অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खादी : नव्या संस्कृतीचे पर्व

खादी : नव्या संस्कृतीचे पर्व

स्वातंत्र्य चळवळीत खादीला अनन्यसाधारण महत्व होते. खादी म्हणजेच स्वदेशी चळवळ असे समजले जात होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेहमीच भाषणात सांगतात की, "भेट देताना फुलं न देता खादीपासून बनविलेल्या वस्तू भेट द्याव्यात". महाराष्ट्र शासनाने देखील खादीला प्रोत्साहन देण्याचे धोरण ठरविले आहे. स्वातंत्र्य संग्राम आणि खादीचे अतूट नाते आता व्यावसायिक तऱ्हेने अधिक व्यापक बनले आहे. हे मान्यच करावे लागेल.

खादीला खद्दर असेही नाव आहे. खद्दर म्हणजे जाडे भरडे कापड. हाताने सूत काढणे आणि त्यापासून कापड विणणे हा धंदा भारतात ग्रामोद्योग म्हणून अनेक वर्षांपासून केला जातो. महात्मा गांधी यांनी 1908 मध्ये चरखा संघाच्या माध्यमातून खादीला महत्त्व मिळवून दिले. 1957 मध्ये भारतात खादी ग्रामोद्योग आयोग स्थापन करण्यात आला. राज्यात खादी ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून खादीला विशेष प्रोत्साहन देण्यात येऊ लागले.

आजची खादी ही फॅशनच्या दुनियेत साऱ्या जगात अग्रेसर ठरत आहे. नव्या युगातले स्टेटस् म्हणूनही खादीला महत्व आले आहे. यंग इंडियामध्ये 8 डिसेंबर 1921 ला गांधीजी म्हणतात, "पुढील काळातील पिढ्या माझ्या जाणते-अजाणतेपणाने झालेल्या चुकांबद्दल शिव्याशाप देतील. परंतू मला खात्री आहे, की त्याच पिढ्या चरख्याच्या पुनरुत्थानाचा मी जो प्रयत्न केला त्याबद्दल मला दुवा देतील. मी चरख्यासाठी माझे सर्वस्व पणाला लावीत आहे. कारण चरख्याच्या प्रत्येक चक्रगतीतून शांतता, सद्भाव व प्रेम समाजाला मिळणार आहे". भारतीय राष्ट्रीय ध्वज खादी कापडाचा असतो हे विशेष होय.

खादीचे उल्लेख वैदिक साहित्यातही आहेत. ऋग्वेद, अर्थवेदात याचे उल्लेख दिसून येतात. ब्रह्मर्षी पंडीत श्री. दा. सातवळेकर यांच्या 1922 ला प्रकाशित झालेल्या ‘वर्दी में चरखाʼ या पुस्तकात सविस्तर विवरण आहे. सम्राट अशोक काळातही खादीला विशेष महत्व होते. मात्र गेल्या तीन वर्षात देशात आणि महाराष्ट्रात खादीला वेगळेच महत्व प्राप्त झाल्याचे दिसून येते. खादी फॅशन आहेच पण संस्कृती होऊ लागली आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाच्या म्हणण्यानुसार 2016-17 या वर्षात खादीला विशेष मागणी दिसून आली तर 2017-18 मध्ये किमान 5 हजार कोटी रुपयाची खादी विक्रीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नुकतीच खादी ग्रामोद्योग आयोगाने त्यांच्याकडील वस्तू निर्यात करण्यासाठी अलिकडेच स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. यातून परदेशी चलनही मोठ्या प्रमाणावर मिळू शकेल असा विश्वास आहे. भारतात 1.42 लाख विणकर आहेत आणि 8.62 सूत काढणारे कारागीर आहेत. एका पाहणीनुसार 9.60 लाख चरखे आणि 1.51 लाख करघोमधून खादी तयार केली जाते. गेल्या तीन वर्षात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार वाढला आहे. जवळपास 13 लाख लोकांना यातून रोजगार प्राप्त झाला आहे. खादी आयोगाने 43.15 कोटी रुपये खादी कारागिरांच्या कौशल्य विकासावर खर्च केले आहेत. 9.057 लाख कारागिरांना यातून लाभ झाल्याचे दिसते.

महाराष्ट्र शासनाने शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दि.14 जून 2016 च्या शासन परिपत्रकानुसार आठवड्यातून एक दिवस खादीचे कपडे परिधान करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार कार्यालयात खादी कपडे वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2016 ला केलेल्या पहिल्या ‘मन की बातʼ या भाषण कार्यक्रमातून खादीचे कपडे घालावेत असे आवाहन केले होते. त्यामुळे देशात अचानक खादीची विक्री वाढली. खादी ग्रामोद्योग आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार 2016-17 मध्ये खादी विक्रीत 33 टक्के वाढ झाली. गेल्यावर्षी 1510 कोटी रुपयाची विक्री झाली होती तर यावर्षी हीच विक्री 2005 कोटी रुपयापर्यंत पोहोचली आहे. महाराष्ट्रात जवळपास 40 खादी संस्था कार्यरत आहेत. त्यातून खादी, रेशीम, वुलन कापडाचे उत्पादन होते. खादी कापडावर सुट देण्याची महाराष्ट्र शासनाची योजना आहे. 10 ते 15 टक्के सूट राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून दिली जाते. या सूट काळात खादीची विक्री वाढण्यास मदत होते.

महाराष्ट्रात खादीचे केंद्र म्हणून वर्ध्याचा उल्लेख होत असला तरी संपूर्ण राज्यात अनेक लहानमोठ्या संस्था या क्षेत्रात मोठे काम करीत आहेत. द्वारकानाथ लेले यांनी लिहिलेल्या "महाराष्ट्रातील खादी कामाचा इतिहास 1987 पर्यंत" या पुस्तकात महाराष्ट्रातील खादी चळवळीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 1972 मध्ये ‘साम्ययोगʼ मासिकाने खादी कार्याचा आढावा घेणारा विशेषांक प्रकाशित केला होता. या अंकात अनेक मान्यवरांची मते नोंदविण्यात आली आहेत. खादी महाराष्ट्रात विशेषत: सण उत्सवात घातले जाणारे वस्त्र म्हणून प्रचलित आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे "जब हम खादी खरीदते है तो हम उन लाखों बुनकारों की जिंदगीयो में रोशनी भरने का काम करते हैं, ज्यो कि रात दिन कठिण परिश्रम करते है!".

एकूणच आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण साऱ्यांनीच वैभवशाली स्वदेशी परंपरा असणाऱ्या खादीला स्विकारले पाहिजे. खादी, चरखा हे नव्या भारताच्या संस्कृतीचे पर्व आहे. या पर्वात आपणही सहभागी होऊन स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजावून घेतला तर भारत अधिक समृद्ध होईल. महात्मा गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे "खादी केवळ स्वातंत्र्य मिळवण्याचे साधन नाही तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचे सुराज्यात रुपांतर करण्याचे साधन होते. खादी हे समाज परिवर्तनाचे व नव्या समाजरचनेचे एक साधन होते."

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नव्या युगात नवीन मंत्र दिला. "खादी देश के लिए, खादी फॅशन के लिए".

लेखक: डॉ.गणेश व.मुळे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate