অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मिरची

प्रस्‍तावना

रोजच्‍या आहारात मिरची ही अत्‍यावश्‍यक असते. बाजारात हिरव्‍या मिरचीस वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशातूनही चांगली मागणी आहे. महाराष्‍ट्र मिरचीची लागवड अंदाजे 1 लाख हेक्‍टरी क्षेत्रावर होते. महाराष्‍ट्रातील मिरचीखालील एकूण क्षेत्राापैकी 68 टक्‍के क्षेत्र नांदेड जळगांव धुळे सोलापूर कोल्‍हापूर नागपूर अमरावती चंद्रपूर उस्‍मानाबाद या जिल्‍हयात आहे. मिरचीमध्‍ये अ. व क. जीवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍याने मिरचीचा संतुलीत आहारात समावेश होतो. तिखटपणा व स्‍वाद यामुळे मिरची हेक्‍टरी महत्‍वाचे मसाल्‍याचे पिक आहे. मिरचीचा औषधी उपयोग सुध्‍दा होतो.

हवामान

उष्‍ण आणि दमट हवामानात मिरची पिकाची वाढ चांगली होऊन उत्‍पादन चांगले मिळते. मिरची पिकाची लागवड पावसाळा, उन्‍हाळा आणि हिवाळा या तीनही हंगामात करता येते. पावसाळात जास्‍त पाऊस व ढगाळ वातावरण असल्‍यास फूलांची गळ जास्‍त होते. पाने व फळे कुजतात. मिरचीला 40 इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले मिरचीच्‍या झाडांची आणि फळांची वाढ 25 ते 30 सेल्सिअस तापमानाला चांगली होते. आणि उत्‍पादनही भरपूर येते. तापमानातील तफावतीमुळे फळे फुले गळ मोठया प्रमाणात होते. व उत्‍पन्‍नात घट येते. बियांची उगवण 18 ते 27 सेल्सिअस तापमानास चांगली होते.

जमिन

पाण्‍याचा उत्‍महिन्‍यातम निचरा होणा-या ते मध्‍यम भारी जमिनीत मिरचीचे पिक चांगले येते. हलक्‍या जमिनीत योग्‍य प्रमाणात सेंद्रीय खते वापरल्‍यास मिरचीचे पिक चांगले येते पाण्‍याचा योग्‍य निचरा न होणा-या जमिनीत मिरचीचे पिक घेऊ नये. पावसाळयात तसेच बागायती मिरचीसाठी मध्‍यम काळी आणि पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी जमिन निवडावी. उन्‍हाळयात मध्‍यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी. चुनखडी असलेल्‍या जमिनीतही मिरचीचे पिक चांगले येते.

हंगाम

खरीप पिकाची लागवड जून, जूलै महिन्‍यात आणि उन्‍हाळी पिकाची लागवड जानेवारी फेब्रूवारी महिन्‍यात करावी.

वाण

पुसा ज्‍वाला : ही जात हिरव्‍या मिरचीसाठी चांगली असून या जातीची झाडे बुटकी व भरपूर फांद्या असलेली असतात. फळे साधारणपणे 10 ते 12 सेमी लांब असून फळांवर आडव्‍या सुरकुत्‍या असतात. फळ वजनदार व खुप तिखट असते. पिकलेली फळे लाल रंगाची असतात.

पंत सी – १ : हिरव्‍या व लाल (वाळलेल्‍या ) मिरचीच्‍या उत्‍पादनाला ही जात चांगली आहे. या जातीची फळे उलटी असतात. मिरची पिकल्‍यावर फळांचा आकर्षक लाल रंग येतो. फळे 8 ते 10 सेमी लांब असून साल जाड असते. फळांतील बियांचे प्रमाण अधिक प्रमाणात असून बोकडया रोगास प्रतिकारक आहे.

संकेश्‍वरी 32 – या जातीची झाडे उंच असतात. मिरची 20 ते 25 सेमी लांब असून पातळ सालीची असतात. सालीवर सुरकुत्‍या असतात. वाळलेल्‍या मरचीचा रंग गर्द लाल असतो.

जी – 2, जी – 3, जी – 4, जी – 5 या जातीची झाडे बुटकी असतात. या मिरचीच्‍या अधिक उत्‍पादन देणा-या चांगल्‍या जाती आहेत. फळाची लांबी 5 ते 8 सेमी असून फळांना रंग गर्द तांबडा असतो.

मुसाळवाडी – या जातीची झाडे उंच वाढतात. खरीप हंगामासाठी ही जात चांगली असून बोकडया, भूरी आणि डायबॅक या रोगांना कमी प्रमाणात बळी पडतात.

पुसा सदाबहार – या जातीची झाडे उंच असून पाने इतर जातीपेक्षा रूंद असतात. पिकलेली मिरची तेजस्‍वी लाल रंगाची असते. या जाती हिरव्‍या मिरचीचे सरासरी उत्‍पादन साडेसात ते दहा टन व वाळलेल्‍या मिरचीचे दीड ते दोन टन उत्‍पादन मिळते. ही जात मावा कोळी या किडींना तसेच डायबॅक आाणि विषाणूंजन्‍य रोगांना प्रतिकारक आहे.

या शिवाय विद्यापीठांनी विकसीत केलेंडर अग्निरेखा, परभणी टॉल , फूले ज्‍योती, कोकणक्रांती, फूले मुक्‍ता फूले सुर्यमुखी, एनपी- 46 या सारख्‍या अधिक उत्‍पादन देणा-या जाती लागवडीयोग्‍य आहेत.

बियाणाचे प्रमाण

हेक्‍टरी 1 ते दीड किलो बियाणे वापरावे.

पूर्वमशागत

एप्रिल मे महिन्‍यात जमिन पुरेशी नांगरून वखरून तयार करावी. हेक्‍टरी 9 ते 10 टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.

लागवड

जिरायती पिकासाठी सपाट वाफयावर रोपे तयार करतात. तर बागायती पिकासाठी गादी वाफयावर रोपे तयार केले  जातात. गादी वाफे तयार करण्‍यासाठी जमीन नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करावी. जमिनीत दर हेक्‍टरी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. नंतर 25 फूट लांब 4 फूट रूंद 10 सेमी उंच आकाराचे गादी वाफे तयार करावेत. प्रत्‍येक गादी वाफयावर 30 किलो चांगले कुजलेले शेणखत आणि अर्धा किलो सुफला मिसळावे.

बी पेरण्‍यासाठी 8 ते 10 सेमी अंतरावर वाफयाच्‍या रूंदीला समांतर ओळी हतयार करून त्‍यामध्‍ये 10 टक्‍के फोरेट दाणेदार 15 ग्रॅम दर वाफयाला टाकून मातीने झाकून घ्‍यावे. त्‍यानंतर या ओळीमध्‍ये दोन सेमी ओळीवर बियांची पातळ पेरणी करावी व बी मातीने झाकून टाकावे. बियाण्‍यांची उगवण होईपर्यंत वाफयांना दररोज झारीने पाणी द्यावे.  बी पेरल्‍यानंतर 30 ते 40 दिवसांनी रोपे लागवडीस तयार होतात.

उंच आणि पसरट वाढणा-या जातींची लागवड 60 बाय 60 सेमी अंतरावर आणि बुटक्‍या जातींची लागवड 60 बाय 45 सेमी अंतरावर करावी. कोरडवाहू मिरचीची लागवड 45 बाय 45 सेमी अंतरावर करावी. रोपांची सरीवरंबा पध्‍दतीवर लागवड करावी. रोपे गादीवाफयातून काढल्‍यानंतर लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे 10 लिटर पाण्‍यात 15 मिली मोनोक्रोफॉस 36 टक्‍के प्रवाही अधिक 25 ग्रॅम डायथेनम 45 अधिक 30 ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक 80 टक्‍के मिसळलेल्‍या द्रावणात बुडवून लावावेत.

खते आणि पाणी व्‍यवस्‍थापन

वेळेवर वरखते दिल्‍यामुळे मिरची पिकाची जोमदार वाढ होते. मिरचीच्‍या कोरडवाहू पिकासाठी दर हेक्‍टरी 50 किलो नत्र 50 किलो स्‍फूरद आणि ओलिताच्‍या पिकासाठी दर हेक्‍टरी 100 किलो नत्र 50 किलो स्‍फूरद आणि 50 किलो पालाश द्यावे. यापैकी स्‍फूरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा रोपांच्‍या लागवडीच्‍या वेळी द्यावीत. नत्राची उर्वरीत अर्धी मात्रा रोपांच्‍या लागवडीनंतर 30 दिवसांनी बांगडी पध्‍दतीने द्यावी.

मिरची बागायती पिकाला जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे.  प्रमाणापेक्षा जास्‍त किंवा कमी पाणी देऊ नये. झाडे फूलावर आणि फळावर असताना झाडांना पाण्‍याचा ताण देऊन रोपे लावणीनंतर 10 दिवसात शेतात रोपांचा जम बसतो. या काळात 1 दिवसाआड पाणी दयावे. त्‍यानंतर 5 दिवसांच्‍या किंवा एक आठवडयाच्‍या अंतराने पाणी दयावे. साधारणतः हिवाळयात 10 ते 15 दिवसांच्‍या अंतराने तर उन्‍हाळयात 6 ते 8 दिवसांच्‍या अंतराने   पिकाला पाणी दयावे.

आंतरमशागत

मिरचीच्‍या रोपांच्‍या लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी पहिली खुरपणी करावी त्‍यानंतर तणांच्‍या तीव्रतेनुसार खुरपण्‍या करून शेत तणविरहीत ठेवावे. खरीप मिरचीला लागवडी नंतर 2 ते 3 आठवडयांनी रोपांना माीची भर दयावी. बागायती पिकांच्‍या बाबतीत रोपांच्‍या लागवडीनंतर 2 महिन्‍यांनी हलकी खांदणी करून सरी फोडून झाडांच्‍या ओळीच्‍या दोन्‍ही बाजूंनी मातीची भर द्यावी.

रोग आणि किड

रोग

मर : हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. लागण झालेली रोपे निस्‍तेज आणि मलूल होतात. रोपाचा जमिनी लगतचा खोडाचा भाग आणि मुळे सडतात. त्‍यामुळे रोप कोलमडते.

उपाय : 10 लिटर पाण्‍यात 30 ग्रॅम कॉपरऑक्‍झीक्‍लोराईड 50 टक्‍के मिसळून हेक्‍टरी द्रावण गादी वाफे किंवा रोपांच्‍या मुळा भोवती ओतावे.

फळे कुजणे आणि फांद्या वाळणे – ( फ्रूट रॉट अॅड डायबॅक ) हा रोग कोलीटोट्रीकम कॅपसीसी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्‍या हिरव्‍या किंवा लाल मिरचीवर वतुळाकार खोलगट डाग दिसतात.  दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चटटे दिसतात.  अशी फळे कुजतात आणि गळून पडतात. बुरशीमुळे झाडाच्‍या फांद्या शेंडयाकडून खाली वाळत जातात. प्रथम कोवळे शेंडे मरतात. रोगांचा प्रादुर्भाव जास्‍त प्रमाणात झाल्‍यास झाडे सुकून वाळतात तसेच पानांवर आणि फांद्यांवर काळे ठिपके दिसतात.

उपाय : या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्‍यांचा नाश करावा. तसेच डायथेन झेड-78 किवा डायथेन एम 45 किंवा कॉपर ऑक्सिक्‍लोराईड यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक औषध 25 ते 30 ग्रॅम 10 लिटर पाण्‍यात मिसळून रोग दिसताच दर 10 दिवसांच्‍या अंतराने 3 ते 4 वेळा फवारावे.

भुरी ( पावडरी मिल्‍डयू ) भूरी रोगामुळे मिरचीच्‍या पानाच्‍या वरच्‍या आणि खालच्‍या बाजूवर पांढरी भूकटी दिसते. या रोगाचा प्रादुर्भाव जास्‍त प्रमाणात झाल्‍यास  झाडाची पाने गळतात.

उपाय : भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच 30 ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक किंवा 10 मिलीलिटर कॅराथेन 10 लिटर पाण्‍यात मिसळून मिरचीच्‍या पिकावर 15 दिवसांच्‍या अंतराने दोन फवारण्‍या कराव्‍यात.

किड

फूलकिडे : हेक्‍टरी किटक आकाराने अतिशय लहान म्‍हणजे 1 मिली पेक्षा कमी लांबीचे असतात. त्‍यांचा रंग फिकट पिवळा असतो. किटक पानावर ओरखडे पाडून पानाचे रस शोषण करतात. त्‍यामुळे पानाच्‍या कडा वरच्‍या बाजूला चुरडलेल्‍या दिसतात. हेक्‍टरी किटक खोडातील रसही शोषून घेतात. त्‍यामुळे खोड कमजोर बनते व पानांची गळ होते.

उपाय : रोपलावणीपासून 3 आठवडयांनी पिकावर 15 दिवसांच्‍या अंतराने 8 मिलीमिटर डायमेथेएम 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे.

मावा : हेक्‍टरी किटक मिरचीची कोवळी पाने आणि शेडयांतील रस शोषण करतात. त्‍यामुळे नविन पालवी येणे बंद होते.

उपाय : लागवडीनंतर 10 दिवसांनी 15 मिली मोनोक्रोटोफॉस 36 टक्‍के प्रवाही 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.

काढणी व उत्‍पादन

हिरव्‍या मिरचीची तोडणी साधारणपणे लागवडीनंतर अडिच महिन्‍यांनी सुरु होते. पुर्ण वाढलेल्‍या व सालीवर चमक असलेल्‍या हिरव्‍यसा फळांची तोडणी देठासह 10 दिवसांच्‍या अंतराने करावी. साधारपणपणे हिरव्‍या मिरच्‍यांची तोडणी सुरु झाल्‍यानंतर 3 महिने तोंडे सुरू राहातात. अशा प्रकारे 8 ते 10 तोडे सहज होतात. वाळलेल्‍या मिरच्‍यांसाठी त्‍या पूर्ण पिकून लाल झाल्‍यावरच त्‍यांची तोडणी करावी.

जातीपरत्‍वे ( बागायती) हिरव्‍या मिरच्‍यांचे हेक्‍टरी 80 ते 100 क्विंटल उत्‍पादन मिळते. वाळलेल्‍या लाल मिरच्‍यांचे उत्‍पादन 9 ते 10 क्विंटल निघते. व कोरडवाहू मिरचीचे उत्‍पादन 6 ते 7 क्विंटल येते.

स्त्रोत : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 8/31/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate