অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेततळ्यातील मत्स्यशेतीतून वाढवा आर्थिक नफा

शेततळ्यातील मत्स्यशेतीतून वाढवा आर्थिक नफा

अलीकडच्या काळात शेततळ्यातील मत्स्यशेती हा चांगला जोडधंदा विकसित होत आहे. शेततळ्यामध्ये रोहू, कटला, मृगळ या भारतीय प्रमुख कार्प बरोबरच चिनी कार्प (गवत्या व चंदेरा) आणि कॉमन कार्प (सायप्रिनस फिश) इ. माशांचे संवर्धन करता येते. 

शेततळ्यात कार्प जातीच्या माशांचे संवर्धन

रोहू, कटला, मृगळ या भारतीय प्रमुख कार्प बरोबरच चिनी कार्प (गवत्या व चंदेरा) आणि कॉमन कार्प (सायप्रिनस फिश) माशांचे संवर्धन करता येते.

शेततळ्यात कोळंबीसह कार्प जातीच्या माशांचे संवर्धन

1) प्लॅस्टिक अस्तर नसलेल्या शेततळ्यांत कार्प माशांबरोबर गोड्या पाण्यातील जंबो कोळंबी (मॅक्रोब्रॅकियम रोझेनबर्गी) चे संवर्धन करता येते. 
2) प्लॅस्टिक अस्तर असलेल्या शेततळ्यातील कोळंबी संवर्धनाबाबत निश्‍चित माहिती उपलब्ध नाही. कोळंबी तळाला रहाते, म्हणून शक्‍यतो कोळंबी आणि कार्प माशांचे एकत्र संवर्धन करताना कोळंबीला जागा आणि खाद्यासाठी स्पर्धा करणारे मृगळ/कॉमन कार्प या माशांची साठवणूक करू नये. साधारणपणे 8 ते 10 फूट खोल असलेल्या शेततळ्यात कोळंबी संवर्धन करणे अधिक फायदेशीर ठरेल.

मत्स्यजिऱ्यांचे बोटुकली बीजापर्यंत संवर्धन

1) शेततळ्यात बोटुकली आकाराच्या बीजाची (50 ते 150 मिमी आकाराचे) साठवणूक केल्यास मत्स्यबीज बेडूक, वाम, इ. भक्षक प्राण्यांची शिकार होणार नाही. तसेच बोटुकली आकाराच्या माशांमध्ये रोगप्रतिकारक व ताण सहन करण्याची क्षमता अधिक असल्याने माशांच्या जगवणुकीचे प्रमाण अधिक राहते. पर्यायाने शेतकऱ्याला अधिक उत्पादन मिळते. 
2) सर्वसाधारणपणे कार्प माशांची पावसाळ्यात पैदास (बीज-निर्मिती) होते. मात्र पावसाळ्यात भौगोलिक परिस्थितीनुसार सगळीकडेच पाऊस पडतोच असे नाही, त्यामुळे शेततळ्यात पाणी असेलच असे नाही. जसजसा पाऊस पडतो त्याप्रमाणे शेततळी भरतात. पुढे मत्स्यबीजाची मागणी वाढत जाते. मात्र, त्या वेळी मत्स्यबीज पैदास केंद्रात बीज उपलब्ध असेलच असे नाही.
3) शेततळ्यातील मत्स्य नर्सरी 
शेततळ्यांचा आकार लक्षात घेता प्रति शेतकऱ्याला 2,000 ते 4,000 नग मत्स्य बोटुकली बीजाची आवश्‍यकता असते, मात्र मत्स्य बोटुकलीच्या खरेदीसाठी लांबवर जावे लागते. त्यासाठी खर्चही जास्त येतो. शिवाय बीज- वाहतूक करताना मरतूक होण्याचीही शक्‍यता असते. या सर्व बाबी लक्षात घेता, एका विशिष्ट भागामधील, उदा. गाव, तालुका इ., शेततळी असणाऱ्या शेतकऱ्यांनी (एक अथवा समूहाने) पावसाळ्यात मत्स्यबीज केंद्रातून मत्स्यजिरे (4-5 मि.मी. आकाराचे) आणून 45-60 दिवस संगोपन केल्यास बोटुकली आकाराचे (50 ते 150 मिमी आकाराचे) मत्स्यबीज तयार होते. म्हणजेच शेततळ्याचा नर्सरी म्हणून उपयोग करावा. अशा बोटुकली आकाराच्या बीजाला मागणीही खूप असते शिवाय दरही चांगला मिळतो.
4) मत्स्यजिऱ्यांचा खरेदी दर 7,000 ते 10,000 रुपये प्रतिलक्ष आहे. तर मत्स्यबोटुकलींचा विक्री दर किमान दोन रुपये प्रति नग एवढा मिळू शकतो. साधारणपणे 10,00,000 प्रति हेक्‍टर या दराने 10 गुंठे शेततळ्यात 1,00,000 नग मत्स्यजिऱ्यांची साठवणूक करून 25 टक्के जगवणुकीचे प्रमाण गृहित धरल्यास किमान 25 हजार मत्स्यबोटुकली दोन महिन्यांच्या संवर्धनातून मत्स्यबीज म्हणून विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतात. याद्वारे शेतकऱ्याला (अथवा समूहाला) किमान 40 ते 50 हजार रुपये उत्पन्न मिळू शकते. जगवणुकीचे प्रमाण अधिक मिळविल्यास उत्पन्नात त्याप्रमाणे वाढ होऊ शकते.
5) मत्स्यबोटुकलीची विक्री - 
1) शेततळ्यात मत्स्यबोटुकली तयार करून विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्याने आपल्या विभागातील शेततळी असणाऱ्या व त्यामध्ये मत्स्यशेती करणाऱ्या अथवा इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मिळवावी. त्यांना तुमच्याकडे कोणत्या जातीचे, कोणत्या आकाराचे मत्स्यबीज आहे व त्याचा दर इ. बाबत वेळोवेळी माहिती द्यावी. 
2) शेततळी असणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मिळविण्यासाठी कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून मिळू शकते.

शेततळ्यात पॅंगॅशिअस माशाचे संवर्धन

1) कॅटफिश प्रकारातील हा मासा हवेतील ऑक्‍सिजनचा उपयोग करू शकतो, त्यामुळे या माशाच्या बीजाची अधिक घनतेने साठवणूक करता येते. पर्यायाने या माशाचे प्रतिहेक्‍टरी अधिक उत्पादन होते. 2) पॅंगॅशिअस माशात काटे कमी असल्याने त्याच्या फिलेटस करता येतात. शिवाय पांढऱ्या रंगाचे मांस "रेडि-टू-इट' पदार्थ तयार करण्यासाठी उपयुक्त ठरते. 
3) या माशाचे प्रति हेक्‍टरी उत्पादन अधिक असले तरी विक्री दर मात्र कार्प मासे, कोळंबी यापेक्षा कमी आहे.

शेततळ्यात कोई- कार्प या शोभिवंत माशांचे संवर्धन

1) गार्डन पूल, मोठमोठे ऍक्वेरियममध्ये ठेवण्यासाठी कोई कार्प हा शोभिवंत मासा प्रसिद्ध आहे. 
2) कोई कार्प म्हणजेच कॉमन कार्प (सायप्रिन्स फिश). 
3) मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा मोठमोठ्या शहरालगत असणाऱ्या शेततळ्यांतील संवर्धनासाठी योग्य प्रजात आहे. 
3) इतर कार्प माशांच्या तुलनेत या माशांच्या बोटुकली आकाराच्या मत्स्य-बीजासाठी थोडी जास्त किंमत द्यावी लागते. 
4) कॉमन कार्प माशांची थंड हवामानात पैदास (बीज-निर्मिती) होते. भारतीय प्रमुख कार्प माशांसारखेच बीज साठवणूक, खाद्य व पाणी व्यवस्थापन इ. या माशांच्या संवर्धनासाठी करावे लागते. 
5) या माशांमध्ये रंगाचा विकास होण्यासाठी खाद्यामध्ये नैसर्गिक स्त्रोत असलेले कॅरेटोनाईडयुक्त खाद्यघटक वापरल्यास फायदा होतो. 
6) हा शोभिवंत मासा असल्याने दोन-तीन महिन्यांच्या संवर्धनानंतर मागणीप्रमाणे विक्री करता येते. 
7) या माशाचा आकार व रंगसंगतीप्रमाणे एक कोई- कार्प मासा (15-20 सें. मी. लांबीचा) 50 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत विकला जातो. मोठ्या प्रमाणात (संख्या आणि गुणवत्ता) उत्पादन केल्यास या माशाच्या निर्यातीलाही वाव आहे.

शोभिवंत माशांचे संवर्धन

1) कार्प माशांच्या मत्स्यशेतीच्या बरोबरीने शेततळ्यात 3 मीटर लांब, दोन मीटर रूंद आणि दोन मीटर खोल आकाराचे मत्स्य-पिंजरे (लहान आकाराचे मत्स्यबीज पिंजऱ्यातून बाहेत जाणार नाही अशा प्रकारच्या आस असलेल्या नायलॉन जाळीचे) तयार करून त्यामध्ये गोल्ड-फिश, गुरामी यासारख्या बाजारात मागणी असलेल्या इतर शोभिवंत माशांचेही संवर्धन करता येईल. 
2) मोठ्या शहरांलगतच्या शेततळ्यांत, प्रथमतः प्रायोगिक तत्त्वावर व पुरेसा अनुभव आणि विपननाची खात्री मिळाल्यावर व्यावसायिक तत्त्वावर शोभिवंत माशाचे संवर्धन करता येईल.

एकात्मिक संवर्धन

1) शेततळ्याबरोबर कोंबडी, बदक, वराह यांचे एकात्मिक पद्धतीने संवर्धन करता येते.
2) या पद्धतीमध्ये परस्पर- पूरकता साध्य होते. त्यामुळे उत्पादन खर्च तर कमी होतोच शिवाय नत्र, स्फुरद, पोटॅश इ. सारख्या बहुमूल्य अन्नद्रव्यांचा नैसर्गिकपणे पुनर्वापर होतो. 
3) पर्यावरण संतुलन साधले जाते. एकात्मिक संवर्धनाबाबत तांत्रिक माहिती करून घेणे आवश्‍यक आहे.

शेततळ्यातील मत्स्यशेतीचे फायदे

1) शेततळ्यासाठी बुडित जमिनीच्या उत्पादकतेचा प्रत्यक्ष उत्पादनासाठी उपयोग, उत्पन्नात वाढ. 
2) जमिनीचा त्रिमितीय वापर, रोजगार निर्मिती 
3) प्रथिनयुक्त अन्नाचा पुरवठा, एक उपयुक्त जोडधंदा. 
4) मत्स्यशेतीमुळे तळ्यातील पाणी खतयुक्त होत असल्याने शेतीसाठी उपयुक्त.
संपर्क - 022-26516816 
(लेखक तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, बांद्रा, मुंबई येथे कार्यरत आहेत)

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate