অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ठाण्याचे कौशल्य विकास केंद्र

ठाण्याचे कौशल्य विकास केंद्र

राज्य अधिस्वीकृतीची बैठक शेगावला झाली होती. तेथेच अनौपचारिकपणे कौशल्य विकास केंद्र ठाणे याचा उल्लेख झाला होता. ते मनात ठेऊन मी या केंद्राला भेट देण्याचे ठरविले. ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर उपक्रमशील जिल्हाधिकारी म्हणून ठाण्यात परिचित आहेत. कोणतीही चांगली कल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न आजही अनेक संकल्पनांमधून दिसून येतात. त्यातलीच एक म्हणजे कौशल्य विकास केंद्र, ठाणे होय.

परवा मुद्दाम वेळ काढून या केंद्राला भेट दिली. आणि मग लक्षात आलं, ठाणे जिल्ह्यातल्या विविध तालुक्यातल्या गरजू मुलांसाठी हे केंद्र म्हणजे रोजगाराची मोठी संधी आहे. खरं तर केंद्र बघण्याची खूप दिवसाची इच्छा होती. कोकण विभागीय आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी काही दिवसापूर्वी या केंद्राला भेट दिली होती आणि जिल्हाधिकाऱ्‍यांना विविध उद्योगांमध्ये या विकासकेंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना तात्काळ रोजगार मिळाला यासाठी उद्योगांमध्ये करार करण्याचे सांगितले होते. त्याचा चांगला परिणाम आता दिसून आला आहे. हे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचे उद्दिष्ट सांगतांना जिल्हाधिकारी कल्याणकर म्हणाले, “ठाणे जिल्ह्यातील सातही तालुक्यात व्यवसायाभिमुख अनेक खाजगी संस्था आहेत. त्या संस्था मुलांकडून मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण खर्च घेतात. मात्र शासनाचे एकही केंद्र नाही. म्हणून लक्षात आले की, येथे जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने केंद्र सुरु करावे. म्हणून याठिकाणी हे केंद्र सुरु केलं. या केंद्रात व्यक्तिमत्व विकास, मुलाखतींसाठी प्रात्यक्षिक, मुलाखतीची भाषा, सभ्याचार याचं प्रशिक्षण दिले जाते. गांवदेवी मंडईच्या इमारतीत दुसऱ्‍या मजल्यावर 10 हजार चौ.फुटावर हे केंद्र सुरु झाले. आज दहा महिन्यात या केंद्रातून अनेक विद्यार्थी बाहेर पडले आहेत. या केंद्रासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी टाटा हौसिंगने 35 लाख रुपये उपलब्ध करून दिले. त्यातून अत्याधुनिक असे सर्व सोयींयुक्त कौशल्य विकास केंद्र उभे राहीले.ʼʼ

ठाण्याच्या या केंद्रात अजून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. फॅशन डिझायनिंग, फिटर, प्लॅबिंग, हाऊस किपिंग, रेफ्रिजरेशन ॲड एअर कंडिशनिंग मेकॅनिक हे कोर्सेस शिकविले जात आहेत. मा.पंतप्रधान यांच्या कौशल्य विकास या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत सुरु करण्यात आलेले पूर्णपणे मोफत असलेले हे राज्यातले पहिलेच प्रशिक्षण केंद्र आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे "केंद्र शासनाच्या शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 मध्ये सुधारणा करण्यात आली. यामुळे महाराष्ट्रातील युवकांना जास्तीत जास्त अप्रेन्टिशिप देण्यात राज्याने आघाडी घेतली. कौशल्य विकास कार्यक्रमात आम्ही धोरणात्मक सुधारणा केल्या. त्यामुळे कौशल्य विकासासाचे प्रशिक्षण शेतकऱ्‍यांसाठी कृषी आणि संलग्न क्षेत्रात व्यवसाय प्रशिक्षण आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना मदत, तांत्रिक प्रशिक्षणास प्रोत्साहन यामुळे कौशल्य विकासात हा विभाग आघाडीवर आहे". याची प्रचिती या केंद्राला भेट दिल्यानंतर येत होती. शहापूरचा किशोर शिर्के, इतगपुरीचा निलम भोईर, कसाऱ्‍याचा संतोष आमले ही प्रातिनिधीक नावं या प्रशिक्षण केंद्रातील तरुणांची आहेत.

प्रशिक्षण केंद्राचे हे पहिले वर्ष आहे. अजून काही दिवस गेल्यानंतर या प्रशिक्षण केंद्रातले अनेक तरूण विविध उद्योगांमध्ये दिसतील. एखादी शासकीय योजना लोकाभिमुख करण्यासाठी अधिकाऱ्‍याच्या मनात सेवाभाव असेल तर काय होऊ शकते. याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. सुसज्ज कौशल्य विकास केंद्र उभे करणे शासनातही शक्य आहे. हे संपूर्ण राज्यात प्रथमच जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दाखवून दिले आहे. खरं तर हा ठाणे पॅटर्न उद्योग असणाऱ्‍या साऱ्‍याच जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा ठरावा.

कौशल्य विकास केंद्र उभे करणे म्हणजे केवळ प्रशिक्षण नाही. देशाच्या नवनिर्माणात युवा शक्तीला कौशल्यपूर्ण बनविणे हा उद्देश आहे. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, डिजीटल इंडिया, राष्ट्रीय सौरऊर्जा मिशन आणि स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी कौशल्य असणारे तरुण निर्माण करण्याची गरज लक्षात घेऊन केंद्रामध्ये प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून तरुणांना नवी दिशा देण्यात येत आहे. त्याचाच हा एक भाग आहे.

ठाण्याच्या या केंद्राला आतापर्यंत राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, अपर मुख्य सचिव एस.एस.संधू, तत्कालिन आयुक्त प्रभाकर देशमुख, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्य सेवा हक्क हमी आयुक्त स्वाधिन क्षत्रीय, मानव विकास आयुक्त भास्कर मुंढे, राज्य विधी मंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष श्री.सुरेश खाडे आणि सदस्य आ.किसन कथोरे आदिंसह अनेक मान्यवरांनी भेट दिली आहे.

पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा देण्याचा संकल्प जसा शासनाने केला. त्याच धर्तीवर आता अधिकाऱ्‍यांच्या संकल्पनेतून ठोस अशा योजना प्रत्यक्षात साकार होऊ लागल्याचे दिसते आहे. रिकाम्या हातांना कौशल्य पूर्ण असे काम मिळावे यासाठी ठाण्यातले कौशल्य विकास केंद्र एक आदर्श ठरणार आहे. कोणतेही काम उभे करताना ते विकासाचे, रोजगाराचे आणि कौशल्याचे प्रतिक ठरावे याच भावनेतून हे केंद्र उभे केल्याचे प्रत्येक ठिकाणी जाणवते. आधुनिक आणि लोकाभिमुख केंद्र म्हणून या केंद्राचे महत्व भविष्यात खूप मोठे आहे. या केंद्रात बराच वेळ चर्चा केल्यानंतर परतीचा मार्ग सुरु झाला. येथेच समजले की, या केंद्राची उपयुक्तता पाहून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सहकार्याने कल्याण येथे कौशल्य विकास केंद्र सुरु झाले आहे. ते पुढच्या वेळी पाहण्याचे मनात ठरवून मी बाहेर पडलो.

लेखक: डॉ.गणेश व.मुळे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate