অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राष्ट्रगीत म्हणजे राष्ट्राभिमानच !

राष्ट्रगीत म्हणजे राष्ट्राभिमानच !

जन-गण-मन हे भारताचे राष्ट्रगीत. खरं म्हणजे, आपण बहुतेक सर्वजण नकळत्या वयापासूनच जन-गण-मन हे गीत आपल्या देशाचे राष्ट्रगीत म्हणूनच गात आलो आहोत. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला ध्वजारोहण करताना हे गीत आवर्जून गायले/वाजवले जाते. आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांत भारताला जेव्हा कधी सुवर्णपदक मिळते तेव्हा मध्यभागी असलेला भारताचा तिरंगा याच गीताच्या सुरांबरोबर उंच-उंच फडकत जाताना आपण सर्वांनी ताठ मानेने पाहिलेला असतो. चित्रपटगृहात खेळाच्या सुरूवातीला आपण सर्वजण उभे राहून या गीताद्वारेच देशाच्या राष्ट्रध्वजाला मानवंदना देतो. जन गण मन… हे शब्द कानावर येताच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावते. राष्ट्रगीताचा अभिमान प्रत्येकालाच असतो. आजवर वेगवेगळ्या पद्धतीचे राष्ट्रगीत अनेक चित्रपटगृहांमध्ये आपल्याला ऐकायला आणि पहायला मिळालेले आहे. आता याच राष्ट्रगीताला एक अनोखा म्युझिकल टच मिळाला आहे. 12 ज्येष्ठ संगीतकारांनी सूर साज दिलेले, फक्त सुरांचे राष्ट्रगीत तयार करण्यात आले आहे. हेच राष्ट्रगीत आता देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाच्या सुरुवातीला वाजवले जाणार आहे.
देशातील 12 ज्येष्ठ संगीतकारांनी सूर साज दिलेल्या राष्ट्रगीताचा लोकार्पण सोहळा काल (10 फेब्रुवारी) मुंबईतील सिटीलाईट सिनेमा येथे आयोजित करण्यात आला होता. या लोकार्पण सोहळ्यास सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजचे संचालक अनिरुद्ध धूत, दिग्दर्शक सर्वश्री महेश मांजरेकर, अभिजित पानसे, महेश लिमये, अमेय खोपकर, मनवा नाईक, निशांत देशमुख, अवधूत वाडकर, शेखर ज्योती आदी मान्यवर उपस्थित होते. ‘राष्ट्रगीत राष्ट्रहित’ ही संकल्पना आणि त्याचे दिग्दर्शन अभिनेता पुष्कर श्रोत्री यांचे आहे.
राष्ट्रभक्ती आणि राष्ट्राबद्दलचा प्रत्येक देशवासियाला असलेला अभिमान दाखविण्याची संधी खरे तर राष्ट्रगीतातून मिळते. म्हणूनच प्रत्येक भारतीय राष्ट्रगीत सुरू झाले की असेल त्या जागी स्तब्ध होतो. राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रगीत हे फक्त १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी या दिवसांपुरतेच मर्यादित न राहता, ते आपल्या सर्वांच्याच मनात दरदिवशी जागृत राहिले पाहिजे. प्रत्येक भारतीयांच्या मनात दैनंदिन जीवनात राष्ट्रभक्ती असणे आवश्यक आहे. खरे तर सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीत वाजविले जात असताना ते 52 सेकंदापेक्षा कमी आणि 56 सेकंदापेक्षा जास्त नसावे असा नियम आहे. हा नियम या नव्याने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रगीताने पूर्ण पाळला आहे.
काही वर्षांपासून महाराष्ट्रसह देशातील सर्व सिनेमागृहांत सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीताची धून वाजवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र प्रत्येक सिनेमागृहात एकच राष्ट्रगीत वाजवले जात नव्हते. आता १२ ज्येष्ठ संगीतकारांनी सूरसाज दिलेले राष्ट्रगीत सिनेमागृहांमध्ये वाजविले जाणार आहे. या राष्ट्रगीताचे वैशिष्ट्य म्हणजे, या राष्ट्रगीताला आता शास्त्रीय साज मिळाला आहे.
जगविख्यात भारतीय संगीतकारांनी शास्त्रीय सुरावटीवर साकारलेले राष्ट्रगीत आता महाराष्ट्रातील सर्व सिनेमागृहांमध्ये दाखवले जाणार आहे. हरिप्रसाद चौरसिया, विश्वमोहन भट, उस्ताद झाकीर हुसेन, उस्ताद अमजदअली खाँ, शिवकुमार शर्मा आदींना सोबत घेऊन वाद्यांचा उत्कृष्ट मेळ साधत हे राष्ट्रगीत बनवण्यात आले आहे. या राष्ट्रगीताचे वैशिष्ट्य म्हणजे ताल आणि लय वेगवेगळ्या वाद्यांचा वापर करून हे म्युझिकल राष्ट्रगीत तयार केले आहे. मुंबईच्या आजीवासन स्टुडिओमध्ये राष्ट्रगीताचे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. कृष्ण-धवल स्वरूपातील हे राष्ट्रगीत असून शेवटी फडकणारा राष्ट्रध्वज आपल्याला रंगीत दिसणार आहे.
यापूर्वी सिनेमागृहांमध्ये वाजविलेले राष्ट्रगीत गायलेल्या स्वरुपातील होते. आता मात्र या नवीन राष्ट्रगीतात केवळ संगीत (म्युझिक) असून ते सुरू झाल्यानंतर त्याचे सूर ऐकताच त्या सुरांवर आपण राष्ट्रगीत बोलू लागतो.
हे नवे राष्ट्रगीत ५६ सेकंदांचे आहे. राष्ट्रगीतासाठी एकत्र आलेल्या या प्रसिद्ध 12 कलाकारांनी यासाठी कोणतेही मानधन घेतले नाही.
हे सुरांचे राष्ट्रगीत देशाला लोकार्पण करीत असताना सिटीलाईट चित्रपटगृहाच्या पडद्यावर ते सुरू झाले आणि या सिनेमागृहात जमलेले सर्व मान्यवर, कलाकार आणि उपस्थित या राष्ट्रगीतांच्या सुरांमध्ये हरवून गेले..... 

-वर्षा फडके

-माहिती स्रोत: महान्यूज, बुधवार, ११ फेब्रुवारी, २०१५.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate