অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराष्ट्राच्या ‘रन’रागिणी...

महाराष्ट्राच्या ‘रन’रागिणी...

नुकत्याच इंग्लंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद मिळविल्याबद्दल भारतीय महिला क्रिकेट चमूचा अभिनंदन ठराव एकमताने विधीमंडळात मंजूर करण्यात आला. महाराष्ट्राच्या पूनम राऊत (मुंबई), स्मृती मानधना (सांगली) व मोना मेश्राम (नागपूर) यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या तीन रनरागिणींना राज्य शासनाकडून प्रत्येकी 50 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. महिला विश्वचषक स्पर्धेचे उपविजेतेपद आणि महाराष्ट्रातील लोकांकडून होणारे स्वागत याविषयी या तिघींनी व्यक्त केलेल्या भावना...

भारतीय महिला संघात सलामीवीर असलेली पूनम राऊत महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले म्हणून आनंदात आहे. पण इतक्या जवळ पोहोचून विजेतेपद मिळवू न शकल्याचे दु:ख असल्याची भावना पूनमने व्यक्त केली. पूनम सांगते की, आज क्रिकेट हा अतिशय लोकप्रिय खेळ आहे. अजूनही पुरुषांचे क्रिकेट सामने पहायला होणारी गर्दी पाहता भारतात क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे हे सिध्द होते. पण आज आमच्या महिला भारत संघाला मिळालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपविजेतेपदामुळे महिला क्रिकेट सामने पाहण्यासाठीही प्रेक्षकांची तितकीच गर्दी यापुढील काळात होईल असा मला विश्वास वाटतो.

भारतीय क्रिकेट संघात स्वत:चे स्थान निर्माण करणाऱ्या पूनम राऊतला यश हे सहजासहजी मिळालेले नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन पूनम इथपर्यंत पोहोचली आहे. मुंबईत सव्वा दोनशे स्क्वेअर फूटच्या घरात राहणाऱ्या पूनमचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. आपल्या आई वडिलांविषयी सांगताना पूनम सांगते की, माझे वडील एका खासगी शाळेत ड्रायव्हरचे काम करतात. तर आई गृहिणी आहे.... जेव्हा क्रिकेट खेळायला मी सुरुवात केली तेव्हा क्रिकेटचं साहित्य विकत घेऊन देण्याचीही माझ्या पालकांची परिस्थिती नव्हती. आणि याही परिस्थितीत माझ्या पालकांनी माझ्यातले गुण हेरले आणि मग माझा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला. आज मी एक क्रिकेटर म्हणून सर्वांसमोर आली आहे पण आता उत्तरोत्तर माझ्या यशाचा आलेख उंचावत राहावा आणि भारतासाठी अनेक विजेतेपद मिळवून देण्यात माझा खारीचा वाटा असावा अशीच कामगिरी करण्याचे माझे ध्येय यापुढील काळात राहील.

महाराष्ट्र संघाची कॅप्टन असणारी स्मृती मानधाने महिला विश्वचषक स्पर्धेत केलेली वैयक्तिक कामगिरी कौतुकास्पद आहे. क्रिकेटमध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करुन एक आक्रमक फलंदाज म्हणून स्वतःभोवती एक वलय तयार करण्यात स्मृती मानधना यशस्वी ठरली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारी स्मृती सांगते की, मूळची सांगलीची आहे. सांगलीतल्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयात मी शिकले. वयाच्या नवव्या वर्षांपासून मी क्रिकेट खेळते आहे. क्रिकेट हे आता माझे पॅशन बनले आहे. क्रिकेटमध्ये रनिंग, बोलिंग आणि बँटीग बरोबर महत्त्वाचे असते ते फिल्डिंग. मला क्षेत्ररक्षणात पारंगत असल्याचे म्हटले जाते तेव्हा खूप आनंद होतो. गेल्या अनेक वर्षापासून मी क्रिकेट खेळते आहे. माझ्या बाबतीत माझ्या खेळाचे वैशिष्ट्य असे म्हणता येईल की, मी उजव्या हाताने लेखन करते पण तिच्या वडिलांनी आणि ट्रेनरनी मला जाणिवपूर्वक डावखुरी फलंदाज बनवले. यामुळे आज मला त्याचा फायदाच होतो आहे. जिल्हा, राज्य, राष्ट्रीयस्तरावर मी खेळले असून आता आंतरराष्ट्रीय संघात मी खेळत आहे याचा आनंद आहे. क्रिकेटचा वारसा मला माझ्या वडिलांकडून मिळाला असून माझे वडील हे निष्णात क्रिकेटपटू आहेत. पण व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना हा क्रिकेट फार काळ पुढे खेळता आला नाही. माझ्या भावामध्ये त्यांनी क्रिकेटर होण्याचे स्वप्न पाहिले. भावाला प्रशिक्षण देताना नकळत मला देखील क्रिकेटचे वेड कधी लागले हे कळले नाही. क्रिकेटचे प्रशिक्षण मी सांगलीतच सुरु केले. सांगलीच्या छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये मी क्रिकेटचा सराव करीत असे. आज महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मिळालेले यश आणि उपविजेतेपद पाहता आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण झाल्याची भावना आहे.

आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू मोना मेश्राम ही मुळची विदर्भातली. विश्वकप स्पर्धा आणि या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव अदभूत असल्याचे मोना सांगते. विश्‍वकप जिंकणे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. आमच्या सर्वांचीही हीच मनापासून इच्छा आहे. भारत महिला संघाने आतापर्यंत अनेक छोट्यामोठ्या स्पर्धा व मालिका जिंकल्या. पण आपला देश अजूनही विश्‍वविजेता होऊ शकला नाही याची खंत आहे. पण आगामी काळात होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघ शानदार कामगिरी करेल असा विश्वास आहे. मोनाच्या सांगते की, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. यात दोन-तीन खेळाडूंवर अवलंबून राहता येत नाही. सर्व अकरा खेळाडूंनी चांगली कामगिरी करेल विजय मिळविता येऊ शकतो. क्रिकेटमध्ये विश्वचषक जिंकणे हे कोणालाही आवडते. आमचा भारतीय संघ सुध्दा या विश्वचषकाला गवसणी घालायची या उद्देशानेच खेळत होता. पण आम्हाला उपविजेत्यापदावर समाधान मानायला लागले. पण हे उपविजेतेपद आम्हाला सांघिक प्रयत्नामुळे मिळाले आहे. यापुढील काळातही भारताला अधिकाधिक विजेतेपद मिळवून देण्याचे आम्हा सर्व खेळाडूंचे स्वप्न आहे. खरे तर खेळामध्ये वातावरण खूप मोठी भूमिका बजावते. पण प्रत्येक खेळाडूला तेथील वातावरणाबरोबर जुळवून घ्यावेच लागते. क्रिकेटमध्ये खेळाडूला बॅटिंग टेक्निक आणि फिटनेसवर यावर अधिकाधिक लक्ष द्यावे लागते. आजच्या महिला क्रिकेटविषयी बोलताना मोना सांगते की, क्रिकेटमध्ये महिलांचा सहभाग अनेक वर्षांपासून आहे. मात्र अलीकडे महिला क्रिकेट सामन्यांची चर्चा होत आहे ही बाब आनंदाची आहे. अलीकडे विविध वाहिन्यांवर महिला क्रिकेट सामन्यांचे प्रक्षेपण होत असल्याने आमच्या सारख्या खेळाडूंना प्रेक्षक नावाने ओळखतात ही आनंदाची बाब वाटते. इंग्लंडसोबत झालेल्या विश्वचषकातील अंतिम सामन्यामुळे आम्हा सर्वांना एक नवी ओळख मिळाली असून ही ओळख आपल्या कामगिरीने टिकवून ठेवण्याचे आमच्या सर्व खेळाडूंसमोरील आव्हान आहे.

लेखिका: वर्षा फडके

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate