी ते सुस्त असतात. पिकावर ०.६५% लिंडेन हेक्टरी २०-२५ किग्रॅ.या प्रमाणात पिस्कारतात. फळमाशी (डेकस डायव्हर्सस) कोवळ्या फळांत अंडी घालते. त्यांतून निघालेल्या अळ्या फळे पोखरतात. परिणामी फळे कुजतात. माशी लागलेली फळे गोळा करून नष्ट करतात. फळे लहान असताना पिकावर मॅलॅथिऑन हे कीटकनाशक फवारतात. भाजीसाठी फळे तोडण्यापूर्वी १० ते १५ दिवस कोणतेही विषारी कीटकनाशक पिकावर न फवारण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

रासायनिक संघटन व उपयोग

फळांत जलांश ९६.३%, प्रथिन ०.२%, वसा (स्निग्ध पदार्थ) ०.१% व कार्बोहायड्रेटे २.९% असतात. ग्लुकोज व फ्रुक्टोज या शर्करा काही प्रमाणात आढळून येतात; ब जीवनसत्त्व पुष्कळ प्रमाणात आणि क जीवनसत्त्व काही प्रमाणात आढळते.

वाळलेल्या भोपळ्याचा उपयोग पाणी ठेवण्यासाठी, डाव, नळ्या, तुतारी व तपकिरीच्या डब्या बनविण्यासाठी, तसेच सतार, बीनसारखी तंतुवाद्ये तयार करण्यासाठी करतात.


संदर्भ : 1. Choudhury. B. Vegetables, New Delhi, 1967.

2. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi, 1962.

क्षीरसागर, ब. ग.; पाटील, ह. चिं.; रुईकर, स. के.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate