অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बालकांमधील निर्मळता गावात, शाळेत, वर्गात येण्याची गरज- विनोद तावडे,

बालकांमधील निर्मळता गावात, शाळेत, वर्गात येण्याची गरज- विनोद तावडे,

  1. प्रश्न- बाल स्वच्छता अभियानांतर्गत 17 नोव्हेंबरला राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ मी या अभियानाविषयी माहिती द्याल का ?
  2. प्रश्न- महाराष्ट्रातील काही गावांमध्ये आज शैाचालये नाहीत. त्यामुळे शौचालय नसलेल्या गावातील मुलांनी काय करायचे ?
  3. प्रश्न- पाणी हे शुद्ध करून पिणे गरजेचे असल्याचे विद्यार्थ्यांना कळणे किती गरजेचे आहे ?
  4. प्रश्न- १९ नोव्हेंबरला शौचालय दिवस साजरा केला जाणार आहे. त्यादिवशी नेमके काय काम केले जाणार आहे ?
  5. प्रश्न- प्रत्येक शाळेत आपण विद्यार्थ्यांमधून स्वच्छतादूत निवडणार आहोत. स्वच्छतादुतांनी विद्यार्थ्यांना नेमके कसे प्रोत्साहन देणे अपेक्षित आहे ?
  6. प्रश्न- शासन नेहमीच चांगल्या योजना राबवित असते. मात्र, शासनाच्या योजनांची अंमलबजावणी कशी होते, यावर त्‍याची यशस्विता ठरलेली असते. त्यामुळे या योजनेचा आढावा आपण घेणार आहोत का ?
  7. प्रश्न - पाच दिवसांच्या उपक्रमातून स्वच्छतेचे धडे गिरविल्यास स्वच्छता पहायला मिळेल. मात्र, हे अभियान यशस्वी झाल्यानंतर ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया कायम ठेवण्यासाठी काही अभियान राबविणार आहात का ?
  8. प्रश्न- या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील बालकांना काय आवाहन कराल ?
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आकाशवाणीवर दिलखुलास हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारीत करण्यात येतो. या कार्यक्रमात दिनांक 15 नोव्हेंबर 2014 रोजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या शिबानी जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा सारांश... (भाग-2)

प्रश्न- बाल स्वच्छता अभियानांतर्गत 17 नोव्हेंबरला राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ मी या अभियानाविषयी माहिती द्याल का ?


उत्तर- १४, १५, १७, १८ आणि १९ नोव्हेंबरला हे अभियान राबविले जाणार आहे. याअंतर्गत १७ तारखेला स्वच्छ मी हे मुलांसाठीचे वैयक्तिक स्वच्छतेचे अभियान राबविले जाणार आहे. मुलांनी मातीतील खेळ खेळणे आवश्यक आहे. विटीदांडू खेळताना विटीदांडू एखाद्या आडरानात पडल्यास तिथे जाऊन उचलली पाहिजे. त्यावेळी त्याच्या हाताला, पायाला घाण लागणे स्वाभाविक आहे. त्याची त्याने स्वच्छता केली पाहिजे. यासोबतच बालकांनी स्वतःची खोलीही स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. अस्वच्छतेमुळे डेंग्युचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. किशोरवयीन मुला-मुलींच्या शरीरात काही बदल पहायला मिळतात. यासाठी पालक आणि शिक्षकांनी त्यांच्या शरीरात होणारे बदल व त्याविषयीची स्वच्छता याविषयी सांगणे गरजेचे आहे. केवळ किशोरवयीन मुलेच नव्हे तर मुलांनाही याविषयीची माहिती देणे गरजेचे आहे. यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांचा मनमोकळा संवाद वेळेत सुरू होण्याची गरज आहे. यासाठी शिक्षकांनीही संवाद साधण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये होणारे संभाव्य आजार टाळता येणार आहेत.

प्रश्न- महाराष्ट्रातील काही गावांमध्ये आज शैाचालये नाहीत. त्यामुळे शौचालय नसलेल्या गावातील मुलांनी काय करायचे ?


उत्तर- महाराष्ट्रातील गावागावांमध्ये शैाचालये व्हावीत, हा सरकारचा आग्रह राहिला आहे. त्यासाठी आपण टीव्हीवर याविषयीची जागृती करणाऱ्‍या जाहिराती पाहतो. वाशिम जिल्ह्यातील एका महिलेने शौचालयासाठी आपले मंगळसूत्र गहाण टाकण्याची तयारी दर्शविली. यातून जनजागृती होत असल्याचे दिसून येते. यासोबतच वेगवेगळ्या माध्यमातून जगजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. १८ नोव्हेंबरला स्वच्छ पाणी हे अभियान राबविले जाणार आहे. मुलांना वाटते की पावसाचे पाणी स्वच्छ असते. मात्र, त्यांना हे पटवून देणे गरजेचे आहे की, पावसाचे पाणी हे प्रदूषण, जंतू घेऊन जमिनीवर पडत असते. हे पाणी गावांमध्ये तुरटीने स्वच्छ केले जाते. तर एखाद्या नगरपालिकेत जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून ते शुद्ध केले जाते. अशा जलशुद्धीकरण केंद्रास शाळांना भेट देणे आवश्यक आहे. यातून पाणी स्वच्छ करून पिणे आवश्यक आहे, हे विद्यार्थ्यांना कळेल.

प्रश्न- पाणी हे शुद्ध करून पिणे गरजेचे असल्याचे विद्यार्थ्यांना कळणे किती गरजेचे आहे ?


उत्तर- अनेक आजार हे दूषित पाण्याने होतात, हे विद्यार्थ्यांना कळणे महत्त्वपूर्ण आहे. अलीकडेच इचलकरंजीत झालेला कावीळ हा आजार प्रदूषित पाण्यामुळे झाला आहे. कारखान्याचे प्रदूषित पाणी हे तसेच नदीत सोडले जाते. ते पाणी पिल्याने रोगांचे प्रमाण वाढले आहे. दररोज आपल्या घरी येणारे पाणी हे स्वच्छ असतेच असे नाही. त्यात क्षार, जंतू असण्याची शक्यता असते. या सर्वांची माहिती हळुहळू विद्यार्थ्यांना झाल्यास विद्यार्थी जागरूक होऊन स्वच्छतेविषयी दक्षता घेतील.

प्रश्न- १९ नोव्हेंबरला शौचालय दिवस साजरा केला जाणार आहे. त्यादिवशी नेमके काय काम केले जाणार आहे ?


उत्तर- १९ नोव्हेंबरला जागतिक शौचालय दिवस आहे. यादिवशी शौचालयाचा वापर आणि स्वच्छतेबाबत उद्बोधन होणे आवश्यक आहे. अनेकवेळा घरात किंवा गावात शौचालय असते. मात्र पाणी कमी असते. त्यामुळे उघड्यावर शौच करण्यास घरचे सांगतात. मात्र, उघड्यावर शौच करण्याचे परिणाम काय आहेत, याविषयी जाणीवजागृती होणे आवश्यक आहे. यासोबतच शाळेतील शौचालय हे स्वच्छ असणे आवश्यक आहे. शाळेतील शौचालय हे आपले असून त्याच्या स्वच्छतेची काळजी घेण्याचे संस्कार शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर करणे आवश्यक आहे.

प्रश्न- प्रत्येक शाळेत आपण विद्यार्थ्यांमधून स्वच्छतादूत निवडणार आहोत. स्वच्छतादुतांनी विद्यार्थ्यांना नेमके कसे प्रोत्साहन देणे अपेक्षित आहे ?


उत्तर- प्रत्येकच शाळेतून स्वच्छता पाळणाऱ्या काही विद्यार्थ्यांची निवड स्वच्छतादूत म्हणून केली जाणार आहे. हे विद्यार्थी गावात स्वच्छतेविषयी जागृती करणार आहेत. शाळेतील मोजक्याच विद्यार्थ्यांची या मोहिमेसाठी निवड होणार असल्यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ होऊन स्वच्छतेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी स्वच्छतादूताची संकल्पना राबविण्यात येणार आहे.

प्रश्न- शासन नेहमीच चांगल्या योजना राबवित असते. मात्र, शासनाच्या योजनांची अंमलबजावणी कशी होते, यावर त्‍याची यशस्विता ठरलेली असते. त्यामुळे या योजनेचा आढावा आपण घेणार आहोत का ?


उत्तर- मी या अभियानाचा दररोज आढावा घेत आहे. राज्यातील ७०० गटशिक्षणाधिऱ्यांशी व्हीडियो कान्फरन्सिंगने हे अभियान कसे राबविण्यात येईल, याविषयी विस्तृत चर्चा केली आहे. या सर्व बाबींचा ऑनलाईन मी आढावा घेणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये राबविण्यात येणार हे स्वच्छता अभियान विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांचे सहकार्य अपेक्षित आहे. हे अभियान यशस्वी होणार असून स्वच्छता अभियान महाराष्ट्र देशात अव्वल क्रमांकावर येईल.

प्रश्न - पाच दिवसांच्या उपक्रमातून स्वच्छतेचे धडे गिरविल्यास स्वच्छता पहायला मिळेल. मात्र, हे अभियान यशस्वी झाल्यानंतर ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया कायम ठेवण्यासाठी काही अभियान राबविणार आहात का ?


उत्तर- सध्या राबविण्यात येत असलेले अभियान हे काही दिवसांपुरते मर्यादित असलेले अभियान नाही. गेले महिना-दीड महिना, विविध शिक्षण अधिकारी या अभियानासाठी परिश्रम घेत आहे. या सर्व अभियानातून शालेय अभ्यासक्रमात यातील काही गोष्टी समाविष्ट करता येतील का, हे ही पाहण्यात येणार आहे. शालेय पाठ्यक्रमाबरोबरच वेगळ्या काही प्रयोगाच्या माध्यमातून हा विषय पोहोचविता येईल का, हेही पाहण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांला सहज पटेल, रुचेल आणि त्याच्या मनावर बिंबवल्या जाईल, यासाठी येत्या काळातही स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

प्रश्न- या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील बालकांना काय आवाहन कराल ?


उत्तर- बालकांना कुठलेही आवाहन करण्याची गरज असल्याचे मला वाटत नाही. बालके ही निर्मळ असतात. हीच निर्मळता गावात, शाळेत, वर्गात येण्याची गरज आहे. असे झाले तर निर्मळ भारत निर्माण होईल. यातून स्वच्छ भारताचे स्वप्न साकार होईल.

 

माहिती स्रोत: महान्यूज, सोमवार, १७ नोव्हेंबर, २०१४

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate