অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भिंग भाषेचे : संबोधन : भाषेचे भावबंधन

भिंग भाषेचे : संबोधन : भाषेचे भावबंधन

सभ्य भाषा. असभ्य भाषा. खळाळती भाषा.
लवणारी भाषा. ‘हरकती’ घेत प्रवाही
राहणारी भाषा... भाषा हा विषयच रोचक
आणि चिंतनाला उद्युक्त करणारा. मराठी
भाषेचा विविध अंगांनी वेध घेत,त्यात होणारे
बदल टिपत, त्यावर आपले मत नोंदवत
विचारप्रवृत्त करणारं हे सदर. अभ्यासू
लेखिका आणि कवयित्री नीलिमा गुंडी
यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेलं...

भाषा ही सामाजिक संस्था असल्यामुळे तिच्यातील लहानसहान घटकही महत्त्वाचे असतात. संबोधन हा असाच एक घटक आहे. दैनंदिन व्यवहारात एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीला, तसेच कारणानिमित्त अनेकांना साद घालण्याची वेळ येते. त्यासाठी भाषेत संबोधने असतात.

नातेसंबंधात आपण हाक कशी मारतो याला फार महत्त्व असते. त्यातून नात्याचा पोत लक्षात येत असतो. म्हणूनच संबोधन हे भाषेचे भावबंधनच ठरते. रमाबाई रानडे यांच्यावरील ‘उंच माझा झोका’ या मालिकेत न्यायमूर्ती रानडे आपल्यापेक्षा वयाने खूप लहान असलेल्या पत्नीला ‘अहो रमाबाई’ अशी हाक मारत. एकोणिसाव्या शतकात सुधारकांच्या मनात तरळत असलेली स्त्रीविषयीची प्रेमादरयुक्त प्रतिमा त्यातून व्यक्त होई. ती प्रतिमा त्यांच्या समकालीन वास्तवात सहज सामावणारी नव्हती.

आपल्याकडे जुन्या काळच्या संस्कृत नाटकांमध्ये पत्नी पतीला ‘आर्यपुत्र’ (सासर्‍याचा मुलगा) असे संबोधन वापरत असे. मात्र प्रत्यक्षात स्त्रिया प्राकृतमध्ये बोलत असत. त्यामुळे त्या ‘अय्यउत्त’ असे म्हणत असत. त्यानंतर काळ बदलला. आज काही घरांमध्ये तरी त्याची जागा ‘अरे’ या संबोधनाने घेतली आहे. स्त्रीपुरुष यांच्यातील समता समाजात सर्वत्र रुजण्यासाठी अजूनही काही काळ जावा लागेल असे वाटते.

समता हे मूल्य मनात ठेवून संबोधन वापरताना आपल्या भाषेतला पेचही आडवा येतो. मराठीत आदरार्थी अनेकवचन रूढ आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तीला ‘अरे’ म्हणणे प्रशस्त मानले जात नाही. सादाला प्रतिसाद कसा मिळतो, हे सांगताना ‘अरे’ला ‘कारे’ करणे, हा वाक्प्रचार वापरला जातो. त्यातून समाजमनाची घडण कळते. आपण जिव्हाळ्याने वापरलेले एकेरी संबोधन अनोळखी व्यक्तीला अकारण सलगी करणारे वाटू शकते, वा स्वत:ला कमी लेखले असेही त्याला वाटू शकते. त्यामुळे ओळख झाल्यानंतर सहजपणे येणारी एकेरी संबोधने नाते प्रस्थापित करायला हातभार लावतात.

संबोधनांमध्ये खाजगीपणाचा अंशही असतो. प्रिय व्यक्तीसाठी एखादे खास संबोधन वापरण्याची सवय अनेकांना असते. अनेक आत्मचरित्रे, तसेच प्रकाशित झालेला खाजगी पत्रव्यवहार वाचताना हे लक्षात येते. उदाहरणच द्यायचे तर कवयित्री शांतादेवी तडवी या आपल्या पतीला ‘दे’ (देवाप्रमाणे याअर्थी) असे संबोधन वापरत, तर त्यांचे पती त्यांना ‘शा’ असे संबोधन वापरत. शांताबाईंनी ‘संधिप्रकाश’ या आपल्या आत्मचरित्रात हे नमूद केले आहे. विविध साहित्यप्रकारांमध्येही संबोधनांच्या निर्मितीला कलात्मकदृष्ट्या महत्त्व असते. वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘नटसम्राट’ नाटकातील नायक आप्पासाहेब बेलवलकर आपल्या पत्नीला ‘सरकार’ असे संबोधन वापरतात. ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.

संबोधन हा सामाजिक शिष्टाचाराचा भाग आहे, हेही विसरता येत नाही. पु.ल. देशपांडे यांनी ‘अपूर्वाई’मध्ये एक प्रसंग नोंदवला आहे. इंग्लंडला जाण्यापूर्वी ते एका इंग्रजी उपहारगृहात गेले होते. ‘गोर्‍या माणसाने आम्हाला ‘सर’ म्हणायचा तो पहिलावहिला प्रसंग होता’ असे त्याविषयीचे पुलंचे भाष्य आहे. आपले एकेकाळचे राज्यकर्ते असलेल्या इंग्रजांविषयी आपल्या मनात असलेली अढीमिश्रित कौतुकाची भावना त्यातून नेमकी व्यक्त होते.

सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही वक्ता श्रोत्यांसाठी कोणते संबोधन वापरतो, यावर त्याला श्रोत्यांकडून मिळणारा प्रतिसाद अवलंबून असतो. त्यामुळेच ‘सभ्य स्त्रीपुरूष हो’ अशा कृत्रिम संबोधनांऐवजी श्रोत्यांशी भावनिक जवळीक साधणारे बंधू-भगिनींनो’ हे संबोधन आपल्याकडे रूढ झाले आहे. समोरच्या श्रोत्यांच्या मनोभूमिकेची नस हेरून हजरजबाबी वृत्तीतून संबोधन योजण्याची कल्पकता काहींनी दाखवल्याचेही आपण वाचत असतो. त्याचे एक उदाहरण देते. आचार्य अत्रे हे तरूण वयात नव्याने शिक्षक म्हणून रूजू झाले. तेव्हा वर्गातल्या विद्यार्थ्यांनी नव्या शिक्षकाला त्रास द्यायचा या त्यांच्या शिरस्त्यानुसार सिंहगर्जना केली. त्याबरोबर ‘गुडमॉर्निंग लायन्स’ असे संबोधन वापरून अत्र्यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली होती. भाडणांमध्ये संबोधनांना वेगळाच रंग चढतो. तिथे सामाजिक शिष्टाचाराची भीडमुर्वतच राखली जात नाही. उलट संबोधनांच्या जागी शिव्यांची लाखोली कानी पडते!

एकंदरीत, संबोधन हे संवादाची नांदी ठरणारे असते. संवाद निकोप राखण्यासाठी संबोधने नेटकेपणे वापरावी लागतात. संबोधने योजताना व्यक्तिगत जिव्हाळा आणि सामाजिक शिष्टाचार याचंा तोल साधणे उभयपक्षी हिताचे असते.
----
डॉ. निलिमा गुंडी
३, अन्नपूर्णा, १२५९, शुक्रवार पेठ,
सुभाष नगर, पुणे - ४११००२
ङ्गोन - ०२० २४४८६०१५
nmgundi@gmail.काम

 

स्त्रोत: मिळून साऱ्याजणी

अंतिम सुधारित : 8/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate