অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सेंद्रिय शेतीच्या योजना

कृषी विभागातर्फे सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये गांडूळ खत निर्मिती, सीपीपी कल्चर युनिट, सेंद्रिय शेतीशाळा, अभ्यास दौरे, समूह संघटनांसाठी अर्थसाहाय्य यासारख्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा करून घेतला पाहिजे. जनार्दन जाधव 

अ) गांडूळ खत उत्पादन व वापर

1) गांडूळ खत उत्पादन युनिट स्थापन करणे. 2) बायोडायनामिक कंपोस्ट युनिट स्थापन करणे. 3) सीपीपी कल्चर युनिट स्थापन करणे. 4) निंबोळी पावडर व अर्क तयार करण्यासाठी निम पल्वरायझर/ ग्राइंडरचा पुरवठा करणे. 
अ- 1) गांडूळ खत उत्पादन युनिट - 
1) गांडूळ खत उत्पादन युनिटसाठी 10,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. उत्पादन प्रक्रिया सुरू करताच लाभार्थ्यास खर्चाच्या 25 टक्के दराने जास्तीत जास्त 2,500 रुपये याप्रमाणे अनुदान देय आहे. 
अ- 2) बायोडायनामिक कंपोस्ट तयार करणे - 
बायोडायनामिक कंपोस्टसाठी शेतातील काडीकचरा, बनगी, पऱ्हाट्या, तुऱ्हाट्या, वाळलेली बोंडे, वाढलेले गवत, शेतातील तण, कडुनिंब, रुचकिण, निरगुडी, मोगली एरंड इत्यादीची पाने, गाजर गवत, बेशरम, गिरिपुष्प इत्यादी साहित्य, सीपीपी कल्चर, ताणे शेण (आठ ते दहा दिवसांचे), जनावरांचे मूत्र व 1500 ते 2000 लिटर पाणी लागते. 
अ- 3) सीपीपी कल्चर युनिट - 
बायोडायनामिक कंपोस्ट तयार करण्यासाठी सीपीपी कल्चर लागते, तसेच सीपीपी हे उत्तम जमीन सुधारक आहे, त्यामुळे बियाण्याची उगवण लवकर होते. जमिनीचा पोत सुधारतो. पिकात कीड व रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते व सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढते. सीपीपी कल्चर युनिट उभारणीसाठी 250 रुपये प्रति युनिट अनुदान देय राहील. 
अ- 4) निंबोळी पावडर/ अर्क तयार करणे - 
शास्त्रीय पद्धतीने व मोठ्या प्रमाणावर निंबोळी पावडर तयार करण्याकरिता पल्वरायझर/ ग्राइंडरची आवश्‍यकता असते. निम पल्वरायझर / ग्राइंडर, इलेक्‍ट्रिक/ डिझेल मोटार चाळण्या, शेड, कच्चा माल, पॅकिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी इत्यादी यंत्रसामग्रीच्या किमतीवर किमतीच्या 50 टक्के दराने जास्तीत जास्त 15,000 रुपये अनुदान अनुज्ञेय आहे.

ब) सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसाहाय्य 

1) सेंद्रिय शेती गट स्थापन करणे - 
या घटकांतर्गत प्रत्येकी 20 शेतकऱ्यांचा साधारणतः 10 हेक्‍टरचा एक गट तयार करण्यात येतो. या गटात 10 किलोमीटर त्रिज्येच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांचा समावेश राहील. गटाचे नेतृत्व करण्यासाठी गटातील सेंद्रिय शेतीबाबत अग्रगण्य आणि उत्स्फूर्तपणे काम करणाऱ्या शेतकऱ्यांची गटप्रवर्तक म्हणून निवड करण्यात यावी.
ब- 1) समूह संघटनांसाठी अर्थसाहाय्य - 
स्थापन झालेल्या गटास तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि समूह संघटनांसाठी रु. 5,000 रुपये प्रति गट याप्रमाणे एका प्रकल्पास 50 हजार रुपये इतके अर्थसाहाय्य देण्यात येईल. समूह संघटनांचे काम शासकीय यंत्रणा, अशासकीय संस्था, स्वयंसेवी आणि मित्र मार्गदर्शक संस्था, कृषी विज्ञान केंद्र इत्यादींमार्फत करावे. गटाकडून उत्पादित झालेल्या मालास योग्य ते ब्रॅंडिंग करून वेगवेगळ्या प्रदर्शनांत, कृषी खात्याचे प्रदर्शन तसेच महोत्सवांत हा सेंद्रिय शेतीमाल ठेवण्यासाठी अशा गटांस प्रोत्साहन देणे, तसेच अशा मालास बाजारपेठ उपलब्धतेची माहिती करून देणे गरजेचे आहे. 
ब- 2) शेतकऱ्यांच्या शेतीशाळा - 
सेंद्रिय शेतीशाळा आयोजित करण्यासाठी खालीलप्रमाणे पिकांची निवड करण्यात आली आहे.
सेंद्रिय शेतीशाळा ही उपरोक्त यादीमधील ज्या पिकांचा प्रकल्प राबवायचा आहे, त्या पिकांसाठी घेण्यात यावी. यामध्ये 30 शेतकऱ्यांच्या गटाचा समावेश राहील. गटातील प्रत्येक शेतकऱ्याने तेच पीक घेणे अनिवार्य राहील (एका गटासाठी एक पीक). यादीव्यतिरिक्त इतर पिकांची निवड करावयाची असल्यास विभागीय कृषी सहसंचालक स्थानिक परिस्थितीनुसार त्यास मान्यता देतात. शेतीशाळेचे एकूण 15 प्रशिक्षणवर्ग घेणे अपेक्षित आहे. एका सेंद्रिय शाळेकरिता वीस हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
ब- 3) प्रवर्तकाचे प्रशिक्षण - 
सेंद्रिय शेतीशाळा आयोजनासाठी तज्ज्ञ प्रवर्तक तयार करणे, सेंद्रिय शेती व प्रमाणीकरणाचे तंत्रज्ञान सर्वदूर एकसारखेच राहील याची काळजी घेणे. 
ब- 4) प्रवर्तकाच्या माध्यमातून प्रमाणीकरणाचे क्षेत्र निश्‍चित करणे -
प्रत्येक विभागीय कृषी सहसंचालक स्तरावर इच्छुक सेंद्रिय शेतीमध्ये कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्था तसेच सेंद्रिय शेतीमध्ये उत्स्फूर्तपणे कार्य करणाऱ्या मातृमार्गदर्शक संस्थेमार्फत प्रवर्तकाचे प्रशिक्षण या कार्यक्रमाची अंमलबजावणी करावयाची आहे. प्रत्येक तालुक्‍यामध्ये सेंद्रिय शेती प्रकल्पामध्ये समाविष्ट गटातील प्रवर्तक/ कृषी सेवक/ कृषी सहायक तसेच सेंद्रिय शाळा घेण्यास उत्सुक असलेल्या संस्थेकडील प्रवर्तक म्हणून नामनिर्देशित केलेला कार्यकर्ता यांची टीओएफ प्रशिक्षणासाठी निवड करावी. एका टीओएफकरिता 40 प्रवर्तक/ कृषी सहायक/ कृषी पर्यवेक्षक यांची निवड करावयाची आहे. मात्र, टीओएफमध्ये प्रशिक्षण झालेल्या प्रवर्तकाने सेंद्रिय शेतीशाळेची अंमलबजावणी करावयाची आहे. जिल्हानिहाय दिलेल्या उद्दिष्टानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्रकल्पामध्ये समाविष्ट कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्याची/ प्रवर्तकाची टीओएफकरिता निवड करून ती यादी विभागीय कृषी सहसंचालक यांना सादर करावी. प्रति टीओएफकरिता चार लाख रुपये खर्चमर्यादा आहे.
ब- 5) हिरवळीचे खत बियाणेपुरवठा - 
1) हिरवळीच्या खताचे पीक प्रत्यक्षात शेतात मुख्य पीक लागवडीपूर्वी पेरून ते 50 ते 60 दिवसांचे झाल्यानंतर अथवा फुलोऱ्यात येण्यापूर्वी नांगराने गाडण्याची पद्धत - यासाठी प्रामुख्याने ताग, धैंचा, चवळी, उडीद, कुळीथ इत्यादी पिकांची शेतात विशेषतः खरीप हंगामात लागवड करतात. 
2) दुसऱ्या पद्धतीत हिरवळीच्या पिकासाठी प्रामुख्याने शेताच्या बांधावर अथवा पडीक डोंगराळ जमिनीतील क्षेत्रावर सुबाभूळ, करंजा, टाकळा, रानमोडी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गिरिपुष्प वनस्पतीची हिरवी पाने आणि कोवळ्या फांद्याचा वापर करणे. 
सन 2012-13 मध्ये कृती आराखड्यांतर्गत सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन योजनेमध्ये हिरवळीच्या खताचा वापर हा घटक समाविष्ट आहे. सदर कार्यक्रमात प्रस्तावित केल्यानुसार हिरवळीच्या खताचा वापर वाढविण्यासाठी सहभागी शेतकऱ्यास कमाल दोन हेक्‍टर क्षेत्र मर्यादेपर्यंत ताग, धैंचा, चवळी, उडीद, कुळीथ इत्यादीचे बियाणे 25 टक्के अनुदानावर कमाल 2000 रुपये प्रति क्विंटल अनुदान देय राहील. कृषी विद्यापीठे/ शासकीय प्रक्षेत्रे/ राज्य बियाणे महामंडळ/ राष्ट्रीय बीज नियम या यंत्रणेच्या माध्यमातून बियाणे पुरविण्यात येणार आहे. हे अनुदान लागवड क्षेत्राच्या 75 टक्के लोकवाटा भरून घेऊन प्रत्यक्ष बियाणे स्वरूपात देय आहे. संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे राज्य बियाणे महामंडळाने प्रकल्पांतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना बियाणेपुरवठा करावयाचा आहे. या बाबीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतात.
ब- 6) बांधावर/ सलग गिरिपुष्प/ शेवरी लागवड - 
जमिनीची पाणी धारण क्षमता, सुपीकता सुधारणे व क्षारयुक्त जमिनीची सुधारणा करण्यासाठी हिरवळीच्या खतांचे बियाणे वापरास प्रोत्साहन देण्यात येते. गिरिपुष्पाच्या पानांमध्ये कर्ब 36 टक्के, नत्राचे प्रमाण 1.15 टक्के असते, त्यामुळे शेताच्या बांधावर, कुंपणावर आणि सलग गिरिपुष्प लागवडीस प्रोत्साहन देणे आवश्‍यक आहे. 
छाटकलमांद्वारे लागवड करण्यासाठी 30 सें.मी. लांब व तीन सें.मी. व्यासाची दोन छाट कलमे निवडून पावसाळ्याच्या सुरवातीस 30 x 30 x 30 सें.मी. आकाराचा खड्डा करून बांधावर दोन मीटर अंतरावर आणि सलग 3 x 3 मीटर अंतरावर लागवड करावी. अशाप्रकारे एक हेक्‍टर क्षेत्राच्या बांधावर साधारणतः 250 रोपे लागवड करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी 500 रुपये इतके अनुदान देय आहे. गिरिपुष्पाची कलमे/ रोपे/ बिया शासकीय नर्सरी/ शासन मान्यताप्राप्त नर्सरीमधूनच खरेदी करावीत. एक हेक्‍टर क्षेत्राच्या बांधावर साधारणतः 250 रोपे लागवड करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी 500 रुपये इतके अनुदान देय आहे, म्हणजेच प्रति रोप लागवडीसाठी रु. 2.00 प्रमाणे अनुदान देय आहे.
ब- 7) प्रदर्शन/ महोत्सव/ चर्चासत्र/ कार्यशाळा/ प्रशिक्षण/ आकस्मिक निधी - 
ग्राहकांमध्ये सेंद्रिय पद्धतीने उत्पादित मालासंबंधी जागृती आणण्यासाठी, प्रमाणीकरण उत्पादनास प्रसिद्धी देण्यासाठी, तसेच सेंद्रिय शेतीमालास खुली बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी, त्याचप्रमाणे सेंद्रिय उत्पादन घेऊ इच्छिणाऱ्या उत्पादकांना, ग्राहकांना, सेंद्रिय वाटचालीमध्ये सहभागी घटकांना प्रशिक्षण देणे, उत्पादकांना प्रशिक्षण देऊन सेंद्रिय उत्पादने घेण्यास प्रवृत्त करणे. राज्य/ विभाग/ जिल्हास्तरीय प्रदर्शन/ महोत्सव इत्यादी आयोजित करावयाचे असून, यामध्ये शेतकरी, सेंद्रिय संस्था, कृषी विद्यापीठे, आरसीओएफ नागपूर, प्रमाणीकरण यंत्रणा, सेंद्रिय निविष्ठा उत्पादक, व्यापारी आयात/ निर्यातदार, सेंद्रिय प्रक्रिया उत्पादक, प्रयोगशाळा, इ. व्यक्ती/ संस्थांना सहभागी करून घ्यावयाचे आहे. या घटकांतर्गत असलेली रक्कम प्रदर्शन, महोत्सव, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण, प्रचार, प्रसार मोहीम व संकीर्ण बाबींसाठी खर्च करावयाची आहे.
ब- 8) प्रचार व प्रसिद्धी - शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी व ग्राहक व खरेदीदार यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी प्रचार व प्रसिद्धीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
ब- 9) अभ्यास दौरे - राज्यातील तसेच राज्याबाहेरील आदर्श सेंद्रिय प्रक्षेत्र, सेंद्रिय तंत्रज्ञान संशोधन केंद्र, तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतावर शेतकऱ्याने जाऊन पाहणी केल्यास सेंद्रिय शेती पद्धतीबद्दल त्यांना माहिती करून घेता येऊ शकते. त्याचप्रमाणे नव्याने सेंद्रिय शेतीमध्ये सहभागी होणाऱ्या उत्पादकांना सेंद्रिय शेतीबाबतचे तंत्रज्ञान अवगत होऊन ते सेंद्रिय शेती करण्यास प्रवृत्त होऊ शकतात. हंगामात समक्ष जाऊन पिकांची व तेथील प्रयोगांची आणि निविष्ठा उत्पादनाची पाहणी करून शेतकऱ्यांना अल्प खर्चात माहिती मिळू शकते. याची खात्री झाल्यावर ते स्वतः या तंत्राप्रमाणे सेंद्रिय शेती सुरू करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांचे राज्यांतर्गत व राज्याबाहेरील अभ्यास दौरे आयोजित करण्यात यावेत. राज्यांतर्गत अभ्यास दौऱ्यासाठी प्रति शेतकरी 1000 रुपये याप्रमाणे अर्थसाहाय्य प्रस्तावित आहे. प्रत्येक प्रकल्पातून अशा प्रकारे सर्वसाधारणपणे 25 शेतकरी/ उत्पादकांचा दौरा आयोजित करण्यासाठी अनुदान प्रस्तावित आहे. राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी प्रति शेतकरी 2,000 रुपये याप्रमाणे अर्थसाहाय्य प्रस्तावित असून, प्रत्येक कृषी विभागातून 60 ते 65 शेतकरी/ उत्पादकांचा एक अभ्यास दौरा आयोजित करण्यासाठी अनुदान मंजूर आहे.
ब- 10) कृषिभूषण (सेंद्रिय शेती) - 
राज्यात सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढविण्यासाठी सेंद्रिय शेतीत उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना/ संस्थांना शासनामार्फत कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. 
(लेखक कृषी आयुक्तालयात कृषी सहसंचालक (फलोद्यान) म्हणून कार्यरत आहेत.)
ऍग्रोवन चौकट, ता. 4-2-2013 (केपी) फा.नं. - ए74106 
अ. क्र.प्रकार पिके 
1 तृणधान्य ज्वारी, गहू, भात 
2 कडधान्य तूर, हरभरा 
3 नगदी पिके कापूस, ऊस 
4 भाजीपाला पिके टोमॅटो, वांगी, भेंडी 
5 पिके आंबा, केळी, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, चिक्कू, पेरू, सीताफळ, पपई, काजू इत्यादी. 
6 पिके कांदा, हळद, आले आणि मिरची

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate