অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फुटबॉलमय दिवसाविषयी...!

फुटबॉलमय दिवसाविषयी...!

उद्देश चांगला असेल आणि प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली तर ध्येय गाठताना कितीही अडचणी आल्या तरी त्या सहजतेने दूर होतात. या मिशनमुळे क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकात एक नवा जोश व उत्साह निर्माण झाला आहे. हा जोश, उत्साह व आत्मविश्वास कायम टिकवण्यासाठी नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी ‘चला खेळूया’ (Let’s Play) हा उपक्रम हाती घेतला आहे.यासंदर्भात नाशिक क्रीडा विभागाचे उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नाशिक विभागात कशाप्रकारे नियोजन करण्यात आले, याबाबत आपले अनुभव सांगितले.

आजची तरूण पिढी ही मैदानावर कमी आणि इंटरनेट, डिजिटल गॅझेटच्या मायाजालात अडकलेली आहे. कधी काळी ‘बस झालं खेळणं, आता घरी या’ म्हणणारे पालक आजकाल मुलांना लॅपटॉप, मोबाईल, कॉम्पुटर यासारख्या गॅझेटस् बाजूला ठेवून ‘बाहेर खेळायला जा’ सांगताना दिसतात. दिवसेंदिवस आजच्या पिढीचे बालपण मैदानी खेळापासून दूर जाताना पाहून त्यांना पुन्हा मैदानाकडे वळविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘फुटबॉल मिशन 11 मिलियन’ ची घोषणा केली. याच अनुषंगाने ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलियन’ या अभिनव क्रीडा उपक्रमाची घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केली. संपूर्ण महाराष्ट्र 15 सप्टेंबर, 2017 रोजी फुटबॉलमय होण्यासाठी नियोजनात्मकरितीने पावले उचलली गेली.

श्री. दुबळे यांनी ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलियन’ या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्र फुटबॉलमय करण्यासाठी क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनान्वये मंत्रालय-क्रीडा संचालनालय, विभागीय क्रीडा उपसंचालक- जिल्हा क्रीडा अधिकारी, शिक्षणाधिकारी या चार टप्प्यातील यंत्रणांना जबाबदारी निश्चित करून संकल्प पूर्ततेसाठी नियोजनाची सुरूवात झाली.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दहा लक्ष विद्यार्थी फुटबॉल खेळण्यासाठी निवडण्यात आलेल्या 30 हजार शाळांना एक लाख फुटबॉलचे वितरण करणे देखील एक आवाहन होते. फुटबॉल मिशनच्या यशासाठी सराव होणे देखील आवश्यक होते. त्यासाठी सर्वच ठिकाणी एकसमान जागा किंवा मैदान उपलब्ध असेलच असे नाही, हे लक्षात घेवून प्रत्येक ठिकाणी गोलस्पॉट ही उपलब्ध नसल्याने दोन फ्लॅग किंवा विटा रचूनही फुटबॉल खेळता येवू शकतो. त्यासाठी त्यांचा किमान आकार हा सर्वत्र सारखा असायला हवा अशा सूचना क्रीडामंत्री यांनी दिल्या. मिशन फुटबॉल यशस्वीतेसाठी प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचून काम करणे आवश्यक असल्याने राज्यातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी, तालुका क्रीडा अधिकारी, क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक व कर्मचारी कामाला लागले होते. यावरून एक आवर्जून सांगावेसे वाटते की, राज्यकर्त्यांनी एखादी गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने प्रयत्न केले तर नियोजित उपक्रम नक्कीच यशस्वी होतो.

केवळ फुटबॉल खेळाचे सामने आयोजित करून किंवा या खेळाला महत्व दिल्याने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा विकास होईल, असे नसले तरी वर्ल्डकप अंडर-१७ च्या माध्यमातून राज्यात क्रीडामय वातावरण निर्मितीस निश्चित हातभार लागेल. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या ‘क्रीडांगण विकास’ योजनेतून दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यास किमान 50 शाळांना क्रीडा साहित्य व 50 शाळांमध्ये क्रीडांगणे तयार करण्याचे उद्दिष्ट प्रस्तावित आहे. यामुळे शाळेत जाण्याच्या वयात मुलांना खेळांची आवड निर्माण होऊन ते डिजिटल गॅझेटच्या विळख्यातून काही प्रमाणात का असेना बाहेर पडण्यास मदत होईल.

वर्ल्डकप फुटबॉलच्या निमित्ताने 15 सप्टेंबर 2017 रोजी केवळ नाशिक विभागच नव्हे तर अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय झाला होता. यादिवशी फुटबॉलच्या सामन्यांसोबतच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचदिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे फुटबॉलला किक मारून या मिशनचा शुभारंभ केला. क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सर्वपक्षीय आमदारांना फुटबॉल मैदानावर आणले, मॅच खेळले व मुख्य म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॅचची कॉमेंट्री केली. यासारख्या घटना क्रीडा क्षेत्रासाठी निश्चितच भविष्यातही प्रेरणादायी ठरतील.

नाशिक क्रीडा विभागाविषयी सांगायचे झाले तर, नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यातून 1.16 मिलियन मुला-मुलींनी 15 सप्टेंबरला फुटबॉल महोत्सवात सहभागी होऊन एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. नाशिक विभागात नाशिक येथे फुटबॉल जिल्हा संघटनेच्या मदतीने विभागीय क्रीडा संकुल येथे मास्टर फुटबॉल ट्रेनर्स कॅम्पचे आयोजन करण्यात येवून निबंध, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य आयोजित करण्यात आली. जळगावमधील दर रविवारी भरत असलेल्या ‘फुटबॉल स्ट्रिट’ उपक्रमाच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’बाबत जनजागृती करण्यात आली. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन तसेच सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी खेळण्याचा आनंद लुटला. 15 सप्टेंबरला नंदुरबारमधील आदिवासी पाडे, आश्रमशाळांचे विद्यार्थी फुटबॉल खेळले व त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हे धडगांव/आक्राणी येथील आदिवासी पाड्यावर स्वत: उपस्थित होते. धुळ्यामध्ये मुलींच्या अल्पसंख्याक शाळेतील संघांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.

या उपक्रमासाठी ऑलिम्पियन धावपटू कविता राऊतसोबतच अनेक पुरस्कारप्राप्त पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी विभागीय क्रीडासंकुल येथे उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे. नाशिक विभागालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला फुटबॉलमय बनविण्यासाठी “घ्या हात हाती जोडू, नाती ध्येय ठेवू विशाल” हे फुटबॉल गीत नाशिकचे क्रीडा शिक्षक राजेंद्र सोमवंशी यांनी रचून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्येही अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात 2.5 मिलियन विद्यार्थी या फुटबॉल मिशनमध्ये सहभागी झाले होते. त्यात नाशिक विभागातील 1.16 मिलियन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विक्रम नोंदविला आहे.

इतिहासतज्ज्ञ बाबासाहेब पुरंदरे म्हणतात, वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नसतात. त्याची प्रचिती या मिशनमध्ये काम करताना जाणवल्याचे डॉ.दुबळे यांनी सांगितले.

उद्देश चांगला असेल आणि प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली तर ध्येय गाठताना कितीही अडचणी आल्या तरी त्या सहजतेने दूर होतात. अशा मिशन फुटबॉलला यशस्वी करण्यासाठी नाशिक विभागातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा अधिकारी, तालुका क्रीडा अधिकारी यांनी मोलाचा सहभाग नोंदविला आहे. या मिशनमुळे क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकात एक नावा जोश व उत्साह निर्माण झाला आहे. हा जोश, उत्साह व आत्मविश्वास कायम टिकविण्यासाठी आयुक्त महेश झगडे यांनी ‘चला खेळूया’ (Let’s Play) हा उपक्रम हाती घेतला आहे.

-शब्दांकन: अर्चना देशमुख

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 4/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate