অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ई-चावडी

ई-चावडी

ई-चावडी

माहिती तंत्रज्ञानामुळे पाहीजे असलेली कोणतीही माहिती संगणकाच्या माध्यमातून एका क्लिकवर अचूकपणे मिळत आहे. महाराष्ट्र शासन प्रत्येक विभाग माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन अद्ययावत करत आहे. शासनाचा अत्यंत महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या महसूल विभागाच्या नोंदी अद्ययावत व अचूक करण्यासाठी ई-चावडी प्रणालीचा अवंलब करुन या प्रणालीमध्ये प्रत्येक गावातील महसूली नोंदीची माहिती संगणकीकृत करण्यात येत असल्यामुळे प्रत्येक नागरिकाला आपल्या आवश्यक असलेल्या नोंदीची घरबसल्या माहिती घेता येणार आहे. यामुळे नागरिकांची वेळ, पैशांची बचत होऊन त्यांना पाहीजे असलेली माहिती एका क्लिकवर उपलब्ध होऊ लागली आहे.
सातबारा काढायचा तर शोधा तलाठयाला, तलाठी आला की सातबारासाठी सजावरील दप्तर तलाठी तपासणार, त्यानंतर नोंदी अद्ययावत असल्या तरच तुमचा सातबारा मिळणार, नाही तर नोंदी अद्ययावत होईपर्यंत वाट पहावी लागणार. हे पूर्वीचे चित्र होते. तलाठी सजा आणि मंडळ अधिकारी कार्यालयातील दप्तरे आणि फायलींचे गठ्ठे यांची जागा आता लॅपटॉपने घेतली असून पुर्वी हस्तलिखित देण्यात येणारे विविध दाखले आणि गाव नमुने आता संगणकीकृत मिळू लागले आहेत. आता तलाठी सजा आणि मंडळ अधिकारी कार्यालयाने कात टाकली असून दप्तरापासून लॅपटॉपकडे डिजिटल प्रवास सुरु झाला आहे ही किमया आहे ई-चावडी आणि ई-म्युटेशन या संगणकीय प्रणालीची.
राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत संपुर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन तलाठी, मंडळ अधिकारी, मंडळ निरिक्षक यांची कार्यपध्दती (चावडी) प्रणाली राबविण्यासाठी संगणकीय आज्ञावलीचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. या अंतर्गत भूमी अभिलेखांचे संगणकीकरण आणि महसूल विभागाचे मजबूतीकरण व भूमी अभिलेख दुरुस्ती या दोन केंद्र सरकारमान्य योजना राबविण्यात येत आहे. ही प्रणाली कशाप्रकारे कार्य करते याबाबतची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहे.
ई-चावडी मध्ये गाव नमुन्याची माहिती भरणे आणि अहवाल करणे या दोन प्रमुख बाबींचा समावेश आहे. ई-चावडी ही प्रणाली तलाठी, मंडळ अधिकारी यांची कार्यपध्दती व महाराष्ट्र राज्यातील ग्रामपातळीवरील महसूली लेखांकन पध्दतीचे संगणकीकरण आहे. ई-चावडी प्रणाली ई-म्युटेशन प्रणालीशी माहिती तयार होणे व बदलण्यासाठी निगडीत असून दोन्ही प्रणालींचा डाटाबेस एकच आहे. या प्रणालीची ई-म्युटेशन बरोबर देवाण-घेवाण होते. या प्रणालीमधून MLRC चे सर्व फॉर्मच तयार होतात.
ई-चावडीमध्ये काम करण्यासाठी LMIS मधील सर्व प्रलंबित फेरफार पूर्ण करणे, संपुर्ण डाटा युनिकोडमध्ये कर्न्व्हट करणे आणि कर्न्व्हट झालेल्या डेटामधून लेखनाच्या चुका काढणे त्याबरोबरच सर्व त्रुटी दूर करणे आदी प्राथम्यक्रमाने करावयाची अत्यंत महत्त्वाची कामे आहेत. यांनतर यात समाविष्ट करण्यात आलेल्या प्रणालीची विभागणी क्षेत्र व जमीन महसूल यासंबधीचे महसूली लेख, जमीन महसूल ज्यांच्याकडुन वसुलीयोग्य आहे अशा व्यक्तींबाबतचे महसूली लेखे, वसूली व ताळेबंद यांच्या लेखाशी संबधीत असलेले महसूली लेखे, सामान्य प्रशासनाच्या आकडेवारीशी सबंधीत महसूली लेखे आणि संकीर्ण नमुने व नोंदवही अशा प्रकारे विभागणी करण्यात येते.
दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीझाल्यानंतर ई-फेरफार प्रक्रिया तीन स्तरावर पुढीलप्रमाणे होते. दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणीनंतर तहसील कार्यालयात म्युटेशन सेलद्वारे माहितीची पडताळणी करण्यात येते. त्यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयात मुळ 7/12 मध्ये बदल करण्यात येतो. ई-फेरफार प्रणालीमध्ये नोंदणीकृत व अनोंदणीकृत दस्त असे दोन प्रकारचे दस्त असतात. यापैकी नोंदणीकृत दस्तांची दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे काम पाच टप्प्यात ऑनलाईन होते. यातील शेवटच्या टप्प्यात नोंदणी केलेले दस्त ऑनलाईन तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात येते. तहसील कार्यायालयात दस्त ऑनलाईन प्राप्त झाल्यानंतर ई-म्युटेशन सेलचे काम सुरु होते. यामध्ये आवश्यकता असल्यास खातेदारांना नोटीस पाठविणे, नांवे वगळणे, फेरफार पुस्तकात नोंद घेणे, नोटीस तयार झाल्यानंतर संबधीत तलाठयास फेरफार क्रमांक, सर्वे क्रमांक, गट क्रमांक, नगर भूमापन क्रमांक, दस्त करुन घेणाऱ्याचे व देणाऱ्याचे नांव, दिनांक आदी माहिती एसएमएसद्वारे पाठविण्यात येतो. त्यानंतर तयार झालेल्या नोटीस पीडीएफ फॉरमॅटमध्ये तयार होऊन त्यावर डिजिटल स्वाक्षरी घेण्यात येते. ही नोटीस परत दुय्यक निबंधक कार्यालयात ऑलाईन पाठविण्यात येऊन ती संबधितांना देण्यात येते. नोटीस दिल्यानंतर 15 दिवसांत फेरफार तहसील कार्यालयाकडे ऑनलाईन पाठविण्यात येतो. त्यावर तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांनी फेरफाराच्या नोंदी, 7 / 12 व नोटीस तपासून मंजूरीचा शेरा नमुद झाल्यानंतर मुळ 7 / 12 अपडेट होतो.
अनोंदणीकृत दस्त (इकरार, वारस, बोजा आदी ) संगणकीय प्रणालीवर टाकला जातो. त्यास तलाठयामार्फत ऑनलाईन फेरफार क्रमांक देण्यात येऊन फेरफाराच संपुर्ण माहिती भरण्यात येते. भरलेली माहिती संगणक प्रणालीमध्ये साठविण्यात येऊन संबधित खातेदारांना मंडळ अधिकाऱ्यांमार्फत नमुना 9 ची नोटीस फेरफराची माहिती, तलाठयाने बजावलेली नोटीस आणि 7 / 12 तपासून पाठविण्यात येते. यानंतर मंडळ अधिकाऱ्यांच्या मंजूरीच्या शेऱ्यानंतर खातेदारास अद्ययावत 7 / 12 प्राप्त होतो.
थोडक्यात या उपक्रमाच्या मध्यमातून प्रामुख्याने भूमी अभिलेखाचे संगणकीकरण आणि विभागाचे मजबुतीकरण व भूमी अभिलेख दुरुस्ती करणे, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावातील जमिनी, गावनकाशे, सातबारांचे अद्यावतीकरण, गांव नोंदणी, फळबागा, जनावरांची संख्या, आम आदमी विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी, फेरफार आदी कामे जलदगीने होऊन ई-म्युटेशनद्वारे गाव नमुने, सातबारा, गावनकाशे, फेरफार आदींच्या अद्यायावत प्रती घरबसल्या प्राप्त होण्यास निश्चितच मदत होणार असून महसूल प्रशासन गतीमान आणि पारदर्शक होऊन लोकाभिमुख होईल यात शंकाच नाही.
लेखक :
राजेश लाबडे

माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत:  महान्यूज

अंतिम सुधारित : 7/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate