অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अंधकारावर मात करणारी आदर्शयात्री ‘हेलन केलर’

अंधकारावर मात करणारी आदर्शयात्री ‘हेलन केलर’

शारीरिक अपंगत्व येऊनही ती हरली नाही जगण्याची जिद्द...जगभरातल्या दृष्टीहीन आणि मूकबधीर लोकांचा ती आदर्श आहे...आजही तिच्या साहित्य कृतीतून जगासमोर प्रेरणेचा, सेवेचा वसा आणि वारसा मांडला जातो. हेलन केलर तिचे नाव. आज तिची पुण्यतिथी त्यानिमित्त तिच्या संघर्षमय आयुष्याचा घेतलेला हा वेध..

हेलनचा जन्म २७ जून १८८० मध्ये झाला. जन्मत:च ती स्वस्थ होती पण जीवघेण्या आजारपणानंतर तिच्यात श्रवण आणि दृष्टीदोष निर्माण झाला. तिची गुरु, शिक्षिका ऍनी सुलीव्हँन यांनी तिच्या आयुष्याला नवी दिशा दिली. अचानक आलेल्या अपंगत्वावर मात करण्याचा आत्मविश्वास सुलीव्हँन यांनीच तिला दिला. भाषा शिकण्यातली मोठी अडचण हेलन समोर होती पण त्यावरही तिने प्रयत्नपूर्वक मात केली. तिच्या आयुष्यावर निघालेला ‘दी मिरँकल वर्कर’ हा चित्रपट तिच्यासारख्या अनेकांना नवसंजीवनी देऊन गेला. बोटांनी वाचून बोलण्याची कला तिने प्रयत्नपूर्वक आत्मसात केली. ब्रेल लिपीही ती दहाव्या वर्षीच शिकली. कुठलीही गोष्ट आत्मसात करण्याचा तिचा आवाका विलक्षण होता. येणाऱ्या अनेक अडचणीवर मात करत ती टायप रायटर चालवायला शिकली. सोळाव्या वर्षी ती पहिल्यांदा शाळेत गेली. १९०४ मध्ये तिने रँडिक्लिफ महाविद्यालयातून पदवी मिळवत जगातील पहिल्या मूकबधीर व्यक्तीने पदवी मिळवण्याचा इतिहास घडविला.

हेलनने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपले संपूर्ण आयुष्य मूकबधीर आणि दृष्टीहीन लोकांच्या सेवेत घालविण्याचे ठरविले आणि ती त्या सर्वांचा आधारवड झाली. लेखक म्हणून तिची वाटचाल अफलातून आहे. बारा पुस्तकांचे लेखन तिने केलेले आहे. व्याख्याता, राजकीय, सामाजिक कार्यकर्ता म्हणून तिचा प्रवास थक्क करणारा आहे. दी स्टोरी ऑफ माय लाईफ (१९०३) दी वर्ल्ड आय लिव्ह इन (१९०८) ही तिची दोन गाजलेली पुस्तके आहेत आणि आजही ती खपाच्या बाबतीत अग्रणी आहेत. ही पुस्तके म्हणजे तिच्या जीवन संघर्षाची खरीखुरी कहाणी आहेत. महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी तिने आपल्या लेखणीतून कायमच लढा दिलेला आहे. समाजवादी तत्वज्ञावर तिचा प्रगाढ विश्वास होता. समतेच्या, मानवतेच्या वाटेवर ती आयुष्यभर चालत राहिली.

वाट्याला आलेल्या समस्यांचा बाऊ न करता त्यावर मात करत तिने जगभरातील अनेकांना जगण्याचं बळ दिलं. आत्मविश्वास हे शस्त्र असून त्याचा अवलंब करून ती हयातभर जगाच्या कल्याणासाठी काम करत राहिली. एकट्याने कार्य करण्यापेक्षा एकत्र येऊन महान कार्याची उभारणी करा असा तिचा जगाला मोलाचा संदेश आहे. आदर्श व्यक्तींना समोर ठेवून चालत रहा. आपल्या असण्याचा शोध जाणीवपूर्वक घ्या. हे तिचं नेहमीच सांगण होतं. “एकेकाळी मी केवळ स्थिरता आणि अंधार पाहिला आहे. माझे जीवन भविष्य आणि भुतकाळाशिवाय होते पण बोटांनी लहानश्या शब्दाला स्पर्श केला आणि रिकामेपणाची पकड हाती आली, आणि माझ्या मनात जगण्याचा नवीन आनंद निर्माण झाला.” हे तिचे शब्द खऱ्या आनंदाची अनुभूती देणारे आहेत. आयुष्याचा खराखुरा आनंद इतरांसाठी जगण्यात असतो हे तिने आपल्या विचारातून सांगितलेले आहे.

सद्यस्थितीत हे जग भय, अंधकार, निराशा यात गुरफटून जात असताना हेलन केलरचा हा जीवन संघर्ष येणाऱ्या अनेक पिढ्यांना अंधारातून, निराशेतून बाहेर काढेल. हेलनचे चरित्र जीवनाकडे पहायची नवी दृष्टी देते. ज्ञान, सुज्ञता सकारात्मकतेच्या प्रकाशात वाटचाल करणाऱ्या या आदर्श सेविकेला पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

लेखक: सचिन के. पाटील

मोबा. ९५२७७७७७३२

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate