অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पश्चिम विदर्भात पर्यटनवृद्धीसाठी एमटीडीसीच्या नाविन्यपूर्ण योजना

अमरावती

पश्चिम विदर्भातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने कंबर कसली आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वाशिम या जिल्ह्यांसाठी महामंडळाने अमरावती येथे नुकतेच प्रादेशिक कार्यालय स्थापन केले असून त्या कार्यालयामार्फत महामंडळाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये निवास व न्याहारी योजना, महाभ्रमण योजना यांसारख्या विविध योजनांचा समावेश आहे. याविषयीची सविस्तर जाणून घेऊ या... या लेखाच्या माध्यमाद्वारे...

निवास व न्याहारी योजना



राज्यातील विविध धार्मिक स्थळे, ऐतिहासिक महत्वाची ठिकाणे, समुद्रे किनारे, डोंगरदऱ्या आणि जंगले या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वळण्याची शक्यता आहे. परंतु त्यासाठी लगेच पर्यटक संकुले बांधण्यावर खर्च करणे फायदेशीर ठरणार नाही. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने अशा स्थळांचा अभ्यास केला असता अशाप्रकारचे पर्यटन क्षेत्राजवळील बंगले/ घर/ वाडे की जे बाराही महिने निवासासाठी वापरले जात नाहीत किंवा बंद ठेवले जातात अशा निवास व्यवस्थेचा पर्यटकांसाठी उपयोग करुन घेता येईल, विशेषत: ज्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ फक्त काही हंगामापुरता असतो, अशा ठिकाणी पर्यटकांची उत्तम प्रकारे राहण्याची व भोजनाची व्यवस्था करता येईल व कायमस्वरुपाची पर्यटक संकुले सरकारी खर्चाने बांधण्याची नजीकच्या काळात आवश्यकता भासणार नाही.
तीर्थस्थाने, आदिवासी पाडे अशा वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी पर्यटकांसाठी सुविधा वाढविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, या उद्देशाने ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जात आहे.
निवास व न्याहारी योजनेचे फायदे
स्थानिक घरमालकांच्या रिकाम्या जागेचा फायदेशीर उपयोग आणि पर्यटन विकास कामाला हातभार आणि पर्यटकांसाठी किफायतशीर पद्धतीने राहण्याची आणि निवासाची घरगुती सोय उपलब्ध होईल. तसेच स्थानिक घरमालक किंवा त्यांच्या नातेवाईकांसाठी स्वयंरोजगार निर्माण होईल.
दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे राज्याबाहेरील किंवा परदेशी पर्यटकांना मालकांसमवेत राहून स्थानिक संस्कृती, राहणीमान, चालीरिती आणि खाद्यपदार्थ यांची चांगल्या प्रकारे ओळख होईल.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विविध ठिकाणी असलेल्या पर्यटन माहिती केंद्राद्वारे स्थानिक घरमालकांच्या या योजनेखालील उपलब्ध जागेची माहिती इच्छुक पर्यटकांना देण्यात येईल व स्थानिक घरमालकांना त्यांच्या पर्यटकांसाठी उपलब्ध केलेल्या घरावर 'महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकृत मंजुरीने' अशाप्रकारची पाटी लावता येईल.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ स्थानिक घरमालकाच्या जागेसंबंधी पर्यटकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध होण्याऱ्या निर्देशिकेमध्ये समावेश करेल आणि महामंडळाच्या वेबसाईटवर अशा निवासांची माहिती एकत्रितरित्या मिळू शकेल.
पर्यटकांसाठी 'निवास आणि न्याहारी योजना' या योजनेंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची मान्यता मिळालेल्या काही निवडक पर्यटन स्थळांमध्ये निवासरुपाने असतील त्यामध्ये पर्यटकांसाठी तात्पुरती राहाण्याची आणि भोजनाची व्यवस्था होईल. निवास व न्याहारी योजनेच्या नोंदणीकरीता घरमालकाचे सर्व कागदपत्र उपलब्ध झाल्यास पाहणीच्या दिवशीच नोंदणी प्रमाणपत्र देण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

मागासवर्गीय घरमालकांना माफक शुल्क

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती, भटक्या जाती, विमुक्त जाती व जमाती, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय इत्यादी घरमालकांना निवास व न्याहारी योजनेत आकर्षित करण्यासाठी व त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी महांडळाने छाननी शुल्क रु. 2500/- ऐवजी रु. 500/- इतके आकारण्याचा निर्णय घेऊन मागासवर्गीय अर्जदारांना रु. 2000/- एवढे शुल्क माफ करण्यात आले आहे.

महाभ्रमण योजना



महाराष्ट्रात भ्रमंती करुन महाराष्ट्राच्या मातीची, संस्कृतीची व परंपरांची ओळख करुन घेता यावी म्हणून पारंपरिक पर्यटनापेक्षा वेगळी अनुभूती देणारं असं काहीतरी पर्यटकांना दिलं पाहिजे, या कल्पनेतून पुढे आलेली एक कल्पना म्हणजे महाभ्रमण योजना.
महाराष्ट्रात काही शेतकरी, खाजगी उद्योजक तसेच अशासकीय संस्था पर्यटनाच्या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. त्यातून पर्यटकाला महाराष्ट्राच्या बहुरंगी अस्तित्वाची ओळख होते. मातीशी नाळ जोडलेल्या शेतकऱ्याची जीवनशैली; डोंगरदऱ्यांतून पदभ्रमण करताना पानाफुलांची सळसळ; घनदाट जंगलाच्या पाणथळ जागांवर श्वापदाचा अलगद वावर; अवखळ नद्यांच्या प्रवाहाशी खेळ; समुद्र तळाच्या अनोख्या विश्वाचा शोध; आदिवासींच्या कला, हस्तकला-सण उत्सवातून दिसणारा उत्साह व रंगोत्सव ह्या सर्व बाबी एक वेगळा अनुभव देणाऱ्या आहेत.
अशा शेतकऱ्यांना, उद्योजकांना व अशासकीय संस्थांना एका छत्राखाली (महाभ्रमण) आणून त्यांच्या प्रयत्नांची दखल घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांचा प्रचार व प्रसार करणे व पर्यायाने महाराष्ट्रातील पर्यटनाला एक वेगळे परिणाम प्राप्त करुन देणे यासाठी महाभ्रमण ही संकल्पना महाराष्ट्र पर्यटनामार्फत राबविली जात आहे.
सदर योजनेत पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यात येणारी पॅकेजेस, सेवा-सुविधा शेती, निसर्ग, साहसी क्रीडा, ऐतिहासिक वारसा, कला, हस्तकला, पाककला, जंगले व पर्यावरण, परंपरा व जीवनशैली यावर आधारित असणे आवश्यक आहे आणि पॅकेजेस पर्यटनाच्या रुढ संकल्पनेपेक्षा वेगळी अनुभूती देणारी असणे आवश्यक आहे.

महाभ्रमण योजनेतून नोंदणीधारकास मिळणारे फायदे


  • पर्यटन महामंडळातर्फे नोंदणीकृत योजनांची राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी केली जाईल त्यात जाहिरात, प्रसिद्धी साहित्य, इंटरनेटरववर संकेतस्थळ व कालांतराने ऑनलाईन आरक्षण सुविधा यांचा समावेश असेल.
  • आर्थिक उलाढातील वाढ-पर्यायाने आर्थिक फायद्यात वाढ व महाराष्ट्राच्या पर्यटन विकास कामाला हातभार.
  • उद्योगाची व्याप्ती वाढेल, शासकीय मान्यतेमुळे पर्यटकांत विश्वासार्हता वाढेल व उद्योजकांची एकूण पत वाढण्यास मदत होईल.
  • स्थानिक उत्पादनांस बाजारपेठ मिळू शकेल, स्थानिक रोजगार निर्मिती होईल.
  • स्थानिक कला, लोककला, हस्तकला व पाककला यांना उत्तेजन मिळेल.
  • पर्यटनाचा आर्थिक लाभ ग्रामीण भागात व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचेल.
  • महाभ्रमण- पर्यटक समस्या निवारण यंत्रणा म्हणून विकसित होऊ शकेल.
वरील दोन्ही योजनांच्या तसेच अन्य योजनांच्या अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर संपर्क साधावा : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय, बरॅक नं. 3, कलेक्टर ऑफिस कंपाउंड, कॅम्प रोड, अमरावती- 444601. फोन - 0721 : 2661611, 2661612 फॅक्स : 0721 : 2661601
E mail : roamravati@maharashtratourism.gov.in.
संकलन -
सचिन ढवण, माहिती सहाय्यक, जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती

------------------------------------------------------------------------------------


स्त्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate