অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भिंग भाषेचे : अर्थाची लपवाछपवी

भिंग भाषेचे : अर्थाची लपवाछपवी

सभ्य भाषा. असभ्य भाषा. खळाळती भाषा.
लवणारी भाषा. ‘हरकती’ घेत प्रवाही
राहणारी भाषा... भाषा हा विषयच रोचक
आणि चिंतनाला उद्युक्त करणारा. मराठी
भाषेचा विविध अंगांनी वेध घेत,त्यात होणारे
बदल टिपत, त्यावर आपले मत नोंदवत
विचारप्रवृत्त करणारं हे सदर. अभ्यासू
लेखिका आणि कवयित्री नीलिमा गुंडी
यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेलं...

आपण भाषा अगदी लहानपणापासून सतत वापरत असतो. वेगवेगळ्या क्षेत्रात आपण वेगवेगळ्या कारणांसाठी भाषा वापरत असतो. तरीही तिच्या अंगच्या नाना कळा आपल्याला पूर्णपणे कळलेल्या असतातच असे नाही. उदाहरण द्यायचे तर भाषेत शब्द आणि अर्थ यांच्या लपंडावाचा अनेकदा चालू असणारा खेळ अशा ‘नाना कळांपैकीच एक’ होय.

भाषेमुळे संवाद साधणे, अभिव्यक्त होणे हे जितक्या प्रमाणात घडत असते, तितक्याच प्रमाणात भाषेतून अर्थ लपवणे हेही साध्य होत असते. एका ऑङ्गिसमध्ये अशी एक पद्धत होती - ऑङ्गिसमध्ये भेटायला आलेल्या व्यक्तीला जर खराखरच चहा द्यायचा असेल तर शिपायाला ‘अण्णाचा चहा आण’ असे सांगायचे. याउलट जर चहा द्यायचा नसेल तर शिपायाला ‘नानाचा चहा आण’ असे सांगायचे! ‘नानाचा चहा’ या शब्दातच दोनदा नकार असे, म्हणजे ‘चहा अजिबात आणू नको’ असा गुप्त संदेश असे! पाहुणा चहाची वाट पाहून कंटाळून निघून जात असे!

भाषेत चालू असलेल्या अर्थाच्या लपवाछपवीचे असे अनुभव अनेकदा येतात. एकदा आम्ही काही मंडळी एका ओळखीच्या ठिकाणी गेलो होतो. तिथे एक तान्हे मूल होते. आमच्यापैकी कुणीतरी पटकन म्हणाले, ‘बाळ अगदी आत्यावर दिसतंय!’ त्यावर मुलीची आई पटकन म्हणाली, ‘काहीतरी काय! वन्संचं नाक अगदी चाङ्गेकळीसारखं आहे ही तर बेटी नकटी आहे!’ तिने ज्या वेगाने आणि ज्या सुरात साम्याची शक्यता ङ्गेटाळून लावली, त्यामुळे तिच्या शब्दांच्या दर्शनी अर्थाविषयी आमच्या मनात प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. तिला नणंदेच्या सरळ नाकाचे कौतुक असण्यापेक्षा आपलं मूल दुसर्‍या कुणावर (आणि त्यातही नणंदेवर!) जाण्याची कल्पनाच सहन झाली नाही की काय; असा प्रश्‍न पडला.

‘तुला हवं तसं कर’, हे वरवर साधे दिसणारे वाक्य वेगवेगळ्या प्रसंगात, वेगवेगळ्या दोन व्यक्तींच्या संदर्भात किती वेगवेगळे ठरू शकते! समजा पहिला प्रसंग असा आहे- परस्परांशी चांगला संवाद असलेले वडील आणि मुलगा यांच्यात अत्यंत समाधानाच्या प्रसंगी हे वाक्य वडील मुलाला म्हणत आहेत. अर्थातच हे वाक्य दोघांमधला विश्वास, मोकळेपणा व्यक्त करणारे ठरते. समजा, असे एक घर आहे ज्यात वडील पारंपरिक वृत्तीचे आहेत आणि तरूण मुलगा स्वतंत्र बाण्याचा आहे. त्यामुळे दोघांच्यात तणावपूर्ण वातावरण आहे. अशावेळी वडील मुलाला तेच वाक्य म्हणत आहेत. यावेळी वाक्य तेच असले तरी त्यातून ‘राग, उपरोध, स्वत:ला किंमत न उरल्याची वेदना’ असा भाव व्यक्त होईल. ‘शिंग ङ्गुटली ना आता तुला! तू थोडंच माझं ऐकणार आहेस!’ असा कानी न पडणारा पण मनाला ऐकू येणारा संवाद त्या वाक्याच्या आसपास घोटाळत असू शकतो. त्यामुळे वरवर निरुपद्रवी दिसणारे ते वाक्य बरेच काही लपवू शकत असते.

एकदा एक बाई माझ्याकडे तिच्या सासूचे कौतुक करीत होती. सासू कशी प्रेमळ आहे, घरकामात कशी मदत करते वगैरे वगैरे. पण प्रत्येक वेळी तिचे एक पालुपद होते. ते म्हणजे - ‘खोटं कशाला बोला!’ त्यामुळे ती म्हणायची ते असे - ‘खोटं कशाला बोला! त्यांचा स्वभाव अगदी मोकळा आहे.’ असे तिचे सारखे चालू होते. मला प्रश्‍न पडला की हिला सासूचे मनापासून कौतुक वाटत आहे की सासूचे कौतुक करावे लागत आहे, याचे शल्य वाटत आहे?

भाषेच्या या स्वभावामुळे साहित्यिकांपुढे लेखन करताना आव्हाने निर्माण होतात. भाषेचा प्रसंगी ‘आत एक बाहेर एक’ करण्याचा स्वभाव प्रज्ञा दया पवार यांनी सूक्ष्मपणे हेरला आहे. त्यांच्या ‘अङ्गवा खरी ठरावी म्हणून’ या कथासंग्रहात त्या लिहितात : ‘मी भाषेतल्या खर्‍याचा शोध घेतेय. आणि भाषा ही माझ्यासाठी ङ्गारच पेचाची गोष्ट बनून गेलीय. मग ती दोन माणसांमधली असो की समष्टीतली.’’ त्यांच्या कथेतल्या निवेदकाचे हे शब्द आहेत. कवी नामदेव ढसाळ यांनीही ‘प्रत्यक्षाला आहे एक छिद्र’ या कवितेत मार्मिकपणे म्हटले आहे ;
‘‘आपण स्वत:ला जसे पाहत आलो
आणि इतर माणसे जशी पाहतात आपणाला
यात खूपच आहेत भाषेच्या मधुर अडचणी’’
एकंदरीत भाषेबाबतच्या व्यवहारात नेहमीच सावध असावे लागते. अगदी बोलणार्‍याने ‘आपला प्रत्येक शब्द खरा आहे’, अशी कायदेशीर शपथ घेतली असली तरीही!
----
डॉ. निलिमा गुंडी
३, अन्नपूर्णा, १२५९, शुक्रवार पेठ,
सुभाष नगर, पुणे - ४११००२
ङ्गोन - ०२० २४४८६०१५
nmgundi@gmail.com

स्त्रोत: मिळून साऱ्याजणी

 

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate