অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जागतिक लोकसंख्या ः दहा ठळक बाबी

जागतिक लोकसंख्या ः दहा ठळक बाबी

मानवाने विज्ञान-तंत्रज्ञानाबाबत किंवा आर्थिक समृद्धीच्या अनुषंगाने कितीही प्रगती केली, तरी मानव जातीचे भवितव्य महिला आणि बालकांच्या आरोग्यावरच अवलंबून आहे. मात्र, महिलांचे प्रजननविषयक आरोग्याचे प्रश्‍न, बालविवाह, एच. आय. व्ही. संक्रमण, महिलांच्या लैंगिक अवयवांचे नुकसान अशा अनेक समस्या आहेत, ज्यात मृत्युमुखी पडणार्‍या लोकांची जगभरातील संख्या खूप मोठी आहे. जागतिक लोकसंख्येसंदर्भातील याबाबतची वास्तव परिस्थिती दर्शविणारी माहिती ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन्स फंड’ने आपल्या संकेतस्थळावर नुकतीच प्रसिद्ध केली असून, ‘जागतिक लोकसंख्या दिना’च्या निमित्ताने ही माहिती वनराईच्या वाचकांना उपलब्ध करून देत आहोत...

1.  सध्या जगातील एकूण लोकसंख्येत तरुणांची संख्या लक्षणीय आहे. यापूर्वी इतक्या प्रमाणात तरुणांची लोकसंख्या नव्हती. त्यामुळे आता आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली प्रचंड क्षमता निर्माण झाली आहे.

10 ते 24 वयोगटांतील सुमारे 1.8 अब्ज तरुणाई सध्या जगात आहे. यापैकी सर्वाधिक तरुणाई विकसनशील देशांमध्ये एकवटलेली आहे. एवढेच नाही तर, जगातील किमान विकसित असलेल्या 48 देशांतील लोकसंख्येत मुले किंवा किशोरवयीन मुलेच बहुसंख्येने आहेत. अत्यंत दारिद्य्र, माहिती मिळविण्यात किंवा पुरविण्यात केला जाणारा भेदभाव आणि माहितीचा अभाव यामुळे त्यांच्यापैकी कित्येक तरुणांच्या क्षमता रोखल्या जात आहेत. त्यांचे शिक्षण आणि संधी यात योग्य गुंतवणूक झाल्यास या तरुणांच्या कल्पना, आदर्श आणि नवकल्पना यामुळे भवितव्यात बदल घडून येईल.

2.  सब-सहारन आफ्रिकेतील अनेक महिला या गर्भारपण किंवा प्रसूतिदरम्यान निर्माण होणार्‍या गुंतागुंतीमुळे मरण पावतात. एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमध्ये अशीच स्थिती होती. याबाबतचे वर्णन चार्ल्स डिकन्सलिखित ‘ऑलिव्हर ट्विस्ट’ आणि ‘अ ख्रिसमस कॅरोल’ या कलाकृतीत आल्याचे दिसून येते.

सब-सहारन आफ्रिकेत जन्मणार्‍या प्रति एक लाख बाळांमागे 510 महिलांचा मृत्यू मातृत्वाच्या वेळी निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे होतात, असे स्पष्ट होते. गर्भारपणाशी संबंधित कारणांमुळे जगभर रोज 800 महिलांचे मृत्यू होत आहेत, तरीही पूर्वीच्या तुलनेत हा मृत्युदर कमी करण्यामध्ये बर्‍यापैकी यश आले आहे. 1990 पासून जागतिक स्तरावर मातामृत्यूच्या प्रमाणात 45 टक्क्यांनी घट झाली आहे. मातामृत्यूचे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी ‘माता आरोग्य काळजी सेवे’चा विस्तार होणे आणि स्वेच्छेने कुटुंबनियोजन करणे आवश्यक आहे.

3.  विकसनशील देशांतील 22 कोटी 50 लाख महिला गर्भारपण टाळू इच्छितात; परंतु तरीही त्या संततीनियमनाची आधुनिक साधने वापरत नाहीत किंवा वापरू शकत नाहीत, ही बाब धक्कादायक आहे. शिवाय दहा लाख महिलांपैकी दहा महिलांना गर्भारपण आणि प्रसूतीच्यावेळी घ्यावयाच्या मूलभूत काळजीच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत.

अगदी अलीकडेच उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, गर्भारपण टाळण्याची इच्छा असलेल्या सर्व महिलांना संततीनियमनाची साधने उपलब्ध झाली असती आणि सर्वच गर्भवती आणि नवजात अर्भकांना योग्य काळजी पुरवली गेली असती, तर माता मृत्यूचे प्रमाण 67 टक्क्यांनी घटले असते. अनैच्छिक गर्भारपणाचे प्रमाण 70 टक्क्यांनी घटले असते आणि नवजात अर्भकांच्या मृत्यूच्या प्रमाणातही सुमारे 77 टक्क्यांनी घट झाली असती.

4.  कितीही प्रतिबंध केला गेला, तरीही जगभर सर्वत्रच बालविवाहाचे प्रमाण मोठे आहे. दररोज सुमारे 37 हजार बालविवाह होतात.

बालविवाहावर जगभर सर्वत्र बंदी घालण्यात आली असली, तरीही गरिबी आणि लिंगभेद यामुळे ही प्रथा टिकून आहे. ही त्रासदायक प्रथा बंद करण्यासाठी लिंगभेदाला कडक आळा घातला गेला पाहिजे. लिंग समानतेला प्रोत्साहन XoD$Z अतिदारिद्य्र नष्ट झाले पाहिजे. ही प्रथा नष्ट करण्यात मुलींचे सबलीकरण महत्त्वाची भूमिका बजावू शकते. मुलींना आपल्या मानवी हक्कांविषयीची माहिती समजली आणि त्यांना मूलभूत जीवनकौशल्ये आणि शिक्षण दिले गेले, तर बालविवाहाला त्या खूपच कमी प्रमाणात बळी पडतील.

5.  गर्भारपण आणि प्रसूती यांमधील गुंतागुंती हे विकसनशील देशांतील किशोरवयीन मुलींच्या मृत्यूचे दुसरे महत्त्वाचे कारण आहे.

विकसनशील देशांत 18 वर्षांखालील सुमारे 20 हजार मुली दररोज प्रसूत होतात. कित्येक मुली शारीरिकदृष्ट्या परिपक्व होण्याआधीच गर्भवती बनतात. गर्भारपण आणि प्रसूती यामुळे हजारो मुली दरवर्षी मरण पावतात. सन 1990 पासून किशोरवयीन मुलींच्या प्रसूतीमध्ये लक्षणीय घट झाली असली, तरीही याबाबतीतील स्थिती सगळीकडे सारखी नाही, तसेच याबाबतीत अद्याप बरेच काम व्हायचे आहे. बालविवाहाची प्रथा नष्ट करण्याबरोबरच मुलींची स्थिती सुधारणे आणि त्यांना माहिती मिळवण्याच्या सुविधा प्राप्त करून देणे या गोष्टी किशोरवयीन मुलींमधील गर्भारपण आणि गर्भारपणाशी संबंधित मृत्यू कमी करण्यासाठी आवश्यक आहेत.

6.  संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार आणि उपलब्ध आकडेवारीनुसार, या शतकाच्या अखेरीपर्यंत जागतिक लोकसंख्या ही जास्तीत जास्त 17 अब्जांपर्यंत किंवा कमीत कमी 7 अब्जांपर्यंत असेल.

प्रजननाचा दर किती झपाट्याने घटेल, त्यावर यातील बराचसा फरक अवलंबून असेल. कुटुंब लहान ठेवण्याच्या वाढत्या इच्छेपोटी आणि स्वेच्छेने केल्या जाणार्‍या संततीनियमनासाठी सुविधा प्राप्त होण्याच्या स्थितीत झालेल्या सुधारणेमुळे गेली कित्येक वर्षे प्रजननाचा दर घटत चालला आहे. 1970 च्या सुरुवातीला जन्मदर सरासरी प्रति महिला 4.5 मुले इतका होेता. सन 2014 पर्यंत ही सरासरी प्रति महिला 2.5 मुले इतकी कमी झाली आहे. या सगळ्या बाबींमधील घट लक्षात घेता संयुक्त राष्ट्रसंघाने लोकसंख्येच्या बाबतीत तीन संभाव्यता किंवा शक्यता सुचवल्या आहेत. सन 2100 पर्यंत 17 अब्ज एवढी जगाची लोकसंख्या असण्याची पहिली शक्यता त्यांनी वर्तवली आहे. दुसर्‍या शक्यतेनुसार जगाची लोकसंख्या सुमारे 7 अब्ज म्हणजेच साधारणपणे आजच्याएवढीच तेव्हाही असेल आणि तिसर्‍या शक्यतेनुसार या शतकाअखेरीस लोकसंख्या 11 अब्जापर्यंत राहील.

7.  सन 2005 पासून ‘एचआयव्ही’शी संबंधित मृत्यूंच्या प्रमाणात 35 टक्क्यांनी घट झाली आहे, परंतु ‘एचआयव्ही’मुळे किशोरवयीन मुलांच्या होणार्‍या मृत्यूंमध्ये खरे तर वाढ होत असल्याचे आकडेवारी दर्शविते.

जगभरात एच.आय.व्ही.मुळे होणार्‍या मृत्यूंच्या प्रमाणात घसरण होत आहे आणि त्याचबरोबर ‘एचआयव्ही’ची नवीन लागण होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे; परंतु तरीही तरुण लोक या आजाराला विशेषतः बळी पडत आहेत, ही धोकादायक आणि सावधगिरीची सूचना देणारी बाब आहे. किशोरवयीन मुलांना लैंगिक आणि प्रजननविषयक आरोग्याची सर्वसमावेशक माहिती पुरवणे, एच.आय.व्ही. संक्रमण रोखण्यास मदत करणार्‍या सेवा पुरवणे आणि ‘एचआयव्ही’बाधित लोकांना उपचार देणे याबाबतीत आणखी जास्त प्रमाणात काम केलेच पाहिजेत.

8.  महिलांच्या लैंगिक अवयवांचे नुकसान (Female Genital Mutilation-FGM) याबाबतीत काहीच उपाययोजना न केल्यास सन 2030 पर्यंत 15 ते 19 वयोगटांतील दीड कोटी मुली लैंगिक अवयवांच्या नुकसानीला बळी पडतील.

जागतिक स्तरावर असे आढळून आले आहे की, आज जीवित असलेल्या मुली आणि महिलांपैकी सुमारे 10 कोटी ते 14 कोटी मुली आणि महिला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या स्वरूपाच्या लैंगिक अवयव नुकसानीला बळी पडलेल्या आहेत. या प्रकारामुळे तीव्र यातना, संसर्ग, प्रसूतीदरम्यानच्या गुंतागुंती आणि इतर प्रतिकूल परिणाम होतात; परंतु आरोग्यावर आणि मानवी हक्कांवर होणार्‍या ‘एफजीएम’च्या परिणामांवर समाजसंवाद घडवून आणल्यानंतर कित्येक ठिकाणी (महिलांचे लैंगिक अवयव नुकसान करण्याशी संबंधित) घातक प्रथांवर बंदी घालण्यात आली आहे. ही प्रथा संपवण्यासाठी ‘द युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’ (UNFPA) आणि ‘द युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड’ (UNICEF) या दोन्ही संघटना संयुक्तपणे एकूण 15 प्रमुख देशांमध्ये काम करत आहेत. त्यामुळे सुमारे 12 हजार 357 समुदायांनी या प्रथेवर बंदी घालण्यास आपण वचनबद्ध असल्याचे सांगितले आहे.

9.  आधीच्या तुलनेत कितीतरी अधिक प्रमाणात सध्या लोक स्थलांतरित होत आहेत. सन 2013 मध्ये सुमारे 23 कोटी 20 लाख लोक आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थलांतरित झाले होते. सन 2000 मध्ये हेच प्रमाण 17 कोटी 50 लाख एवढे होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरचे निम्मे स्थलांतरित लोक फक्त 10 देशांत राहतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिका, रशियन संघराज्य, जर्मनी, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती ही स्थलांतरितांची अत्युच्च आवडीची ठिकाणे आहेत. मात्र, विकसनशील देशांतून विकसित देशांतच स्थलांतर केले जाते, (याला ‘दक्षिण-उत्तर स्थलांतर’ असे म्हणतात.) असे मानत असले, तरीही विकसनशील देशाअंतर्गत (याला दक्षिण-दक्षिण स्थलांतर असे म्हणतात.) होणार्‍या स्थलांतराचे प्रमाण त्याहूनही किंचितसे अधिकच आहे. छळ, शोषण आणि भेदभाव यांना स्थलांतरित लोक बळी पडू शकतात; परंतु ते ज्या देशांतून आलेले असतात आणि ज्या देशांत आलेले असतात, त्या दोन्ही देशांत ते महत्त्वाचा सहभाग देतात.

10. जागतिक लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोकसंख्या शहरी विभागात असून, आणखी कित्येक वर्षे तरी शहरीकरणाची लाट अशीच सुरू राहील. आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी शहरीकरणाची ही लाट आहे.

शहरीकरणामुळे भूप्रदेशाचे स्वरूप आणि जीवनशैली यांमध्ये मोठे बदल होतात. त्यामुळे रोजगार, अत्यावश्यक सेवा, तसेच शिक्षण अशा अनेक संधी मिळू शकतात; परंतु त्यांच्या बरोबरीनेच अनौपचारिक वस्त्या आणि झोपडपट्ट्या यांचीही असमान वाढ होते. शहरीकरणामुळे सर्वच रहिवाशांना लाभ मिळू शकेल, याची हमी देण्यासाठी आगामी काळाचा विचार करणार्‍या धोरणांची आवश्यकता आहे. विशेषतः शाश्‍वत विकास आणि मानवी हक्क यांना प्रोत्साहन देणार्‍या खास धोरणांची गरज आहे.

स्त्रोत - वनराई जुलै १५

अंतिम सुधारित : 3/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate