অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दुग्धव्यवसाय विभागाच्या वाटचालीबाबत...

दुग्धव्यवसाय विभागाच्या वाटचालीबाबत...

मुंबई शहरातील नागरिकांना निर्जंतुक केलेले दूध उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सन 1951 साली आरे दुग्धवसाहत, मुंबई येथे आशियातील पहिली दुग्धशाळा उभारण्यात आली. संपूर्ण राज्यामध्ये दुग्धव्यवसाय विकसित करण्यासाठी आवश्यक संरचना उभारणीसाठी शासनाचा स्वतंत्र दुग्धव्यवसाय विभाग सन 1958 साली स्थापन करण्यात आला. जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकार विभाग ठाणे या कार्यालयाची 2005 ला कोकण भवन येथे स्थापना झाली.

सन 1975-76 साली राज्यातील दुधाचे संकलन सुमारे 6.40 लाख लिटर प्रतिदिन होते आणि त्यात वाढ होऊन सन 1984-85 च्या काळामध्ये 17.40 लाख लिटर प्रतिदिन झाले आहे. ग्रामीण भागातून दूध संकलन करण्यासाठी गावस्तरावर प्राथमिक सहकारी संस्था, तालुका आणि जिल्हा स्तरावर सहकारी दूध संघ आणि त्यांच्यामार्फत होणारी शासनाकडील दूध स्विकृती अशा तऱ्हेची एक साखळी निर्माण करण्याच्या दृष्टीने जिल्हा स्तरावर जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी या पदाची निर्मिती 1978 साली करण्यात आली. तसेच त्यांना मदत करण्यासाठी सहाय्यक जिल्हा दुग्धविकास अधिकारी आणि सहनिबंधक (सहकारी संस्था) व इतर कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली.

दुग्धव्यवसाय हा शेतीचा जोडधंदा म्हणून केला जातो. ग्रामीण भागात उत्पादित केलेले दूध शहरी ग्राहकांना रास्त दराने पुरविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. याकरिता महाराष्ट्र राज्यात दुधाचे संकलन, वाहतूक, प्रक्रिया, पॅकेजिंग करण्याकरिता सुविधा निर्माण केल्या आहेत. ग्रामीण भागातील दुधाचे संकलन करून ते शहरी भागात आणण्यासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून गाव पातळीपासून शासकीय दूध योजनेपर्यंत एक साखळी निर्माण करण्यात आली. गाव स्तरावर प्राथमिक सहकारी दूध संस्था, तालुका व जिल्हा स्तरावर दूध संघ व त्यांच्यामार्फत शासनाकडे दूध पुरवठा अशा तऱ्हेची ही साखळी होती. 1960 पर्यंत फक्त मुंबईसाठी असलेले शासकीय दूध वितरण हळूहळू महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्ये सुद्धा सुरु करण्यात आले. त्यात प्रामुख्याने पुणे, नागपूर, नाशिक इ. शहरांचा समावेश होतो.

सहकारी दुग्धसंस्था स्थापन करणे, शेतकऱ्यांना सवलतीच्या योजना देणे, दूध उत्पादनात वाढ करणे, खाजगी तबेल्यांना परवाना देणे व त्यांच्याकडून परवाना शुल्क वसूल करणे अशा स्वरुपाचे कामकाज जिल्हा दुग्धव्यवसाय विकास विभाग करतो. 29 जिल्ह्यात या विभागाचे कार्यालय असून त्यापैकी एक ठाणे जिल्ह्यात आहे. ठाणे जिल्ह्यात 160 दुग्ध संस्था आहे. दूध उत्पादन वाढीसाठी सहकारी संस्थानकडून शेतकऱ्यांना मदत करण्यात येते, मागासवर्गीयांना कर्जाच्या मर्यादेत 50% सवलत देण्यात आली आहे. सहकारी संस्थाच्या अनुदानातून दूध थंड ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना बलक मिल्क कुलर देण्यात येते, जनावरांसाठी सुगरास पशु खाद्य देण्यात येते. अशा विविध योजना दुग्धव्यवसाय विभाग शेतकऱ्यासाठी राबवते. कोकण विभागात 2016 - 17 चा आकडेवारीनुसार शासकीय दूध संकलन प्रतिदिन 7 हजार 381 लिटर इतके होते. सहकारी दूध प्रकल्पामधून प्रतिदिन 22 हजार लिटर इतके दूध संकलन होते. तसेच महाराष्ट्र शासनाचा योजनाद्वारे रायगड जिल्ह्यात 553 लिटर, रत्नागिरी जिल्ह्यात 6584 लिटर, ठाणे जिल्ह्यात 244 लिटर इतके दूध संकलन झाले आहे. तसेच जुलै 2017 च्या आकडेवारीनुसार रायगड जिल्ह्यात 270 लिटर, रत्नागिरी जिल्ह्यात 6094 लिटर आणि ठाणे जिल्ह्यात 151 लिटर इतके दूध संकलन झाले आहे. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, गुजरात या ठिकाणाहून प्रतिदिन 28 लाख 21 हजार लिटर इतके दूध बाहेरुन उपलब्ध करावे लागते.

दुग्धव्यवसाय विकास विभागांतर्गत विविध दुग्धशाळा केंद्रामध्ये दुधावर प्रक्रिया करण्यासाठी दूध थंड करण्यासाठी विविध प्रकारची सयंत्रे बसविण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने खालील सयंत्रांचा समावेश आहे. मिल्क प्लेट चिलर या यंत्राच्या साहाय्याने दुग्धशाळा/शीतकरण केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या दुधाची चांगली गुणवत्ता राखण्यासाठी ४ डिग्री से. तापमानापर्यंत थंड करण्याचे काम मिल्क चिलरद्वारे केले जाते. त्यामध्ये स्टेनलेस स्टिलच्या प्लेटस असून एका बाजूने थंड पाणी व दुसऱ्या बाजूने दूध प्रवाहित करून दूध थंड करण्याचे कार्य केले जाते. पाश्चरायझर (प्रक्रिया सयंत्र) याच्या साहाय्याने दुग्धशाळेमध्ये प्राप्त होणारे दूध दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे (पाश्चरायझेशन) आवश्यक असते. यामध्ये दूध 72 डिग्री से. एवढ्या तापमानास गरम करुन किमान 16 सेकंद ठेवण्यात येते. नंतर ते 4 डिग्री से.पर्यंत थंड करुन साठवून ठेवण्यात येते. सदर प्रक्रिया लुई पाश्चर या शास्त्रज्ञाने शोधून काढल्याने त्या प्रक्रियेस पाश्चरायझेशन म्हटले जाते. या सयंत्रामध्ये दूध गरम पाण्याच्या सहाय्याने गरम केले जाते व काही सेकंदानंतर थंड पाण्याद्वारे थंड केले जाते.

दूध योग्य त्या तापमानास गरम होण्यासाठी तसेच योग्य त्या तापमानास प्रक्रिया न झालेले दूध प्रक्रिया सयंत्रातून पुढे जाऊ नये यासाठी सदर सयंत्रात आवश्यक ते ॲटोकंट्रोल्स बसविलेले असतात. होमोजिनायझर यांच्या साहाय्याने दुधामध्ये असलेले फॅट ग्लोबुल्स संपूर्ण दुधामध्ये समप्रमाणात मिसळण्यासाठी त्याचे अत्यंत सूक्ष्म कणामध्ये (मायक्रॉनपेक्षाही कमी व्यास) रूपांतर सदर सयंत्राद्वारे केले जाते. यामध्ये हाय प्रेशर पंप व होमोजिनायझेशन व्हॉल्वचा समावेश असतो. या प्रक्रियेमुळे फॅट ग्लोबुल्सचे आकारमान कमी झाल्याने आणि दुधाच्या संपूर्ण आकारमानामध्ये ते समप्रमाणात मिसळत असल्याने दुधाचा पिवळेपणा कमी होतो व फॅट ग्लोबुल्स एकत्र येऊन दुधावरील पृष्ठभागावर थर जमण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे टँकरमधून वाहतूक करताना टँकरमधील दूधातील फॅटचे प्रमाण सर्वत्र समान राहण्यास मदत होते.

क्रिम सेपरेटर या यंत्राच्या साहाय्याने अतिरिक्त दुधाचे मलई विरहित दूध भुकटीमध्ये रूपांतर करताना दुधामधील जास्तीचे फॅट काढून स्कीम मिल्क वेगळे करण्यासाठी क्रिम सेपरेटर या सयंत्राचा उपयोग करण्यात येतो. यामध्ये दुधास गोलाकार गती दिली जाते व सेंट्रीफ्युगल फोर्समुळे दुधातील फॅट व स्कीम मिल्क याच्या विशिष्ट गुरूत्वातील फरकामुळे ते स्वतंत्र होतात.स्वतंत्र केलेल्या फॅटपासून नंतर बटर व घी हे पदार्थ तयार केले जातात. स्कीम्ड मिल्कपासून दूध भुकटी तयार करण्यात येते. यामध्ये अनुक्रमे आवश्यक त्या फॅटचे दूध निर्माण करणे तसेच दुधामध्ये असलेला कचरा इ.बाहेरील अंश काढून टाकण्यात येतात. पाऊच सयंत्र यांच्या साहाय्याने दुधाचे वितरण करण्यासाठी ते पिशवीबंद करण्यात येते. सयंत्राद्वारे आवश्यक त्या परिमाणाचे दूध (200/500/1000 मिली. लिटर) पॉलिथिलीन फिल्ममध्ये भरण्यात येते. या सयंत्राद्वारे आवश्यक त्या क्षमतेची पॉलिफिल्मची पिशवी बनविणे, ती भरणे व सिलिंग करणे या क्रिया स्वयंचलित पद्धतीने केल्या जातात. सुगीच्या हंगामात प्राप्त झालेल्या दुधाचा विनियोग करण्यासाठी त्याचे दूध भुकटीमध्ये रूपांतर केले जाते.

शासनाने आपली धोरणे राबवून उद्दिष्टे साध्य करण्यासाठी दूध महापूर योजना, संरचनेचे बळकटीकरण व स्वच्छ दूध उत्पादन योजना, संघाचे पुनर्वसन, सधन दुग्ध विकास प्रकल्प, राष्ट्रीय कृषि विकास योजना, राष्ट्रीय पूरक प्रथिने अभियान, राष्ट्रीय प्रकल्प-पशू पैदास व दुग्धशाळा विकास, इंटिग्रेटेड डेरी फार्म प्रकल्प, सुधारीत दूध प्रक्रिया सुविधा विकास प्रकल्प, वेगवर्धक दुग्ध विकास कार्यक्रम आदी विविध योजना तसेच विदर्भ विकास पॅकेज, मराठवाडा पॅकेज आदी पॅकेजेस यांची अंमलबजावणी करण्यात आली. याचा परिणाम होऊन दुधाची गुणवत्ता व परिमाण चांगल्या प्रमाणात वाढला आहे.

लेखिका: हर्षा थोरात

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate