অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ग्रंथालय

ग्रंथालय

ग्रंथालय म्हणजे ग्रंथसंग्रहाचे स्थान. ग्रंथालय ही प्राचीन सामाजिक संस्था असून तिला मोठा इतिहास आहे आणि तो मानवसंस्कृतीशी समांतर आहे. ग्रंथवाचक आणि ग्रंथालयातील सेवक हे ग्रंथालयाचे तीन प्रमुख घटक होत. या घटकांचे स्वरूप व त्याविषयाच्या कल्पना कालमानानुसार बदलत गेल्याचे आढळून येते. याबरोबरच ग्रंथालयाची वास्तू, ग्रंथालयीन प्रशासन, आंतरग्रंथालयीन सहकार्य व आंतरराष्ट्रीय ग्रंथालयीन संघटना इ. घटकही आधुनिक ग्रंथालयविचारात येतात. ग्रंथालयाचे प्रकार आणि कार्य यांचाही विचार या संदर्भात महत्त्वाचा असतो.

प्राचीन ग्रंथालयात इष्टिका,पपायरस व चामडे यांवर लिहिलेले ग्रंथ असत. त्यात पुढे हस्तलिखित ग्रंथांची व नंतर मुद्रित ग्रंथांची भर पडली. आधुनिक ग्रंथालयांत ग्रंथांबरोबर नियतकालिके, कागदपत्रे, हस्तलिखिते,नकाशे, छायाचित्रे, शिल्पाकृती, शिलालेख, नाणी, तिकीटे, ध्वनिमुद्रिका, मुद्रित फीता, सूक्ष्मपट (मायक्रोफिल्म), सूक्ष्मपत्र (मायक्रोकार्ड), लेखछायाचित्रे, कात्रणे इ. प्रकारचे दृक्‌श्राव्य ज्ञानसाहीत्य संग्रहीत केले जाते. प्राचीन ग्रंथालयातील इष्टिका, शिला, चर्म अथवा तत्सम साधनांद्वारे तयार केलेले ग्रंथ दुर्मिळ असल्यामुळे त्यांचे रक्षण करणे एवढेच कार्य ग्रंथपालाला यापूर्वी असे; परंतु आधुनिक युगात ग्रंथ सुलभ झाल्यामुळे ग्रंथपालाच्या कार्याची व्याप्ती वाढली आहे. वाचकांना ग्रंथांचा अधिकाअधिक उपयोग करू देऊन ज्ञानाचा प्रसार समाजात कसा करता येईल, वाचकांशी आपुलकीने वागून त्यांच्या जिज्ञासा व गरजा तत्परतेने कशा पुऱ्या करता येतील, जिज्ञासूंना यथायोग्य मार्गदर्शन करून ज्ञान, मनोरंजन तसेच नागरिकत्वाची व सुसंस्कृतपणाची जाणीव त्यांच्यात कशी वाढेल, त्यांचे व्यक्तिमत्त्व सुसंपन्न कसे होईल यांसाठी सदैव सिद्ध राहणारा ग्रंथपाल आजच्या ग्रंथालयाचा प्रमुख घटक मानला गेला आहे.

रम्य व सोयीची जागा, तज्ञ व तत्पर ग्रंथपाल, उपयुक्त ग्रंथांचा संग्रह, ग्रंथांची शास्त्रशुद्ध रचना व आर्थिक सुस्थिरता ही आदर्श ग्रंथालयाची पाच महत्त्वाची अंगे मानली जातात. अशा ग्रंथालयाकडून पुढील कार्याची अपेक्षा करण्यात येते : (१) शैक्षणिक कार्य : समाजातील कोणत्याही लहान-मोठ्या, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत व्यक्तीला स्वतः ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ज्ञान-साहित्य उपलब्ध करून देणे. (२) संशोधनात्मक कार्य : प्रत्येक विषयावर संशोधनयोग्य असे अद्ययावत ज्ञानसाहित्य संग्रहित करणे. (३) राजकीय कार्य : स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरील माहिती कोणताही पूर्वग्रह न बाळगता सर्वांना उपलब्ध करून देणे. (४) औद्योगिक कार्य : उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक ती माहिती, नवे विचार, वैज्ञानिक व तांत्रिक संशोधन यांची अद्ययावत माहिती संशोधक, संयोजक व तंत्रज्ञ यांना उपलब्ध करून देणे. (५) सांस्कृतिक कार्य : भावी पिढ्यांसाठी ज्ञान जतन करून ठेवणे. या गोष्टी लक्षात घेता ग्रंथालय म्हणजे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा मानदंड होय, असे म्हणावे लागेल.

ग्रंथालयांचा इतिहास

जागतिक ग्रंथालये : अलीकडील उत्खननांत प्राचीन काळातील शहरांचे जे अवशेष सापडले त्यांवरून जगातील सर्वांत प्राचीन ग्रंथालये सुमेरियन व बॅबिलोनियन संस्कृतींच्या काळात अस्तित्वात होती, असे सिद्ध होते. उदा., ख्रि. पू. २७०० वर्षे धार्मिक व शासकीय ग्रंथालये होती. टेयो येथील एका ग्रंथालयात तीस हजार ग्रंथ होते. चुनखडीपासून तयार केलेल्या विटांवर, धातू अथवा लाकूड यांपासून तयार केलेल्या लेखणीने क्यूनिफॉर्म लिपीत लिहिलेल्या इष्टिकाग्रंथांचा संग्रह म्हणजे जगातील पहिला ग्रंथसंग्रह होय. धार्मिक वचने, प्रार्थना, मंत्रतंत्र, लोककथा, न्यायनिवाडे यांबरोबरच तत्कालीन सामाजिक, राजकीय व तात्त्विक वाङ्‌मयाचे नमुनेही या इष्टिकाग्रंथात आढळले आहेत.

बॅबिलोनियन संस्कृतीला सुमेरियन संस्कृतीचा वारसा मिळालेला होता. ह्या काळी देवालये व राजवाडे यांमधून ग्रंथसंग्रह केला जाई. बॉर्सिपा येथे एक महत्त्वाचे ग्रंथालय होते. व्यापार, दैनंदिन घटनांच्या नोंदी, राजकीय व धार्मिक आदेश यांच्यासाठी इष्टिकांचा वापर होई. जगातील कायद्याची पहिली संहिता हामुराबी या राजाने निर्माण केली. ती इष्टिकाग्रंथावर लिहिलेली असून सध्या ती पॅरीसमधील ग्रंथालयात उपलब्ध आहे.

ॲसिरियन राजघराणे बॅबिलोनियन संस्कृतीच्या काळात अस्तित्वात होते. ग्रंथपालन हा व्यवसाय या काळाइतका पुरातन आहे,असे मानले जाते. असुरबनिपाल (इ. स. पू. ६६८ ते ६२७) या राजाने निनेव्ह येथील एका मंदिराजवळ एक मोठे ग्रंथालय स्थापन केले होते. बॉर्सिपा येथील ग्रंथालयातील ग्रंथांच्या नकला त्याने करवून घेतल्या, अनेकांची भाषांतरे केली व सुमेरियन भाषेतील सु. वीस हजार ग्रंथ एकत्रित केले. १८५० साली ऑस्टिन लेअर्ड याने उत्खनन केले तेव्हा त्याला निनेव्ह येथे हे ग्रंथालय सापडले. या ग्रंथालयातील इष्टिकाग्रंथांत प्राचीन आर्ष ग्रंथांच्या प्रती होत्या. या ग्रंथांचे वर्गीकरण व सूचिलेखनही केलेले होते. हे ग्रंथ बाहेर वाचावयास दिले जात. तसेच ते मुक्तद्वार ग्रंथालय होते. या ग्रंथालयातील काही इष्टिकाग्रंथ ब्रिटीश म्यूझीयममध्ये ठेवलेले आहेत.

प्राचीन ईजिप्तमधील लेखनसाहित्य व ग्रंथ मात्र अगदी निराळे होते. हे ग्रंथ पपायरसवर लिहिले ले होते. हायरोग्लिफिक लिपीत लिहिलेले हे ग्रंथ गुंडाळून मातीची भांडी किंवा धातूंची नळकांडी यांमधून सुरक्षित ठेवले जात. भांड्यांवर आतील ग्रंथांची माहिती लिहिलेली असे. खाजगी व मंदिरांतील ग्रंथालयांप्रमाणेच ईजिप्तमध्ये त्या काळात सरकारी ग्रंथालयेही होती. गीझा येथे इ. स. पू. २५०० मध्ये एक मोठे ग्रंथालय अस्तित्वात होते. इ. स. पू. १२५० च्या सुमारास थीब्झ येथे दुसरा रॅमर्सीझ यानेही एक ग्रंथालय स्थापन केले होते. इ. स. पू. २८०० च्या सुमाराचे ईजिप्तमधील सर्वांत प्राचीन पुस्तक प्रीसि पपायरस हे सध्या पॅरीस येथील बिब्लिओथेक नॅशनले या ग्रंथालयात उपलब्ध आहे. इद्फू, मेंडीझ, मेंफिस आणि हीलिऑपोलिस या ठिकाणी ग्रंथालये अस्तित्वात होती.

ईजिप्तमधील सर्वांत महत्त्वाचे ग्रंथालय अ‍ॅलेक्झांड्रिया येथे होते. ग्रीक राजा पहिला टॉलेमी याने इ.स.पू. २९० मध्ये ते स्थापन केले. फिलाडेल्फस व तिसरा टॉलेमी या राजांनी हे ग्रंथालय अधिक समृद्ध केले होते. सीझरने ज्यावेळी या ग्रंथालयाचा नाश केला त्यावेळी या ग्रंथालयात सात लाख ग्रंथ होते. त्या काळी पपायरससारखे दुर्मिळ लेखनसाहित्य आणि लेखनविसांची मर्यादित संख्या असतानादेखील इतक्या मोठ्या प्रमाणावर केलेला हा ग्रंथसंग्रह पाहून आश्चर्य वाटते. डीमीट्रिअस,झिनॉडोटस, अपोलोनियस, ॲरिस्टोफेनीस आदि नामवंत विद्वानांनी या ग्रंथालयाचे ग्रंथपालपद भूषविले होते. त्यांनी अनेक ग्रंथ जमविले, त्यांची भाषांतरे केली व १२० विषयांत त्यांचे वर्गीकरण करून सूचीही तयार केली होती.

ॲलेक्झांड्रियाप्रमाणेच पर्गामम येथेही एक ग्रंथालय दुसऱ्या यूमीनीझ याने स्थापन केले होते. विद्याप्रसार व कलाक्रीडा यांबाबत या दोन ग्रंथालयांत नेहमीच स्पर्धा चाले. पर्गामम येथील ग्रंथनिर्मिती इतकी वेगवान होती, की ईजिप्शियनांनी मत्सरामुळे त्यांना पपायरस वनस्पतीचा पुरवठा करण्याचे बंद करून टाकले. या चुरशीतूनच पुढे चामड्यावरील ग्रंथांची निर्मिती झाली. इ. स. ४८ मध्ये अ‍ॅलेक्झांड्रियाच्या ग्रंथालयाचा सीझरच्या स्वारीत नाश झाला होता, त्याचे परिमार्जन म्हणून अँटोनीने पर्गाममचे ग्रंथालय क्वीओपात्राला भेट म्हणून दिले. त्यावेळी या ग्रंथालयात दोन लाख ग्रंथ होते, असे प्लिनी हा इतिहासकार म्हणतो. जर्मन संशोधक अलेक्झांडर कोंज याने १८७६ ते १८८६ या काळात जेव्हा उत्खनन केले, तेव्हा त्याला पर्गामम ग्रंथालयाची चार दालने सापडली होती. ईजिप्तमधील पपायरस हे ग्रंथसाधन फारसे टिकाऊ नव्हते, त्यामुळे व ख्रिश्चन धर्मवेड्यांनी आणि खलीफा उमर याने ग्रंथालयाचा नाश केल्यामुळे त्यांपैकी फारच थोडे अवशेष आज मिळत आहेत.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate