অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आगळी वेगळी फुटबॉल मॅच

आगळी वेगळी फुटबॉल मॅच

मंत्रालयाच्या समोरच असलेले विधानभवन. दररोज मंत्रालयात येताना या विधानभवनात कधीतरी जावे असे वाटत होते आणि काल ही संधी मला मिळाली. निमित्तही तसे होते... काल विधानभवनात विधानपरिषद सभापती 11 विरुध्द विधानसभा अध्यक्ष 11 अशी आमदारांना घेऊनच फुटबॉल मॅच आयोजित करण्यात आली होती. ही फुटबॉल मॅच लाईव्ह पाहण्याचा आनंद मला घेता आला.

विधानभवन प्रांगणात फुटबॉल मॅच का? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण निमित्त तसेच होते.. कारण जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा येत्या ऑक्टोबर महिन्यात भारतामध्ये होत आहे. केवळ भारतामध्येच नव्हे, तर संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये होणारी ही पहिलीची फिफाची विश्वचषक स्पर्धा आहे. या निमित्ताने भारताच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ११ मिलियन मिशन हा उपक्रम आखला आहे याच संदेशाला साथ देण्यासाठी आणि फुटबाँल खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी राज्य शासनामार्फत मिशन १ मिलियन हा फुटबॉल प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी मिशन 1 मिलियन - अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय अभियानाची योजना केली आहे. याचाच एक भाग म्हणून विधानमंडळाच्या परिसरातील वाहनतळाच्या मोकळ्या जागेत फुटबॉल सामना आयोजित करण्यात आला होता.

फुटबॉल सामना म्हटल्यावर आठवते ते दोन संघातील चुरस आणि अटीतटीत जिंकण्याची जिद्द. पण राज्य शासनाच्या क्रीडा संचालनालयातर्फे आयोजित आमदार फुटबाल स्पर्धेत दोन्ही सभागृहातील अकरा सदस्यांनी भाग घेतला होता. विशेष म्हणजे दोन्ही संघातील आमदार फुटबॉल मॅच खेळताना पूर्णपणे या खेळाचा आनंद घेत होते. आता फुटबॉल मॅच स्पर्धा सुरु झाली आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांच्या समोर फुटबॉल सामन्याचा टॉस उडविण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुटबॉलला किक मारुन या सामन्याचा शुभारंभ केला आणि या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्याचे समालोचन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने करुन जमलेल्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता खरे तर या मॅचची रंगत वाढतच चालली होती. कोण जिंकणार असेच उपस्थिताना वाटत होते. येथील उपस्थित सर्व जणही मॅच खेळणाऱ्यांना प्रेरित करीत होते.

साधारणपणे पाऊण तास चाललेल्या मॅचमध्ये विधानसभा अध्यक्ष 11 यांनी बाजी मारली. मॅच संपल्यावर सगळ्यांना आता या खेळाचे महत्त्व पटून गेले होते. त्यामुळेच असेल पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचवेळी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषद सभापती विरुध्द विधानसभा अध्यक्ष या दोन संघामध्ये क्रिकेट मॅच होणार असल्याचे जाहिर केले. या मॅचनंतर असे जाणवले की, एरव्ही सभागृहात एखादा मुद्दा गंभीरपणे मांडणारे सदस्य प्रथमच फुटबॉल मॅचची मज्जा तितकेच खिलाडूवृत्तीने घेत होते. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या फिफा फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आणि विधानभवनात रंगलेल्या फुटबॉल मॅचनंतर आता राज्यातही फुटबॉल फिव्हर येतोय असे म्हणायला हरकत नाही.

लेखक: प्रशांत भालेराव

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 6/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate