অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भिंग भाषेचे : परिभाषेतील शब्दसंपदा

भिंग भाषेचे : परिभाषेतील शब्दसंपदा

सभ्य भाषा. असभ्य भाषा. खळाळती भाषा.
लवणारी भाषा. ‘हरकती’ घेत प्रवाही
राहणारी भाषा... भाषा हा विषयच रोचक
आणि चिंतनाला उद्युक्त करणारा. मराठी
भाषेचा विविध अंगांनी वेध घेत,त्यात होणारे
बदल टिपत, त्यावर आपले मत नोंदवत
विचारप्रवृत्त करणारं हे सदर. अभ्यासू
लेखिका आणि कवयित्री नीलिमा गुंडी
यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेलं...

मराठी भाषा ही ज्ञानभाषा म्हणून समर्थपणे घडविण्याचे आव्हान असल्याचे दरवर्षी मराठी भाषादिनाच्या निमित्ताने आपल्या लक्षात येते. ज्ञानभाषा या नात्याने भाषेचा विकास होण्यासाठी विविध ज्ञानक्षेत्रांशी संबंधित विषयांचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन करण्यासाठीची सामग्री मराठीत लिखित स्वरूपात हवी. त्यासाठी अर्थातच अनेक विषयांशी संबंधित परिभाषा तयार असणे गरजेचे आहे. राज्यशासनाच्या भाषा संचालनालयातर्ङ्गे मराठीमध्ये वास्तविक अनेक प्रकारचे परिभाषाकोश प्रकाशित झालेले आहेत. पण त्यांचा वापर कितपत होतो हा प्रश्‍नच आहे.

परिभाषेतील शब्दसंपदा म्हणजेच ‘संज्ञा’ या अर्थदृष्ट्या काटेकोर असतात. आशय नेमकेपणाने समजण्यासाठी त्यांचा विवक्षित ठिकाणी तोलून मापून वापर करावा लागतो. अनेकदा संज्ञा नव्याने घडवाव्याही लागतात. समाजजीवनात जसजसे बदल घडतात, तसतसे परिभाषेचे क्षेत्रही बदलत जाते. त्यात नवे संदर्भ आणि नव्या संज्ञा यांचा समावेश होत जातो. जसे संगणकाशी संबंधित परिभाषा घडवण्याचे मोठेच आव्हान आज आपल्यापुढे आहे.

चळवळींच्या माध्यमातून येणारे नवे भानही नव्या पारिभाषिक संज्ञांची निर्मिती करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. याचे उदाहरण म्हणजे स्त्रीवादी चळवळीमुळे मराठीमध्ये ‘लिंगभाव’ ही स्वतंत्र संज्ञा ‘जेंडर’ या इंग्रजी संज्ञेसाठी वापरली जाऊ लागली. ‘सेक्स’ आणि ‘जेंडर’ या इंग्रजीतील दोन स्वतंत्र संज्ञांसाठी ‘लिंग’ही मराठीतील एकच संज्ञा अपुरी आहे हे लक्षात येत गेले. त्यातून ‘लिंगभाव’ही स्त्रीपुरुष समतेसाठी पायाभूत अशी संकल्पना व्यक्त करणारी संज्ञा स्वीकारली गेली. येथे ‘समता’ या संज्ञेचा उल्लेख आला. ‘समता’ या ऐवजी ‘समानता’ - ‘स्त्रीपुरुष समानता’ असेही वाचायला, ऐकायला मिळते. समता आणि समानता या संज्ञा ढोबळपणे समानार्थी मानल्या जातात. पण सूक्ष्मपणे विचार केला तर ‘समान’ या शब्दाचा दाते-कर्वे कोशात दिलेला एक अर्थ ‘हुबेहूब एकसारखे’ असाही आहे.

त्यामुळे स्त्रीपुरुष समता ही संज्ञा अधिक अर्थपूर्ण ठरते. नव्या संकल्पनांसाठी अर्थपूर्ण पारिभाषिक संज्ञा काही वेळा दुसर्‍या भाषेतून आयात केल्या जातात. आपण विज्ञानविषयक परिभाषेत काही इंग्रजी संज्ञा आपण आजही वापरतो. ‘कल्चर’ साठी इतिहासाचार्य राजवाडे यांनी तयार केलेला ‘संस्कृती’ हा शब्द आपल्याकडे मान्यता पावला. हा शब्द मराठीतून बांगला भाषेत गेला कारण रवींद्रनाथ टागोर यांना तो शब्द आवडला आणि त्यांनी तो वापरायला सुरुवात केली. याउलट ‘अस्मिता’ हा शब्द आपण गुजराती भाषेतून घेतला. (तेथे आपली भाषिक अस्मिता आड आली नाही!)

पारिभाषिक संज्ञेला विशिष्ट ज्ञानक्षेत्राशी निगडित असा विवक्षित अर्थ असतो. नुकतेच ‘संदर्भांसहित स्त्रीवाद’ (संपादक वंदना भागवत, अनिल संकपाळ, गीताली वि.मं.) हे पुस्तक हाती पडले. त्याची अर्पणपत्रिका आहे - ‘मैत्रीसाठी, करुणेसाठी, मुदितेसाठी, उपेक्षेसाठी’ - त्यावर धर्मानंद कोसंबी यांचे एक अवतरण दिले आहे. अर्पणपत्रिकेतील संज्ञा या बौद्ध तत्त्वज्ञानाशी निगडित आहेत. धर्मानंद कोसंबी यांच्या अवतरणामुळे हे लक्षात यावे असे संपादकांना अपेक्षित आहे. अर्पणपत्रिकेतील ‘उपेक्षेसाठी’ हा शब्द सर्वसामान्य अर्थाने घेतला तर वाचक बुचकळ्यात पडणार! पण बौद्ध तत्त्वज्ञानात ‘उपेक्षा’ ही संज्ञा ‘तटस्थता’ या अर्थाने वापरली जाते. आता अर्थ नीट लागतो.

काही संज्ञा सतत चर्चेत राहतात. मराठी समीक्षेत ‘रोमँटिक’ या संज्ञेसाठी ‘सौंदर्यवादी’ म्हणावे की ‘निर्भरशील’ म्हणावे, की ‘रोमँटिक’च म्हणावे; हा पेच जाणवतो. ‘आर्ट्स’ या विद्याशाखेसाठी आपण‘कला शाखा’ ही संज्ञा वापरतो. पण भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर त्यासाठी ‘मानव्य शाखा’ ही संज्ञा वापरतात. ही संज्ञा या शाखेची प्रतिष्ठा वाढवणारी आहे. पण अजूनही ती रूढ झालेली नाही.

आपल्याकडे एकोणिसाव्या शतकात भाषांतरयुग आले. तेव्हापासून पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी विविध परिभाषांची गरज जाणवू लागली. सुरुवातीला विज्ञानक्षेत्रातील परिभाषा निर्मितीचे काम करण्यासाठी हरी केशवजी पाठारे यांनी पुढाकार घेतला होता. आजही अनेकजण या कामात व्यग्र आहेत. काही वेळा जुन्या संज्ञांऐवजी कालांतराने नव्या संज्ञा येतात. उदाहरणार्थ पूर्वी ‘ऍटम’ साठी परमाणू आणि ‘मोलिक्युल’साठी ‘अणू’ या संज्ञा रूढ होत्या. नंतर ‘अणू’ आणि ‘रेणू’ अशा संज्ञा अनुक्रमे वापरात आल्या. असे बदल क्वचित होत राहतात.

आपण विशिष्ट क्षेत्र आणि संज्ञा यांची जरी सांगड घालत असलो, तरी या संज्ञांना मराठी साहित्याचे विशाल अंगण शेवटी खुले असते, हे खरे! त्याचा अनुभवही येतो. भालचंद्र नेमाडे यांच्यासारखे प्रतिभावंत कवी ‘ऊर्ध्वपातन’ ही विज्ञानातील पारिभाषिक संज्ञा निर्मितीच्या प्रक्रियेचे स्वरूप दर्शविण्यासाठी कवितेत वापरून जातात नि लिहितात : ‘‘रोजच्या जगण्याचे ऊर्ध्वपातन होऊन त्याची निदान एक ओळ झाली पाहिजे.’’
अशा प्रकारे ज्ञानक्षेत्रातल्या पारिभाषिक संज्ञाही ‘रूपक’ म्हणून इतरत्र आढळू शकतात!
----
डॉ. नीलिमा गुंडी
स्थिरभाष ः ०२०-२४४८६०१५
nmgundi@gmail.com

स्त्रोत: मिळून साऱ्याजणी

 

अंतिम सुधारित : 3/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate