অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी

देशाच्या विकासात लष्कराची भूमिका महत्त्वाची आहे. तिन्ही सैन्यदलासाठी प्रशिक्षीत सैनिकी अधिकारी निर्माण करण्याच्या उद्देशाने, 1954 साली खडकवासला, पुणे येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए (National Defence Academy) ची स्थापना करण्यात आली. सैनिकी अधिकाऱ्यांना येथे देण्यात येणारे प्रशिक्षण सर्वोत्कृष्ट असून आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त आहे. भारतासह विदेशातील विद्यार्थ्यांना येथे सैनिकी प्रशिक्षण देण्यात येते. या प्रबोधिनीतील 132 व्या तुकडीचा पदवी प्रदान व दीक्षांत संचलन सोहळा (passing out parade) पार पडला. त्यानिमित्ताने प्रबोधिनीवर माहितीपर लेख...

दुसऱ्या महायुध्दानंतर युध्द शास्त्रामध्ये आमूलाग्र बदल झाला. आधुनिक युध्द शास्त्राचा वायुदल, नाविक दल आणि सैन्य दलाला सराव व्हावा, यासाठी प्रशिक्षीत सैनिकी अधिकारी तयार करण्यासाठी देशपातळीवर खडकवासला, पुणे येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली. ‘सेवा परमो धर्म:’ अर्थात ‘service before self’ हे या संस्थेचे ब्रीद वाक्य आहे.

बारावी (10+2) अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना, केंद्रीय लोक सेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या परिक्षेद्वारे येथे प्रवेश मिळतो. या परिक्षेचा समावेश, जगातील मोजक्या, उत्तीर्ण होण्यासाठी कठीण परिक्षांमध्ये करण्यात येतो. येथील अभ्यासक्रम तीन वर्ष कालावधीचा असून हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जवाहरलाल नेहरु विश्वविद्यायातर्फे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येते. सहा महिने कालावधीची एकूण सहा सत्रे येथे विद्यार्थ्यांना पूर्ण करावी लागतात. येथील अभ्यासक्रमात विज्ञान, संगणक विज्ञान व कला या विद्या शाखांच्या अभ्यासक्रमांबरोबरच सैनिकी शिक्षणाचा समावेश आहे. सैनिकी शिक्षणाबरोबरच खडतर प्रशिक्षण विद्यार्थ्यांना पूर्ण करावे लागते. प्रबोधिनीत देण्यात येणारे प्रशिक्षण, जागतिक पातळीवरील अशाप्रकारच्या प्रशिक्षण संस्थांच्या तुलनेत अत्यंत आव्हानात्मक आहे. कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावरच प्रबोधिनीतील प्रशिक्षण पूर्ण करता येते. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता वाढावी याबरोबरच साहस आणि नेतृत्वगुण तयार होण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच शारीरिक शिक्षण, जलतरण, हॉर्स रायडींग, शुटींग, नेविगेशन, कवायत, युध्दशास्त्राचे सखोल प्रशिक्षण देण्यात येऊन सर्वोच्च व्यावसायिक योग्यता असलेले सैनिकी अधिकारी येथे तयार करण्यात येतात. येथील प्रशिक्षणानंतर उत्तीर्ण विद्यार्थी, एअर फोर्स ॲकेडमी हैद्राबाद, इंडियन मिलीटरी ॲकेडमी डेहराडून येथे एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर सैन्यामध्ये दाखल होतात. प्रबोधिनीतून आतापर्यंत सुमारे 35 हजार प्रशिक्षीत सैनिकी अधिकारी बाहेर पडले आहेत. येथून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले काही सैनिकी अधिकारी, कालांतराने भारतीय वायु दल, नौदल आणि सैन्यदलाचे प्रमुख झाले आहेत.

पदवी प्रदान सोहळा आणि दीक्षांत संचलन

प्रबोधिनीतील 132 व्या तुकडीने तीन वर्षाचा अभ्यासक्रम नुकताच पूर्ण केला. त्यानिमित्त अत्यंत शिस्तबध्द पद्धतीने आयोजित केलेल्या सोहळ्यामध्ये या तुकडीतील, 308 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यात सहा परदेशी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पदवी प्रदान सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी शिस्तबध्द आणि नेत्राद्दीपक संचलनाने विद्यार्थ्यांना प्रबोधिनीतून निरोप देण्यात आला. या संचलनात 313 कॅडेट सहभागी झाले होते. यामध्ये 211 कॅडेट लष्काराचे, 34 कॅडेट नौदलाचे आणि 67 छात्र वायुदलातील होते. याशिवाय 11 परदेशी कॅडेट सहभागी झाले होते. संचलनाच्या देखण्या पार्श्वभूमीवर, ‘हम एनडीएके कॅडेट है’, ‘सारे जहाँ से अच्छा’ आणि ‘देशोंका सरताज है भारत’, या धून ऐकताना मन प्रसन्न झाले होते. प्रबोधिनीच्या खेत्रपाल परेड ग्राऊंडवर हा सोहळा पार पडला. शैक्षणिक आयुष्य संपवून, देशकार्यासाठी पुढे नेणाऱ्या या क्षणाची वाट प्रत्येक विद्यार्थी आतुरतेने बघत असतो. दीक्षांत संचलन एक अविस्मरणीय सोहळा असतो. त्याची प्रत्यक्ष पाहणी करणे हा प्रत्येकाने आयुष्यभर साठवून ठेवावा असा क्षण असतो.

लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती

दीक्षांत संचलनानंतर लष्काराच्या लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कवायती करण्यात आल्या. तिरंग्यासह सेनादलांच्या ध्वजाचे चित्ता हेलिकॉप्टरने सूंदर प्रदर्शन केले. सुखोई, सुपर डिमोना विमानांनी ऊंच आकाशात सूर मारत, लक्षवेधक कवायती केल्या. त्यानंतर सारंग हेलिकॉप्टरच्या चमूने डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या कवायती आकाशात केल्या. फ्रंट फॉर्मेशन, डायमंड फॉर्मेशन, लाईन असर्टन फॉर्मेशन, सिंक्रोनाईज स्टाल टर्नम क्रॉस, क्रॉसओव्हर ब्रेक याप्रकारच्या कसरती, यावेळच्या दीक्षांत संचलनाच्या प्रमुख आकर्षण ठरल्या.

या दीक्षांत सोहळ्याला निमंत्रितानी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यामध्ये लहान मुले, महाविद्यालयीन तरुणांचा मोठा सहभाग होता. दीक्षांत संचलन पाहून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून बाहेर पडणाऱ्या तरुणांच्या चेहऱ्यावर, भविष्यात संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षणासाठी दाखल होऊन देशसेवा करण्याचा भाव स्पष्टपणे दिसून येत होता.

लेखक: जयंत कर्पे,

माहिती सहायक,

जिल्हा माहिती कार्यालय,

पुणे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 3/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate